What Is Monotheism?

एकेश्वरवाद म्हणजे काय?

15/09/2026
What Is Monotheism?

एकेश्वरवाद म्हणजे काय?

15/09/2026

येशू हा नवा दावीद आहे

Jesus Is the New David

तुम्ही कधी पवित्र शास्त्राच्या अभ्यासाला बसून गटपुढाऱ्याच्या शास्त्रीय अंतर्दृष्टीचे आश्चर्यचकित होऊन कौतुक केले आहे का? अम्माऊसच्या वाटेवर पुनरुत्थित येशूबरोबर भेट झाल्यावर त्या दोन खिन्न शिष्यांना कसे वाटले असेल, याची कल्पना करा. लूक आपल्याला सांगतो की, “मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.” (लूक 24:27). मी केवळ असा अंदाज लावू शकतो की येशू त्यांच्या पुढे शास्त्रातील सत्ये एकामागून एक उलगडत गेला, तसे ते अधिकाधिक थक्क होत गेले असतील. त्याच दिवशी नंतर येशू इतर शिष्यांसमोर प्रकट झाला आणि “तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले” (लूक 24:45). पुनरुत्थित प्रभूने पहिल्यांदाच त्यांना हे समजण्यास समर्थ केले की संपूर्ण पवित्र शास्त्र खरे तर त्याच्याविषयीच आहे, तेव्हा या पुरुषांच्या मनात काय आले असेल, असा प्रश्न मला अनेकदा पडला आहे. मोशे, संदेष्टे आणि स्तोत्रे यांनी त्याच्याविषयी दिलेल्या साक्षीच्या मार्गाने येशूने स्वतः त्यांना क्रमशः नेले, तेव्हा ते सर्व बहुधा थक्क होऊन नि:शब्द बसले असतील, असे मला वाटते (लूक 24:44). 

जुन्या करारात अर्थातच असे शास्त्रभाग आहेत, जे स्पष्टपणे आणि अद्भुत रीतीने येशूकडे निर्देश करतात (पाहा यशया 53). परंतु जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले की “सर्व शास्त्रलेख” त्याच्याविषयी बोलतात, तेव्हा त्याच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय होता?

पवित्र शास्त्रातील प्रकारशास्त्र

तुम्ही यापूर्वी कधी टायपॉलॉजी, म्हणजे प्रकारशास्त्र, हा शब्द ऐकला आहे का? प्रेषित पौल देवाचा पहिला मनुष्य आदाम आणि येशू यांच्यातील संबंधाचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरतो. तो आदामाला “जो येणार होता त्याचे प्रतिरूप (प्रकार)” असे म्हणतो (रोमकरांस 5:14). “प्रकार” म्हणजे नमुना, प्रतिरूप. आदाम हा देवाने निर्माण केलेला सेवक-पुत्र होता (लूक 3:38). येशू हा देवाचा अनिर्मित, आज्ञाधारक सेवक-पुत्र होता. आदाम पूर्णपणे अपयशी ठरला, परंतु येशू गौरवाने विजयी झाला.

आदामाप्रमाणे दावीद राजाचे वर्णन “जो येणार होता त्याचे प्रतिरूप” असे कोठेही केलेले नाही. तरीही, पवित्र शास्त्राला ते जे आहे त्या स्वरूपात, म्हणजे देवाच्या उलगडत जाणाऱ्या तारणाच्या वृत्तांताच्या स्वरूपात वाचले, तर आपण पाहू शकतो की नवा करार येशूला प्रकारशास्त्रीय दृष्टीने “नवा दावीद” म्हणून दाखवतो, म्हणजे असा राजा जो आला आणि ज्याने सर्व नीतिमत्व पूर्ण केले. मला हे थोडक्यात स्पष्ट करू द्या.

2 शमुवेल 23:1 मध्ये दावीद आपल्याला सांगतो की तो “याकोबाच्या देवाचा अभिषिक्त” आहे. जुन्या करारात देवाची आणि त्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी देवाकडून तीन प्रकारच्या महत्त्वाच्या व्यक्तींचा अभिषेक केला जात असे: संदेष्टे, याजक आणि राजे. संदेष्ट्यांना देवाचे वचन बोलण्यासाठी अभिषिक्त केले जात असे. याजक हे लोकांच्या वतीने देवाला यज्ञ अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी अभिषिक्त केले जात असे. राजे हे देवाच्या वचनानुसार देवाच्या लोकांचे नेतृत्व आणि त्यांच्यावर राज्य करण्यासाठी अभिषिक्त केले जात असे.

हे तिन्ही अधिकारपदे दावीद राजाच्या ठायी एकत्र आली होती. दावीद हा “परमेश्वराचा अभिषिक्त” होता; परंतु दुःखद शोकांतिका अशी की परमेश्वराचा अभिषिक्त म्हणून दावीद अपयशी ठरला. सर्व संदेष्टे, याजक आणि राजे यांच्याप्रमाणे त्यानेही पाप केले. सापाचे डोके ठेचून देवाच्या पापी जगासाठी तारण आणील, असे देवाने ज्याच्याविषयी अभिवचन दिले होते, तो दावीद नव्हता (उत्पत्ति 3:15).  

