जॉन कॅल्विन यांनी “चर्चमध्ये धर्मसुधारणा करण्याची निकडीची गरज” यावर मांडलेले विचार

15/10/2025

आपण काम का करतो?

21/10/2025

जॉन कॅल्विन यांनी “चर्चमध्ये धर्मसुधारणा करण्याची निकडीची गरज” यावर मांडलेले विचार

15/10/2025

आपण काम का करतो?

21/10/2025

सुवार्ता म्हणजे काय?

अनेक ख्रिस्ती लोक, मंडळ्या आणि मिशनसंस्था आपल्या विश्वासाचे वर्णन करण्यासाठी सुवार्ता (किंवा शुभवर्तमान) या शब्दाचा नियमित उपयोग करतात. सुवार्तेचा नेमका अर्थ काय आहे, आणि कोण ती प्रामाणिकपणे गाजवतो, यावर ईश्वरशास्त्रीय वाद झाले आहेत आणि आजही होत आहेत. आम्हा सर्वांना परिचित असलेल्या या शब्दाचा खरा अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पवित्र शास्त्राकडे वळणे. 

ग्रीक नव्या करारात युएंजेलियन (euangelion / सुवार्ता) हे नाम सत्तरहून अधिक वेळा आले आहे. एका अर्थाने संपूर्ण नवा करार सुवार्तेशी संबंधित असल्याने, हा शब्द अधिक वारंवार वापरला गेला पाहिजे होता अशी अपेक्षा आपण केली असावी. त्याहूनही अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे नव्या कराराच्या लेखकांनी हा शब्द अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला दिसतो. पौलाने इतर सर्व लेखकांच्या तुलनेत तिप्पटहून अधिक वेळा हा शब्द वापरला आहे. बाकीचे बहुतांश वापर मत्तय आणि मार्क या पुस्तकांत आढळतात, तर लूक, योहान, पेत्र आणि याकोब यांच्यात तो क्वचितच किंवा अजिबात आढळत नाही. 

सुवार्ता या शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे “चांगले वर्तमान.” हा शब्द केवळ ख्रिस्ती संदेशापुरता मर्यादित नाही, तर मूर्तीपूजक जगामध्ये देखील तो एखाद्या चांगल्या घोषणेचा उल्लेख करण्यासाठी वापरला जात असे. नव्या करारात मात्र तो तारणकर्ता येशूविषयीचे उत्तम वर्तमान जाहीर करण्याच्या संदर्भात वापरला जातो. अनेकदा हा शब्द असा गृहित धरून वापरला जातो की वाचकाला त्याचा अर्थ माहीत आहे.

नव्या करारात सुवार्ता हा शब्द ज्या प्रकारे वापरला आहे, त्याचे अधिक जवळून निरीक्षण केल्यास अनेक गोष्टी ठळकपणे समोर येतात. पहिला मुद्दा, आपल्याला अनेकदा “देवाची सुवार्ता” किंवा “देवाचे शुभवर्तमान” ही संज्ञा आढळते. यामुळे शुभवर्तमानाचा उगम देवाकडून मिळालेली देणगी म्हणून स्पष्ट होतो—ते मानवी नव्हे, तर दैवी उत्पत्तीचे आहे. दुसरा मुद्दा असा की, सुवार्तेची वैशिष्ट्ये वेगवेगळ्या पद्धतीने परिभाषित केली जातात: ती सत्य आहे (गलतीकरांस 2:5, 14; कलस्सैकरांस 1:5), ती कृपेची सुवार्ता आहे (प्रेषितांची कृत्ये 20:24) आणि ती गौरवी सुवार्ता आहे (2 करिंथकरांस 4:4; 1 तीमथ्य 1:11). तिसरा मुद्दा हा की, सुवार्तेला दोन प्रतिसाद आपण पाहतो —प्राथमिक प्रतिसाद म्हणजे विश्वास ठेवणे (प्रेषितांची कृत्ये 15:7; इफिसकरांस 1:13), आणि त्याबरोबर आज्ञापालन  हा देखील एक प्रतिसाद आहे (1 पेत्र 4:7; रोमकरांस 1:5; 10:16; 16:26; 2 थेस्सलनीकाकरांस 1:8). 

(रोमकरांस पत्रात पौल “विश्वासाने आज्ञापालन” हा विचार मांडतो, जेव्हा तो नियमशास्त्रविरोधी (antinomian / अँटीनोमियन) असल्याचा आरोप करणाऱ्यांना या शब्दप्रयोगाने प्रत्युत्तर देतो.) चौथा मुद्दा, सुवार्तेचे अनेक परिणाम दिसतात: निश्चितच सुवार्ता आम्हांस तारते (रोमकरांस 1:16; इफिसकरांस 1:13); ती देवाचे राज्य घेऊन येते (मत्तय 4:23; 9:35; 24:14); ती देवाच्या लोकांमध्ये आशा निर्माण करते (कलस्सैकरांस 1:23); आणि पवित्रीकरणाकडे प्रवृत्त करते (मार्क 8:35; 10:29; 2 करिंथकरांस 9:13; इफिसकरांस 6:15; फिलिप्पैकरांस 1:27). 

