
मानव-स्वभावाचे मूळ स्वरूप: सात्विक की पूर्णपणे पापभ्रष्ट?
14/05/2026
गर्भपाताच्या अपराध-भावनेतून मुक्तता
21/05/2026देवाचा क्रोध काय आहे?
देवाचा क्रोध म्हणजे, ख्रिस्ताच्या प्रायश्चिताद्वारे ज्यांचे पाप झाकले गेलेले नाही, अशा पापाच्या आणि पापी लोकांच्या विरोधात आमचा जो पवित्र व नीतिमान देव ह्याचा न्यायोचित प्रतिसाद होय. अनेक लोकांना देव क्रोधाविष्ट आहे असा विचार करणे जरी आवडत नसले, तरी दुष्टतेविरुद्ध परमेश्वराचा क्रोध प्रकट होतो, असा उल्लेख पवित्र शास्त्रात वारंवार येतो. जुना आणि नवा असे दोन्ही करार या गोष्टीची विपुल साक्ष देतात की देव अनीतीवर आपला क्रोध अंमलात आणतो (पहा अनुवाद 9:8; 2 राजे 23:26; स्तोत्रसंहिता 21:9; 90:11; यशया 13:9; मीखा 5:15; सफन्या 1:18; योहान 3:36; रोमकरांस पत्र 1:18; इफिसकरांस पत्र 5:6; प्रकटीकरण 16:1).
दैवी क्रोध आणि देवाची गुणवैशिष्ट्ये
देव स्वतः जो आहे, त्याच्या त्याच गुणवैशिष्ट्यांमुळे तो अनीतीवर आपला क्रोध अंमलात आणतो. पवित्र शास्त्र साक्ष देते की देव नीतिमान आणि न्यायी आहे (अनुवाद 32:4; दानीएल 9:14; रोमकरांस पत्र 1:17; प्रकटीकरण 15:3). जर तो दुष्टतेला व दुष्कर्म करणाऱ्यांना दंड देत नसता, तर तो नीतिमान आणि न्यायी राहू शकला नसता; म्हणून पापावर क्रोधाचा वर्षाव करणे हे त्याच्या नीतिमान स्वभावाशी पूर्णपणे सुसंगत आहे. पाप्यांनी आपल्या अपराधांची किंमत चुकवलीच पाहिजे; आणि देव आपला न्यायी क्रोध अंमलात आणल्याशिवाय दोषी व्यक्तीला निर्दोष ठरवू शकत नाही, नाहीतर तो अनीतिमान ठरेल (निर्गम 34:6-9). देव प्रीती आहे (1 योहान 4:7-8), आणि तो ज्या गोष्टींवर प्रीती करतो त्यांपैकी एक म्हणजे नीतिमत्व (स्तोत्रसंहिता 33:5). देव परिपूर्ण असल्यामुळे, नीतिमत्वावरील त्याची प्रीतीही परिपूर्ण असणे आवश्यक आहे; परिणामी त्याला “दुर्जनाच्या मार्गाचा” वीट येणे आवश्यक आहे (नीतिसूत्रे 15:9; अनुवाद 32:4 देखील पाहा).
जोपर्यंत पाप नाही, तोपर्यंत प्रभू परमेश्वर आपला क्रोध प्रकट करू शकत नाही; आणि पाप करणाऱ्या सृष्ट प्राण्यांच्या अस्तित्वावाचून पापही असू शकत नाही. म्हणून सृष्टी आणि तिचे पापात पतन यांवाचून दैवी क्रोध प्रकट होऊ शकत नाही. या कारणास्तव अनेक ईश्वर-शास्त्रज्ञांनी क्रोधाचे वर्गीकरण देवाचा सापेक्ष गुणधर्म म्हणून केले आहे, निरपेक्ष गुणधर्म म्हणून नाही. देवाचा निरपेक्ष गुणधर्म असा असतो की प्रभूने कधीही काहीही निर्माण केले नसते, तरीही तो गुण उघड झाला असता किंवा कार्यरत राहिला असता. निरपेक्ष गुणधर्मांत सार्वकालिकता आणि सर्वज्ञता यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. देवाने विश्व निर्माण केले असते किंवा केले नसते, तरीही तो सार्वकालिक आणि सर्वज्ञ असताच.
सापेक्ष दैवी गुणवैशिष्ट्ये तेव्हाच प्रकट होतात, जेव्हा देवाच्या बाहेर असे काही असते की ज्याच्याशी त्याचा संबंध येतो. वर म्हटल्याप्रमाणे, क्रोध हा सापेक्ष दैवी गुणधर्म आहे, कारण पापीच नसते तर दैवी क्रोधाचे प्रकटीकरणही झाले नसते. तथापि, याचा अर्थ असा नाही की क्रोध (किंवा इतर कोणताही सापेक्ष दैवी गुणधर्म) हा एखादा असा गुणधर्म आहे जो देवाला सृष्टीची निर्मिती केल्यामुळे नव्याने प्राप्त झाला. देव आपल्या अंतर्निहित स्वरूपामुळेच, म्हणजे तो स्वभावतः चांगला आणि नीतिमान असल्यामुळे, पापावर क्रोधाविष्ट होतो. दैवी क्रोध प्रकट होतो तो सृष्टी बदलून पापी झाली म्हणून; देव स्वतः बदलतो म्हणून नव्हे. पापी जेव्हा स्वभावतःच नीतिमान असलेल्या देवासमोर येतात, तेव्हा त्यांना त्याचा क्रोध जाणवतो, मनुष्य पापात पडला त्या प्रसंगी एखादा नवा गुणधर्म देवाने धारण केला म्हणून नव्हे. सरतेशेवटी देव कधीच बदलू शकत नाही (मलाखी 3:6).
