Does God Really Care?
देव खरोखरच आमची काळजी घेतो का?
16/04/2026
Does God Really Care?
देव खरोखरच आमची काळजी घेतो का?
16/04/2026

गंभीर आजारपणात आशा शोधणे

Finding Hope Amid Severe Illness

माझ्या मुलाच्या पाचव्या वाढदिवशी, मी सहाशे मैल दूर एका कर्करोग (कॅन्सर) केंद्रात बसले होते आणि आयव्ही बॅगांमधून केमोथेरपी माझ्या शरीरात वाहत जात असताना पाहत होते. मी कर्करोगाच्या एका दुर्मिळ प्रकाराशी झुंज देत होते; आणि क्लिनिकल ट्रायलची गरज भासल्यामुळे मला माझ्या पतीपासून आणि 3 लहान मुलांपासून अनेक महिने दूर राहावे लागले. 

माझ्या ऐहिक जीवनाच्या आशेवर गंभीर संकट ओढवले होते. माझे सुदृढ आरोग्य नाहीसे झाले होते, आणि त्याने माझी ऊर्जा, माझे केस, तसेच उद्याचा अंदाज बांधता येईल असे माझे भवितव्यही सोबत ओढून नेले होते. कुटुंबाची काळजी घेण्याऐवजी, माझे दिवस प्रतीक्षागृह, रक्त चढवणे, वैद्यकीय चाचण्या, आणि डुलक्या यांमध्ये जात होते. मुलांच्या आयुष्यातील मौल्यवान टप्पे माझ्या हातून निसटत होते, आणि पुढचे टप्पे पाहण्यासाठी मी जिवंत राहीन की नाही, हेही मला माहीत नव्हते. 

कर्करोगाच्या या परीक्षांमधून आणि त्यातून सावरून जिवंत राहण्याच्या काळात, माझ्या आरोग्यसाठीच्या संघर्षाच्या चढ-उतारांना तोंड देऊ शकेल अशी आशा मला हवी होती. देवाची करुणा आणि कृपा यांमुळे, आमच्याकडे एक उत्तम अशी आशा आहे जिला आम्ही घट्ट धरून राहू शकतो :  आपला प्रभू आणि तारणकर्ता, येशू ख्रिस्त. पेत्राने आपले पहिले पत्र तुमच्या आणि माझ्यासारख्या दुःख सोसणाऱ्या ख्रिस्ती लोकांसाठी लिहिले, जेणेकरून आपल्याला खातरी मिळावी की ख्रिस्तामधील आपली जिवंत आशा जगिक परीक्षांमुळे डळमळणार नाही, तर ती तिच्या गौरवशाली शेवटापर्यंत टिकून राहील.

आमची जिवंत आशा

पेत्र आपल्या पत्राचा आरंभच या जिवंत आशेच्या सुवार्तेने करतो: 

“आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला;” (1 पेत्र 1:3)”

आम्ही ज्या तारणाऱ्याचे लोक आहोत, तो कबरेतच राहिलेला नाही. तो मृतांतून उठला; आणि पाप व मृत्यू यांवर विजय घोषित केला (1 करिंथ 15:54-57). शिवाय, हे पुनरुत्थान म्हणजे पुनरुत्थानाच्या वृत्तांताचा केवळ प्रारंभ नव्हे, तर त्याचा निर्णायक आरंभ आहे. तो पुनरुत्थानाचे पहिले फळ आहे; आणि जे सर्व त्याचे आहेत, ते सदासर्वकाळ जिवंत राहतील, कारण तोच आमची जिवंत आशा आहे (1 करिंथ 15:20-23). 

गंभीर आजारपणाचे परिणाम भोगत असताना, थकवा येणे आणि अंतःकरण खचणे सहज घडते. जीवन पुन्हा कधी पूर्वपदावर येईल, याविषयीची आशा देखील ढळू शकते. पण त्या काळोख्या क्षणीसुद्धा, कबरेवर विजय मिळविलेल्या आपल्या तारणाऱ्याला, म्हणजेच आपल्या जिवंत आशेला, आपण घट्ट धरून राहू शकतो. आपल्याकडे जिवंत आशा आहे, कारण आपल्याकडे जिवंत तारणारा आहे.

