सुव्यवस्थित ईश्वरशास्त्राचे मूळ स्त्रोत

15/10/2025

सुवार्ता म्हणजे काय?

20/10/2025

सुव्यवस्थित ईश्वरशास्त्राचे मूळ स्त्रोत

15/10/2025

सुवार्ता म्हणजे काय?

20/10/2025

जॉन कॅल्विन यांनी “चर्चमध्ये धर्मसुधारणा करण्याची निकडीची गरज” यावर मांडलेले विचार

सुमारे 450 वर्षांपूर्वी, मंडळीतील धर्मसुधारणेचे स्वरूप आणि ती का आवश्यक आहे या विषयावर लेखन करण्याची विनंती जॉन कॅल्विन यांना प्राप्त झाली. त्या काळातील परिस्थिती कॅल्विन यांच्या इतर लिखाणाला प्रेरक ठरलेल्या परिस्थितींपेक्षा वेगळी होती, आणि त्यामुळे धर्मसुधारणेच्या त्यांच्या समर्थनाचे काही वेगळे पैलू आपल्यासमोर उलगडतात. सम्राट चार्ल्स पाचवा याने इ.स. 1544 मध्ये पवित्र रोमन साम्राज्याची सभा स्पेयर या शहरात बोलावली होती. स्ट्रासबुर्ग येथील महान सुधारक मार्टिन बुसेर यांनी कॅल्विन यांना धर्मसुधारणेचे शिक्षण काय आहे आणि तिची तातडीची आवश्यकता का आहे यावर एक विधिवत प्रबंध लिहिण्याचे आवाहन केले. या प्रयत्नाचे फळ अत्यंत उल्लेखनीय ठरले. जिनेवा येथील थियोडोर बेजा, जे कॅल्विनचे मित्र आणि पुढे त्यांचे उत्तराधिकारी झाले, यांनी “द नेसेसिटी फॉर रिफॉर्मिंग द चर्च” (The Necessity for Reforming the Church), म्हणजे “मंडळीमध्ये धर्मसुधारणा करण्याची निकडीची गरज” या ग्रंथाला “त्याकाळातील सर्वाधिक प्रभावी लेखन” म्हणून गौरवले. 

कॅल्विन यांनी या ग्रंथाचे तीन मुख्य भागांत विभाजन केले आहे. पहिल्या भागात त्यांनी मंडळीतील अशा अनिष्ट प्रवृत्तींचा मागोवा घेतला आहे, ज्यांमुळे धर्मसुधारणा अनिवार्य झाली. दुसऱ्या भागात, त्या दुष्परिणामांवर सुधारकांनी सुचवलेली विशिष्ट उपाययोजना तपशिलाने मांडली आहे. तिसऱ्या भागात ते दाखवतात की धर्मसुधारणा पुढे ढकलण्याचा प्रश्नच नव्हता; उलट त्या काळच्या परिस्थितीने जणू “तत्काळ सुधारणा” अपरिहार्य करून टाकली होती.

या प्रत्येक विभागात, कॅल्विन चार विषयांवर लक्ष केंद्रित करतात — ज्यांना ते मंडळीचे “प्राण आणि शरीर” म्हणतात. मंडळीचा प्राण म्हणजे उपासना आणि तारण, तर शरीर म्हणजे परमेश्वराने लावून दिलेल्या पवित्र विधी (sacraments) आणि मंडळीचे शासन. कॅल्विन यांच्या मते धर्मसुधारणेचे मुख्य कारण पुढील चार विषयांवर केंद्रित आहे. चर्चमधील भ्रष्टता, तिच्यावर उपाययोजना आणि तातडीची कृती यांचा संबंध उपासना, तारण, पवित्र विधी आणि मंडळीचे शासन या चारही विषयांशी अत्यंत निकट आहे.

कॅल्विनच्या दृष्टीने, धर्मसुधारणेच्या आवश्यकतेचे मूळ कारण या विषयांवरच केंद्रित होते. या मुद्द्यांचे” महत्त्व यावरून स्पष्ट होते की त्यांनी हे लेखन केवळ या विषयांवरील टीकांना उत्तर म्हणून केले नव्हते, तर त्यांनी स्वतः या गोष्टींना धर्मसुधारणेचे सर्वात अनिवार्य पैलू म्हणून निवडले. योग्य उपासना हा कॅल्विनचा पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा होता. 

