Who Was Ruth?
रूथ कोण होती?
02/04/2026
What Is an Assurance of Pardon?
पापक्षमेची खातरी म्हणजे काय?
09/04/2026
Who Was Ruth?
रूथ कोण होती?
02/04/2026
What Is an Assurance of Pardon?
पापक्षमेची खातरी म्हणजे काय?
09/04/2026

शमशोन कोण होता?

Who Was Samson?

शमशोन कोण होता? शास्ते 13–16 मध्ये नोंदलेल्या वृत्तांताप्रमाणे, शमशोन हा शास्ते पुस्तकातील बारावा, शेवटचा आणि परिपूर्ण परिणतीकडे नेणारा शास्ता होता. त्याचे कुटुंब दान वंशातील होते (शास्ते 13:2). शास्ता म्हणून शमशोनाने मोशेच्या कराराचा एक अधिकारी म्हणून, तसेच ख्रिस्ताचे एक प्रतीकरूप (Type of Christ) म्हणून सेवा केली. शमशोनाने ख्रिस्ताचे प्रतीकरूप म्हणून सेवा केली, हा दावा दोन प्रकारे पुष्ट होतो. सर्वप्रथम म्हणजे, शास्ते पुस्तकातील सर्व शास्ते त्यांच्या पदाच्या स्वरूपामुळे ख्रिस्ताचे प्रतीकरूप ठरतात. दुसरे म्हणजे, शमशोनाच्या जीवनातील विशिष्ट तपशील त्याला, येणाऱ्या राजाचा अग्रदूत म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान, याच्याशीही जोडतात, आणि पापाच्या जाचामुळे व सभोवतालच्या राष्ट्रांकडून झालेल्या अधीनतेमुळे इस्राएल राष्ट्रावर आलेल्या दडपणातून त्याची सुटका करण्यासाठी देवाचे साधन म्हणून त्याला ख्रिस्ताशी जोडतात.

शमशोन, शास्ते पुस्तकातील इतर सर्व प्रमुख शास्त्यांप्रमाणे, शास्त्याच्या पदाच्या आंतरिक गुणवैशिष्ट्यामुळे ख्रिस्ताचे प्रतीकरूप म्हणून चित्रित केला जातो. शास्त्यांची ओळख, यहोशवा याचे उत्तराधिकारी म्हणून केली जाते (शास्ते 1:1; 2:6–10, 16), जो मोशेच्या कराराचा मध्यस्थ म्हणून मोशेचा उत्तराधिकारी झाला होता (अनुवाद 31:23; 34:9; यहोशवा 1:1–9). एक लेखक याचा सारांश असा मांडतो: 

“अशा प्रकारे, मोशे आणि यहोशवाचे उत्तराधिकारी म्हणून, शास्त्यांनी सर्वात व्यापक अर्थाने कराराचे मध्यस्थ व्हायचे होते, ज्याच्या केंद्रस्थानी केवळ देवाची उपासना आणि देवाच्या मार्गांचे आज्ञापालन होते.”

शास्ते पुस्तकाच्या दुसऱ्या प्रस्तावनेत, शास्त्याच्या पदाची पाचपदरी कार्ये मांडली आहेत (शास्ते 2:6–3:6):

● या व्यक्ती परमेश्वराने उभ्या केल्या होत्या (शास्ते 2:16, 18); 
● त्यांना परमेश्वराच्या आत्म्याने सामर्थ्य दिले होते (शास्ते 2:18; तसेच पहा 3:10; 4:14; 6:34; 11:29; 13:25; 14:6, 19; 15:14);
● त्यांना देवाच्या लोकांची सुटका (तारण) करण्यासाठी उभे केले गेले होते (शास्ते 2:16; तसेच पहा 3:9);
● देशाला विसावा मिळवून देण्यासाठी (शास्ते 2:18; तसेच पहा 3:11; 8:28);
● आणि इस्राएलची कराराशी असलेली निष्ठा वाढवण्यासाठी (शास्ते 2:17–19).

