
सुवार्ता म्हणजे काय?
20/10/2025
प्रोटेस्टंट विश्वासात प्रचलित सर्वात खोटा सिद्धांत कोणता आहे?
28/10/2025आपण काम का करतो?
आपण काम का करतो? एकदा मी एक निराशाजनक उत्तर ऐकले होते, जे काहीसे असे होते: “आपण नोकरी करतो जेणेकरून आपण आपल्या मुलांसाठी शाळेचे नवीन कपडे व पुस्तकं विकत घेऊ शकू, ते शाळेत जाऊ शकतील, त्यांना पुढे नोकरी मिळेल, आणि त्यांना त्यांच्या मुलांसाठी शाळेचे नवीन कपडे व पुस्तकं विकत घेता येतील…” दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, काम किंवा उद्योगधंदा म्हणजे एक निरर्थक बाब. खरं तर, या दृष्टीकोनातून पाहिल्यास जीवनच निरर्थक ठरते—जणू एक अखंडपणे फिरणारे चक्र.
मी असेही ऐकले आहे की आपण काम करतो जेणेकरून आपण अशा मिशन संस्थांना (ministries) आर्थिक साहाय्य करू शकू, जी देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवतात. बरं, मी आधीच स्पष्ट करतो की मला सेवाभावी कार्यांना देण्यात काहीही आक्षेप नाही. उलट, पवित्र शास्त्राच्या आधारावर मी हे ठामपणे सांगतो की आपण तसे करणे हे आपले कर्तव्यच आहे. परंतु मला प्रश्न पडतो की एवढ्यावरच कामाचा संपूर्ण अर्थ संपतो का?
तर मग, मी पुन्हा विचारतो, आपण काम का करतो? या प्रश्नाचे उत्तर मला स्तोत्रसंहिता 104 मध्ये अगदी आरंभीच मिळते. स्तोत्रसंहिता 104 ही निर्मितीवरचे चिंतन आहे—आणि कदाचित उत्पत्ती 6–8 मधील जलप्रलयावरचेही चिंतन आहे. या स्तोत्रात स्तोत्रकर्ता केवळ देवाने पृथ्वी व सर्व सृष्टीची केलेली निर्मिती याचे काव्यात्मक वर्णन करीत नाही, तर देव आपल्या हातांनी निर्माण केलेल्या त्या सृष्टीला आणि प्राण्यांना तो सतत कसा पोसतो व टिकवतो, हेही दाखवतो (वचन 1–13).
वचन 14 मध्ये आपण वाचतो की देव पशु आणि मनुष्य दोघांसाठीही तरतूद करतो. पण आपण हे देखील वाचतो की ह्यात मनुष्याला एक भूमिका दिलेली आहे. देव जी उगवून आणतो, त्या वनस्पतींचे संवर्धन आणि लागवड करणे हे त्यांचे कार्य आहे. येथे देवाच्या प्रतिरूपात घडविलेल्या मानवाचे कार्य कृतीत उतरलेले दिसते. देवाच्या प्रतिरूपात निर्माण केलेले असल्यामुळे, आपल्याला पृथ्वीवर सत्ता गाजवायची आणि तिला आपल्या ताब्यात आणायचे आहे. देवाने आपल्याला जी दिली त्या मूळ बागेचा विस्तार आपणच करायचा आहे. उत्पत्ती 1:26–28 मधील सांस्कृतिक आज्ञेचा येथे उपयोग दिसतो.
हेच आपल्याला स्तोत्रसंहिता 104:21–23 मध्ये देखील दिसते. जसे सिंह आपले भक्ष्य शोधायला बाहेर पडतात—जसे ते त्यांच्या निर्मितीनुसार कार्य करतात—तसेच “मनुष्य आपल्या कामधंद्यास जाऊन संध्याकाळपर्यंत श्रम करतो” (वचन 23). येथे एक असा सुसंवाद आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. देवाचे सर्व प्राणी, लहान असोत वा मोठे, त्यांच्या मूळ निर्मितीच्या रचनेनुसार नैसर्गिक समन्वयाने कार्य करत असल्याचे दृश्य येथे साकारलेले आहे. सिंहांना सिंहांसारखे “काम” करण्यासाठी बनवले गेले आहे. तसेच आपण देवाच्या प्रतिरूपधारी म्हणून कार्य करण्यासाठी निर्माण झालो आहोत. खरं तर, स्तोत्रकर्ता एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे सहजपणे जातो आणि मग प्राण्यांकडून थेट सृष्टीकर्त्या देवाकडे वळतो. पुढच्याच वचनात, वचन 24 मध्ये, स्तोत्रकर्ता उद्गारतो:
“हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सुज्ञतेने केलीस; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.”