उपासना

कॅल्विन उपासनेचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करतात, कारण मनुष्य देवाच्या वचनाऐवजी स्वतःच्या शहाणपणानुसार उपासना करण्याकडे सहज वळतो. म्हणून ते ठाम प्रतिपादन करतात की उपासना केवळ आणि केवळ पवित्र शास्त्राच्या नियमांनीच ठरवलेली असली पाहिजे: “देवाच्या वचनात स्पष्ट मान्यता नसलेली प्रत्येक उपासना देवाला अप्रिय आहे, हे लोकांना पटवून देणे किती कठीण आहे, हे मला माहीत आहे; परंतु उलट समज त्यांच्या हाडामज्जेत इतका खोलवर रुजलेला आहे की, जोपर्यंत एखाद्या कृतीत देवाच्या गौरवासाठीचा उत्साह दिसतो, तोपर्यंत ती कृती स्वतःपुरती योग्य आहे असे ते मानतात. परंतु देवाच्या आज्ञेच्या विरोधात जाऊन, केवळ उपासनेच्या उत्साहाने आपण काहीही केले, तरी देव त्याला निष्फळच नव्हे तर घृणास्पद मानतो; मग अशा उलटमार्गी प्रयत्नातून काय लाभ? देवाचे वचन स्पष्ट आहे: ‘यज्ञ करण्यापेक्षा आज्ञा पाळणे अधिक चांगले आहे.’” (1 शमुवेल 15:22).” ही जाणीवच धर्मसुधारणेच्या अपरिहार्यतेचे मूळ कारण ठरली: “कारण देवाने पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी आपल्या वचनात मान्यता नसलेली कोणतीही नवी उपासना स्पष्ट शब्दांत निषिद्ध ठरवली आहे; ज्याअर्थी तो जाहीर करतो की अशा उपासनेचा शोध लावणाऱ्या गर्विष्ठपणामुळे  त्याचा गंभीरपणे अपमान होतो आणि तो अशा प्रत्येक कृतीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी चेतावणी देतो  त्याअर्थी आम्ही हाती घेतलेले सुधारकार्य ही एक प्रबळ गरज होती.” देवाच्या वचनाच्या निकषावरून कॅल्विन ठाम निष्कर्ष काढतात की, “आजच्या काळातील रोमन कॅथलिक चर्चमध्ये सार्वत्रिकपणे रूढ असलेली उपासना ही संपूर्णपणे भ्रष्ट आणि विकृत स्वरूपाची आहे.”   

कॅल्विनच्या दृष्टीने, मध्ययुगीन मंडळीची उपासना ही ‘“अत्यंत घोर मूर्तिपूजेमध्ये” रूपांतरित झाली होती. त्यांच्या मते, मूर्तिपूजा ही तितकीच गंभीर गोष्ट होती जितकी देवासमोर नीतिमान ठरण्यासाठी कर्मांनी नीतिमत्व प्राप्त करण्याची चूक. या दोन्ही बाबी म्हणजे देवाच्या प्रकटीकरणाऐवजी मानवी बुद्धीने घेतलेली जागा होत. या दोन्ही गोष्टी मुळातच देवाला संतुष्ट करण्याऐवजी आणि त्याचे आज्ञापालन करण्याऐवजी मानवी प्रवृत्तींना तृप्त करण्याचा प्रयत्न होता. कॅल्विन याविषयी आग्रह करतात की मूर्तिपूजकांसोबत उपासनेच्या बाबतीत कोणतेही ऐक्य शक्य नाही: “कदाचित कोणी म्हणेल, की जरी संदेष्टे आणि प्रेषितांनी दुष्ट याजकांच्या शिकवणीला विरोध केला, तरीही ते बलिदान आणि प्रार्थनांमध्ये त्यांच्या बरोबर सहभाग घेत होते. मी हे मान्य करतो—पण केवळ तेव्हाच, जर त्यांना मूर्तिपूजेमध्ये सहभागी होण्यासाठी बळजबरी केलीं जात नव्हती. परंतु आपण कोणत्या संदेष्ट्याविषयी असे वाचतो की त्याने बेथेलमध्ये यज्ञ अर्पण केला?” 