शास्ते पुस्तकातील शास्त्याच्या पदाचे हे प्रत्येक नमूद केलेले पैलू आपल्याला नवीन करारात सादर झालेल्या येशूच्या व्यक्तीमत्त्वाकडे आणि कार्याकडे निर्देशित करतात. येशू हा:
● पित्याने उभा केला होता (योहान 5:36–37; रोम 6:4; गलती 1:1);
● पवित्र आत्म्याने सामर्थ्य दिलेला होता (मत्तय 3:16; 12:18);
● देवाच्या लोकांची सुटका करण्यासाठी होता (मत्तय 1:21; 1 योहान 4:14);
● विसावा देण्यासाठी होता (मत्तय 11:28–29);
● आणि देवाच्या लोकांच्या आज्ञापालनाची खातरी करण्यासाठी होता (रोम 5:19).

स्वतः पदाच्या व्यतिरिक्त, शमशोनाच्या जीवनातील तपशील त्याला येणाऱ्या राजाचा अग्रदूत म्हणूनही, आणि त्या राजाचेच एक प्रतीक म्हणूनही ओळख देतात. शास्ता म्हणून शमशोनाला शास्ते 13:5 मध्ये परमेश्वराने ही आज्ञा दिली: “आणि पलिष्ट्यांच्या हातातून इस्राएलला सोडविण्यास तो आरंभ करील”. अशा प्रकारे शमशोन राजा दाविदाशी जोडला जातो, कारण पलिष्ट्यांपासून इस्राएलाच्या सुटकेसाठी शमशोनने जे आरंभिले, तेच दाविद पूर्ण करील (1 शमुवेल 17; 2 शमुवेल 7:1). 

दावीद राजाच्या आगमनाचा अग्रदूत म्हणून हे लक्षात घेणे लक्षवेधी आहे की, नव्या करारातील शुभवर्तमानांचे लेखक शास्ते पुस्तकातील शमशोनच्या जीवनवृत्तांताला, येऊ घातलेल्या दाविदाच्या कुळाच्या प्रतिज्ञात राजाचा दुसरा अग्रदूत, म्हणजे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जीवनवृत्तांतासाठी एक साचा (नमुना) म्हणून वापरतात. दोन्ही वृत्तांत साधर्म्य असलेल्या जन्मकथांनी सुरू होतात (शास्ते 13; लूक 1:5-25). दोन्ही माता वांझ होत्या (शास्ते 13:2; लूक 1:7). दोघांनाही जन्म होण्यापूर्वीपासून द्राक्षारस आणि मद्य यांपासून दूर ठेवायचे होते (शास्ते 13:3-5; लूक 1:15). दोन्ही वृत्तांतांत परमेश्वराचा दूत जन्माची घोषणा करतो (शास्ते 13:3; लूक 1:11). परमेश्वराच्या दूताने सांगितलेल्या बातमीवर विश्वास ठेवताना दोन्ही पित्यांना संघर्ष करावा लागला (शास्ते 13:16-17; लूक 1:18-20). दोन्ही जन्मकथांमध्ये त्या त्या व्यक्तीची नेमणूक आणि कार्यस्वरूप स्पष्टपणे नोंदलेले आढळते (शास्ते 13:5; लूक 1:16-17). पुढे आयुष्यात शमशोन आणि बाप्तिस्मा करणारा योहान या दोघांचाही स्त्रियांच्या हातून विश्वासघात होतो (अनुक्रमे दलीला आणि हेरोदियाची मुलगी), आणि त्याचा शेवट त्यांच्या मृत्यूत होतो (शास्ते 16; मत्तय 14:1-12). अखेर, दोघेही अशा राजाच्या आगमनाचे अग्रदूत म्हणून सेवा करतात की, जो देवाच्या लोकांसाठी अधिक महान विसावा संपादन करून देईल (2 शमुवेल 7:1; मत्तय 11:28).

