How Are We to “Improve Our Baptism”,?

आपण आपल्या “बाप्तिस्म्याचा योग्य उपयोग” कसा करावा?

14/08/2026
Is Jesus Our Example?

येशू आमच्यासाठी कित्ता आहे का?

01/09/2026
How Are We to “Improve Our Baptism”,?

आपण आपल्या “बाप्तिस्म्याचा योग्य उपयोग” कसा करावा?

14/08/2026
Is Jesus Our Example?

येशू आमच्यासाठी कित्ता आहे का?

01/09/2026

बायबल बहुपत्नीत्वाविषयी काय सांगते?

What Does the Bible Say About Polygamy?

जुन्या करारात अशा काही प्रथा आहेत, ज्यांकडे बायबलच्या नैतिकतेवर टीका करणारे लोक वारंवार बोट दाखवितात. त्यांपैकी एक प्रथा म्हणजे बहुपत्नीत्व. जुन्या कराराच्या काळात बहुपत्नीत्वाची प्रथा होती हे उघड आहे. त्याचा पहिला उल्लेख उत्पत्ती 4:19 मध्ये येतो: “लामेखाने दोन स्त्रिया केल्या.” पुढे अब्रामाचा विवाह सारायशी झाला होता; परंतु सारायने “आपली मिसरी दासी हागार हिला घेऊन आपला पती अब्राम याला त्याची बायको म्हणून दिले” (उत्पत्ती 16:3). याकोबाला चार बायका होत्या, त्यांपैकी दोन विधिपूर्वक बायका, तर दोन दासी होत्या. त्या दासी, त्या दोन बायकांसाठी अपत्ये जन्मास घालावीत म्हणून, पर्यायी बायकांच्या भूमिकेत होत्या (उत्पत्ती 29–30). तथापि, बहुपत्नीत्वाची प्रथा केवळ कुलपितांच्या काळापुरती मर्यादित नव्हती. इस्राएलाच्या इतिहासातील इतर प्रमुख पुरुषही बहुपत्नीक होते, त्यांत दावीद राजा आणि सर्वात उल्लेखनीय म्हणजे शलमोन यांचा समावेश होतो (1 राजे 11:3). प्राचीन निकटपूर्वेत बहुपत्नीत्व दुर्मिळ नव्हते, तरी अनेक पत्नींपासून उद्भवणाऱ्या मोठ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची पुरुषाची आर्थिक क्षमता या प्रथेवर मर्यादा घालीत असे. राजांच्या बाबतीत हे विवाहसंबंध अनेकदा राजकीय हेतूने केले जात असत, जे प्रामुख्याने राज्यांमधील संबंधांची स्थिरता सुनिश्चित करत असत. इस्राएलातील ही प्रथा प्राचीन जगाच्या बहुतेक भागांत आढळणाऱ्या प्रथेचेच प्रतिबिंब होती.  

या तथ्यांमुळे अनेक प्रश्न उभे राहतात. पहिला प्रश्न असा की, जुना करार बहुपत्नीत्वाला मान्यता देतो का? जुन्या करारात उल्लेखिलेल्या काही पुरुषांनी बहुपत्नीत्वाचे आचरण केले असले, तरी प्राचीन इस्राएली लोकांमध्ये, किंवा सर्वसाधारणपणे प्राचीन जगात बहुपत्नीत्वाची प्रथा सर्रास पाळली जात असल्याचे दिसत नाही. बहुतेक पुरुषांना त्याचा खर्च परवडत नसे. उदाहरणार्थ, रूथ 4 मध्ये उल्लेखिलेल्या दुसऱ्या सोडवणाऱ्याच्या निर्णयावर रूथशी विवाह केल्यामुळे त्याच्या साधनसंपत्तीवर पडणाऱ्या भाराचा परिणाम झाला असावा, असा रूथ 4:6 चा एक संभाव्य अर्थ आहे. बहुपत्नीत्व ही प्रथा, आजच्या भाषेत सांगायचे तर, केवळ “एक टक्का” अतिश्रीमंत लोकांसाठीच राखीव होती. जुना करार बहुपत्नीत्वाची ही उदाहरणे नोंदवितो, परंतु त्या प्रथेला तो कोठेही मान्यता देत नाही.

