
आव्हानात्मक काळात पित्याचा मार्ग
17/11/2026पश्चात्ताप म्हणजे काय?
मार्क 1:14-15 मध्ये येशूने आपल्या सार्वजनिक सेवेच्या उपदेशात म्हटलेले पहिले शब्द नोंदवले आहेत: “काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.” येशूच्या सुवार्तेच्या पहिल्या घोषणेमध्येच पापाबद्दलच्या पश्चात्तापाचे पाचारण समाविष्ट असल्यामुळे, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की पश्चात्ताप हा ख्रिस्ती शिष्यत्वाचा एक आवश्यक घटक आहे. येशूचे विश्वासूपणे अनुसरण करण्यासाठी, आपण या प्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ असणे आवश्यक आहे: पश्चात्ताप म्हणजे काय?
जीवनाकडे घेऊन जाणारा पश्चात्ताप
वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार आणि प्रश्नोत्तरे (वेस्टमिन्स्टर कन्फेशन ऑफ फेथ आणि कॅटेकिझम्स) “जीवनाकडे घेऊन जाणारा पश्चात्ताप” यासह अनेक विषयांवरील पवित्र शास्त्रातील शिक्षणाचा उपयुक्त असा सारांश देतात, ज्याला इतर ईश्वरशास्त्रज्ञ कधीकधी “सुवार्ता-प्रेरित पश्चात्ताप” असे म्हणतात. दोन्ही शब्दप्रयोग खऱ्या आणि तारणदायी पश्चात्तापाला ऐहिक दु:खापासून वेगळे करतात, कारण अशी खंत खरा पश्चात्ताप तर मुळीच नसतो. पौल अशा ईश्वरप्रेरित दुःखाबद्दल बोलतो, तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत ठरते, आणि तो आपल्याला केवळ मरण उत्पन्न करणाऱ्या जगिक दुःखाबद्दल इशारा देतो (2 करिंथकरांस 7:10-11). मूलतः, तो आपल्या पापांमुळे देवाचा अपमान झाला आणि इतरांना दुःख झाले याबद्दलचे दुःख, आणि पापाच्या परिणामांमुळे होणारे दुःख यांमधील फरक स्पष्ट करीत आहे. तारणदायी नसलेला पश्चात्ताप म्हणजे केवळ आपल्या पापांमुळे आपल्यालाच झालेल्या दुःखाबद्दलची खंत किंवा आपण चुकीचे कृत्य करताना पकडले गेलो याबद्दलची खंत होय. हे अशा प्रकारचे दुःख आहे जे एखादे मूल बिस्किटांच्या बरणीत हात अडकला तेव्हा व्यक्त करते, परंतु आपल्या पालकांचे नियम मोडल्याचे स्वतःहून सांगताना व्यक्त करत नाही. हे तेच दुःख आहे जे एसावाने आपले ज्येष्ठपणाचे हक्क आणि आशीर्वाद यांचा त्याग केला तेव्हा प्रकट केले होते, एका वाटीभर वरणासाठी देवाच्या चांगुलपणाचा त्याग केल्यामुळे झालेले दुःख नव्हे, तर सर्वोत्तम वारसा गमावल्याचे दुःख (उत्पत्ती 25:29-34; 27:1-41; इब्रीकरांस 12:16).
खऱ्या पश्चात्तापाचे घटक
तारण न देणाऱ्या, ऐहिक पश्चात्तापाच्या विपरीत, जीवनाकडे नेणारा पश्चात्ताप आपल्याला पापापासून वळवतो, जेणेकरून आपण ख्रिस्ताद्वारे देवाकडे परत येऊ शकू. वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार 15.2 आपल्याला खऱ्या, तारणदायी पश्चात्तापाच्या घटकांची व्याख्या करण्यास मदत करते. यात असे म्हटले आहे की, “त्याद्वारे [जीवनाकडे नेणाऱ्या पश्चात्तापाद्वारे], पापी मनुष्य केवळ आपल्या पापांच्या धोक्याचीच नव्हे, तर देवाच्या पवित्र स्वभावाच्या आणि पवित्र नियमशास्त्राच्या विरुद्ध असलेल्या आपल्या पापांच्या अमंगळपणाची आणि तीव्र घृणास्पदतेची दृष्टी आणि जाणीव झाल्यामुळे; आणि ख्रिस्तामध्ये पश्चात्ताप करणाऱ्यांवर होणाऱ्या त्याच्या दयेचे आकलन झाल्यामुळे, आपल्या सर्व पापांबद्दल असा खेद करतो व त्यांचा असा द्वेष करतो की, तो त्या सर्वांपासून देवाकडे वळतो, आणि त्याच्या आज्ञांच्या सर्व मार्गांमध्ये त्याच्यासोबत चालण्याचा संकल्प करतो व प्रयत्न करतो.”