स्तोत्रकर्ता आपल्या कामाला व्यापक अर्थाच्या संदर्भांशी जोडायला सांगतो. आपण काम करतो तेव्हा आपण सृष्टीकर्ता देवाच्या कार्याचे प्रतिबिंब असतो. आपल्या ताब्यात घेण्याच्या, वश करण्याच्या आणि लागवड करण्याच्या कामात आपल्याला आणखी एक गूढ अर्थ सापडतो. आपले काम ही साक्ष आहे—एक निर्देशक आहे—त्या देवाची ज्याच्या प्रतिरूपात आपण घडवले गेलो आहोत. आपले श्रम सृष्टीकर्त्या देवाकडे निर्देश करतात. सी.एस. लुईस यांनी एकदा म्हटले होते की आपण कधीही एका सामान्य व्यक्तीला पाहिलेलं नाही. आपण त्यांचे हे कथन येणेप्रमाणे रूपांतरित करू शकतो: आपण कधीही एक सामान्य काम करीत नाही. काम हे क्षुल्लक, तुच्छ, निरर्थक, हास्यास्पद किंवा अर्थहीन नाही. उलट, आपल्या कामात गहन अर्थ आणि महत्त्व ओसंडून वाहते.
पण, विषय येथेच संपत नाही, पुढे बरंच काही आहे.
वचन 25–26 मध्ये आपण वाचतो:
“हा समुद्र अफाट व विस्तीर्ण आहे, त्यात लहानमोठे असंख्य जलचर विहार करतात. पाहा, त्यात गलबते चालतात, त्यात क्रीडा करण्यासाठी तू निर्माण केलेला लिव्याथान तेथे आहे.”
येथे अगदी स्पष्ट आहे, समुद्र आणि समुद्रातील प्राणी हे देवाच्या महानतेची, वैभवाची आणि सौंदर्याची साक्ष देतात. पण वचन 26 कडे नीट लक्ष द्या. स्तोत्रकर्त्याने दोन गोष्टी समांतर मांडल्या आहेत: जहाजे आणि लिव्याथान. स्तोत्रसंहिता आणि ईयोब, यांसारख्या काव्यग्रंथांत, तसेच काही संदेष्ट्यांच्या पुस्तकांमध्येही, या लिव्याथान नावाच्या प्राण्याचा उल्लेख येतो. या प्राण्याची नेमकी ओळख काय, यावर असंख्य तर्कवितर्क झाले आहेत. तो एखादा विशाल व्हेल मासा आहे का? एखादा डायनासोर? की प्रचंड समुद्री महाकाय? पण एवढे मात्र निश्चित आहे की लिव्याथान आपल्याला थक्क करून टाकतो. आपण ‘थक्क करणारे’ हा शब्द वारंवार वापरून त्याची धार बोथट केली आहे. पण येथे तो शब्द अगदीच योग्य ठरतो. लिव्याथान खरोखरच थक्क करणारा जीव आहे.
लिव्याथानाला क्रीडा करायला देखील आवडते, याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. जोनाथन एडवर्ड्सने उडत्या कोळ्याबद्दल लिहिताना नमूद केले की, जेव्हा तो कोळी हवेत झेप घेतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते. यावरून एडवर्ड्सने असा निष्कर्ष काढला की देवाने “प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांच्या, अगदी कीटकांच्याही आनंद आणि मनोरंजनासाठी नियोजन केले आहे.” अगदी लिव्याथानसाठीसुद्धा. हा भव्य प्राणी खेळतो. आणि मग वचन 26 मधील दुसरी गोष्ट— गलबते, म्हणजे जहाजे. पण ही देवनिर्मित नाहीत; ती मानवनिर्मित आहेत: महासागरात “जहाजांचे दळणवळण होत असते.” आपण याचा गंभीर विचार करायला हवा. देवाची निर्मिती आणि मानवी निर्मिती स्तोत्रकर्त्याने अगदी समांतर ठेवल्या आहेत. तो लिव्याथानाचा विचार करून थक्क होतो, आणि जहाजांचा विचार करूनही तो तितकाच थक्क होतो. तुम्ही याची सहज कल्पना करू शकता. कदाचित तुम्ही स्वतःच असे म्हटले असेल, “पाहा, ती जहाजे कशी चालली आहेत! किती अद्भुत!”
