The Holy of Holies

परमपवित्र स्थान

23/07/2026
Exceptional Mediocrity

असामान्य सामान्यपणा

30/07/2026
The Holy of Holies

परमपवित्र स्थान

23/07/2026
Exceptional Mediocrity

असामान्य सामान्यपणा

30/07/2026

जेव्हा मला कुठेतरी अडकून पडल्यासारखे वाटते

When I Feel Stuck

मी आयर्लंडमध्ये लहानाचा मोठा होत असताना, त्या काळी दर बुधवारी दुपारचा पावसाने भिजलेला, कंटाळवाणा काळ हा आमच्या आयुष्याचा जणू नेहमीचाच भाग झाला होता. आठवड्याच्या शेवटापासून चांगलाच दूर तो दिवस, आणि पुढे गृहपाठाने भरलेली संध्याकाळ उभी ठाकलेली असताना, मला आठवतं की मी शाळेतून भिजत-भिजत कष्टाने घरी परत येत असे. पुस्तकांच्या ओझ्याने दबलेला, ओलसरपणामुळे त्यांच्या पानांना लाटा आलेल्या, आणि घोट्यांजवळून आत शिरून पायाच्या बोटांजवळून बाहेर वाहणाऱ्या पाण्यामुळे मोजे चिंब भिजलेले, अशा अवस्थेत मी एखाद्या पाण्यात टाकलेल्या मांजरासारखा आनंदी असायचो, (जरी तितका रागीट नव्हतो).

आत्म्याला स्वतःच्या गुप्त वेदना आणि दुःखांची खरी जाणीव असते. आपण सर्वच उधळ्या पुत्रांसारखे आहोत, जे  आदामाच्या पापी निर्णयामुळे कलुषित झालेल्या जगातून निभावून पित्याच्या घराकडे परत जात आहोत. पतित अवस्था प्रत्येक आनंदावर घाला घालते. अपराधबोध, लाज आणि पश्चात्तापाने जड झालेली ओझी आपल्या खांद्यांना बोचतात. अंतःकरणातील भीती आणि बाहेरील संकटे मेघगर्जनेसारखी काळीकुट्ट होऊन समोर उभी राहतात. आनंदाने स्वागत करणाऱ्या पित्याच्या धावत येणाऱ्या पावलांचा आवाज अधिक ऐकू यावा, त्याचे बलवान बाहू आपल्याभोवती गुंडाळले जावेत, आणि त्याचे उबदार, खारट अश्रू आपल्या गालांवर पडावेत म्हणून आपण आसुसलेले असतो. परंतु अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा आपल्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत राहतात. आपले सर्वोत्तम क्षण नेहमीच खंडित होतात, आणि आठवड्याच्या मध्यावर असलेल्या शाळकरी मुलाला जसा शनिवार-रविवार दूर वाटतो, तसे स्वर्गही इतके दूर वाटू लागते की तो जणू कायमचाच दूर आहे असेच भासते.

यातील सर्वांत वाईट काळ अनाकलनीयच राहतो. कोणतेही विशिष्ट पाप, अपयश किंवा चूक यासाठी आपण दोषी आहोत की काय, हे स्पष्टपणे समोर येत नाही. आपल्याला मनाने उदास व निस्तेज वाटते, आणि त्याचे कारणही कळत नाही (स्तोत्रसंहिता 42:5). या दूरच्या ठिकाणी आपण भावनांवर आधारित एका अंधकारमय ईश्वरशास्त्राचे सहज बळी पडतो. मग एक निराशाजनक अपरिहार्यता मागे येते: देव बोलत आहे असे आपल्याला जाणवत नाही, म्हणून आपण पवित्र शास्त्र वाचणे थांबवतो. देव ऐकत आहे असे आपल्याला वाटत नाही, म्हणून आपण प्रार्थना करणे थांबवतो. जिवावर भारावलेल्या ओझ्यामुळे सर्वकाही मंदावते; आपण कुठेच जात नाही. मग अशावेळी काय करावे?