प्राचीन काळातील संदेष्ट्यांप्रमाणेच, धर्मसुधारकांना त्यांच्या काळातील उपासनेतील मूर्तिपूजा आणि “बाह्य प्रदर्शन” यांचा तीव्र प्रतिवाद करणे आवश्यक होते. कॅल्विन यांच्या काळात मंडळीमधील नाट्यमय वर्तनाला प्रतिविष ठरली ती उपासनेतील सुभक्तिपूर्ण साधेपणा—जशी जिनेवा येथील मंडळीच्या सुव्यवस्थित उपासना-क्रमात दिसून येते. असा साधेपणा उपासकांना देहाच्या कृतीसोबत अंतःकरण आणि विचारही देवाला अर्पण करण्यास जागृत ठेवतो: “खऱ्या उपासकांचे कर्तव्य हेच असते की त्यांनी आपले अंतःकरण व विचार पूर्णतः देवाला समर्पित करावेत, परंतु मनुष्यप्रवृत्ती अशी असते की, तो देवाची सेवा करण्यासाठी नेहमीच एक वेगळीच पद्धत शोधत असतो—जिथे तो काही बाह्य शारीरिक विधी पार पाडतो, परंतु मन मात्र स्वतःजवळच राखून ठेवतो.”

नीतीमान ठरणे

यानंतर कॅल्विन नीतिमान ठरविले जाणे या विषयाकडे वळतात. येथे ते मान्य करतात की, या विषयावर सर्वाधिक तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत: “आपण नीतीमान विश्वासाद्वारे ठरतो की कर्मांमुळे — या प्रश्नाइतका प्रखरपणे चर्चिलेला वादग्रस्त मुद्दा दुसरा कोणताही नाही; आणि याविषयी आमच्या विरोधकांचा विरोध जितका कट्टर आहे, तितका अन्य कोणत्याही विषयात नाही.” या तत्त्वज्ञानावर “मंडळीचे सुरक्षित अस्तित्व’ अवलंबून आहे, आणि यावरील चुका झाल्यामुळेच मंडळीला “घातक जखम” झाली असून तिला “नाशाच्या तलवारीजवळ” आणून ठेवले आहे.

कॅल्विन ठामपणे प्रतिपादन करतात की, नीतीमान ठरणे हे केवळ विश्वासानेच होते: “…मनुष्याची कृत्ये कशीही असोत, देव त्याला आपल्या समोर नीतिमान ठरवतो ते केवळ त्याच्या विनामूल्य कृपेच्या आधारावर. कारण देव, मनुष्याच्या कोणत्याही कृत्यांचा विचार न करता, ख्रिस्तामध्ये त्याला मुक्तपणे स्वीकारतो, आणि ख्रिस्ताचे नीतिमत्व त्याचे नीतिमत्व म्हणून असे गणतो की जणू ते त्या व्यक्तीचे स्वतःचेच नीतिमत्व आहे.”  

या तत्त्वज्ञानाचा ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनावर आणि अनुभवांवर खोलवर परिणाम होतो: “…मनुष्याला त्याची दारिद्र्यावस्था आणि असहाय्य अवस्था पटवून देऊन, आपण त्याला खरी नम्रता अधिक प्रभावीपणे शिकवतो, ज्यामुळे तो सर्व आत्मविश्वासाचा त्याग करून पूर्णपणे देवावर विसंबून राहतो; शिवाय, आपण त्याला खरी कृतज्ञता अधिक प्रभावीपणे शिकवतो, म्हणजे आपल्याकडील प्रत्येक चांगली गोष्ट ही देवाच्या कृपेनेच मिळालेली आहे, हे जेव्हा आपण एखाद्याला खरेपणाने शिकवतो, तेव्हा त्याला कृतज्ञतेकडे अधिक प्रभावीपणे प्रशिक्षित करता येते.”

