
येशू हा नवीन मंदिर आहे
05/11/2026
मुलांसाठी करारशास्त्र: एक प्राथमिक मार्गदर्शन
12/11/2026देवाचे वचन ऐकणाऱ्या लोकांचे 6 प्रकार
माहितीने भरलेल्या या जगात असंख्य आवाज आपले लक्ष वेधून घेतात. तरीही या गदारोळात देवाच्या वचनापेक्षा अधिक महत्त्वाचा दुसरा कोणताही शब्द नाही, ज्याला स्तोत्रकर्त्याने “मधापेक्षा गोड” म्हटले आहे (स्तोत्रसंहिता 119:103). याच्या प्रकाशात, याकोबाचे पत्र 1:22-25 एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करते: आपण देवाच्या वचनाला कसा प्रतिसाद देतो? आपण फक्त ऐकतो की आपल्या आयुष्यात त्याचे लागूकरण करतो?
याकोब आज्ञा देतो, “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.” (याकोब 1:22). ऐकण्याच्या गरजेला तो कमी लेखत नाही; उलट, तो आपल्या वाचकांना “ऐकावयास तत्पर” राहण्याचा सल्ला देतो (याकोब 1:19). तथापि, याकोब अशा लोकांच्या धोकादायक आत्मफसवणुकीचा पर्दाफाश करतो, जे असे समजतात की केवळ देवाचे वचन ऐकणे म्हणजे खरी आध्यात्मिकता होय. तो असा युक्तिवाद करतो की खरा विश्वास कृतीत, म्हणजे आपण ऐकतो त्या सत्याने आकार घेतलेल्या जीवनात, प्रकट होतो (याकोब 2:14-17).
याकोब केवळ ऐकणाऱ्याची तुलना अशा माणसाशी करतो, जो आरशात आपले डाग पाहिल्यानंतर निघून जातो आणि आपण काय पाहिले ते विसरून जातो (याकोब 1:23-24). हे रूपक देवाचे वचन लागू न करता ते ऐकण्याचा दुःखद मूर्खपणा प्रभावीपणे दर्शवते. या ठिकाणी आरसा म्हणजे स्वतः देवाचे वचन आहे. ते आपले पाप उघड करते, आपली खरी आत्मिक स्थिती प्रकट करते आणि आपल्याला ख्रिस्ताकडे नेते, जो आपल्याला क्षमा करण्यास आणि आपल्या सर्व पापातून शुद्ध करण्यास सक्षम असलेला एकमेव आहे. वचन ऐकणे, पण पश्चात्ताप आणि विश्वासाच्या त्याच्या पाचारणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्याने दिलेली कृपा तुच्छ लेखणे आणि आपल्या पापशैलीत कुठलाही बदल न करताच जीवन जगणे होय.
याकोबाची चेतावणी आपल्याला स्वतःचे परीक्षण करण्याचे आमंत्रण देते. आपण कशा प्रकारचे ऐकणारे आहोत? देवाच्या वचनाला मिळणाऱ्या निरनिराळ्या प्रतिसादांचे प्रतिनिधित्व करणारे असे ऐकणाऱ्यांचे 6 प्रकार येथे दिले आहेत:
1. श्रीमान अंधळे
हा ऐकणारा आरशात पाहतो, परंतु आत्मिक अंधत्वामुळे स्पष्टपणे पाहू शकत नाही. तो पवित्र शास्त्राचे वाचन किंवा अध्ययन करत असला तरी, देवाने जशी पापाची व्याख्या केली आहे तसे पाप ओळखण्यात तो अपयशी ठरतो. तो वाईटाला चांगले आणि चांगल्याला वाईट म्हणतो (यशया 5:20). त्याचे जीवन सवय झालेल्या पापाने ओळखले जाते, तरीही त्याच्या जीवनावर प्रभुत्व गाजवणाऱ्या पापी जीवनक्रमामुळे तो अस्वस्थ होत नाही. सत्याकडे त्याचे डोळे उघडण्यासाठी त्याला पवित्र आत्म्याच्या नवा जन्म देणाऱ्या कार्याची गरज आहे.
2. श्रीमती भित्र्या
तिला माहीत आहे की तिच्यात डाग आहेत, पण त्यांचा सामना करायला ती घाबरते. वाईट निदानाची भीती वाटल्यामुळे डॉक्टरांकडे जाणे टाळणाऱ्या व्यक्तीप्रमाणे, श्रीमती भित्र्या वचनाच्या दोषारोपाला प्रतिकार करते. पश्चात्तापाच्या किंमतीला सामोरे जाण्याची तिची इच्छा नसते. तरीही खरी मुक्ती ही टाळाटाळ करण्यातून येत नाही, तर आपले पाप प्रकाशात आणून पश्चात्तापाने आणि विश्वासाने ख्रिस्ताकडे वळण्यातून येते.