सर्वप्रथम, लक्षात ठेवा : तुम्ही एकटे नाही. देवाची सर्व मुले यापूर्वी या मार्गांवरून चालली आहेत. स्तोत्रकर्त्यांना किती वेळा टाकून दिल्यासारखे वाटले, तरीही त्यांनी गीतांतून देवाला साद घातली. दाविदाने आक्रोश करून विचारले: “हे परमेश्वरा, कोठवर? तू मला कायमचा विसरशील काय?” (स्तोत्रसंहिता 13:1). कोरहाच्या पुत्रांनी विचारले, “हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस?” (स्तोत्रसंहिता 42:1). हे संत प्रभूसमोर येत होते आणि देव किती काळ आपले मुख त्यांच्यापासून लपवून ठेवणार आहे, हे विचारत होते. येथून आपण एक धडा शिकतो: चांगले लोक अनेकदा स्वतःला ते प्रत्यक्षात जसे आहेत त्यापेक्षा अधिक वाईट समजतात. हे स्तोत्रकर्ते खोल निराशेच्या गर्तेतून आपला आक्रोश सुरू करतात, पण तेथेच थांबत नाहीत. स्तोत्रकर्ते व्याकुळ होत असताना, त्यांच्या हृदयातून पवित्र शास्त्र वाहू लागते. अंधकारात, त्यागले गेल्याच्या जाणिवेच्या पलीकडे, देव अजूनही तिथेच असतो; तो त्यांना शब्द देतो, त्यांना देवाकडे वळण्यास मदत करतो, आणि पवित्र शास्त्राला प्रेरणा देतो. याहवे आपल्याला जाणवतो त्यापेक्षा नेहमीच अधिक जवळ असतो. 

दुसरे, देवाला विनंती करा की तुमच्या आणि त्याच्यामधील सहभागितेत अडथळा निर्माण करणारी काही दुष्टपणाची प्रवृत्ती तुमच्या ठायी असेल तर त्याने ती शोधून काढावी (स्तोत्रसंहिता 139:24). “दुष्टपणा” या शब्दाची मुळे आदामाच्या कडू निवडीपर्यंत पोहोचतात. (“दुःख,” “कष्ट,” आणि “वेदना” हे सर्व परस्पर संबंधित इब्री शब्द आहेत (उत्पत्ती 3:16–17). बागेमध्ये आपल्या पहिल्या पित्याने देवाच्या पलीकडे जाऊन अधिक चांगले जीवन शोधण्याची एक कौटुंबिक परंपरा सुरू केली. थडग्यांनी भरलेले जग त्याच्या यशाचा वृत्तांत सांगते. पण निराश होऊ नका : उत्तम वैद्य मरण पावला तो यासाठी की त्याने अशा देवरहितनिवडींची “इच्छा” आणि “कृती” तुमच्यातून कापून टाकावी (फिलिप्पैकरांस पत्र 2:12–13).

पापाच्या पलीकडे, आपण आपल्या हृदयातील तण, म्हणजेच आत्म्यातील जीवन गुदमरवून टाकणाऱ्या विषारी वासना, यांचा देखील शोध घेतला पाहिजे. पेरणाऱ्याच्या दाखल्यात येशू अशा तीन गोष्टी दाखवतो: प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह, आणि इतर गोष्टींचा लोभ (मार्क 4:19). हे तण वाढत असताना आपल्याला कधीच बरे वाटणार नाही. त्यांना नष्ट करण्यासाठी, पवित्र आत्मा अधिक चांगल्या जीवनाविषयीच्या अधिक समृद्ध विचारांचे स्वर्गीय तणनाशक घेऊन सज्ज उभा आहे (रोमकरांस पत्र 8:5; फिलिप्पैकरांस पत्र 4:8; कलस्सैकरांस पत्र 3:1–4). ख्रिस्ताशी संयुक्त झाल्यामुळे आपण जीवनाची नवीन चाल चालतो (रोमकरांस पत्र 6:1–14).

