
नियमपंथी न बनता पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न कसा करावा
10/09/2026
येशू हा नवा दावीद आहे
22/09/2026एकेश्वरवाद म्हणजे काय?
मानवजात ही स्वभावतःच असाध्यरीत्या धार्मिक आहे. संपूर्ण जगभरात, लोक अनेक मुख्य जागतिक धर्मांपैकी एकाचे, आणि त्या धर्मांमधून सातत्याने निघणाऱ्या असंख्य पंथांचे, किंवा अगदी अद्याप नोंदणीकृत न झालेल्या धार्मिक पद्धतींचे अनुसरण करतात. प्रत्येक धर्म ज्याला आपण “परम सत्य” म्हणू शकतो, जे सर्व अस्तित्वाचे उगमस्थान आहे, त्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे समेट साधण्याचा प्रयत्न करतो. या परम सत्याची संकल्पना एकतर व्यक्तिरहित मानली जाते, जसे की अनेक पौर्वात्य धर्मांमध्ये, किंवा एका व्यक्तिमत्त्व असलेल्या देवाची किंवा अनेक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेल्या देवांची उपासना करणाऱ्या धर्मांप्रमाणे व्यक्तिरूप अशी केली जाते.
वैयक्तिक असलेल्या परम सत्याची उपासना करणाऱ्या धर्मांचे आपण एकेश्वरवाद, हेनोथीझम (एकदेवनिष्ठावाद) किंवा बहुईश्वरवाद यांचे समर्थन करणारे धर्म म्हणून वर्गीकरण करू शकतो
ईश्वरवादाचे प्रकार
एकेश्वरवाद समजून घेण्यासाठी आपल्याला त्याची व्याख्या तसेच ईश्वरवादाच्या इतर प्रकारांची व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. एकेश्वरवाद (मोनोथीझम) हा शब्द ग्रीक शब्द मोनोस (“एक, एकल, एकमेव”) आणि थिओस (“देव”) यांपासून आला आहे, आणि तो असे मानतो की केवळ एकच खरा देव अस्तित्वात आहे आणि त्याचीच उपासना केली पाहिजे. बहुधा सर्वात प्रसिद्ध एकेश्वरवादी धर्म हे तथाकथित अब्राहमिक धर्म आहेत—ख्रिस्ती धर्म, यहुदी धर्म आणि इस्लाम.
बहुईश्वरवाद, (पॉलीथीझम) हे नाव ग्रीक शब्द पॉलिस, म्हणजे अनेक, आणि थिओस यांपासून आले आहे. जो धर्म बहुईश्वरवादाचे समर्थन करतो, तो एकापेक्षा जास्त देवांची उपासना करणारा धर्म असतो. अनेक लोक प्राचीन ग्रीस आणि रोममधील झ्यूस, अथेना आणि मार्स यांच्यासह अनेक देवांच्या बहुईश्वरवादी धर्मांशी परिचित आहेत. आज आपल्याला हिंदू धर्माच्या काही प्रकारांमध्ये आणि चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्स, ज्याला मॉर्मोनिझम असेही म्हणतात, यामध्ये बहुईश्वरवाद पाहायला मिळतो. बहुईश्वरवादी विश्वास अनेकदा व्यवहारात हेनोथीझम बनतात.
हेनोथीझमचा उपासक इतर कनिष्ठ देवांचे अस्तित्व न नाकारता एका सर्वोच्च देवाची उपासना करतो. हा शब्द ग्रीक शब्द हेन, म्हणजे एक, आणि थिओस यांपासून आला आहे. बहुईश्वरवादी धर्म अनेकदा त्यांच्या दैवतांपैकी एका दैवतेवर इतरांपेक्षा अधिक महत्त्व देऊन हेनोथीझमचे रूप धारण करतात. उदाहरणार्थ, काही हिंदू लोक इतर देवांपेक्षा ब्रह्मा, शिव किंवा विष्णू यांच्यावर स्वतःला समर्पित करतात.
एकेश्वरवादाचे प्रकार
जरी सर्व एकेश्वरवादी मानतात की केवळ एकच खरा देव आहे, तरी हा एक व्यक्तिरूप देव कशा प्रकारे अस्तित्वात आहे आणि तो कोण आहे, यावर सर्व एकेश्वरवादी सहमत नाहीत. मूलतः, एकेश्वरवादाचे दोन प्रकार आहेत: युनिटेरियनिझम (एकत्ववाद) आणि ट्रिनिटेरियनिझम (त्रैक्य परमेश्वरवाद ).