3. श्रीमान आत्मनीतिभिमानी (स्वतःला नीतिमान समजणारा गर्विष्ठ)
तो आपले दोष पाहतो, पण त्यांचे समर्थन करतो. स्वतःच्या नैतिक नोंदींवर ठाम विश्वास असल्याने तो सुधारणेचा प्रतिकार करतो. त्याला सामोरे गेले की तो जबाबदारी झटकतो आणि म्हणतो, “मला बदलण्याची गरज नाही, इतरांना आहे.” त्याचा स्व-नीतिमानपणा त्याला दयेच्या त्याच्या खोल गरजेबद्दल आंधळा बनवतो. तो येशूच्या दाखल्यातील त्या परुश्यासारखा दिसतो, ज्याने अशी प्रार्थना केली: “हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.” (लूक 18:11-12). भक्तिमान दिसत असतानाही त्याचे हृदय गर्विष्ठ आणि पश्चात्तापरहित होते. येशू आपल्याला आठवण करून देतो की तो नीतिमानांना नाही, तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी पाचारण करायला आला आहे (लूक 5:32).
4. कुमारी निराशावादी
ती आरशात पाहते, तिचे डाग मान्य करते, पण ते शुद्ध होण्याच्या पलीकडे आहेत असे मानते. दयेसाठी देवाकडे वळण्याऐवजी ती आपल्या दुःखातच रेंगाळत राहते आणि निराश होऊन म्हणते, “माझे पाप इतके मोठे आहे की मला क्षमा केली जाऊ शकत नाही.” कुमारी निराशावादी हिला शुभवर्तमानाच्या आशेची गरज आहे. रॉबर्ट मरे मॅकचेन यांनी सुज्ञपणे म्हटल्याप्रमाणे, “स्वतःकडे एकदा पाहताना, ख्रिस्ताकडे दहा वेळा पाहा.” ख्रिस्तामध्ये पश्चात्ताप करणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या अत्यंत दुष्ट पापी व्यक्तीसाठीही पूर्ण क्षमा आहे.
5. श्रीमान अर्धवटराव
1 शमुवेल 15 मधील शौल राजाप्रमाणे, तो निवडक आज्ञापालन करतो. शौलाला अमालेक्यांचा पूर्णपणे नाश करण्याची आज्ञा देण्यात आली होती, तरीही त्याने उत्तम जनावरे आणि अगाग राजा यांना वाचवले. त्याने आपल्या बलिदानांचा दाखला देऊन स्वतःचा बचाव केला. परंतु शमुवेल संदेष्ट्याने उत्तर दिले, “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे.” (1 शमुवेल 15:22). श्रीमान अर्धवटराव हा देवाने सांगितलेल्या काही गोष्टीं पाळतो, पण सर्वच नाही. तरीही अर्धवट आज्ञापालन हे पूर्ण आज्ञाभंगच असते. खरा ऐकणारा देवाच्या वचनाला पूर्णपणे शरण जातो, केवळ सोयीस्कर भागांनाच नाही.
6. कुमारी सुज्ञता
ही खरी ऐकणारी आहे. पवित्र शास्त्राच्या आरशात प्रतिबिंबित झालेले डाग पाहून ती पश्चात्तापाने देवाकडे वळते आणि ख्रिस्ताद्वारे शुद्धता शोधते. येशूच्या दाखल्यातील जकातदाराप्रमाणे ती प्रार्थना करते, “देवा, मज पाप्यावर दया कर!” (लूक 18:13). याकोब म्हणतो की अशी व्यक्ती “आपल्या कृतीत धन्य होईल” (याकोब 1:25). तिचे जीवन स्तोत्रसंहिता 1 मधील पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाची चिन्हे धारण करते, फळ देणारे आणि टिकून राहणारे.
आता स्वतःचे आत्मपरीक्षण करा
तर, तुम्ही कशा प्रकारचे ऐकणारे आहात? लक्षात ठेवा, देवाचा आशीर्वाद ऐकणाऱ्यांवर आणि आज्ञा पाळणाऱ्यांवर असतो. आज्ञापालनामुळे तारण मिळते म्हणून नाही, तर ते देवाच्या कृपेने खरोखर रूपांतरित झालेल्या हृदयातून वाहते. म्हणूनच, देवाचे वचन ऐकणारे असणे म्हणजे केवळ लक्षपूर्वक ऐकणे किंवा पवित्र शास्त्रातील सत्याची बौद्धिकदृष्ट्या पुष्टी करणे नव्हे. तर नम्रतेने वचन स्वीकारणे, त्याने आपले परीक्षण करू देणे आणि विश्वासाने त्याला शरण जाणे होय. ते म्हणजे त्याच्या वचनाच्या प्रकाशात प्रभूबरोबर चालणे होय. जुने गीत सांगते त्याप्रमाणे:
विश्वास ठेवा आणि आज्ञा पाळा, कारण दुसरा मार्ग नाही
येशूमध्ये आनंदी राहण्याचा, विश्वास ठेवणे आणि आज्ञा पाळणे हाच मार्ग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


