
बायबल बहुपत्नीत्वाविषयी काय सांगते?
18/08/2026
येशू आमच्यासाठी कित्ता आहे का?
01/09/2026मी सेमिनरीला जावे का?
मी भेटत असलेल्या अनेक भावी विद्यार्थ्यांपैकी बरेच जण, “मी सेमिनरीत जावे का?” या प्रश्नाशी झुंज देत असतात. त्यांपैकी काही जण या प्रश्नाकडे जीवनाची दिशा या दृष्टीने पाहतात. देवाने आपण सेमिनरीत जावे, की दुसरे काही करावे, अशी त्याची इच्छा आहे का, हे ओळखण्याचा ते प्रयत्न करत असतात. परंतु इतर काही जण पदवी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या साधनसंपत्तीच्या तुलनेत सेमिनरी खरोखरच फायदेशीर ठरेल का, याचा विचार करीत असतात. ते या प्रश्नाकडे गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याच्या दृष्टीने पाहतात आणि साधारणपणे असा प्रश्न विचारतात: सेमिनरी माझ्यासाठी काय करेल? मला यातून काय मिळेल?
या लेखात मी भावी विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटाला संबोधित करणार आहे, म्हणजे मी काय करावे अशी देवाची इच्छा आहे, या प्रश्नाशी जे झुंजत आहेत त्यांना. दुसऱ्या गटाला मी पुढील लेखात संबोधित करेन. तेव्हा, या लेखामागील माझे ध्येय अशा विद्यार्थ्यांशी थेट बोलणे आहे जे त्यांनी सेमिनरीत जावे का, असा प्रश्न विचारतात. तुम्ही मला प्रत्यक्ष भेटू शकला असता, तर हाच सल्ला मी तुम्हाला दिला असता.
प्रथम, मी तुम्हाला आपल्या इच्छांवर मंथन करण्यास प्रोत्साहन देईन. आपण सेमिनरीला जावे असे तुम्हाला वाटते का? पवित्र शास्त्र, ईश्वरशास्त्र आणि मंडळीचा इतिहास यांचा अभ्यास करून त्यांविषयीचे ज्ञान वाढविण्याची तुमची इच्छा आहे का? विश्वासाच्या गोष्टींविषयी आयुष्यभर शिकविण्याची किंवा लिहिण्याची कल्पना तुम्हाला आकर्षित करते का? ख्रिस्ती जीवनातील चढउतारांतून देवाच्या लोकांचे मेंढपाळाप्रमाणे पालनपोषण करण्याची, आणि ते “मृत्यूछायेच्या दरीतून” (स्तो. 23:4) जात असताना त्यांच्याबरोबर चालण्याच्या संधीची तुम्ही वाट पाहत आहात का?
अनेक वर्षांपूर्वी देवाची माझ्यासाठी काय इच्छा आहे, या प्रश्नाशी झुंज देत असताना मी स्वतःलाही असेच काही प्रश्न विचारत होतो. मला आठवते की एका सकाळी माझे बायबल वाचताना मला जाणीव झाली की मला माझे उर्वरित आयुष्य देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यात आणि ते देवाच्या लोकांना शिकवण्यात घालवायचे आहे. तुम्हालाही स्वतःमध्ये अशाच इच्छा जाणवत असतील, तर सेमिनरीला जाण्याचा विचार तुम्ही करावा. देव तुमच्याकडून काय करून घेऊ इच्छितो, याचा विचार करताना अशा इच्छा असणे हे आवश्यक पहिले पाऊल आहे.