युनिटेरियनिझम असे प्रतिपादन करते की एकच दैवी तत्त्व आहे. म्हणजे देव म्हणून जो आहे ते ज्यामुळे आहे असे स्वरूप, आणि त्या तत्त्वात एकच दैवी व्यक्ती अस्तित्वात आहे. यहुदी धर्म आणि इस्लाम ही युनिटेरियन एकेश्वरवादाचे समर्थन करणाऱ्या धर्मांची उदाहरणे आहेत. या प्रत्येक धर्मात, देव हा एकच व्यक्ती आहे जो सर्व गोष्टींपूर्वी एकटाच अस्तित्वात होता. निर्मितीपूर्वी त्याचा कोणाशीही संबंध नव्हता कारण त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी इतर कशाचेही अस्तित्व नव्हते. इतर व्यक्तींशी प्रेम आणि सहभागिता यांचे नाते ठेवणे हे, म्हणूनच, देव कोण आहे याच्या मूलभूत स्वरूपाचा भाग नाही. परिणामी, इस्लामसारखे धर्म प्रत्यक्षात असे शिकवत नाहीत की मानव देवाशी वैयक्तिक नातेसंबंधात राहू शकतात. देवाला अनेकदा इतका परात्पर मानले जाते की तो आपल्या सृष्टीजवळ कोणत्याही अर्थपूर्ण रीतीने कधीही येणार नाही.
दुसरीकडे, त्रैक्य परमेश्वरवाद (ट्रिनिटेरियनिझम) असे सांगतो की केवळ एकच दैवी तत्त्व आहे परंतु या तत्त्वामध्ये तीन सार्वकालिक भिन्न व्यक्ती विद्यमान आहेत. एकेश्वरवादाचे हे स्वरूप केवळ खऱ्या ख्रिस्ती धर्मामध्येच अद्वितीय आहे, जो कबूल करतो की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तीन व्यक्तींमध्ये एकच देव आहे. कारण हे तिघे एकच खरे देव आहेत, म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे दैवी तत्त्व पूर्णपणे आहे. असे नाही की प्रत्येक व्यक्ती देवाचा एक तृतीयांश हिस्सा आहे आणि एक देव मिळवण्यासाठी तुम्ही त्या तिघांना एकत्र जोडता. त्याऐवजी, प्रत्येक व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे देव आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या गुणांमध्ये इतरांसारखीच आहे. म्हणून, पित्याचे सामर्थ्य पुत्राच्या सामर्थ्यासारखेच आहे आणि ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासारखेच आहे. पित्याचे ज्ञान पुत्राच्या ज्ञानासारखेच आहे आणि ते पवित्र आत्म्याच्या ज्ञानासारखेच आहे. हे सर्व दैवी गुणांच्या बाबतीत खरे आहे.
एका देवातील तीन व्यक्ती तत्त्वाने एकच आहेत, तरी त्या त्यांच्या वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांमध्ये किंवा उत्पत्तीच्या संबंधांच्या बाबतीत भिन्न आहेत—आणि केवळ याच एका मार्गाने त्या भिन्न आहेत. पिता हा सार्वकालिकपणे अनन्य आहे, पुत्र हा पित्यापासून सार्वकालिक अनन्य आहे, आणि पवित्र आत्मा हा पिता आणि पुत्र यांकडून आला आहे (याहोवाचे साक्षीदार या पाखंडी मताप्रमाणे नव्हे, तर योहान 15:26 मध्ये सांगितल्याप्रमाणे). ही वैशिष्ट्ये तत्त्वाचे विभाजन न करता त्या व्यक्तींमध्ये भेद दर्शवितात. परिणामी, देव अनादिकालापासून एकाच तत्त्वात तीन व्यक्ती म्हणून अस्तित्वात आहे, आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी सार्वकाळ एकमेकांवर प्रेम केले आहे. देव परात्पर आहे आणि म्हणूनच आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, परंतु तो स्वभावाने संबंध जोडणारा देखील आहे आणि त्याने स्वेच्छेने आपल्या जवळ येण्याचे ठरविले आहे. तो आपल्या सर्वात जवळ तेव्हा आला जेव्हा पित्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मानव-प्रकृतीचे स्वरूप धारण करण्यासाठी आपला एकुलता एका अनन्य पुत्र ह्याला पाठवले. हा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो एकच व्यक्ती असून पूर्णपणे देव आणि पूर्णपणे मनुष्य आहे.
निष्कर्ष
एकेश्वरवाद अशी पुष्टी करतो की केवळ एकच खरा देव आहे, परंतु वेगवेगळ्या एकेश्वरवादी धर्मांची या एका खऱ्या देवाविषयी वेगळी समज आहे. आपल्याला माहीत आहे की एकमेव खरा देव वास्तविकपणे पवित्र त्रैक्य आहे. खरा देव तत्त्वाने एक आणि व्यक्तीत्त्वांनी तीन आहे—पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. ख्रिस्ती लोकांचा बाप्तिस्मा या एका देवाच्या त्रैक्य नावाने केला जातो जेणेकरून ते त्याचे गौरव करतील आणि सर्वकाळ त्याचा आनंद घेतील (मत्तय 28:18–20).
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.




