
योएलच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
07/05/2026
मानव-स्वभावाचे मूळ स्वरूप: सात्विक की पूर्णपणे पापभ्रष्ट?
14/05/2026इब्री लोकांस पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
इब्री लोकांस पत्रातील मूलभूत तत्त्वे समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे, ईश्वरशास्त्राच्या तीन मुख्य मुद्द्यांवर ते जे अनिवार्य, अपरिहार्य योगदान देते त्याचे परीक्षण करणे.
1. करारशास्त्र समजून घेण्यासाठी इब्री लोकांस पत्र महत्त्वाचे आहे.
मी असे म्हणण्याचे धाडस करतो की, पवित्र शास्त्रातील करारशास्त्र समजून घेण्यासाठी इब्री लोकांस पत्र हे नव्या करारातील सर्वात महत्त्वाचे पत्र आहे. पवित्र शास्त्रातील करारांविषयी एखाद्याची समज काहीही असो, इब्री लोकांस पत्राचे अर्थविवेचन त्यास लक्षणीयरीत्या दिशा देईल, समृद्ध करील. हे जुना करार कोणत्या हेतूसाठी देण्यात आला आणि नव्या कराराशी त्याचा नेमका संबंध काय आहे, हे उलगडून दाखवते. जुना करार वाचताना हाताशी धरावे असे हे एक स्पष्टीकरणात्मक भिंग आहे.
वाचक चुकून असा निष्कर्ष काढू शकतात की इब्री लोकांस पत्र जुन्या कराराला कमी लेखते. पण सत्य याच्या अगदी विरुद्ध आहे. जुना करार जरी तात्पुरता असला, तरी तो आपल्या संपूर्ण वैभवात दिसू लागला की, नव्या कराराचे गौरव सर्वाधिक तेजाने उजळून निघते. हा विरोधाभास अनेक “जर/तर” (if/then) अभिव्यक्ती असलेल्या विधानांत दिसून येतो (पहा इब्री लोकांस पत्र 2:1–4; 9:13–14; 12:25). इब्री लोकांस पत्र हे स्पष्ट करते की नवा करार जुन्या कराराला रद्द करीत नाही, तर त्यास पूर्णत्वास नेतो. त्यामुळे आपण संपूर्ण पवित्र शास्त्र कसे वाचतो, याला दिशा मिळते. इब्री लोकांस पत्र आपल्याला दाखवते की शास्त्रवचनाचा अर्थ शास्त्रवचनच लावते. म्हणून आपण जुना आणि नवा करार यांना एकमेकांच्या विरोधात उभे करू नये; उलट त्यांचा योग्य संबंध ओळखून पाहावा—छाया आणि वास्तव, अभिवचन आणि पूर्तता.
लेखक नव्या कराराच्या युगात जगण्याचा गौरवशाली विशेषाधिकार आणि त्यातील गंभीर महत्त्व मोठ्या आवेशाने अधोरेखित करतो (पहा इब्री लोकांस पत्र 1:2–3). कारण आपण अधिक उत्कृष्ट अशा कराराच्या व्यवस्थेखाली आहोत (इब्री लोकांस पत्र 8:6) जो प्रत्यक्षात निर्दोष आहे (इब्री लोकांस पत्र 8:7–8) म्हणून त्यातील दांव अधिक मोठा आहे. त्यामुळे चेतावण्या अधिक कठोर, अभिवचने अधिक गोड, आणि अपेक्षा अधिक उंचावलेल्या आहेत. हा काही क्षणभंगुर करार नाही, तो सार्वकालिक आहे (इब्री लोकांस पत्र 13:20). इब्री लोकांस पत्र 2 करिंथकरांस 1:20 मधील प्रेषित पौलाच्या दाव्याचे सविस्तरपणे प्रत्यंतर देते: “देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी ‘होय’ हे आहे.” कृपेचा तो एकच करार, त्याच्या विविध व्यवस्थांसह, ख्रिस्ताच्या येण्याने बहरून उठला आहे. आणि इब्री लोकांस पत्रासाठी, यामुळे सर्व काही बदलून जाते. म्हणून जेव्हा तुम्ही इब्री लोकांस पत्र वाचता, तेव्हा नव्या कराराच्या गौरवांकडे जागरूकपणे लक्ष द्या.