सुवार्ता या शब्दाचा असा उपयोग तिच्या अंतर्निहित विषयवस्तूकडे निर्देश करतो; आणि नव्या करारात काही परिच्छेद तर तिची विषयवस्तू अगदी स्पष्टपणे मांडतात. या वचनांवर विचार केला असता असे दिसते की कधी कधी सुवार्ता हा शब्द येशू आपल्या लोकांना देत असलेले तारण आणि नवे जीवन यांच्या सर्व पैलूंना व्यापक रीतीने सूचित करतो; तर कधी कधी तो मर्यादित अर्थाने—आपल्याबाहेर (outside of us) येशूने आपल्यासाठी जे केले त्यापुरता—वापरला जातो. दुसऱ्या शब्दांत, कधी कधी “सुवार्ता” ही संज्ञा व्यापक अर्थाने येशूने आपल्या लोकांसाठी व त्यांच्या अंतःकरणात घडवलेल्या ‘नीतिमान ठरविले जाणे’ आणि ‘पवित्रीकरण’ या दोन्ही कार्यांना सूचित करते; आणि कधी कधी ती अरुंद अर्थाने केवळ नीतिमान ठरविले जाणे या येशूच्या कार्याला दर्शवते. ही भिन्नता मांडण्याचा दुसरा मार्ग असा की, काही वेळा “सुवार्ता” हा शब्द जुन्या करारातील वचनांची नव्या करारात झालेली सर्व पूर्तता दाखवतो; आणि काही वेळा तो मर्यादित अर्थाने—आपण नियमशास्त्र पाळून जे करतो त्याच्या विरोधात—येशूने केलेल्या कार्याकडेच निर्देश करतो. 

मार्क 1:1 मध्ये “सुवार्ता” किंवा “शुभवर्तमान” या शब्दाचा व्यापक अर्थ दिसून येतो: “देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ.” येथे, “शुभवर्तमान” हा शब्द मार्कने येशूच्या शिकवणुकी आणि कार्याबद्दल सांगितलेल्या सर्व गोष्टींचा संदर्भ देत असल्याचे दिसते. अशाच प्रकारचा व्यापक उपयोग प्रकटीकरण 14:6–7 मध्येही आढळतो: 

‘नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणार्‍यांना म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यांना सांगण्यास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र’ व पाण्याचे झरे ‘निर्माण केले,’ त्याला नमन करा.” 

बर्‍याच वेळा, सुवार्ता हा शब्द मर्यादित अर्थाने वापरला जातो आणि त्याचा आशय स्पष्टपणे सांगितलेला असतो. हे आपण 1 करिंथकरांस 15:1–4 मध्ये पाहतो:

‘बंधुजनहो, जी सुवार्ता मी तुम्हांला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केलात, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात; जिच्या द्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हांला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हांला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसर्‍या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले; ‘

येथे, सुवार्ता म्हणजे आम्हाला पापापासून वाचविणारे येशूचे मरण आणि पुनरुत्थान याविषयीचा संदेश.

आणखी एक ठिकाणी, पौल “धन्यवादित देवाच्या गौरवाची जी सुवार्ता मला सोपवलेली आहे” असे लिहितो आणि मग त्या सुवार्तेची विषयवस्तू काय आहे ते स्पष्ट करतो:

ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे; त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली. ‘1 तीमथ्य 1:11,15-16

येथे, सुवार्ता हे पाप्यांसाठी ख्रिस्ताच्या बचावकार्याचा उल्लेख करते.

याचप्रमाणे, पौल 2 तीमथ्यामध्ये लिहितो:

‘म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नयेस; तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दु:ख सोसावे. त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वत:च्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे; ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती; ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले, आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहेत. … ‘माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यांतून उठवलेला, दाविदाच्या संतानांतील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव. ‘ (2 तीमथ्य 1:8–10; 2:8)

सुवार्ता या शब्दाचा असा मर्यादित उपयोग सोळाव्या शतकातील धर्मसुधारकांच्या लेखनात अत्यंत सामान्य आहे. हे आपण जॉन कॅल्विन यांच्या विचारांमध्ये पाहू शकतो:

“‘विश्वासाचे वचन’ हा शब्द पर्यायालंकाराने [ज्यात एका संकल्पनेचे नाव तिच्याशी संबंधित दुसऱ्या संकल्पनेसाठी वापरले जाते] ‘अभिवचनाच्या वचनासाठी’, म्हणजेच प्रत्यक्षात सुवार्तेसाठी वापरला आहे, कारण ती विश्वासाशी जोडलेली आहे. नियमशास्त्र आणि सुवार्ता यांतील भेद समजणे अगत्याचे आहे; आणि या भेदावरून आपण हा निष्कर्ष काढतो की की नियमशास्त्र जिथे कर्मांची मागणी करते, तिथे सुवार्ता देवाची कृपा प्राप्त होण्यासाठी मनुष्याने फक्त विश्वास ‘ठेवावा’ एवढीच मागणी करते.” 

