
धर्मसुधारणा आजही का महत्त्वाची आहे?
04/11/2025
रिफॉर्मेशन डे म्हणजे काय?
11/11/2025प्रोटेस्टंट धर्मसिद्धांत आणि विश्वासाचे कबूलनामे
प्रोटेस्टंट धर्मसुधारणा ही विश्वासाच्या मूलतत्त्वांसाठीची झुंज होती. सुरुवातीला ल्यूथर आणि नंतर इतर प्रोटेस्टंट परंपरांसह, सुधारकांनी पवित्र शास्त्रसत्ताक विश्वासाला रोमन कॅथलिक शिकवणी व पोपसत्ताक अधिकारमंडळाच्या विरोधात उभे केले. पवित्र शास्त्र हेच धर्मसिद्धांत आणि विश्वास यांसाठी एकमेव प्रामाणिक स्त्रोत आहे हे अगदी स्पष्टपणे दाखवून, प्रोटेस्टंट सुधारकांना पवित्र शास्त्राच्या शिकवणीची समज स्पष्ट व सुव्यवस्थित रीतीने मांडणे आवश्यक होते. या अर्थाने, धर्मसुधारणेतील विश्वासाचे कबूलनामे (confessions) हे पवित्र शास्त्राप्रतीच्या प्रोटेस्टंट बांधिलकीचा एक स्वाभाविक फुलोरा ठरलें.
विश्वासाच्या कबूलनाम्यांची गरज प्रोटेस्टंट सुधारकांनी निर्माण केलेली नाही. शतकानुशतके, गोंधळ किंवा संकटाच्या काळात मंडळीने नेहमीच आपला विश्वास कबूल केला आहे. पवित्र शास्त्राची जागा घेणे ही धर्मसिद्धांत किंवा विश्वासाच्या कबूलनाम्यांची भूमिका कधीच नव्हती; उलट, चुकीच्या शिकवणीच्या विरोधात पवित्र शास्त्रातील सत्याविषयी मंडळीची साक्ष संक्षेपाने मांडणे हीच त्यांची भूमिका असायची (आणि आजही आहे).
या प्रेरणेची सर्वात प्रसिद्ध उदाहरणे म्हणजे तिसऱ्या ते पाचव्या शतकांदरम्यान रचलेले प्राचीन धर्मसिद्धांत—नायसिन (नायसिया) आणि कॅल्सिडोनियन धर्मसिद्धांत. नंतरच्या प्रोटेस्टंट कबूलनाम्यांप्रमाणेच हेही त्या गरजेतूनच उदयास आले —म्हणजे, धर्मतत्त्वांच्या बाबतीत मंडळी काय आवश्यक मानते, ते स्पष्ट करणे.
तथापि प्रोटेस्टंट विश्वास कबूलनाम्यांचे वैशिष्ट्य असे की सुधारकांना मुळापासून-टोकापर्यंत (root-and-branch) सुधारणा करण्याचा ध्यास होता. धर्मसुधारणेचे प्रश्न कुठल्यातरी एकाच सिद्धांतापुरते मर्यादित नव्हते; तर संपूर्ण मंडळीचीच सुधारणा करणे आवश्यक आहे या जाणिवेवर ते आधारलेले होते. त्रैक्यासारखे काही धर्मसिद्धांत पवित्र शास्त्राधारित म्हणून कायम टिकवून ठेवले गेले, तर “केवळ विश्वासाने नीतिमान ठरविले जाणे” यांसारख्या इतर बाबींना काटेकोर स्पष्टीकरणाची गरज भासली. आपल्या परंपरांतील मंडळ्यांच्या हितासाठी प्रोटेस्टंट नेतृत्वाने सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन भाषेत हे विचार लिहून ठेवले—उदा., केवळ विश्वासाने नीतिमान ठरविले जाणे हा सिद्धांत का स्वीकारावा आणि पोपसत्ताक अधिकारमंडळाचा विरोध का करावा, यामागील विचारसरणी.