तिसरे, स्वतःचे परीक्षण करा: तुमच्या जीवनातील सर्व घटनाक्रम देवाच्या सार्वभौम पूर्वनियोजनातून घडून येतो, हे मान्य करून तुमचे अंतःकरण शांत आहे का? ज्या देवावर तुम्ही गुप्तपणे रागावलेले आहात, त्याच्या जवळ जाणे कठीण असते. नकोशी वाटणारी ओझी प्रार्थनेची मित्र ठरू शकतात; ती आपली इच्छा जागृत करतात आणि आपल्याला देवाजवळ ओढतात (स्तोत्रसंहिता 55:22). परंतु आपण तीच ओझी धरून ठेवणे पसंत केले, तर ती अव्यक्त झालेल्या हत्तींसारखी प्रार्थनेच्या खोलीत गर्दी करतात आणि देवाजवळ जाण्याची आपली इच्छा मंदावून टाकतात. देवाशी प्रामाणिक असा; तुम्ही त्याच्याकडे देऊ इच्छिता ते प्रत्येक ओझे वाहण्यास तो समर्थ आहे.

प्रत्येक वेदनेमागील प्रथम कारण देव आहे, हे मान्य केल्याने मोठी शांती मिळते. आपल्याला बुडवून टाकणाऱ्या उसळत्या लाटा त्याच्याच मालकीच्या आहेत (स्तोत्रसंहिता 42:7). प्रत्येक अडचणीत मुख्य कर्ता तोच आहे (स्तोत्रसंहिता 66:10–12). तरीही, त्या वेळीही देव आपल्यासाठी आहे. स्वतःचा नकार करणे आणि देवाच्या इच्छेला अधीन होणे हे विश्वासाच्या जीवनात शिकायचे पहिले आणि शेवटचे धडे आहेत. पण जॉन न्यूटन यांचे म्हणणे बरोबर होते: “निराशेच्या शाळेत” काही काळ प्रशिक्षण घेतल्याशिवाय हे धडे शिकण्यास फार थोडे लोक तयार असतात. 

जर अंधार दूर झाला नाही तर काय? अनेकदा वर जाण्याचा सर्वोत्तम मार्ग एवढाच असतो: विश्वास ठेवा आणि आज्ञा पाळा. ईयोबाच्या धीराचा विचार करा (ईयोब 23:8–12). प्रतिकूल अंधाराच्या तोंडावर, तो गोंधळाकडून (वचने 8–9), खातरीकडे (वचन 10), आणि समर्पणाकडे (वचने 11–12) कसा जातो, हे पाहा. या पतित जगात ईयोबाला हे उमगते की, त्याच्या अंतःकरणाला जे अनुभवता येते, त्यापेक्षा देवाविषयीचे ज्ञान त्याच्याजवळ अधिक निश्चित आणि अधिक खरे आहे. विश्वास ही दरी भरून काढतो आणि त्याला अशा क्षेत्रात नेतो, जिथे भावनांचा हात नेहमीच पोहोचू शकत नाही (इब्री लोकांस पत्र 11:1).

“परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे; त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन.” (ईयोब 23:10). या प्रवासासाठी विश्वासाजवळ हीच ती हमी आहे, जी आपल्या सर्वांत वाईट भीतींपेक्षा अधिक खरी आहे; म्हणून आपण त्याला धरून राहतो, कारण तो आपल्याला धरून राहतो (वचने 11–12). टेरिअर जातीचा कुत्रा जसे खेळणे तोंडात घट्ट धरून ठेवतो, तसेच ईयोब या सत्याला घट्ट चिकटून राहतो आणि ते कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही. आपण देवाला धरून आहोत, असे त्याला स्वतःला जाणवत नाही, परंतु विश्वासाचे नेत्र हे त्याला धरून ठेवणाऱ्या अधिक सामर्थ्यवान हाताकडे लागलेले असतात, असा हात जो त्याला कधीही सोडणार नाही.

शेवटी, उदास आणि निराशेच्या काळात आपण स्वतःला विचारण्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, “मला काय वाटते?” हा नसून, “मला काय माहीत आहे?” हा असला पाहिजे.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

नील स्टुअर्ट

नील स्टुअर्ट

डॉ. नील स्टुअर्ट हे कोलंबिया, एस.सी. येथील फर्स्ट प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये वरिष्ठ पाळक आहेत.