झेकैरियास अर्सिनस यांच्या लेखनातही हे स्पष्टपणे दिसते. हेडलबर्ग कॅटेकिझमवरील आपल्या भाष्याच्या आरंभीच अर्सिनस संपूर्ण सिद्धांताची विभागणी नियमशास्त्र आणि सुवार्ता अशी करतात:  

“मंडळीचा सिद्धांत दोन भागांमध्ये विभागलेले आहे—नियमशास्त्र आणि सुवार्ता; यांतच पवित्र शास्त्राचा सार आणि मूळार्थ संक्षेपित आहे. नियमशास्त्राला ‘दहा आज्ञा’ म्हणतात; आणि सुवार्ता म्हणजे ख्रिस्त मध्यस्थ व विश्वासाद्वारे मिळणारी पापांची विनामूल्य क्षमा याविषयीचा सिद्धांत.”

सुप्रसिद्ध डच ईश्वरशास्त्रज्ञ हर्मन बाविंक यांनी खाली मांडलेल्या दीर्घ आणि आकर्षक अवतरणावरून आपल्याला कळते की सुवार्तेवरील अशी विचारसरणी धर्मसुधार ईश्वरशास्त्रात सातत्याने दिसून येते:

“देवाचे वचन—नियमशास्त्र आणि शुभवर्तमान दोन्ही रूपांनी—देवाच्या इच्छेचे प्रकटीकरण आहे; ते कर्माचा करार आणि कृपेचा करार यांची घोषणा आहे… जरी ‘नियम’ आणि ‘सुवार्ता’ हे शब्द व्यापक अर्थाने कृपेच्या कराराची जुनी आणि नवी व्यवस्था दर्शवण्यासाठी व्यापक अर्थाने वापरले जाऊ शकतात, तरी त्यांची वास्तविक विषयवस्तूत ते देवाचा जो मूळ संकल्प आहे त्या संदर्भात  भिन्न अशा दोन प्रकटीकरणांकडे अंगुलीनिर्देश करतात [येथे बाविंक अनेक नव्या करारातील वचने पुरावा म्हणून देतात]… या वचनांमध्ये नियमशास्त्र आणि सुवार्ता यांची मागणी आणि देणगी, आज्ञा आणि वचन, पाप आणि कृपा, आजार आणि उपचार, मृत्यू आणि जीवन म्हणून तुलना केली जाते… नियमशास्त्र देवाच्या पवित्रतेतून येते, सुवार्ता देवाच्या कृपेतून येते; नियमशास्त्र निसर्गातून ज्ञात होते, सुवार्ता केवळ विशेष प्रकटीकरणातून; नियमशास्त्र परिपूर्ण नीतिमत्तेची मागणी करते, परंतु सुवार्ता ती बहाल करते; नियमशास्त्र लोकांना त्यांच्या कृत्यांद्वारे सार्वकालिक जीवनाकडे नेते, आणि सुवार्ता विश्वासाने प्राप्त झालेल्या सार्वकालिक जीवनाच्या समृद्धीतून चांगली कृत्ये निर्माण करते; नियमशास्त्र सध्या लोकांना दोषी ठरवते, आणि सुवार्ता त्यांना दोषमुक्त करते; नियमशास्त्र सर्व लोकांसाठी आहे, आणि सुवार्ता केवळ त्यांच्यासाठी आहे जे ती ऐकू शकतात.”

सुवार्तेचे हे सादरीकरण किती स्पष्ट, ठळक, पवित्र शास्त्रसंगत आणि अमूल्य आहे.

मंडळीने सुवार्ता प्रचार तिच्या व्यापक आणि मर्यादित अशा दोन्ही अर्थांनी केला पाहिजे. शुभवर्तमानासाठी प्रयुक्त ग्रीक शब्दच ‘इव्हँजेलिझम’ (evangelism) या इंग्रजी शब्दाचा उगम आहे. मत्तय 28:18–20 मध्ये येशूने दिलेल्या महान आज्ञेनुसार खरा शुभवर्तमान-प्रसार म्हणजे शिष्य घडविण्याचे कार्य होय—प्रथम, मर्यादित अर्थाने पुरुष व स्त्रिया अशा दोघांनाही येशूवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करणे; आणि द्वितीय, व्यापक अर्थाने येशूने आपल्या लोकांना शिकविलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळायला शिकवणे. शुभवर्तमानाच्या हितासाठी, आपण सर्वांनी खऱ्या शुभवर्तमान-प्रसाराला प्रोत्साहन द्यावे.

हा लेख मूळात टेबल्टॉक मासिकात प्रकाशित झाला होता.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

डब्ल्यू. रॉबर्ट गॉडफ्रे

डब्ल्यू. रॉबर्ट गॉडफ्रे

डॉ. डब्ल्यू. रॉबर्ट गॉडफ्री हे लिगोनियर संस्थेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत, तसेच वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्नियामधील चर्च इतिहासाचे अध्यक्ष एमेरिटस आणि प्राध्यापक एमेरिटस आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यामध्ये सेविंग द रेफार्मेशन आणि लर्निंग टू लव साम्स यांचा समावेश आहे.