
प्रार्थना सभांचे सामर्थ्य
08/09/2026
एकेश्वरवाद म्हणजे काय?
15/09/2026नियमपंथी न बनता पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न कसा करावा
द होल क्राइस्ट या पुस्तकात डॉ. फर्ग्युसन नियमपंथाची उपयुक्त व्याख्या देतात: “नियमपंथवादिता म्हणजे सरळसरळ देवाच्या नियमशास्त्राला देवाच्या व्यक्तिमत्त्वापासून वेगळे करणे, त्याच्या नियमाला त्याच्या प्रीतीपूर्ण आणि उदार व्यक्तिमत्त्वापासून वेगळे काढणे.” जर आपण देवाचे नियमशास्त्र आणि त्यात नमूद मागण्या त्या प्रेमळ आणि उदार देवापासून वेगळ्या केल्या, ज्याचा तो नियम आहे, तर पवित्रीकरण मिळवण्याचा आपला पाठपुरावा नकळत निरुपयोगी आणि नियमपंथी दिशेकडे वळण घेईल. म्हणून देव कोण आहे आणि तो आपल्याला पवित्रीकरण मिळवण्यासाठी का पाचारण करतो, हे लक्षात ठेवूनच आपण नेहमी पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न केला पाहिजे.
2 करिंथकर 1:3–4 मध्ये पौल देवाची स्तुती करतो आणि देव कोण आहे याचे अद्भुत वर्णन आपल्यासमोर ठेवतो: “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.” करुणाकर पित्याने पाप्यांचे तारण करण्यासाठी आपल्या पुत्राला जगात पाठवून आपल्या संकटात आपले सांत्वन केले आहे. आपल्या महान प्रीतीमुळे पित्याने येशू ख्रिस्ताला पाठविले, यासाठी की आपल्या पापामुळे आपण ज्या अपवित्रतेत स्वतःला लोटून दिले होते, त्यातून त्याने आपली मुक्ती करावी. आपल्या पित्याने प्रभू येशू ख्रिस्त हा तारणहार आपल्याकडे पाठविला, यासाठी की त्याने आपल्याला देवासमोर नीतिमान ठरवावे. केवळ कृपेने, केवळ विश्वासाद्वारे आणि केवळ ख्रिस्ताच्या तारणकार्यामुळे आपल्याला देवाबरोबर शांती लाभली आहे (रोमकरांस 5:1–2).
परंतु आपला करुणाकर पिता आपल्याला फक्त नीतिमान ठरवून, त्याच्यासमोर योग्य स्थितीत उभे करून थांबत नाही. जसा तो पवित्र आहे तसे आपणही पवित्र असावे अशी त्याची इच्छा आहे (1 पेत्र 1:15–16). म्हणून देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपानुसार आपले नूतनीकरण करण्यासाठीही कार्य करतो. म्हणून सुवार्तेचे शुभवृत्त हे आहे की,
“ख्रिस्ताने आपल्या रक्ताद्वारे आपली मुक्ती केली आहे, आणि तो आपल्या आत्म्याद्वारे आपले त्याच्या प्रतिरूपात नूतनीकरण करीत आहे” (हायडेलबर्ग कॅटेकिझम 86).
म्हणून, पवित्रता हा आपल्या पित्याचा आपल्यासाठी असलेला उद्देश आहे, आणि ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हा उद्देश पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे, या निश्चित आणि सांत्वनदायक ज्ञानात आपण पवित्रतेचा पाठपुरावा करण्यास बोलाविलेले आहोत. त्या कार्यात सहभागी होण्यास आणि सहकार्य करण्यास आपल्याला बोलावले आहे; तरी देवाच्या नूतनीकरणाच्या कार्याचे यश आपल्यावर अवलंबून नसून, हे कार्य ज्याचे आहे त्या आपल्या त्रैक्य देवावर अवलंबून आहे. पवित्र आत्मा 1 थेस्सलनीकाकर 5:23–24 मध्ये या सत्याची आपल्याला खात्री देतो: “‘शांतीचा देव स्वत: तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे; तो हे करीलच.” देवाची इच्छा आहे की आपण पवित्र व्हावे; म्हणून त्याची ही इच्छा आपल्यामध्ये पूर्ण व्हावी, यासाठी तो कार्य करील असे अभिवचन देतो.