पवित्र विधी

कॅल्विन यांच्या विवेचनातील तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे पवित्र विधी (sacraments), ज्यांचा त्यांनी सखोल शोध घेतला. की “माणसांनी घडवलेल्या विधींना ख्रिस्ताने स्थापलेल्या रहस्यांइतकाच मान दिला गेला, आणि विशेषतः प्रभू-भोजनाला “नाट्यगृहात होणारे प्रदर्शन” म्हणून परिवर्तित करण्यात आले” या प्रकारावर त्यांनी कठोर शब्दांत आक्षेप घेतला. देवाने स्थापलेल्या पवित्र विधींचा असा दुरुपयोग असह्य आहे. “येथे आमची पहिली तक्रार ही आहे की भडक विधींनी लोकांचे मनोरंजन केले जाते, पण त्या विधींचा अर्थ व सत्य याविषयी एक शब्दही सांगितला जात नाही. कारण चिन्ह ज्या गोष्टीकडे निर्देश किंवा संकेत करत आहे, ती गोष्ट देवाच्या वचनातून स्पष्ट केली जात नसेल, तर पवित्र विधींचा उपयोगच राहत नाही.

कॅल्विन यांना खंत आहे की प्राचीन मंडळीमध्ये प्रचलित असलेले पवित्र विधींचे साधेपण आणि शास्त्राधिष्ठित आचरण नष्ट झाले आहे. हे विशेषतः प्रभू भोजनात प्रकर्षाने दिसते. ‘युकरिस्टिक बलिदान’, ‘रूपांतरवाद’ (transubstantiation) आणि पवित्र केलेल्या भाकर व द्राक्षरसाची उपासना ही बायबलविरोधी आहेत आणि या विधीचा खरा अर्थ नष्ट करतात.” “जिथे या विधीने भक्तांचे मन स्वर्गाकडे उचलले गेले पाहिजे होते, तिथे भोजनातील पवित्र चिन्हांचा सर्वार्थाने विपर्यास झाला; लोक त्यांच्याकडे निरखून पाहण्यात व त्यांची उपासना करण्यातच समाधान मानू लागले—ख्रिस्ताचा विचारही मनात येत नाही.” ख्रिस्ताच्या कार्यालाच धक्का बसतो—जसे ‘युकरिस्टिक बलिदान’ या संकल्पनेत दिसते—“जणू ख्रिस्ताला आमच्यासाठी एकदाच मरून पुरेसे झाले नाही, म्हणून त्याला दिवसाला हजार वेळा अर्पण केले जावे.” 

प्रभू-भोजनाच्या खऱ्या अर्थाचा सारांश कॅल्विन साधेपणाने या शब्दांत मांडतात: “…आम्ही सर्वांना विश्वासाने येण्याचे आग्रहपूर्वक आवाहन करतो… आम्ही प्रचार करतो की प्रभू भोजनात प्रभू स्वतः आपले देह आणि रक्त आम्हांला अर्पण करतो—आणि आम्ही ते ग्रहण करतो. आणि आम्ही इतकेच शिकवत नाही की भाकर आणि द्राक्षारस हे चिन्हे आहेत; तर त्वरित हेही सांगतो की त्यांच्याशी एक सत्य निगडित आहे, ज्याकडे ती चिन्हे प्रत्यक्ष निर्देश करतात.” जे प्रभू भोजनात विश्वासाने सहभागी होतात, त्यां सर्वांना ख्रिस्त स्वतःला आणि आपल्या सर्व तारणदायक लाभांना खऱ्या अर्थाने देतो.   

पवित्र विधींवरील कॅल्विन यांच्या चर्चा-संक्षेपातून आपल्याला या महत्त्वपूर्ण विषयावरील त्यांच्या विश्लेषणाचे एक संक्षिप्त दर्शन घडते. त्यांनी बाप्तिस्म्याच्या विषयावर देखील भरपूर लक्ष दिले आहे आणि रोमन पंथाची “पाच अतिरिक्त पवित्र विधी” असल्याची भूमिका त्यांनी ठोसपणे खोडून काढली आहे.