आमची अढळ आशा

आम्ही केवळ जिवंत आशेसाठीच पुन्हा जन्मलो नाही, तर आपल्याला पुन्हा जन्म मिळाला आहे तो “अविनाशी, निर्मळ व अक्षय असे वतन मिळावे म्हणून, जे तुमच्यासाठी स्वर्गात राखून ठेवले आहे; आणि जे तारण शेवटल्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, त्या तारणासाठी विश्वासाद्वारे देवाच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण केले जाते” (1 पेत्र 1:4-5).

जे ख्रिस्ताचे आहेत, ते या जगातील दुःखाच्या पलीकडे एक दूरदृष्टीने सुरक्षित वतनाकडे पाहू शकतात. जे आजार आपल्या शरीराचा निर्दयपणे नाश करतात ते या वतनाला स्पर्श करू शकत नाहीत. ज्या परिस्थिती आपल्याला ग्रासून टाकतात, ती या वतनाच्या सार्वकालिक परिपूर्णतेला आणि शुद्धतेला धक्का देऊ शकत नाहीत. देवाने स्वर्गात आपल्यासाठी जे राखून ठेवले आहे, त्याला कशाचाही धोका पोहोचू शकत नाही. 

हे न कोमेजणारे अक्षय वतन आपल्याला नक्की मिळेल, हे आपल्याला पूर्ण खातरीने कसे माहीत? पेत्र म्हणतो की देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे आमचे रक्षण केले जात आहे. हे आपल्या सामर्थ्यावर, किंवा आपल्या विश्वासाच्या बळावर अवलंबून नाही. आम्हाला हे वतन देवाच्या दयेने मिळते, आणि देवाच्या सामर्थ्यानेच ते आपल्यासाठी टिकून राहते. म्हणूनच आपली आशा अढळ आहे, कारण आपल्यावर देवाची पकड अढळ आहे (योहान 10:27-29).   

आमची गौरवशाली आशा

जेव्हा पेत्राने या जिवंत, अढळ आशेविषयी लिहिले, तेव्हा तो जीवनातील परीक्षांकडे डोळेझाक करीत नव्हता. तरीही, दुःखामुळे मन व्याकुळ होत असतानाही आनंद मानण्यास पेत्राने आपल्याला उत्तेजित केले:

त्याविषयी तुम्ही उल्लास करता, तरी तुम्ही आता थोडा वेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दु:ख सोसले; ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी. (1 पेत्र 1:6-7)

देवाची वचने आपले डोळे आपल्या तात्पुरत्या संकटांकडून आपल्या सार्वकालिक गौरवाकडे वळवितात. कारण देव आपल्यामध्ये कार्य करीत असतो, म्हणून, दुःखाची परीक्षा ही आपला विश्वास खरा असल्याचे सिद्ध करते. ख्रिस्त परत येईल त्या दिवशी, या परीक्षांच्या माध्यमातून देवाने आपल्यामध्ये जोपासलेला विश्वास “प्रशंसा, गौरव व मान” यांस कारणीभूत ठरेल (1 पेत्र 1:7). हा गौरव ख्रिस्ताच्या गौरवाकडे निर्देश करीत असावा, किंवा त्याच्याबरोबर आपल्याला मिळणाऱ्या गौरवाकडे, किंवा दोन्हीकडेही. परंतु आम्हाला इतके निश्चित माहीत आहे की ख्रिस्तासोबतचे आमचे भविष्य गौरवशाली आहे, आणि म्हणून आजच्या दुःखाच्या काळातही आनंद करण्याचे ते एक कारण आहे.  

जेव्हा वेदना आपल्याला ग्रासून सोडतात, भीती आपल्यावर तुटून पडते, आणि देहात तसेच भविष्यात घडणारे बदल आपल्याला थकवून टाकतात, तेव्हा ख्रिस्तामधील आपली आशा ही एक दृढ, अढळ आश्रयस्थान ठरते. म्हणून, आपल्या जिवंत, अढळ, गौरवशाली आशेमुळे आपण पेत्राबरोबर म्हणू शकतो: “आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचा देव व पिता हा धन्यवादित असो!” (1 पेत्र 1:3).

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

मरिसा हेनली
मरिसा हेनली
मरिसा हेनली या एक वक्त्या आहेत आणि त्यांनी लव्हिंग युअर फ्रेंड थ्रू कॅन्सर आणि आफ्टर कॅन्सर ही पुस्तके लिहिली आहेत. त्या MarissaHenley.com वर लेखन करतात.