2. ख्रिस्तशास्त्र समजून घेण्यासाठी इब्री लोकांस पत्र महत्त्वाचे आहे.
नवा करार इतका गौरवशाली आहे, कारण त्याचा मध्यस्थच तसा गौरवशाली आहे. जर विश्वास हे देवाच्या कृपाळू कराराच्या लाभांचा आनंद घेण्याचे साधन असेल (जसे ते नेहमीच राहिले आहे), तर त्या विश्वासाचा विषय आपल्या विश्वासाचे ओझे पेलण्यास समर्थ, आणि ते पेलण्यास इच्छुक, असणे आवश्यक आहे. इब्री लोकांस पत्र ठामपणे आणि निर्विवाद रीतीने ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व स्थापन करते: तो जुन्या करारातील प्रत्येक छायेचे खरे सार आहे, तसेच आपल्या विश्वासाचा आणि आपल्या उपासनेचा सर्वोच्च केंद्रबिंदू आहे.
इब्री लोकांस पत्र येशूला ‘घरगुती’ अशा मर्यादित स्वरूपात दाखवण्यास जागाच ठेवत नाही. तो देवाच्या गौरवाचे तेज, आणि त्याच्या तत्त्वाचे नेमके प्रतिरूप आहे (इब्री लोकांस पत्र 1:3), आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. तो सनातन पुत्र आहे, देवदूतांपेक्षा श्रेष्ठ, मोशेपेक्षा महान, आणि असा अंतिम व थोर महायाजक आहे की ज्याने स्वतःला एकदाच सर्वांसाठी यज्ञ म्हणून अर्पण केले आहे. देवदूतांपासून ते जुन्या करारात प्रभूने स्वतः स्थापिलेल्या त्या गौरवशाली पदांपर्यंत, म्हणजे संदेष्टे, याजक, आणि राजे, या सर्वांच्या संदर्भात तो सर्वोच्च आहे.
प्रभू येशू ख्रिस्त हा नव्या कराराचे खरे सार आहे; आणि आपण वर पाहिल्याप्रमाणे हा नवा करार जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ करार आहे (इब्री 7:22). इब्री लोकांस पत्र ठामपणे सांगते की ख्रिस्ती जीवन हे काही धूसर, अस्पष्ट आध्यात्मिकता नाही; तर ख्रिस्ताशी असलेल्या गूढ ऐक्यातून उगवलेली, या गौरवशाली ख्रिस्ताप्रतीची ठोस आणि करारात्मक निष्ठा आहे. म्हणूनच तो आपल्या प्रीतीचा विषय, आपल्या आशेचा नांगर, आणि आपल्या विश्वासाचा केंद्रबिंदू असावा. जेव्हा तुम्ही इब्री लोकांस पत्र वाचता, तेव्हा येशू ख्रिस्ताचे वैभव निरखून पाहा.
3. मंडळीशास्त्र समजून घेण्यासाठी इब्री लोकांस पत्र महत्त्वाचे आहे.
इब्री लोकांस पत्रात ख्रिस्त आणि करार या विषयांवर जो भर दिला आहे त्या तुलनेने मंडळीशास्त्राची समज आजच्या वाचकांना कदाचित सहज उमजणार नाही, तरीही त्याचे महत्त्व काडीमात्र कमी नाही. इब्री लोकांस पत्राचा लेखक केवळ सोयीस्कर ऐतिहासिक संदर्भ म्हणून रानातील पिढीकडे वळून पाहत नाही; तो त्या रानातील चौकटीतच मंडळीचे अस्तित्व आणि ओळख समजावून सांगतो. ही ओळख रूपकात्मक नाही; ती प्रकारात्मक आहे, म्हणजे आजची मंडळी केवळ रानातील इस्राएलसारखी नाही, तर एका वास्तविक अर्थाने ती त्याच प्रवासी लोकांचे नव्या करारातील सातत्य आहे.