दुसरा प्रश्न असा आहे की, बहुपत्नीत्व ही प्रथा चुकीची आहे, हे दर्शविणारे काही नियम किंवा तत्त्वे बायबलमध्ये दिली आहेत का? प्रथम, जुन्या करारातील बहुपत्नीत्वाचे आरंभीचे उदाहरण लामेखाचे आहे. तो काईनाच्या वंशातील होता; आणि त्याच्या हिंसक कवितेवरून हा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की तो एक उच्च नैतिक चरित्र असलेला मनुष्य होता, असे म्हणता येत नाही. दुसरे म्हणजे, आदामासाठी हव्वेची निर्मिती विवाहाचा आदर्श असा ठरविते की एका पुरुषाची एकच स्त्री असावी. घटस्फोटाच्या प्रश्नाला उत्तर देताना येशूने याच तत्त्वाचा आधार घेतला (मत्तय 19:3–6). तिसरे म्हणजे, जुन्या करारातील बहुपत्नीक विवाहांची सर्व उदाहरणे वैवाहिक जीवनात मोठ्या प्रमाणावर संघर्ष दर्शवतात. याकोबाच्या प्रीतीसाठी लेआ व राहेल यांच्यात झालेल्या स्पर्धेतून आपण हे उत्पत्ती 29–30 मध्ये पाहतो. याकोबापासून आणखी अपत्ये व्हावीत म्हणून बिल्हा आणि जिल्पा यांना आणण्यात आले, त्यामुळे राहेल व लेआ यांच्यातील संघर्ष अधिकच वाढला. चौथे म्हणजे, एलकानाच्या वैवाहिक जीवनात पनिन्नाचा उल्लेख हन्नाची सवत असा केला आहे (1 शमुवेल 1:6). “सवत” असे भाषांतर झालेला शब्द ज्या क्रियाधातूपासून आला आहे, त्याचा अर्थ “शत्रूप्रमाणे वागणे” असा आहे. शेवटी, लेवीय 18:18 असे म्हणते: “तू आपल्या बायकोच्या बहिणीला आपली बायको करून तिला सवत करू नकोस, ती जिवंत असता तिच्यासह तिच्या बहिणीची काया उघडी करू नकोस.” याचा शब्दशः अर्थ असा होतो की याकोबाने केले तसे, एखाद्या पुरुषाने एका स्त्रीशी व तिच्या बहिणीशी विवाह करू नये. परंतु “बहीण” हा शब्द लाक्षणिक अर्थाने अशा दुसऱ्या स्त्रीसाठीही वापरला जाऊ शकतो की जिचे तिच्याशी जैविक दृष्ट्या नाते असणे गरजेचे नाही.

आपण नव्या करारात येतो, तेव्हा संपूर्णपणे गृहीत धरलेली मूळ संकल्पना हीच आहे की विवाह एकपत्नीक असावा. 1 करिंथकर 7 मध्ये पौलाने विवाहाविषयी केलेल्या विवेचनात एकपत्नीत्व गृहीत धरले आहे. 1 तीमथ्य 3 आणि तीत 1 मधील मंडळीच्या सेवकांसंबंधीच्या नियमांमध्ये वडील हा “एका स्त्रीचा पती” असावा, असे स्पष्टपणे सांगितले आहे. नव्या करारात मंडळीमध्ये बहुपत्नीत्व मान्य होऊ शकते, असा कोणताही संकेत आढळत नाही.

शेवटचा प्रश्न हा की, पवित्र शास्त्र, विशेषतः जुना करार, बहुपत्नीत्वाची प्रथा उघडपणे निषिद्ध का ठरवीत नाही? किंवा, या प्रश्नाला दुसऱ्या प्रकारे विचारले, तर देव जुन्या कराराच्या काळात बहुपत्नीत्व सहन का करतो? याचे निश्चित उत्तर आपल्याला माहीत नाही. तरी असे दिसते की इस्राएलाभोवतीच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली काही पापे देवाने आपल्या लोकांमध्ये सहन केली. गुलामगिरीविषयीही असेच म्हणता येईल. परंतु देवाने याकोब, दावीद राजा किंवा शलमोन यांना बहुपत्नीत्वासाठी तात्काळ शिक्षा केली नाही, यावरून आपण त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवावे, असे सिद्ध होत नाही. एकपत्नीक विवाहाची तत्त्वे जुन्या करारातही स्पष्ट आहेत. परंतु यामुळे आपण स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजेत की, आपल्या युगात सर्वत्र पसरलेली कोणती पापे आपण मंडळीमध्ये सहन करीत आहोत? आणि आपल्या स्वतःच्या जीवनात अशी कोणती पापे आहेत, ज्यांविषयी देव अजूनही धीर धरत आहे? विलंब न करता ती पापे आपण दूर करू या.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.