येशू हा संदेष्टा, याजक आणि राजा म्हणून

ही ती पार्श्वभूमी आहे जी आपल्याला येशूला “नवा आणि अधिक उत्तम दावीद” म्हणून पाहण्यास मदत करते. येशू हा तो अभिषिक्त संदेष्टा आहे, ज्याने न केवळ देवाचे वचन विश्वासूपणे सांगितले, तर तो स्वतः देवाचा देहधारी शब्द होता (योहान 1:1–18; इब्रीकरांस 1:1–4). येशू हा तो परिपूर्ण अभिषिक्त याजक आहे जो यज्ञ अर्पण करण्यासाठी आला नाही, देवापासून वेगळे करणाऱ्या पापाचा पूर्णपणे, अंतिम आणि सार्वकालिक निकाल लावण्यासाठी तो स्वतःच यज्ञ झाला (इब्रीकरांस पत्र पाहा). येशू हा तो अभिषिक्त राजा देखील आहे, जो परिपूर्ण ज्ञानाने, कृपेने आणि सामर्थ्याने आपल्या लोकांवर राज्य करतो, त्यांचे मार्गदर्शन करतो, आणि आमच्या सर्व शत्रूंपासून आमचे रक्षण करतो.

याच कारणामुळे येशूला ख्रिस्त, मशीहा, म्हणजे अभिषिक्त, असे म्हटले जाते. दावीद राजा अत्यंत सदोष नमुना म्हणून जे काही होता, तेच येशू परिपूर्णतेने होता. नवा करार संपूर्णपणे येशूला दाविदापेक्षा अधिक उत्तम संदेष्टा, याजक आणि राजा म्हणून सादर करतो, जसा तो आदामापेक्षा अधिक उत्तम सेवक-पुत्र होता. 

दाविदाच्या पलीकडे जाऊन येशूकडे निर्देश करणे

आरंभीच्या मंडळीतील काही पितरांनी कधी कधी प्रकारशास्त्राचा कल्पनारम्य वापर केला; परंतु देवाच्या वचनातील ज्या नमुन्यांचा उद्देश आपल्याला येशूकडे निर्देशित करण्याचा आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे हे कोणतेही कारण नाही. येशू हा एकमेव असा आहे ज्याच्याबद्दल देवाने म्हटले, “हा माझा प्रिय पुत्र आहे; याचे ऐका” (मार्क 9:7; मत्तय 3:17; 17:5; लूक 9:35 देखील पाहा).

नव्या करारातील सतरा वचने येशूचे वर्णन “दाविदाचा पुत्र” असे करतात. हे शब्द पहिल्यांदा त्याच्या दाविदाच्या वंशावळीतील शारीरिक वंशावर प्रकाश टाकत नाहीत (जरी ते खरे असले तरी); तर ती एक  मशीही पदवी आहे. परूश्यांबरोबर झालेल्या आपल्या वादविवादाच्या एका प्रसंगी येशूने त्यांना हा प्रश्न विचारला: दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो, तेव्हा मशीहा दाविदाचा पुत्र कसा असू शकतो? (मार्क 12:35–37; स्तोत्रसंहिता 110:1). येशूला हे समजले होते की दावीद स्वतःच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे निर्देश करीत होता. म्हणूनच आपण पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून वाचायला शिकले पाहिजे. ते सर्व त्याच्याविषयीच आहे.1  

तुम्हाला पवित्र शास्त्रसम्मत प्रकारशास्त्राचा, आणि विशेषतः पवित्र शास्त्र प्रकारशास्त्राद्वारे येशूला नवा दावीद म्हणून कसे सादर करते याचा अधिक सखोल अभ्यास करायचा असेल, तर जोनाथन एडवर्ड्स यांचे द टाइप्स ऑफ द मेसाया हे पुस्तक वाचा. (हे अलीकडेच त्यांच्या वर्क्समधून घेतलेले 108 पानांचे पेपरबॅक म्हणून प्रकाशित झाले आहे).

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

इयान हॅमिल्टन

इयान हॅमिल्टन

डॉ. इयान हॅमिल्टन हे न्यूकॅसल, इंग्लंड येथील वेस्टमिन्स्टर प्रेस्बिटेरियन थियोलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत आणि ग्रीनविले, एस.सी. येथील ग्रीनविले प्रेस्बिटेरियन थियोलॉजिकल सेमिनरीमध्ये संलग्न प्राध्यापक आहेत. ते वर्ड्स फ्रॉम द क्रॉस, आवर हेवन्ली शेफर्ड, आणि दि लेक्तिओ कॉन्टिन्यूआ एक्स्पोजिटरी कॉमेण्टरी ऑन द न्यू टेस्टामेंट मधील इफिस यांवरील भाष्यग्रंथ यासह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.