पहिले म्हणजे, जीवनाकडे नेणारा पश्चात्ताप केवळ हेच ओळखत नाही की पाप आपल्यासाठी धोकादायक आहे, तर ते अशुद्ध आणि किळसवाणे आहे, कारण सर्व आज्ञाभंग हे देवाच्या पवित्र नियमशास्त्राचे उल्लंघन आहे आणि त्याच्या पूर्णपणे पवित्र स्वभावाचा अवमान आहे. स्तोत्रसंहिता 51:4 मध्ये आपण याचे प्रतिबिंब पाहतो, जिथे दावीद कबूल करतो की बथशेबा आणि उरीया यांच्या बाबतीत त्याचे पाप हे केवळ देवाविरुद्धचे पाप होते. हे काव्यात्मक अतिशयोक्ती आहे. उरीयाची हत्या घडवून आणणे हे उघडपणे देव आणि उरीया या दोघांच्याही विरुद्धचे पाप होते. दाविदाचा अर्थ असा आहे की त्याचे अपराध हे प्रामुख्याने आणि सर्वोपरी देवाविरुद्धचे पाप आहेत. प्रभू हा पवित्र निर्माणकर्ता आणि नियमशास्त्र देणारा आहे आणि आपण त्याच्या प्रतिरूपात बनवले गेलो आहोत, म्हणून प्रत्येक पाप हे इतर कोणाविरुद्ध असण्यापूर्वी देवाविरुद्धचे पाप असते. इतरांविरुद्धची पापे ही देवाच्या प्रतिरूपाविरुद्ध केलेली पापे असतात, त्यामुळे त्या अर्थाने ती देवाला दुखावण्याचे प्रयत्न असतात. आर. सी. स्प्रौल वारंवार म्हणायचे त्याप्रमाणे सर्व पापे हे “वैश्विक राजद्रोह” असतात. ते देव आणि त्याच्या आज्ञांच्या जागी स्वतःला आणि आपल्या स्वतःच्या निकषांना प्रस्थापित करण्याचे प्रयत्न असतात.
जीवनाप्रत नेणारा पश्चात्ताप केवळ हेच ओळखत नाही की आपली पापे प्रामुख्याने देवाविरुद्ध आहेत, तर तो पश्चात्ताप करणाऱ्यांवर ख्रिस्तामधील देवाच्या दयेचे आकलन देखील करतो, ज्यामुळे पापी व्यक्तीला देवाकडे वळण्याची, पापाची कबुली देण्याची आणि क्षमेची मागणी करण्याची प्रेरणा मिळते (वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार 15.2). स्तोत्रसंहिता 51 मध्येही आपण हे पाहतो, जिथे दावीद आपल्या पापाची कबुली देतो आणि देवाच्या दयेची याचना करतो. यहूदा इस्कर्योत आणि प्रेषित पेत्र यांच्यातील फरकाचाही विचार करा. दोघांनीही घोर पाप केले; यहूदाने येशूला अधिकाऱ्यांच्या हाती सोपवले आणि पेत्राने तो येशूचा शिष्य असल्याचे नाकारले (मत्तय 26:14-16, 69-74). दोघांनीही आपल्या पापाबद्दल दुःख व्यक्त केले (मत्तय 26:75; 27:3-4). तरीही यहूदाचे पापाबद्दलचे दुःख आत्महत्या करण्यात संपले, तर पेत्राचे दुःख सेवेतील पुनर्स्थापनेकडे घेऊन गेले (मत्तय 27:5-10; योहान 21:15-19). हा फरक का? पाप केलेले असूनही, ते न जुमानता पेत्र येशूकडे परत येतच राहिला, प्रथम रिकामी कबर पाहण्यासाठी आणि नंतर समुद्राच्या काठावर त्याच्यासोबत भोजन करण्यासाठी (योहान 20:1-10; 21:1-14). पश्चात्ताप करणाऱ्यांवर येशू दया करतो हे जाणून पेत्र येशूकडे धावला; यहूदा तारणाऱ्याच्या दयेवर विश्वास न ठेवता, स्वतःच्या हाताने मृत्यूला कवटाळत येशूपासून दूर पळाला.
शेवटी, जीवनाकडे नेणाऱ्या पश्चात्तापामध्ये, पापी मनुष्य आपल्या पापांबद्दल इतका खेद करतो आणि त्यांचा इतका द्वेष करतो की, देवाचे पालन करण्याच्या नव्या संकल्पाने आणि तो संकल्प आचरणात आणण्याच्या अनुरूप प्रयत्नासह तो त्यांच्यापासून दूर वळतो (वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार 15.2). दुसऱ्या शब्दांत, पश्चात्तापाचा अर्थ फक्त पापाबद्दल वाईट वाटले असे म्हणणे आणि नंतर स्वतःचे जीवन सुधारण्यासाठी कोणताही प्रयत्न न करणे असा होत नाही. आपण अंधाराची कामे टाकून दिली पाहिजेत आणि ख्रिस्ताला परिधान केले पाहिजे (रोमकरांस 13:11-14), आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे आणि परिणामी, आपण जी नवी उत्पत्ती आहोत त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पापापासूनचे हे वळणे आपल्या परिवर्तनाच्या वेळी निर्णायकपणे घडते, परंतु नंतर आपल्या उर्वरित आयुष्यासाठी दररोज चालू राहते. आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. (1 योहान 1:8-9).
पश्चात्तापाचे कर्तव्य आणि विशेषाधिकार
याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण एकाच पापात एकापेक्षा जास्त वेळा गुंतलो तर आपण खरोखर पश्चात्ताप केलेला नाही. याचा अर्थ असा आहे की जर आपण आपल्या पापावर प्रेम करत असू आणि ते थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसू, तर आपण आपल्या पश्चात्तापाच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे. ख्रिस्ताला ओळखणाऱ्या सर्वांसाठी, जीवनाकडे नेणारा पश्चात्ताप हे पूर्ण करण्याचे कर्तव्य आणि आपल्या तारणाऱ्यासोबत अखंड सहभागिता टिकवून ठेवू देणारा विशेषाधिकार दोन्ही आहे. आपण पापाचा द्वेष करूया, क्षमेची याचना करूया, ख्रिस्ताचा मार्ग शिकण्याचा प्रयत्न करूया आणि देवाच्या नियमांचे उल्लंघन करण्याऐवजी त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करूया.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