म्हणून, या अर्थाने प्रोटेस्टंट विश्वास-अंगीकार किंवा कबूलनामे हे आरंभीच्या धर्मसिद्धांतांसारखेच आहेत; फरक इतकाच की त्यांचा तपशील अधिक सखोल असतो. धर्मसिद्धांतांप्रमाणेच हे विश्वास-अंगीकार पवित्र शास्त्राची जागा घेत नाहीत, किंवा पवित्र शास्त्राच्या बरोबरीचे समजले जात नाहीत; उलट, प्रोटेस्टंट सुधारकांना पवित्र शास्त्रामध्ये जे आढळते त्याचे स्पष्ट मांडणीकरण (articulation) ते करतात.
ल्यूथरन विश्वास-अंगीकार
प्रोटेस्टंट परंपरेतील या प्रवृत्तीचे पहिले उदाहरण ल्यूथर यांच्या आरंभीच्या धर्मसुधारणाकाळात दिसते. 1517–1519 या काळात केवळ विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जाणे यासाठी ते झुंज देत होते; पुढे 1521 मधील व्हर्म्सच्या धर्मसभेत त्यांना कायदाबाह्य व धर्मद्रोही ठरवण्यात आले. तत्क्षणीच ल्यूथर यांनी आपल्या संदेशाची मूलतत्त्वे विश्वास-अंगीकारांच्या दस्तऐवज स्वरूपात नोंदवू लागले. त्यांपैकी दोन मंडळीसाठी आणि एक ल्यूथर यांच्या संदेशाच्या सार्वजनिक बचावासाठी असायचे.
पहिल्या दोन प्रकरणांत ल्यूथर यांनी 1529 मध्ये विस्तृत धर्मशिक्षण प्रश्नोत्तरी आणि लघु धर्मशिक्षण प्रश्नोत्तरी (Large आणि Small Catechisms) असे दोन ग्रंथ लिहिले, त्यांपैकी पहिला प्रौढ शिष्य व धर्मोपदेशकांच्या प्रशिक्षणासाठी होता, तर दुसरा मुलांसाठी किंवा नवशिक्या विश्वासणाऱ्यांसाठी होता. त्याच वर्षी त्यांनी ‘एक्झॉर्टेशन टू कन्फेशन’ नावाचा ग्रंथही लिहिला, ज्यात विश्वासाच्या कबुलीची (confession) गरज त्यांनी समर्पक ठरवली. मंडळी केवळ पवित्र शास्त्रावर उभी असली तरी, विश्वासाचा सामूहिक अंगीकार अत्यंत निकडीचा आहे, असा युक्तिवाद ल्यूथर यांनी केला.
हे आरंभीचे प्रश्नोत्तरे स्वरूपातील धर्मशिक्षणग्रंथ विश्वास-अंगीकारांचे एक लक्षणीय वैशिष्ट्यही दाखवतात: ते शिष्यत्वाची साधने आहेत आणि मंडळीच्या जीवनासाठी अनिवार्य ठरतात.
तिसरा विश्वास-अंगीकार म्हणजे 1530 मधील प्रसिध्द ऑग्सबुर्ग विश्वास-अंगीकार. तो ल्यूथर व फिलीप मेलान्क्थन यांनी तयार केला. तो मंडळीसाठीच्या सामुदायिक कबुलीच्या भावनेतून नव्हे, तर सम्राट चार्ल्स पाचवा व युरोपीय राजपुत्रांसमोर सादर करण्यासाठी रचण्यात आला होता. तो ल्यूथरन संदेशाचा बचावग्रंथ (apologia) होता, ज्याचा स्वर कधीकधी आक्रमक होता, निदान त्याच्या अर्थछटांमध्ये तसे जाणवते. जर्मन कॅथलिक लोकांनी त्यांच्यावर लावलेल्या आरोपांच्या विरोधात ल्यूथरन लोक प्रत्यक्षात काय मानतात, हे तो स्पष्ट करतो.
ल्यूथरन धर्मशिक्षणग्रंथ आणि विश्वास-अंगीकार धर्मसुधारणेच्या काळात विश्वास-अंगीकारांचा उपयोग ज्या प्रकारे झाला त्याचे सूक्ष्म-चित्र तयार करतात: एक मंडळीच्या अंतर्गत जीवनासाठी, आणि दुसरा प्रोटेस्टंट शुद्धमतावर केलेल्या खोट्या दाव्यांविरुद्ध सार्वजनिक बौद्धिक विवादासाठी; एक मंडळीमधील प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी, आणि दुसरा पुढाऱ्यांनी आपण कोणत्या शुद्ध शिकवणीला धरून आहोत हे त्यांना स्पष्ट करता यावे या साठी.
