
पश्चात्ताप म्हणजे काय?
19/11/2026तुम्ही मरता तेव्हा तुमच्या आत्म्याचे काय होते?
आपण सर्वांनी याविषयी विचार केला आहे. आपण आपला शेवटचा श्वास घेतो, आपल्या हृदयाचे ठोके थांबतात आणि आपला आत्मा निर्जीव झालेल्या शरीरातून निघून जातो, त्या क्षणी नेमके काय होते? खरे सांगायचे तर, आपल्यापैकी बहुतेकांना मरण्याची भीती वाटते, जरी आपल्याला मृत्यूची भीती वाटत नसली तरी. मरण्याची प्रक्रिया अनेकदा वेदनादायक संघर्षाची असते. ती अनेकदा निर्जंतुक, वैद्यकीय वातावरणात घडते आणि सहसा अत्यंत अप्रिय असते. परंतु, मृत्यू म्हणजे प्रभूच्या उपस्थितीत सार्वकालिक जीवनात प्रवेश करणे होय, या अभिवचनावर विश्वास ठेवल्याने, तसेच मृतांना उठविण्याच्या ख्रिस्ताच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवल्याने, मरण्याच्या प्रक्रियेविषयी आपल्याला धास्ती वाटत असली, तरी ख्रिस्ती लोकांना मृत्यूच्या अंतिम परिणामाची भीती बाळगण्याची गरज नाही.
मरण आणि मरण पावण्याविषयीचे वृत्तांत आणि दंतकथा मोठ्या प्रमाणावर आढळतात. याचे एक कारण असे आहे की पवित्र शास्त्र मरण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करत नाही, तरीही मरण पावलेल्या आणि नंतर येशूने पुन्हा जिवंत केलेल्या अनेक व्यक्तींचा उल्लेख त्यात आढळतो. यांत लाजरचे उदाहरण सहज आठवते (योहानाचे शुभवर्तमान 11), तसेच इतरही उदाहरणे आहेत (उदा. लूकचे शुभवर्तमान 7:11–17 मधील नाईन येथील विधवेचा मुलगा). परंतु हे लोक मरण पावले तेव्हा त्यांनी काय अनुभवले याचा त्यांच्या स्वतःकडून आलेला कोणताही प्रत्यक्ष वृत्तांत (लाजराकडूनही) आपल्याकडे नाही. लाजर दुसऱ्यांदा मरण पावला, यावेळी सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्यासाठी, तेव्हा तो काय विचार करत असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. आता, आपली पुनरुत्थित शरीरे कशी असतील हे आपल्याला माहीत आहे, कारण ख्रिस्त परत येतो आणि आपण अविनाशी अवस्थेत उठवले जातो, तेव्हा होणाऱ्या संपूर्ण रूपांतरणाचे एक उल्लेखनीय वर्णन पौल आपल्याला देतो (1 करिंथकरांस पत्र 15:35–49). तथापि, मध्यवर्ती अवस्थेबद्दल पवित्र शास्त्रात फारशी माहिती नाही. हा असा काळ आहे ज्यामध्ये मरण पावलेल्या विश्वासणाऱ्यांचे आत्मे त्यांच्या शरीरांच्या पुनरुत्थानाची आणि शापाचा (मृत्यूचा) अंतिम व संपूर्ण पराभव होण्याची वाट पाहतात.