जहाजबांधणीसाठी काय लागते? गणित आणि भौतिकशास्त्र, कुशल सुतारकाम, अनुभव, अनेक पिढ्यांच्या प्रयोग–अपयशातून आलेले शहाणपण, आणि अथक परिश्रम—हे सर्व जहाज तयार करण्यासाठी आवश्यक असते. जहाज चालवण्यासाठी काय लागते? दिशा शोधण्याची कला, कौशल्य, स्नायूंचे बळ, मजबूत पाठ आणि हात, चिकाटी, दृढनिश्चय, आणि अनेक पिढ्यांचे सामूहिक ज्ञान—हे सर्व जहाजे चालवण्यासाठी लागते. स्तोत्रकर्ता जेव्हा समुद्राच्या विशाल विस्तारातून जहाजे चालताना पाहतो, तेव्हा तो थक्क होतो. स्तोत्रकर्ता जेव्हा लिव्याथानला त्याच समुद्राच्या विस्तारावर खेळताना पाहतो, तेव्हाही तो तितकाच थक्क होतो. हे दोन्ही दृश्ये खरोखरच विलक्षण आहेत.
जसजसे आपण हे स्तोत्र पुढे वाचत जातो, तसतसे आपल्याला दिसते की येथे केवळ समुद्र पार करणारे किंवा लाटांमध्ये खेळणारे नैसर्गिक आणि मानवनिर्मित मोठमोठ्या गोष्टींच नव्हे, तर आणखी गूढता आहे. वचन 27 आणि 28 सांगते: “तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाली देतोस म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात….. तू आपली मूठ उघडतोस तेव्हा उत्तम पदार्थांनी त्यांची तृप्ती होते.” आपल्या परिश्रमातून आपल्याला आनंद, तृप्ती व जीवनाची सार्थकता मिळते. आपण देवाने दिलेल्या देणग्या आणि देवाने दिलेल्या संसाधनांची दखल घेतो, आणि मग आपण कामाला लागतो. आणि मग समाधान अनुभवतो. द्राक्षारस आपले अंतःकरण आनंदित करतो (वचन 15). आपली निर्मिती आपल्याला चकित करते.
ही सर्व आपल्या परिश्रमांची फळे आहेत. पण यापैकी कोणतेही आपले मुख्य ध्येय किंवा कार्याचा अंतिम परिणाम नाही. खरे ध्येय वचन 31 मध्ये आहे: “परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो! परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होवो!.” आपल्या कृतींना खरा अर्थ आहे. आपली कामे त्याच्याकडे, ज्याच्या प्रतिरूपात आपण घडविले गेलो आहोत, अंगुलीनिर्देश करतात. आपण परिश्रम करतो तेव्हा आपण देवाला गौरव देतो; आपण आपले उद्योग-धंदे करतो तेव्हा देवाला आपल्यामध्ये आनंद होतो. तर मग, आपण परिश्रम का करतो, याचे उत्तर येथे स्पष्ट होते.
स्तोत्रसंहिता 104 मध्ये काय नाही हे तुम्ही लक्षात घेतले का? त्यात मंदिराचा, मंदिरातील संगीतकारांचा, याजकांचा वा त्यांच्या विधींचा एकही उल्लेख नाही. मात्र त्यात शेतीचा उल्लेख आहे. त्यात द्राक्षवेलींची निगा राखण्याचा उल्लेख आहे. त्यात हातांनी केलेल्या श्रमांचा उल्लेख आहे. त्यात कामाचा उल्लेख आहे. त्यात जहाजे बांधण्याचा उल्लेख आहे. त्यात जहाजांचे दळणवळण होत असल्याचा उल्लेख आहे.
परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो!
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


