3 Things You Should Know About Hebrews

इब्री लोकांस पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

12/05/2026
What Is the Wrath of God?

देवाचा क्रोध काय आहे?

19/05/2026
3 Things You Should Know About Hebrews

इब्री लोकांस पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

12/05/2026
What Is the Wrath of God?

देवाचा क्रोध काय आहे?

19/05/2026

मानव-स्वभावाचे मूळ स्वरूप: सात्विक की पूर्णपणे पापभ्रष्ट?

Is Human Nature Basically Good or Completely Sinful

मानवस्वभाव हा मूलतः सात्विक आहे असा दावा प्राचीन पेलेजियन पाखंडी मताचाच प्रतिध्वनी आहे, या लबाड मतानुसार, आदामाच्या पापाचा परिणाम केवळ आदामावरच झाला. या पाखंडी मताचा जनक, म्हणजे पेलागियस, याच्या दृष्टिकोनानुसार, आदामाच्या पतनामुळे मानवी स्वभावावर परिणाम झाला नाही. परंतु पवित्र शास्त्र याच्या उलट शिकवते, आणि असे ठामपणे सांगते की आदामाच्या पापाचा परिणाम त्याच्या नैसर्गिकरीत्या जन्मलेल्या सर्व वंशजांवर झाला (रोमकरांस पत्र 5:12-14). स्वभावानेच मनुष्यप्राणी “क्रोधाची संतान” आहे (इफिसकरांस पत्र 2:3). ‘टोटल डिप्राव्हिटी’ (पूर्ण भ्रष्टता), ट्युलिपमधील T (टी), या संज्ञेमागे हाच ईश्वरशास्त्रीय मुद्दा आहे. दुसऱ्या शब्दांत, पापाने आपल्यातील प्रत्येकाला (येशू वगळता) हृदय, मन, शरीर, आणि आत्मा या सर्व पातळ्यांवर भ्रष्ट केले आहे. हे तत्त्व जुन्या आणि नव्या करारात सर्वत्र आढळते (उदा., उत्पत्ती 6:5; स्तोत्रसंहिता 14:1-3; 143:2; उपदेशक 7:20; यशया 64:6; मार्क 7:18-23; रोमकरांस पत्र 1:21-32; 3:10-18, 23; 8:5-8; गलतीकरांस पत्र 4:3; इफिसकरांस पत्र 2:1-3; 4:17-19; तीतास पत्र 3:3).

ख्रिस्ती लोक गोंधळात पडू शकतात, कारण पवित्र शास्त्र शिकवते की मनुष्यप्राण्यांना देवाने त्याच्या प्रतिरूपात निर्माण केले होते (उत्पत्ती 1:26-27), आणि देवाने त्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींना चांगले म्हटले होते (व. 31). जर देवाने निर्माण केलेले सर्व काही चांगले असेल, आणि देवानेच मानव-स्वभाव निर्माण केला असेल, तर मग मानव-स्वभाव अनिवार्यपणे चांगला नाही का? होय. मूळतः, निर्माण केल्याप्रमाणे मानव-स्वभाव चांगला होता. तथापि, मानव-स्वभावाचा एक भाग म्हणजे मानवी इच्छा. पहिल्या मानवांची ही जबाबदारी होती की त्यांनी त्यांच्या निर्मित इच्छा देवाच्या इच्छेशी पूर्णपणे सुसंगत ठेवाव्यात, म्हणजेच त्याची आज्ञा पाळावी. पण त्यांनी देवाची आज्ञा मोडली. सैतानाप्रमाणे, त्यांनी आपली इच्छा देवाच्या इच्छेला जणू काही प्रतिरोधी अशी वळवली, आणि त्यामुळे जगात, आणि त्यांच्या स्वतःच्या स्वभावातही, पाप आणि दुःख यांचा शिरकाव झाला. दुसऱ्या शब्दांत, त्यांनी पाप केले. आणि जेव्हा त्यांनी पाप केले, तेव्हा मानव-स्वभाव विकृत आणि भ्रष्ट झाला. जसा बाप तसा मुलगा, या तत्त्वनुसार, आता सर्व मनुष्य भ्रष्ट आणि पतित मानव-स्वभाव घेऊनच जन्माला येतात. मनुष्यप्राणी आता पापाचे दास म्हणून जन्माला येतात. 

म्हणूनच “प्रत्येकजण थोडेफार पाप करतो” हा दावा देखील चुकीचा आहे. आपण बहुतेक वेळा स्वतःचे मोजमाप इतर मनुष्यांशी तुलना करून करतो; आणि तुलना करताना, अगदी टोकाचे, सर्वांत भयंकर नमुनेच निवडण्याची आपली सवय असते. म्हणून आपण अडॉल्फ हिटलर, जोसेफ स्टॅलिन, किंवा माओ झेडोंग यांसारख्या लोकांशी स्वतःची तुलना करू लागतो. निकष जर “लाखो लोकांची हत्या न करणे” इतकाच ठेवला, तर स्वतःबद्दल चांगले वाटणे सहज शक्य होते. पण देवाचे वचन पापाचे मोजमाप ज्या निकषाने करते, तो हा नाही. निकष देवाची इच्छा हा आहे; आणि त्या इच्छेचे परिपूर्ण आज्ञापालन हीच आवश्यकता आहे. “कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो.” (याकोब 2:10; गलतीकरांस पत्र 3:10 पाहा). प्रश्न हा नाही की आज तुम्ही लाखो लोकांची हत्या करण्यापासून स्वतःला आवरले की नाही? प्रश्न हा आहे की आज तुम्ही “प्रभु जो तुझा देव त्याच्यावर आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने व आपल्या पूर्ण मनाने” परिपूर्ण प्रीती केली का, आणि “आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती” परिपूर्ण रीतीने केली का (मत्तय 22:37-39)? हे परिपूर्णपणे करण्यात तुम्ही किती वेळा अपयशी ठरलात? ते फक्त “थोडे” होते का? नाही. आपण हे करण्यात सातत्याने अपयशी ठरतो, आणि याचा अर्थ असा की आपण पुष्कळ पाप करतो. म्हणूनच आपल्याला येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण नीतिमत्वाची गरज आहे. नियमशास्त्र परिपूर्ण रीतीने पूर्ण करणारा एकमेव मनुष्य तोच आहे.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

लिगोनियर मिनिस्ट्रीज

लिगोनियर मिनिस्ट्रीज

आम्ही डॉ. आर.सी. स्प्रौल यांचे शिक्षण-मंडळ सहकारी आहोत. आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत देवाच्या पवित्रतेची घोषणा करण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि त्याचे समर्थन करण्यासाठी अस्तित्वात आहोत. आमचे ध्येय, उत्कटता आणि उद्देश लोकांना देव आणि त्याच्या पवित्रतेबद्दलचे ज्ञान वाढण्यास मदत करणे हा आहे.