या प्रश्नाचे स्वरूपच असे आहे की (आपण मरतो तेव्हा आपल्या आत्म्याचे काय होते?) तो अनुमानाला सहज वाव देतो. माझी भक्तिमान आजी (एका पाळकाची कन्या) मंडळीतील मरणासन्न अवस्थेत असलेल्या सदस्यांच्या शय्येजवळ केलेल्या जागरणांचे अनुभव सांगत असे, ते मला आठवते. तिने सांगितले की अंतिम श्वास घेण्यापूर्वी मरणासन्न व्यक्ती अनेकदा आपले डोळे उघडायची, स्वर्गाकडे पाहायची, काहीसा आनंद आणि अपेक्षा व्यक्त करायची आणि मग अटळ मृत्यूला शरण जायची. तिचा असा विश्वास होता की या संतांना पुढे काय (किंवा कोण) त्यांची वाट पाहत आहे याची क्षणिक झलक दाखवली जात होती. तसे असूही शकते, परंतु शरीराचे कार्य बंद पडत असताना मेंदूमध्ये होणाऱ्या जैवरासायनिक प्रतिक्रिया विविध प्रकारच्या संवेदनात्मक अनुभूती निर्माण करतात, हेही तितकेच शक्य आहे. असे वृत्तांत, कितीही प्रामाणिक असले तरी, वैयक्तिक अनुभवांपुरते मर्यादित असतात आणि त्यांच्यावर सिद्धांत उभारता येईल असा कोणताही आधार देत नाहीत.
आपण सर्वांनी अशा लोकांच्या वृत्तांतांविषयी ऐकले आहे, ज्यांचा कथितपणे मृत्यू झाला आणि त्यानंतर ते मृत्यूनंतरच्या जगातून परत आले. असे वृत्तांत अतिशय कुतूहलजनक वाटतात. त्यामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर आलेल्या अनुभवांविषयी लिहिलेल्या पुस्तकांचा एक स्वतंत्र व्यवसायच उभा राहिला आहे. या पुस्तकांचे लेखक स्वर्गाला दिलेल्या आपल्या वैयक्तिक भेटीचे वृत्तांत सांगतात आणि परत आल्यानंतर त्या अनुभवांवर पुस्तके लिहितात. या पुस्तकांमध्ये सहसा मरण पावलेल्या प्रियजनांशी झालेल्या भेटींचे वर्णन असते. त्यात स्वर्गाचे वर्णनही केलेले असते, जे बहुधा पृथ्वीवरील दृश्यांचे अतिशयोक्त चित्रण असते, तसेच येशूला भेटल्याचे, देवाशी संवाद साधल्याचे आणि स्वर्गीय गोष्टी पाहिल्याचे वर्णनही आढळते.
परंतु या सर्व बहुधा बनावट कथा-कहाण्या देवाच्या उपस्थितीत प्रवेश करण्याविषयी पवित्र शास्त्र जे सांगते त्याच्याशी विसंगत आहेत. यशया 6:1–7 मधील प्रसंग येथे आठवतो. प्रभूचे दर्शन झाल्यावर यशया स्वतःच्या अयोग्यतेच्या जाणिवेने भारावून जातो. देवाच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींचे पवित्र शास्त्रातील वृत्तांत, जसे मोशेला प्रभूच्या गौरवाची मिळालेली झलक (निर्गम 33:18–23) किंवा अम्माऊसच्या वाटेवर येशूने आपल्या दोन शिष्यांना दिलेले दर्शन (लूकचे शुभवर्तमान 24:37), पवित्र देवाच्या उपस्थितीत आल्यावर भय, किंबहुना दहशत निर्माण झाल्याचे दाखवतात. पवित्र शास्त्रातील वृत्तांत “मी स्वर्ग पाहिला” किंवा “मी येशूबरोबर चाललो” अशा प्रकारच्या साहित्यामध्ये आढळणाऱ्या सहज, किंबहुना क्षुल्लक स्वरूपाशी अजिबात जुळत नाहीत. पवित्र शास्त्र मरण्याची प्रक्रिया किंवा मरणासन्न व्यक्तींच्या मनातील विचारांचे वर्णन करत नसल्यामुळे, अनेकांनी ही पोकळी बनावट वृत्तांतांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. दुर्दैवाने, त्यांना यात मोठे यश मिळाले आहे. अनेक लोक या दंतकथांना सत्य मानतात.