देवाच्या क्रोधाचा अनुभव
पवित्र शास्त्र हे स्पष्ट करते की देवाचा क्रोध भयानक आहे. पवित्र शास्त्र वारंवार देवाच्या क्रोधाच्या जळजळीत उष्णतेबद्दल बोलते (निर्गम 32:11; विलापगीत 4:11), आणि जे पापी आपल्या पापापासून कधीही ख्रिस्ताकडे वळत नाहीत त्यांच्यावर असलेल्या देवाच्या सार्वकालिक क्रोधाच्या ठिकाणाचे वर्णन “अग्नीचे सरोवर” असे करते (प्रकटीकरण 20:10). यशया 66:24 चा संदर्भ घेत येशू नरकाविषयी म्हणतो की “त्यांचा किडा मरत नाही” (मार्क 9:42-49). या प्रतिमेद्वारे आपला तारणकर्ता देवाच्या न्यायाचे चित्रण एक असे भक्षण म्हणून करतो जो पाप्याला कधीही न संपणाऱ्या विनाशात गिळंकृत करतो. संदेष्टे व प्रेषित “प्रभूचा दिवस” या विषयी बोलताना त्याचा उल्लेख मोठा नाश व विध्वंसक दिवस म्हणून करतात; हा शब्द इतिहासातील विशिष्ट काळांत देवाचा न्याय ओतला जाणे, तसेच काळाच्या शेवटी होणारा त्याचा अंतिम न्याय, या दोन्ही अर्थांनी वापरला जाऊ शकतो (यशया 13:6; यहेज्केल 30:3; योएल 1:15; 2 पेत्र 3:10).
वरील वर्णनांमुळे अनेकांना असे वाटू शकते की देवाचा क्रोध म्हणजे केवळ विस्मयकारक, अग्नीमय न्यायाचे प्रदर्शन. मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की न्यायाची अशी प्रदर्शने प्रत्यक्षात त्या क्रोधाची परिपूर्णता असतात, जो फार पूर्वीच प्रथम ओतला जाऊ लागला होता. रोमकरांस पत्र 1:18-32 यांसारखे शास्त्रभाग सूचित करतात की देव अनेकदा आपला क्रोध एकाच वेळी सर्वस्वी अंमलात आणीत नाही, तर कालक्रमाने बजावतो. पौल सांगतो त्याप्रमाणे, देवाचा क्रोध यामध्येही प्रकट होतो की तो लोकांना त्यांच्या पापाच्या स्वाधीन करतो आणि त्यांना त्यात अधिकाधिक गुंतत जाऊ देतो. देव अनेकदा पश्चात्ताप न करणाऱ्या पाप्यांना त्यांच्या आवडीच्या पापात बराच काळ गुंतवून ठेवतो, आणि नंतर त्यांचा अग्नीमय न्यायाने भूगाभूगा करतो. देव आपल्या क्रोधात पश्चात्ताप न करणाऱ्यांना त्यांच्या पापाच्या स्वाधीन करील.
ज्यांच्यावर देवाचा क्रोध आहे अशांसाठी आशा
पाप्यांवर क्रोधाचा एक अंतिम दिवस येणार आहे. परंतु देवाची स्तुती असो की, देव दयाळूही आहे, आणि येणाऱ्या क्रोधापासून आमचा बचाव व्हावा म्हणून त्याने येशू ख्रिस्ताची तरतूद केली आहे (1 थेस्सलनीकाकरांस पत्र 1:10). येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, जो देही झाला जेणेकरून आपल्या न्यायी देवाचा पापावरील दंड स्वतःवर घ्यावा. येशू ख्रिस्तावर देव आपला क्रोध ओततो, आणि तो क्रोध तो स्वतःवर घेतो. अशा रीतीने तो स्वतःला न्यायी दाखवतो, कारण ख्रिस्तामध्ये पापाला दंड मिळतो; आणि तो दयेने परिपूर्णही ठरतो, कारण ख्रिस्ताचे प्रायश्चित्त याचा अर्थ असा आहे की जे आपल्या पापापासून वळतात आणि येशूवर विश्वास ठेवतात, त्यांच्याविषयी तो आता कृपाळू, म्हणजेच अनुकूल, होऊ शकतो (रोमकरांस पत्र 3:21-31). प्रभू दया आणि अढळ प्रीती दाखवण्यात आनंद मानतो (मीखा 7:18), आणि जे तारणासाठी केवळ येशूवरच विसंबून राहतात, ते देवाच्या सार्वकालिक क्रोधापासून पूर्णतः वाचविले जातील (इब्री लोकांस पत्र 7:25).
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