प्रवासाची भाषा इब्री लोकांस पत्रात ओतप्रोत भरलेली आहे: “कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही; तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत” (इब्री 13:14). लेखक आपल्या वाचकांना, ज्यांच्यावर जुन्या कराराच्या व्यवस्थेतील सोयी आणि निश्चिततेकडे परत फिरण्याची परीक्षा ओढवली आहे, त्यांच्या खऱ्या वतनाकडे जाणाऱ्या मार्गावर उपरी म्हणून टिकून राहण्याचा आग्रह करतो. हे मंडळीशास्त्रीय चित्रण अध्याय 3 आणि 4 मध्ये सर्वाधिक ठळकपणे दिसून येते. मंडळीला ताकीद दिली जाते की बंडाच्या वेळी झाले तसे आपले अंत:करण कठीण करू नका (इब्री 3:7–8). ती पिढी अविश्वासामुळे रानात मेली. इब्री लोकांस पत्र कठोर चेतावण्यांच्या जोडीला तितकेच सामर्थ्यवान प्रोत्साहनही देत राहते. देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्याचे अभिवचन अद्यापही तसेच ठेवलेले आहे (इब्री 4:1), आणि तो विसावा ख्रिस्तामध्ये आढळतो, जो आपला थोर महायाजक असून आपल्या अशक्तपणाबद्दल आपल्याशी सहानुभूती बाळगतो (इब्री 4:15). म्हणून मंडळी ही चिकाटी, उपासना, आणि पुढे पाहणाऱ्या आशेने चिन्हांकित झालेला कराराचा समुदाय आहे. ती रानात ख्रिस्ताभोवती एकत्र जमलेली आहे, त्याच्या वचनाने तिचे भरण-पुरण होत आहे, आणि स्वर्गीय यरुशलेमकडे वाटचाल करत आहे..
परंतु आपल्याला अजून खोलवर जाणे आवश्यक आहे. इब्री लोकांस पत्र पवित्र शास्त्रातील स्वर्गीय उपासनेचे सर्वांत भव्य दर्शनही आपल्यासमोर उभे करते, आणि हेही आपल्या मंडळीशास्त्राला प्रकाश देते. अध्याय 12 मध्ये लेखक सीनाय पर्वत आणि सियोन पर्वत यांतील विरोधाभास त्याच्या कळसापर्यंत नेतो. तो सांगतो की आपण सीनायच्या भयावहतेजवळ आलेलो नाही, तर “सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ” आले आहोत (इब्री 12:22-24). हे केवळ भविष्यातील दर्शन नाही; हे वर्तमान वास्तव आहे. मंडळी जेव्हा जेव्हा उपासनेसाठी एकत्र जमते, तेव्हा ती या स्वर्गीय सभेत सामील केली जाते. लढणारी मंडळी सार्वकालिक कराराच्या रक्तावर आधारलेल्या कराराच्या सरावासाठी विजयी मंडळीत सहभागी होते (इब्री 13:20). म्हणून तुम्ही इब्री लोकांस पत्र वाचता तेव्हा मंडळीच्या गौरवाकडे लक्ष द्या.
या तीन विषयांच्या प्रकाशात इब्री लोकांस पत्र वाचल्यास तुम्हाला केवळ या एका पुस्तकाचा संदेश समजण्यास मदत होणार नाही, तर उरलेल्या पासष्ट पुस्तकांचा संदेशही अधिक स्पष्टपणे उलगडेल.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