परंतु, जर तुम्हाला स्वतःच्या इच्छेविषयी खात्री नसेल, तर काय? मग तुम्हाला सेमिनरीतील शिक्षण आवडते की नाही, हे पाहण्यासाठी मी तुम्हाला सेमिनरीचा एखादा वर्ग घ्यावा, असे सुचवीन. शक्य असेल, तर प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि अभ्यासक्रमातील गुणांकनासाठी तो वर्ग घ्या. यामुळे विद्यार्थी असणे कसे असते आणि पदवी पूर्ण करण्यासाठी काय आवश्यक असते, याचे शक्य तितके संपूर्ण चित्रच तुम्हाला मिळेल. नेमून दिलेले वाचन आणि संशोधन तुम्ही आनंदाने करता का? तुम्ही व्याख्यानांची आतुरतेने वाट पाहता का? आपल्या वर्गमित्रांबरोबर, किंवा मित्र व कुटुंबीयांबरोबर वर्गातील विषयांची चर्चा करताना तुम्हाला विशेष उत्साह वाटतो का? आणि कदाचित सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्या वर्गामुळे तुम्हाला पुढचा वर्ग घेण्याची इच्छा होते का?
दुसरे म्हणजे, जे तुम्हाला अगदी जवळून ओळखतात, त्यांच्याशी बोलण्यास मी तुम्हाला प्रोत्साहन देईन. त्यांना तुमच्यामध्ये काय दिसते हे विचारा. पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याची आणि ते शिकविण्याची इच्छा त्यांना तुमच्यात दिसते का? देवाचे वचन समजून घेण्याची, त्याचा योग्य उपयोग करण्याची आणि ते इतरांपर्यंत पोहोचविण्याची विलक्षण क्षमता त्यांनी तुमच्यामध्ये पाहिली आहे का? कठीण शास्त्रभाग सहज समजावून सांगण्याची देणगी त्यांना तुमच्यात दिसते का? देवाच्या लोकांविषयी तुमच्यामध्ये असलेली कळकळ त्यांच्या निदर्शनास आली आहे का?
माझ्या स्वतःच्या प्रवासात ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. माझी पत्नी आणि जवळचे मित्र या सर्वांनी मला मी सेमिनरीला जायला पाहिजे, असेच सुचवले. जेव्हा जेव्हा मी मंडळीच्या संडे-स्कूलमध्ये शिकवीत असे किंवा पवित्र शास्त्राच्या अभ्यासाचे नेतृत्व करीत असे, तेव्हा नंतर लोक अनेकदा माझ्याजवळ येऊन मला सेमिनरीला जाण्यास प्रोत्साहन देत असत. या प्रक्रियेत माझ्या पाळकांचीही महत्त्वाची भूमिका होती. या सर्वांकडून मिळालेली एकत्रित साक्ष मी माझ्या अंतःकरणात आधीपासून जे अनुभवत होतो त्याचीच पुष्टी करणारी होती. उत्तम भविष्य असलेली, चांगल्या पगाराची नोकरी सोडून पुन्हा शिक्षणाकडे वळण्याचा विचार करणे वेडेपणाचे नाही, हे ओळखण्यास त्यामुळे मला मदत झाली.
तुम्हाला सेमिनरीला जाण्याची इच्छा जाणवत असेल आणि तुमच्या जवळचे लोकही तुम्हाला त्याच दिशेने प्रोत्साहन देत असतील, तर तुम्ही सेमिनरीला गेले पाहिजे, असे मला वाटते. त्यासाठी प्रत्येक गोष्ट आधीच पूर्णपणे स्पष्ट झालेली असण्याची गरज नाही. देव योग्य वेळी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, आणि त्यासाठी तो तुमचे वर्ग, वर्गमित्र आणि प्राध्यापक यांचा उपयोग करील. सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीला तपशीलवारपणे निश्चित करून ठेवणेही आवश्यक नाही. तुम्ही पुढे जात राहाल तसे देव तुमच्यासाठी पुरवठा करील. प्रार्थना करा आणि विश्वासाने पाऊल टाका. मोठ्या अपेक्षेने मागा किंवा स्तोत्रकर्त्याच्या शब्दांत, “तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन ” (स्तोत्रसंहिता 81:10). त्याच्या वचनावर भरवसा ठेवा. डोळ्यांनी पाहून नव्हे, तर विश्वासाने चाला. आणि तुम्ही असे करीत असताना, मी ही प्रार्थना करीन की आमचा थोर देव आणि राजा आगामी अनेक दशकांपर्यंत त्याच्या गौरवयुक्त कृपेच्या स्तुतीसाठी तुमचा पराक्रमाने उपयोग करो.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


