5 Things You Should Know About Biblical Decision-Making

पवित्र शास्त्राधारित निर्णय घेण्याबद्दल तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

13/04/2026
Finding Hope Amid Severe Illness

गंभीर आजारपणात आशा शोधणे

21/04/2026
5 Things You Should Know About Biblical Decision-Making

पवित्र शास्त्राधारित निर्णय घेण्याबद्दल तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

13/04/2026
Finding Hope Amid Severe Illness

गंभीर आजारपणात आशा शोधणे

21/04/2026

देव खरोखरच आमची काळजी घेतो का?

Does God Really Care?

नैराश्याच्या खोल गर्तेत किंवा चिंतेच्या टोकावर असताना, विश्वासणाऱ्यांना अनेकदा हा प्रश्न पडतो, मग तो प्रश्न केवळ त्यांच्या अंतःकरणातच का असेना, की देव खरोखरच त्यांची काळजी घेतो का. जर तुम्ही अशा पेचात असाल, तर माझ्याकडे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

एक सर्वसामान्य प्रश्न

प्रथम, तुम्ही एकटे नाही. इतिहासभर विश्वासणाऱ्यांनी हा प्रश्न विचारला आहे. हबक्कूक संदेष्ट्याने देवाच्या लोकांची अवस्था पाहिली, जे अनीतिमानांकडून तुडवले जात होते आणि अत्याचारग्रस्त होते, आणि देवाकडे आक्रोशाने आरोळी मारत असयाचे की,

“हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. “जुलूम झाला” असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस.” (हबक्कूक 1:2; हे देखील पहा 1:3, 13).

स्तोत्रकर्ते वारंवार देवाला विनवणी करीत असत की त्याने स्वतःला “जागृत” करावे, आणि जेव्हा त्यांच्या वेदनांना उत्तर मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात यायचे, तेव्हा तो त्यांची काळजी तरी घेतो का याविषयी प्रश्न उपस्थित करायचे (स्तोत्रसंहिता 35:23; 44:23). जरी त्यांना माहीत होते की देव कधीही झोपत नाही (स्तोत्रसंहिता 121:4), तरी त्यांच्या दुःखाच्या काळात त्याची कथित निष्क्रियता पाहून त्यांना आश्चर्याने प्रश्न पडायचा की त्याला खरोखरच त्यांची काळजी आहे का.

हा संघर्ष केवळ जुन्या करारापुरता मर्यादित नाही. नैराश्याच्या एका क्षणी शिष्यांनी येशूला हाक मारली, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?” (मार्क 4:38, मार्क 4 | IRVMar Bible | YouVersion). अगदी दैनंदिन बाबींमध्येही विश्वासणारे या प्रश्नाशी संघर्ष करीत असतात. उदाहरणार्थ, मार्था, जेव्हा ती आतिथ्य करण्याच्या तिच्या कामाच्या ओझ्याखाली दबलेली होती, तेव्हा तिला एकटीलाच सेवा करावी लागत आहे, याची येशूला काळजी नाही काय, असा प्रश्न तिने उपस्थित केला (लूक 10:40). काळ आणि परिस्थिती यांनुसार, जेव्हा देव आपल्या दुःखात आपल्या अपेक्षेप्रमाणे लगेच हस्तक्षेप करत नाही (किबहूंना मुळात ते दुःख येऊच का देतो), तेव्हा सर्व वयोगटांतील विश्वासणाऱ्यांनी त्याच्या काळजीविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. 

एक प्रेक्षणीय उत्तर

दुसरी गोष्ट म्हणजे, देव खरोखरच तुमची काळजी घेतो की नाही या शंकेत तो तुम्हाला एकटे सोडत नाही. त्याला तुमची काळजी आहे हे तुम्हाला पटवून देण्यासाठी त्याने तुमच्या कल्पनेपलीकडे असलेला एक विलक्षण मार्ग प्रकट केला आहे : तो म्हणजे तुमच्यासाठी आपल्या प्रिय पुत्राला पाठवून. योहान जेव्हा असे लिहितो तेव्हा तो हेच सांगतो: “कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला” (योहान 3:16). याचा अर्थ असा की, पापाने रोगग्रस्त झालेल्या जगात जगताना येणारी कुंठा, वेदना आणि भय ख्रिस्त पूर्णपणे समजतो, आणि अशा वेळी तो तुमच्याशी सहानुभूती दाखवण्यास समर्थही आहे (इब्री 4:15). 