चर्चचे प्रशासकीय धोरण

शेवटी कॅल्विन चर्चच्या प्रशासकीय धोरणाकडे वळतात. हा विषय प्रचंड व्यापक होऊ शकतो, असे ते नमूद करतात: “जर मी मंडळीच्या शासनातील त्रुटींचा एक-एक करून ऊहापोह करायला बसलो, तर तो कधीच संपणार नाही.” ते पाळकपदाच्या (pastoral office) महत्त्वावर लक्ष केंद्रीत करतात. या पदाच्या केंद्रस्थानी शिकवण्याचा विशेषाधिकार आणि जबाबदारी आहे: “…जो व्यक्ती शिकवण्याचे कार्य पार पाडत नाही, तो मंडळीचा खरा पाळक नाही.” धर्मसुधारणेच्या महान कामगिरींपैकी एक म्हणजे देवाच्या लोकांच्या जीवनात वचनाच्या उपदेशाला त्याचे योग्य स्थान परत देणे: “…आमच्या कोणत्याही मंडळीमध्ये वचनाचा नियमित उपदेश नसलेला प्रसंग दिसत नाही.” तसेच पाळकपदाने पवित्रता आणि शिकवण यांना अभेद्यपणे जोडलेले असले पाहिजे: “…जे मंडळीमध्ये अध्यक्षस्थानी असतात त्यांनी इतरांपेक्षा सरस असावे आणि अधिक पवित्र जीवनाच्या आदर्शाने प्रकाशमान व्हायला पाहिजे.”

कॅल्विन तक्रार नोंदवतात की, शिकवण आणि पवित्रतेचा पाठपुरावा करण्याऐवजी रोमन मंडळीमधील नेतृत्व देवाच्या लोकांच्या आत्म्यांवर “अतिशय क्रूर जुलूमशाही” चालवते आणि अशा अधिकारांचा व सामर्थ्याचा दावा करते जे देवाने त्यांना दिलेलेच नाही. धर्मसुधारणेमुळे अशा पवित्र शास्त्रविरहित परंपरांपासून—ज्यांनी विश्वासणाऱ्यांची अंतःकरणे कोंडवाड्यात बांधून ठेवली होती—मंडळीला गौरवशाली स्वातंत्र्य लाभले. “म्हणून, विश्वासणाऱ्यांची अंतःकरणे त्या अनुचित बंधनातून मुक्त करणे हे आमचे कर्तव्य होते; आणि म्हणूनच आम्ही शिकवले की, ते मानवी नियमांपासून मुक्त आणि निर्बंधित आहेत. ही स्वातंत्रता ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेली आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.”

रोमन मंडळीने विशेषतः दीक्षेच्या संदर्भात आपली प्रेरित परंपरा मोठ्या प्रमाणात अधोरेखित केली. पण कॅल्विन ठामपणे सांगतात की, धर्मसुधारित शिक्षणाप्रमाणे दीक्षा ही ख्रिस्त, प्रेषित, आणि प्रारंभीच्या मंडळीच्या खऱ्या शिकवणीवर आणि आचरणावर आधारित असली पाहिजे. ते निरीक्षण नोंदवतात: “जो व्यक्ती शुद्ध शिकवणीद्वारे मंडळीचे ऐक्य टिकवून ठेवत नाही, तो दीक्षा मिळविण्यास पात्र असल्याचा  दावा करू शकत नाही.”