याव्यतिरिक्त, शमशोनाचा विश्वासघात त्याच्या प्रियजनांकडूनच होतो, आणि त्याच्या स्वतःच्या लोकांकडूनच त्याला शत्रूच्या स्वाधीन केले जाते. त्याचे सामर्थ्यपराक्रम आणि शत्रूवरील विजय परमेश्वराच्या आत्म्याद्वारे शक्य झाले होते. खरे पाहता, परमेश्वराच्या आत्म्याच्या कार्याचा उल्लेख शमशोनाच्या बाबतीत चार वेळा येतो, आणि शास्तेच्या पुस्तकातील इतर कोणत्याही शास्त्याच्या बाबतीत इतका वारंवार तो येत नाही (शास्ते 13:25; 14:6, 19; 15:14). त्याच्या जीवनातील अनेक अपयश त्याच्यापेक्षा अधिक महान अशा व्यक्तीची गरज दाखवतात, तरीही पलिष्ट्यांचा पराभव करण्याच्या आपल्या पाचारणाला शमशोन विश्वासू राहिला, अगदी मृत्यूपर्यंत विश्वासू राहिला. त्याच्या मृत्यूतच शमशोनाने शत्रूवर आपला सर्वांत मोठा विजय मिळवला, आणि हा विजय त्याच्या अपमानाच्या परिस्थितीतूनच आला, जिथे खऱ्या सामर्थ्याचे अंतिम प्रकटीकरण दिसते. शास्तेच्या पुस्तकात शमशोन हा ख्रिस्ताचा प्रतिरूपक आहे, तुमचा किंवा माझा प्रतिरूपक नाही. शमशोन हा एक शास्ता म्हणून आणि येशू हा देवाचा प्रतिज्ञात तारक म्हणून हे दोघेही मुक्ती देणारे व्यक्ती आहेत आणि आपण ते आहोत ज्यांना मुक्तीची, म्हणजे तारणाची गरज आहे. शास्तेच्या पुस्तकातील शमशोनाच्या जीवनाचे महत्त्व अधोरेखित करताना बॅरी वेब यांनी पुढीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे:

“त्याच्या जन्माची घोषणा देवदूताने आगाऊ केली आहे. त्याचा गर्भसंभव चमत्कारिक आहे. त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला नाकारले आहे. त्याचे नेते त्याला बांधतात आणि आपल्या मूर्तिपूजक अधिपतींच्या स्वाधीन करतात (16:13). त्याचे तारणकार्य त्याच्या मृत्यूत पूर्णत्वास जाते, आणि त्या मृत्यूत तो दागोनला खाली पाडतो, आणि  भविष्यात अधिक पूर्णपणे प्रकट होणाऱ्या सुटकेसाठी पाया घालतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, येथे, या अत्यंत असंभाव्य व्यक्तीमध्ये, जुन्या करारात इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा कदाचित अधिक स्पष्टपणे, येऊ घातलेल्या गोष्टींचे स्वरूप आपल्याला दिसते.” 2
शमशोन कोण होता? शमशोन हा ख्रिस्ताचे एक प्रतिरूपक होता आणि आजही आहे (इब्री 11:32-40).3

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


शमशोनच्या जीवनाविषयी अधिक चर्चा आणि स्पष्टीकरणासाठी, पहा: माइल्स व्ही. व्हॅन पेल्ट, जजेस: ईएसव्ही एक्सपोजिटरी कमेंटरी, खंड II (क्रॉसवे, 2021), 618-645.
जे. क्लिंटन मॅककॅन, जजेस (वेस्टमिन्स्टर जॉन नॉक्स प्रेस, 2002). 
बॅरी वेब, “ए सिरियस रीडिंग ऑफ द शमशोन स्टोरी (जजेस 13-16)” रिफॉर्म्ड थिओलॉजिकल रिव्ह्यू 54 (1995): 114.

माइल्स व्हॅन पेल्ट
माइल्स व्हॅन पेल्ट
डॉ. माइल्स व्ही. व्हॅन पेल्ट हे जॅक्सन, मिसिसिपी येथील रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीमध्ये ओल्ड टेस्टामेंट आणि बिब्लिकल लँग्वेजेसचे ॲलन हेस बेल्चर प्राध्यापक, तसेच समर इन्स्टिट्यूट फॉर बिब्लिकल लँग्वेजेसचे संचालक आहेत. ते ‘बेसिक्स ऑफ बिब्लिकल हिब्रू’ आणि ‘जजेस: अ 12-वीक स्टडी’ यांसह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.