इतकेच नाही, तर पवित्र आत्म्याच्या क्रियाशील कार्याद्वारे देवाचा काळजीवाहूपणा आपल्या जीवनात प्रत्यक्ष उपस्थित असतो. जेव्हा येशूने आत्म्याचे अभिवचन दिले, तेव्हा त्याने त्याचे वर्णन “दुसरा कैवारी” असे केले, जो आपल्याला कधीही सोडणार नाही (योहान 14:16). मानवी मित्र कधी थकतात, कधी त्यांचे लक्ष विचलित होते, परंतु पवित्र आत्मा तुमच्यासोबत नेहमी राहतो. तो कधीही विश्रांती घेत नाही, कधीही चोरपावलांनी पळ काढत नाही, आणि कधीही तुम्हाला टाकून देत नाही. हे तुमच्याविषयी देवाच्या करारातील त्या मूलभूत अभिवचनाचे फलित आहे: “मी तुला कधीही सोडणार नाही व तुला कधीही टाकणार नाही” (अनुवाद 31:8; इब्री 13:5). तुमच्या भावना तुम्हाला सांगत असतील की तुम्ही एकटे, त्यागलेले, आणि देवाच्या काळजीवाहू कक्षेबाहेर आहात, तेव्हाही हे सत्य तितकेच खरे आहे.  

दुःखे ही देवाला आमची काळजी आहे याकडे निर्देश करतात

शेवटी, तुम्ही हे ओळखले पाहिजे की देवाच्या काळजीवाहूपणाचा अर्थ असा होत नाही की तुम्ही दुःख आणि निराशा यांपासून अलिप्त असाल. उलट, त्याच्या काळजीवाहूपणाचा अर्थ असा आहे की तुम्ही ते सहन करावे, आणि त्यातून तुमची वाढही व्हावी. हे कदाचित सहज पटण्यासारखे वाटणार नाही. तरीही देव आपल्याला सांगतो की दुःख आपला नाश करण्याऐवजी, चिकाटी, चारित्र्य, आणि आशा उत्पन्न करते (रोमकरांस 5:3-5). 

काही दुःखे आपल्या पित्याकडून प्रेमळ शिस्त म्हणून येतात, आणि ते आपल्या हितासाठीच असतात (इब्री 12:7-11). याचा अर्थ असा की आपले दुःख, जरी ते शिस्तीच्या स्वरूपात येत असले तरी, ते देवाने आपल्याला टाकून दिल्याचे चिन्ह नसून, त्याच्या काळजीवाहूपणाचेच चिन्ह आहे.  

इतर दुःखे आपल्याला ख्रिस्ताच्या जीवनात सहभागी होण्याची संधी देतात. पौल धैर्याने घोषित करतो की आपण “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दु:ख भोगत असलो तरच” (रोमकरांस 8:17). खुद्द ख्रिस्तही दुःखाद्वारे आज्ञाधारकपणा शिकला (इब्री 5:8). आपल्याला जर त्याच्यासारखे व्हायचे असेल, तर आपणही त्याच पद्धतीने ते शिकले पाहिजे. हे ओझे नसून एक देणगी आहे, म्हणजे आपण आपल्या तारकाच्या अनुभवांमध्ये सहभागी व्हावे, यासाठी लाभलेले सौख्य. 

निष्कर्ष

जेव्हा तुम्हाला देव खरोखरच काळजी घेतो की नाही, याविषयी प्रश्न उपस्थित करण्याचा मोह होईल, तेव्हा वधस्तंभाकडे पहा. तिथे देवाचे प्रेम पूर्णपणे प्रदर्शित झाले आहे. इतकी मोठी खंडणी मोजल्यानंतर तो आपल्या लोकांना सोडणार नाही, किंबहुना, त्याला तसे करणे शक्यच नाही. आणि जर त्याला आरंभीपासूनच आपल्या लोकांची, म्हणजे तुमची, मनापासून काळजी नसती, तर त्याने इतकी मोठी खंडणी मोजलीच नसती. तुमचे दुःख हे देवाचा आशीर्वाद काढून घेतल्याचे लक्षण नाही; उलट, ते तुमच्यामध्ये तो अजूनही कार्य करीत आहे, याचाच पुरावा असू शकतो.  

धीर धरा. शंका येतात, आणि तुमचा विश्वास कमकुवत वाटतो, तेव्हा तो तुम्हाला हातातून जाऊ देणार नाही. एक दिवस, शांततेच्या ठिकाणी उभे राहून तुम्ही या परीक्षेकडे मागे वळून पाहाल, तेव्हा तुम्हाला दिसेल की वधस्तंभावरील तुमची पकड किती घट्ट होती, यामुळे तुम्ही टिकून राहिला नाहीत; तर खिळ्यांच्या खुणा असलेल्या त्याच्या हातांचे सामर्थ्य तुम्हाला वाहून नेत होते, तुम्हाला धरून ठेवत होते, तुम्हाला बळ देत होते, आणि तुम्हाला कधीही सोडत नव्हते, कधीही टाकत नव्हते.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

जोशुआ स्क्वॉयर

जोशुआ स्क्वॉयर

रेव्ह. जोशुआ ए. स्क्वॉयर हे कोलंबिया, एस.सी. येथील फर्स्ट प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये समुपदेशनाचे सहयोगी सेवक आहेत.