धर्मसुधारणा

कॅल्विन या प्रबंधाचा शेवट धर्मसुधारणेच्या प्रवासावरील चिंतनाने करतात. त्या प्रारंभाचे श्रेय ते ल्यूथरला देतात, ज्यांनी “कोमल वृत्तीने” सुधारणा सुरू केली होती; पण रोमकडून मिळालेला प्रतिसाद मात्र “हिंसा आणि क्रौर्याने सत्य दडपण्याचा” प्रयत्न, हाच होता. हा संघर्ष कॅल्विन यांना अनपेक्षित नव्हता, कारण “सुवार्तेचा अढळ वाटा असा आहे—आणि शेवटपर्यंत तसाच राहणार आहे—की तिचा जगभर पहिल्या उद्गमापासून अखेरपर्यंत प्रचंड विरोध आणि वादांच्या वातावरणातच प्रचार केला जाईल.” कॅल्विन मंडळीच्या जीवनातील या संघर्षाला योग्य ठरवतात, कारण वादातील मुद्दे अत्यंत गाभ्याचे होते. “ख्रिस्ती धर्माचे संपूर्ण सार” धोक्यात असल्याची वस्तुस्थिती कमी लेखण्यास ते मुळीच संमती देत नाहीत. सुधारकांनी पवित्र शास्त्राच्या आज्ञेला मान देऊन वर्तन केले म्हणून ते विभाजनवादी आहेत अशा कोणत्याही मताला त्यांनी विरोधच केला: “…ज्या गोष्टीकडे सर्वात आधी लक्ष देणे आवश्यक आहे, ती म्हणजे मंडळीला ख्रिस्तापासून, जो मंडळींचा मस्तक आहे, वेगळे करण्यापासून सावध राहणे. ‘ख्रिस्त’ असे मी म्हणतो तेव्हा त्याच्या सुवार्तेच्या शिकवणीचाही त्यात समावेश आहे—ज्यावर त्याने आपल्या रक्ताने शिक्का मारला आहे…. म्हणून यावर ठाम असा की : शुद्ध सिद्धांतात एकमत असता, केवळ ख्रिस्तामध्ये आपण एकत्र बांधले गेलो असता, तेव्हाच आपल्यामध्ये पवित्र ऐक्य अस्तित्वात असते.” ऐक्य हे नावापुरत्या ‘मंडळी’मुळे नव्हे, तर देवाच्या वचनात स्थिर राहणाऱ्या खऱ्या मंडळीच्या वास्तवामुळे येते. 

यानंतर कॅल्विन चर्चमधील धर्मसुधारणेच्या कार्याचे योग्य नेतृत्व कोण करू शकेल, या व्यावहारिक प्रश्नाकडे वळतात. पोपच चर्चचे किंवा सुधारणेचे नेतृत्व करू शकतो, या कल्पनेला ते अतिशय कठोर शब्दांत नाकारतात: “मी त्या आसनाला प्रेषितीय मानत नाही, ज्यात भयावह धर्मत्यागाव्यतिरिक्त काहीच दिसत नाही— जो सुवार्तेचा क्रूरपणे छळ करतो, तो त्याच्या वागणुकीने दाखवून देतो की तो ख्रिस्तविरोधी आहे, त्याला मी ख्रिस्ताचा प्रतिनिधी मानत नाही —जो पेत्राने उभारलेले प्रत्येक बांधकाम पाडण्यासाठी जीव तोड प्रयत्न करीत आहे, त्याला मी पेत्राचा उत्तराधिकारी मानत नाही—आणि जो ख्रिस्त या तिच्या खऱ्या व एकमेव मस्तकापासून तिला वेगळी करून, आपल्या जुलूमाने मंडळीचा विच्छेद करतो व तुकडे-तुकडे करतो, त्याला मी मंडळीचे मस्तक मानत नाही.” मंडळीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सार्वत्रिक परिषदेचे आवाहन अनेक जण करीत असले, तरी अशी परिषद कधी जमणार नाही, आणि जमली तरी ती पोपच्या ताब्यातच राहील, अशी त्यांना भीती होती. त्यामुळे ते सुचवतात की प्राचीन चर्चच्या पद्धतीप्रमाणे विविध स्थानिक किंवा प्रांतीय परिषदांमध्ये हे प्रश्न निकाली काढावेत. कोणत्याही स्थितीत, अखेरीस हा संपूर्ण विषय देवावरच सोपवला पाहिजे, जो आपल्या इच्छेनुसार सर्व धर्मसुधारणाच्या प्रयत्नांना योग्य वेळी यश देईल: “आमची सेवा जगासाठी लाभदायक ठरावी, ही आमची—आणि असायलाच हवी अशी—इच्छा आहे; परंतु तिचा प्रत्यक्ष परिणाम घडविणे हे आमच्या नव्हे, देवाच्या अधिकारातील आहे.”


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

डब्ल्यू. रॉबर्ट गॉडफ्रे

डब्ल्यू. रॉबर्ट गॉडफ्रे

डॉ. डब्ल्यू. रॉबर्ट गॉडफ्री हे लिगोनियर संस्थेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत, तसेच वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्नियामधील चर्च इतिहासाचे अध्यक्ष एमेरिटस आणि प्राध्यापक एमेरिटस आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यामध्ये सेविंग द रेफार्मेशन आणि लर्निंग टू लव साम्स यांचा समावेश आहे.