देव आपल्या पवित्रीकरणासाठी आणि नूतनीकरणासाठी इतका आवेशी आहे, यामागचे कारण हे की त्याच्या राज्यात त्याच्यासोबत जीवन जगण्यास आपण योग्य व्हावे, अशी त्याची इच्छा आहे. देवाच्या राज्याचा विषय “नीतिमत्व, शांती आणि आनंद” हे आहे, हे आपण जाणतो (रोमकरांस 14:17). देव जाणतो की नीतिमत्वावाचून त्याचे लोक त्याच्या राज्यातील शांती आणि आनंद अनुभवू शकत नाहीत. मनुष्याचे पापात पतन झाले तेव्हा नेमके काय घडले, याचा विचार करा: आपण नीतिमत्वाकडून अनीतिमत्वाकडे वळलो. असे करून आपण देवाबरोबर अनुभवत असलेली शांती भंग केली आणि त्याऐवजी त्याच्याशी वैर निर्माण केले. त्याच्याशी असलेल्या सहभागितेच्या आनंदाची अदलाबदल आपण त्याच्यापासून दूर झाल्याच्या दुःखाशी केली. परंतु देव जीवन देणारा देव आहे; त्याने आपल्याला नीतिमत्व, शांती आणि आनंद यांत त्याच्यासोबत जगण्यासाठी निर्माण केले आहे. म्हणून त्याने आपल्याशी तो संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचे ठरविले (उत्पत्ती 3:15).
आपल्या दयाळू स्वर्गीय पित्याची इच्छा आहे की आपण स्तोत्रसंहिता 1 मधील त्या मनुष्यासारखे व्हावे, जो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो आणि रात्रंदिवस त्याचे मनन करतो. का? कारण तो मनुष्य,
“झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते,
जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत,
अशा झाडासारखा तो आहे;
आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” (स्तोत्रसंहिता 1:3)
देवाचे नियमशास्त्र हे आपल्या जीवन देणाऱ्या देवाचे जीवनाला आशीर्वाद देणारे नियमशास्त्र आहे, हे जेव्हा आपण समजतो, तेव्हा आपण त्यात आनंद मानतो. आपण पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करावा अशी देवाची इच्छा आहे, कारण आपण आता आणि सदासर्वकाळासाठी लावलेले, फळ देणारे, टिकून राहणारे आणि हाती घेतो ते काम सिद्धीस नेणारे असे व्हावे, ही त्याची इच्छा आहे. पित्याची आपल्यासाठी इच्छा ही आहे:
ख्रिस्ताद्वारे देवामध्ये पूर्ण मनापासून आनंद मानणे,
आणि प्रत्येक प्रकारचे चांगले कार्य करीत
देवाच्या इच्छेनुसार जगण्याची प्रीती व आनंद बाळगणे.
(हायडेलबर्ग कॅटेकिझम 90)
पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करण्याच्या आपल्या उद्यमात ख्रिस्ताविषयीची कृतज्ञता ही नियमपंथीपणासाठी मोठे विषनाशक आहे. आपण पवित्रीकरण मिळवण्यासाठी झटतो ते स्वबळावर देवासमोर ग्रहणीय ठरावे म्हणून नाही. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्याला मिळालेली मुक्ती, आणि ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे आपल्यामध्ये अंशा अंशाने होत असलेले नूतनीकरण यांविषयी कृतज्ञता म्हणून आपण पवित्रीकरण मिळवण्यासाठी झटतो. आपण आनंदाने पवित्रीकरण मिळवण्यासाठी झटतो, कारण त्यासाठीच आपली निर्मिती झाली आहे आणि त्यासाठीच आपण नवी उत्पत्ती म्हणून घडविले गेलो आहोत:
कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे;कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली (इफिसकरांस 2:8–10).
पवित्रीकरण मिळवण्यासाठी झटत असताना देव आपल्याला नियमपंथीपणापासून राखो, आणि आपल्या कृपेने व आत्म्याने आपले मार्गदर्शन करो.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