दिलासादायक गोष्ट म्हणजे, पवित्र शास्त्र आपल्याला मध्यवर्ती अवस्थेबद्दल दोन महत्त्वाचे संदर्भबिंदू देते, जे आपल्याला मृत्यूचा सामना करण्यासाठी तयार होण्यास मदत करतात. प्रथम, काही सुप्रसिद्ध शास्त्रभागांमध्ये, पौल विशेषतः विश्वासणाऱ्यांचा मृत्यू झाल्यापासून ख्रिस्त परत येईपर्यंत त्यांचे काय होते, या विषयावर बोलतो. 2 करिंथकरांस पत्र 5:8 नुसार, पौल शिकवतो की विश्वासणाऱ्याच्या मृत्यूच्या क्षणी, तो ताबडतोब प्रभूच्या उपस्थितीत प्रवेश करतो. प्रेषित लिहितो, “शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते.” पौलाने “येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.” (फिलिप्पैकरांस पत्र 1:23) असेही म्हटले आहे. आपण मरतो तेव्हा आपण लगेच “ख्रिस्ताजवळ” असतो आणि देवाच्या उपस्थितीत प्रवेश करतो. जेव्हा आपण “स्वर्गाबद्दल” बोलतो तेव्हा सहसा आपला हाच अर्थ असतो.
दुसरे, प्रकटीकरण 4–6 मध्ये योहानाने वर्णन केलेले स्वर्गीय दृश्य आपल्याला आजवर न पाहिलेल्या त्या वास्तवाची एक झलक देते, ज्याचा अनुभव आपण मरण पावल्यानंतर घेणार आहोत. केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आपण देवाच्या उपस्थितीत, स्वर्गीय राजासनासमोर, मुक्ती पावलेल्या संतांमध्ये सामील होऊ. आपण शुद्धीवर असू, आपण कोठे आहोत याची आपल्याला पूर्ण जाणीव असेल आणि आपण आनंदाने देवाची स्तुती करीत असू. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे स्वर्गीय दृश्य आपण मरतो तेव्हा आपल्या आत्म्याचे काय होते याचे आपल्याला उपलब्ध असलेले सर्वांत स्पष्ट चित्र आहे. या तीन अध्यायांमध्ये, योहान स्वर्गाचे एक महिमावान चित्र देतो, जिथे युगसमाप्तीला आपल्या शरीराचे पुनरुत्थान होईपर्यंत देव त्याच्या लोकांमध्ये वास करतो. स्वर्ग म्हणजे हेच आहे, पवित्र देवाच्या उपस्थितीत वास करणारे मुक्ती पावलेले लोक आपल्या निर्माणकर्त्याला आणि मुक्तिदात्याला सर्व स्तुती आणि गौरव अर्पण करतात.
हे दृश्य अद्भुत असले आणि अनेक प्रकारे आपल्या आकलनापलीकडचे असले तरी, स्वर्गातील पवित्र लोक असा आक्रोश करत आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे: “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणार्या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?” (प्रकटीकरण 6:10). जे आधीच देवाच्या राजासनासमोर त्याच्या उपस्थितीत आहेत, म्हणजे जे आपल्यापूर्वी मरण पावले आहेत आणि आता मध्यवर्ती अवस्थेत आहेत, मृत्यू आणि प्रभूचे पुनरागमन यांमधील हा काळ अनुभवत आहेत, आणि ते त्या दिवसाची वाट पाहत आहेत जेव्हा येशू ख्रिस्त पुनरुत्थानाच्या व न्यायाच्या दिवशी पृथ्वीवर परत येईल.
मग, आपण मरतो तेव्हा विश्वासणाऱ्यांच्या आत्म्यांचे काय होते? आपण ताबडतोब प्रभूच्या गौरवशाली उपस्थितीत प्रवेश करतो, जिथे आपण युगसमाप्तीला आपल्या शरीरांच्या पुनरुत्थानाची वाट पाहतो.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