धर्मसुधारित विश्वास-अंगीकारांचा प्रसार
धर्मसुधारित परंपरा ही विश्वास-अंगीकारांच्या कार्यासाठी तितक्याच दृढतेने वचनबद्ध होती. आपण किती विस्तृतपणे पाहतो, या आधारावर, 1520 ते 1650 या काळात अंदाजे चाळीस ते पन्नास धर्मसुधारित (किंवा धर्मसुधार-प्रभावित) विश्वास-अंगीकार रचले गेले जे तुलनेने कोणत्याही प्रोटेस्टंट परंपरांमध्ये संख्येने सर्वाधिक आहेत. 1523 मध्ये, धर्मसुधारित परंपरेची सुरुवात होताच उलरिख झ्विंग्ली यांनी झ्युरिखमध्ये संकटात असलेल्या मुद्द्यांचे स्पष्ट मांडणीकरण करण्यासाठी ‘सहासष्ट लेख’ तयार केले. त्यानंतर ‘बर्नचे दहा सिद्धांत’ (1528), ‘बाझेलचा पहिला विश्वास-अंगीकार’ (1534) आणि इतर अनेक विश्वासाचे कबूलनामे पुढे आले, कारण विविध शहरांनी धर्मसुधारित दृष्टिकोन स्वीकारण्यास सुरुवात केली होती. पुढे इतर देशांत ‘फ्रेंच विश्वास-अंगीकार’ (1559) आणि ‘स्कॉट्स विश्वास-अंगीकार’ (1560) प्रसिद्ध झाले.
इतके अनेक धर्मसुधारित विश्वास-अंगीकार तयार होण्यामागे त्यांचा संदर्भ कारणीभूत होता. धर्मसुधारित विश्वास नेहमीच ‘बंधुभावाच्या’ नेतृत्वाखाली पुढे गेला (जॉन कॅल्विन यांनी एकहाती धर्मसुधारित शुद्धमत घडवले, हा आधुनिक काळातील समज चुकीचा आहे). ही परंपरा अनेक शहरांमध्ये आणि देशांत जवळजवळ एकाच वेळी जन्माला आली. 1520 पासून एकामागून एक शहरे धर्मसुधारणेकडे (म्हणजे प्रोटेस्टंट विश्वासाकडे) वळली—बहुतेकदा तुकड्यांमध्ये, आणि काही तर जिनिव्हामध्ये सुधारणा येण्यापूर्वीच. म्हणूनच ल्यूथरप्रमाणे एकमेव ‘एकच आवाज’ येथे नव्हता, जो धर्मसुधारित विश्वास-अंगीकारांच्या पायाभूत दस्तऐवजांना सर्वत्र समान रीतीने आकार देऊ शकला असता.
परिणामी, एकामागून एक मंडळी व समुदाय यांनी आपल्या स्थानिक मंडळ्यांसाठी विश्वास-अंगीकार संहिताबद्ध करण्यावर मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च केली. म्हणूनच बहुतेक धर्मसुधारित विश्वास-अंगीकार आपल्या उद्गम-शहराच्या नावाने ओळखले जातात : हा विश्वास-अंगीकार त्या शहरासाठी, तेथील मंडळीसाठी होता. तो सार्वत्रिक धर्मसुधारित मंडळ्यांनी एकमेव मानक म्हणून स्वीकारावा यासाठी नव्हता.
तरीही, इतिहासकार आणि ईश्वरशास्त्रज्ञ दाखवून देतात की या धर्मसुधारित विश्वास-अंगीकारांमध्ये असा एक सुसंवाद आहे, जो विविध स्वरांना एकत्र आणून एकच धर्मसुधारित आवाज घडवतो. तारण, उपासना आणि आचरण या मुद्द्यांवर त्यांचे ऐक्य इतके ठळक आहे की मतभेद त्याला धूसर करू शकत नव्हते. आज अनेक मंडळ्या ‘एकत्वाची तीन रूपे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूलभूत सुसंवादाची कबुली देतात—बेल्जिक विश्वास-अंगीकार, डॉर्टचे धर्मनियम (Canons of Dort) आणि हेडलबर्ग धर्मशिक्षण प्रश्नोत्तरी — हे एकत्व लेखनाचे नसून, धर्मसुधारित तत्त्वांच्या साक्षीचे एकत्व आहे.
