
देवाचे वचन ऐकणाऱ्या लोकांचे 6 प्रकार
10/11/2026मुलांसाठी करारशास्त्र: एक प्राथमिक मार्गदर्शन
आपण आपल्या मुलांना संडे स्कूल किंवा व्हीबीएसमध्ये पाठवतो, तेव्हा आपल्या मुलांना त्यातून नेमके काय मिळावे अशी आपली अपेक्षा असते? पवित्र शास्त्रातील काही व्यक्तींची चरित्रे आपल्याला अस्पष्ट जाणवतात, तेव्हा त्या देवाच्या मोठ्या योजनेशी कशा जोडलेल्या आहेत, हे समजून घेण्यासाठी आपण मुलांना कशी मदत करू शकतो? अशी कोणती मूलभूत तात्त्विक सत्ये आहेत, ज्यांनी ख्रिस्ती लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे?
लिगोनियर मिनिस्ट्रीजचा मुलांसाठीचा नवीन अभ्यासक्रम, ग्रोइंग इन गॉड्स वर्ड, एका वर्षाच्या अभ्यासात पवित्र शास्त्राच्या मूलभूत गोष्टी उलगडतो. हा अभ्यासक्रम पवित्र शास्त्राच्या करारात्मक चौकटीतून विशेष रीतीने तयार करण्यात आला आहे, जो आपल्याला देवाच्या तारणाच्या योजनेचे आणि मानवजातीशी असलेल्या त्याच्या व्यवहारांचे मोठे चित्र दाखवते. पवित्र शास्त्राची पायाभूत सत्ये सांगण्यासाठी किंवा मुलांना ईश्वरशास्त्राची ओळख करून देण्यासाठी ते मोठे होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. हे साधन वय आणि वाढीच्या विकासात्मक टप्प्यांना अनुरूप अशा कृती आणि प्रश्नांसह करारशास्त्राचे मुख्य घटक सुलभ करण्याचा प्रयत्न करते.
देवाने मंडळ्या, पालक आणि शिक्षक यांना येशूच्या आज्ञेचे पालन करण्याचे गंभीर पाचारण दिले आहे: “बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे” (मत्तय 19:14). आपल्या मुलांच्या सुरुवातीच्या शिक्षणात पवित्र शास्त्र हे सातत्याने आणि विश्वासूपणे त्यांच्यासाठी सुलभ करण्याचा प्रयत्न करत असताना आपण ज्यांपासून सुरुवात करू शकतो, अशी काही विषय- सामग्री येथे दिलेली आहे.
1. निर्माणकर्ता
जेव्हा आपण मुलांना करारशास्त्राची ओळख करून देतो, तेव्हा आपण अगदी मूळ मुद्द्यापासून सुरुवात करू शकतो: देव निर्माणकर्ता आहे. जेव्हा काहीही अस्तित्वात नव्हते, तेव्हा देवाने सर्व काही निर्माण केले. तो आपल्या सृष्टीत प्रकट झाला आहे, परंतु जीवन, मरण, पाप आणि ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व, हे असे विषय आहेत जे आपण केवळ त्याच्या वचनातून समजू शकतो. एकदा मार्टिन ल्युथर यांनी असे म्हटले, “जर मला देवाची कार्ये आणि सामर्थ्य माहीत नसेल, तर मला प्रत्यक्ष देवच माहीत नाही; आणि जर मला देव माहीत नसेल, तर मी त्याची उपासना, भक्ती, उपकारस्तुती किंवा सेवा करू शकत नाही.”1
देवाने सर्व गोष्टी बनवल्या आणि कराराद्वारे तो आपल्या सृष्टीची सार्वभौम रीतीने काळजी घेतो (पाहा रोमकरांस 5; 1 करिंथकरांस 15). करार हे आशीर्वाद आणि कटिबद्धतेचे एक वचन आहे.2 देवाचे करार-मदार हे मनमानी किंवा व्यवहाराधारित नसतात; उलट, ते त्याच्या पवित्रतेचे आणि त्याच्या सृष्टीतील त्याच्या कार्यांचे स्व-प्रकटीकरण दर्शवतात. तो त्याच्या त्रैक्यात्मक स्वभावाशी सुसंगत राहून कार्य करतो, आवेग, सोय किंवा केवळ व्यावहारिकतेमुळे लहर-प्रधान पद्धतीने कार्य करत नाही. पवित्र शास्त्र तीन पायाभूत करार प्रकट करते: तारणाचा करार, कर्मांचा करार आणि कृपेचा करार.
2. ख्रिस्त
पवित्र शास्त्रातील प्रत्येक भाग ख्रिस्ताकडे निर्देश करतो. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत पवित्र शास्त्र विविध वृत्तांतांनी समृद्ध आहे. परंतु हे सर्व वृत्तांत एकत्र येऊन आजवरच्या सर्वांत महान वृत्तांताचे चित्र उभे करतात— म्हणजेच देवाच्या सृष्टीवर असलेली त्याची कृपा, जी अंतिमतः ख्रिस्ताच्या कार्यात प्रकट झाली आहे. करारशास्त्र हे जुना करार आणि नवा करार, या दोन्हींना जोडते, जेणेकरून पवित्र देव त्याच्या नियमशास्त्रात आणि ख्रिस्ताच्या एकदाच पूर्ण केलेल्या कार्यात प्रकट होतो (गलतीकरांस 3:24-29). नियमशास्त्राचा विसर पडू देण्याऐवजी, ख्रिस्ताने आपल्या परिपूर्ण जीवनाने, वधस्तंभावरील मरणाने आणि कबरेतून पुनरुत्थानाने कर्मांचा करार पूर्ण केला आहे, आणि त्याच्या मागे जाणाऱ्या सर्वांना कृपेच्या करारात नेले आहे (मत्तय 5:17).
पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव असलेला येशू ख्रिस्त हा परिपूर्ण देव आणि पतित मानवजात यांच्यातील एकमेव मध्यस्थ आहे. पित्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाठवणे; पुत्राचे प्रायश्चित्तयुक्त जीवन, मरण आणि पुनरुत्थान; आणि पवित्र आत्म्याद्वारे नवा जन्म देणाऱ्या कार्याचे सामर्थ्य, यांद्वारेच आपल्याला कृपेच्या कराराचे सर्व लाभ मिळतात. विश्वासाद्वारे ख्रिस्ताशी एकरूप झाल्यामुळे, ख्रिस्ती लोक आता देवाला “पिता” म्हणू शकतात आणि त्याच्याशी असलेल्या या पितृसंबंधात खरी शांती, तारणाची खात्री आणि परिपूर्ण विसावा मिळवू शकतात.
3. मंडळी
कृपेचा करार प्रत्येक वंश, राष्ट्र आणि भाषेतील विश्वासणाऱ्यांच्या समुदायासाठी आहे. ख्रिस्ती जीवन एकाकीपणे जगायचे नसते, आणि देवाच्या राज्यात कोणालाही इतरांवर विशेष स्थान नाही. मंडळी समजून घेण्यासाठी, आपण करारशास्त्र आणि ऐतिहासिक विश्वासाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, जिथे सामूहिक उपासना ही प्राथमिकता असते. सुवार्ता कराराच्या लोकांना एकाच ध्वजाखाली एकत्र आणते: येशू हाच एकमेव मार्ग आहे (योहान 14:6). पहिल्या आदामामध्ये मानवजात पापात मरण पावली आणि शेवटच्या आदामामध्ये आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जातो (1 करिंथकरांस 15:45). हा विश्वास आपल्याला अंधाराच्या सत्तेतून बाहेर आणून प्रकाशात आणतो, जिथे ख्रिस्ताच्या नावाचा धावा करणारे सर्व जण कधीही वेगळे किंवा एकटे पडणार नाहीत.
ही जरी तात्काळ वास्तवता असली, तरी ख्रिस्त परत येईपर्यंत किंवा आपल्याला घरी बोलावून घेईपर्यंत आपण अद्याप एका भग्न जगात जगत आहोत. रविवारी होणारी उपासना ही केवळ वीकेंडच्या आवडीच्या उपक्रमांविषयी नाही, तर आपण ज्यासाठी बनवले गेलो होतो त्याचे ते मोठे चित्र आहे: आपल्या निर्माणकर्ता देवाच्या ज्ञानात वाढणे आणि ख्रिस्तामध्ये ज्या त्रैक्यात्मक विसाव्यात सहभागी होण्यासाठी तो आपल्याला आमंत्रित करतो त्यात वाढणे.
4. पाचारण
करारातील मुलांना, सुवार्तेची घोषणा ऐकणाऱ्या सर्वांप्रमाणेच, एक अद्वितीय हक्क आणि आशीर्वाद दिला गेला आहे, तो म्हणजे प्रभूच्या मार्गात पुढे चालत राहण्याचे वारंवार केलेले पाचारण. जेव्हा आपण आपल्या मुलांना करारशास्त्र शिकवतो, तेव्हा आपण सार्वकालिक सत्यावर आधारित जीवनाची चौकट त्यांना देतो. परंतु जर आपले शिक्षण केवळ पाठांतर किंवा वर्तन बदलापुरतेच थांबवले, तर आपण त्यांना द्राक्षवेल असलेल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहण्याचे पाचारण करणार नाही. आपल्या मुलांनी विश्वासाने येशूला प्रतिसाद द्यावा आणि कृपेच्या साधनांद्वारे द्राक्षवेलीमध्ये वाढावे अशी आपली इच्छा आहे. स्थानिक मंडळीच्या संदर्भातील हे पाचारण म्हणजेच पवित्र शास्त्रातील त्या विविध वृत्तांतांचे सार आहे: देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवण्याचे विश्वासाचे पाचारण.
या संदेशात एक निकड आहे, ती आपण आपल्या मुलांना सांगू शकतो, आणि त्याच वेळी परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधण्यासाठी (यशया 55:6) धीराने त्यांना प्रशिक्षण आणि ताकीद देऊ शकतो. जेव्हा आपण आपल्या मुलांना करारशास्त्र शिकवतो, तेव्हा आपण त्यांना अशा अंतिम प्रवासाकडे निर्देशित करतो, जिथे ते या जीवनासाठी आणि येणाऱ्या जीवनासाठी पूर्णपणे ओळखले गेलेले, सुरक्षित आणि शांत पाण्याच्या काठी नेले गेलेले असू शकतात.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


