
कर्मांचा करार म्हणजे काय?
21/07/2026
जेव्हा मला कुठेतरी अडकून पडल्यासारखे वाटते
28/07/2026परमपवित्र स्थान
“मी त्यांच्यामध्ये निवास करावा” (निर्गम 25:8). इस्राएलाचा निवासमंडप ही एक अद्भुत वास्तुरचना होती. देवाच्या अफाट आणि सार्वकालिक उपस्थितीला जणू मूर्त स्वरूप देणे, हाच त्याचा अंतिम उद्देश होता. निवासमंडपाची उभारणी केली जाण्यापूर्वी, देवाची उपस्थिती वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी, आणि वेगवेगळ्या रीतींनी प्रकट होत असे. आदाम आणि हव्वा यांच्यासमोर त्याने स्वतःला प्रकट केले, जेव्हा त्यांनी “परमेश्वर देव बागेत फिरत असताना त्याचा आवाज ऐकला” (उत्पत्ती 3:8). अब्राहामासमोर त्याने धुमसती आगटी आणि जळती मशाल यांच्या रूपाने स्वतःला प्रकट केले (उत्पत्ती 15:17). याकोबासमोर त्याने स्वतःला अशा पुरुषाच्या रूपाने प्रकट केले, ज्याच्याशी याकोब कुस्ती करू शकला (उत्पत्ती 32:22–32). मोशेसमोर त्याने स्वतःला जळत्या झुडपाच्या रूपात प्रकट केले जे भस्म होत नव्हते (निर्गम 3:2). आणि संपूर्ण इस्राएलासमोर त्याने अरण्याच्या प्रवासादरम्यान दिवसा मेघस्तंभाद्वारे आणि रात्री अग्निस्तंभाद्वारे (13:21–22) आणि दाट मेघ, विजांचा कडकडाट, गर्जना आणि कर्ण्याच्या आवाजाद्वारे स्वतःला प्रकट केले (निर्गम 19:9, 16).
तरीही, निवासमंडपामुळे काहीतरी नवे घडले. देवाची उपस्थिती आता येणाऱ्या-जाणाऱ्या पाहुण्यासारखी नव्हती, तर त्यांच्यामध्ये, त्यांच्यासारखीच तंबूत वस्ती करणाऱ्या रहिवाशासारखी होती. म्हणून निवासमंडप हे त्याचा राजमहाल होते. त्यात पडद्याला प्रवेशद्वार होते, त्याला झाकणारे पडदे, भाकरी ठेवलेली मेज होती, प्रकाशासाठी दीपस्तंभ होता, आणि त्याचे राजेशाही पादासन म्हणून कराराचा कोश होता.
या नवीनतेचा एक पैलू हा होता की, आता करारातील लोक परमेश्वराच्या उपस्थितीचा त्यांच्यामध्ये अशा प्रकारे आनंद घेऊ शकत होते जो त्यांच्या पूर्वजांना शक्य नव्हता. आणि हे आजच्या ख्रिस्ती लोकांसाठी देखील अत्यंत बोधप्रद आहे, कारण निवासमंडप हे देव देहामध्ये आपल्यामध्ये वस्ती करणार असल्याचा एक नमुना होता:
आणि शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली [‘वस्ती केली’ या शब्दाचा अनुवाद ‘निवासमंडप’ असा होऊ शकतो]; आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, हे पित्यापासून आलेल्या एकुलत्या एका पुत्राचे असावे असे गौरव, ते कृपेने व सत्याने पूर्ण होते. (योहान 1:14)
परमेश्वराच्या उपस्थितीचा आनंद केवळ त्याने ठरवलेल्या अटींवरच घेता येत असे. त्याने त्या अटी मोशेला सांगितल्या: “निवासमंडपाचा जो नमुना व त्याच्या सर्व साहित्याचा जो नमुना मी तुला दाखवतो, त्याप्रमाणेच तुम्ही ते बनवावे” (निर्गम 25:9). वर्णनातील बारकावे आणि विशिष्टता (अध्याय 25–30) ही गोष्ट आपल्या मनावर ठसवतात. देव स्वतःला आपल्यावर, म्हणजे त्याच्या लोकांना, प्रकट करतो, आणि त्याच्या वचनाद्वारे आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो व त्याला ओळखू शकतो. त्याच्या वचनाच्या सेवकांद्वारे आपल्याला शिकविले जावे म्हणून परमेश्वराने जे काही आज्ञापिले आहे, त्या सर्वांचे आपण पालन करीत असताना, तो “युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस [आमच्या] बरोबर आहे” याची खातरी आपण बाळगू शकतो (मत्तय 28:19–20).
परमेश्वराच्या उपस्थितीचा आनंद त्याच्या निवडलेल्या सेवकांमध्ये, म्हणजे याजकांमध्ये मूर्त झालेल्या आणि त्यांच्या द्वारे मध्यस्थी झालेल्या स्वरूपात घेतला जात असे. परमेश्वराच्या उपस्थितीचे सेवक म्हणून इस्राएल लोक आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांद्वारे त्यांच्याशी संबंध ठेवू शकत होते. त्यांच्या पोशाखाचाही उद्देश परमेश्वराच्या लोकांना परमेश्वराचे सौंदर्य आणि गौरव व्यक्त करून दाखवणे हा होता (निर्गम 28:2). आणि ते लोकांच्या जाणीवपूर्वक केलेल्या आणि अजाणतेपणी केलेल्या पापांसाठी, त्यांच्या पापांबद्दल देवाचा क्रोध शांत व्हावा आणि त्यांचे पाप दूर केले जावे म्हणून, व तसेच त्यांच्या देवाच्या कृपामय कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून यज्ञ अर्पण करत असत (लेवीय 1–7). खरे तर, यज्ञव्यवस्थेतील एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यात लोकांचा असलेला प्रत्यक्ष सहभाग. लोक स्वतःचे प्राणी यज्ञार्पणासाठी आणत, त्या प्राण्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवत, आणि स्वतःच्या पापांची कबुली देत. पुढे, शांत्यर्पण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यज्ञात, परमेश्वर वेदीवर आपला वाटा “ग्रहण करत असे” आणि याजकांना त्यांचा वाटा मिळत असे एवढेच नव्हे, तर लोक सुद्धा त्यातील एक भाग खात असत (लेवीय 7:11–18).
परमेश्वराने आपल्या लोकांना निवासमंडप दिला, जेणेकरून त्याच्या वचनाद्वारे, याजकांमध्ये व यज्ञांमध्ये असलेल्या कृपेच्या विधियुक्त चिन्हांद्वारे, आणि तेथे अर्पण केलेल्या त्यांच्या प्रार्थनेद्वारे, तो कृपा व दयेने त्यांच्यामध्ये वस्ती करेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो आजही आपल्यामध्ये वस्ती करतो (इफिसकरांस पत्र 2:18–22).
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