याचा अर्थ असा नाही की सर्व धर्मसुधारित विश्वास-अंगीकार अगदी एकसारखेच आहेत. स्विस कॅन्टन्समधून धर्मसुधारित विश्वास जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स आणि पुढे इंग्लंड-स्कॉटलंडमध्ये पसरताना ठळकत्व व प्रत्यक्ष कृतीपर अंमलबजावणी यांमध्ये लक्षणीय भेद प्रकर्षाने दिसतात. ह्याच विश्वास-अंगीकारात्मक ओळखी पुढे जाऊन आज आपल्याला ज्ञात असलेल्या धर्मसुधारित पंथ व समुदायांच्या विविधतेस कारणीभूत ठरल्या.
रेमॉन्स्ट्रंट्स (कॅल्विनवादाचा प्रतिरोधक गट) आणि डॉर्ट
उदाहरणार्थ, नेदरलँड्समध्ये सुधारित मंडळीत 1618–19 या काळात आर्मिनिअनिझमचा उदय हा डॉर्टच्या धर्मसभेसाठी कारणीभूत ठरला, ज्यात जेकब आर्मिनिअसने उपस्थित केलेल्या आव्हानांना धर्मसुधारित तत्त्वांचा विशिष्ट उपयोग करून प्रत्युत्तर देण्यात आले. जॉन कॅल्विनचे उत्तराधिकारी थिओडोर बेझा यांच्या अधीन जिनेव्हामध्ये अध्ययन करून जेकब आर्मिनिअस एक पाळक म्हणून सेवेसाठी नेदरलँड्सला परतला (विडंबना ही की, घरी परतताना बेझांनीच त्याला शिफारसपत्र दिले होते). पुढे, आर्मिनिअसला धर्मसुधारित विद्वत्परंपरेबद्दल (scholasticism) आणि तारण पावणारे लोक व सर्व घडून येणाऱ्या घटना हे सर्व जगाच्या स्थापनेपूर्वी नेमण्यात आले हा धर्म सिद्धांत व कृपेवरील शिकवणी यांबद्दल वाढती शंका वाटू लागली. कालांतराने, त्याची मते इतर अनेक पुढाऱ्यांसाठी कॅल्विनवादी व्यवस्थेविरुद्ध एकत्र येण्याचा नारा ठरली.
1609 मध्ये आर्मिनिअसच्या मृत्यूनंतर, आर्मिनिअन भूमिका, जिला रेमॉन्स्ट्रंट विश्वास असेही म्हटले जाते, लवकरच पाच मुद्द्यांमध्ये संहिताबद्ध करण्यात आली आणि नेदरलँड्सला स्पॅनिश-नियंत्रित कॅथलिक प्रदेशांपासून विभक्त करण्यासाठीच्या डच संघर्षातील पुढाऱ्यांसमोर सादर करण्यात आली. याला प्रत्युत्तर म्हणून डॉर्टची धर्मसभा भरली व तिने त्या पाचही मुद्द्यांना फेटाळून लावले. अशा प्रकारे, तथाकथित “कॅल्विनवादाचे पाच मुद्दे” उदयास आले—जरी धर्मसभेचा उद्देश विश्वासाला पाच मुद्द्यांपुरता मर्यादित करण्याचा नव्हता, तर फक्त आर्मिनिअनिझमच्या पाच मुद्द्यांना उत्तरे देणे हा होता.
पुढे, सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात, हीच धर्मसुधारित तत्त्वांची स्वतंत्र अभिव्यक्ती लंडन बॅप्टिस्ट विश्वास-अंगीकार (1689) मध्ये दिसते. प्युरिटन बॅप्टिस्ट—किंवा प्रिमिटिव्ह बॅप्टिस्ट—यांनी तयार केलेला हा अंगीकार धर्मसुधारित शिकवणीशी निष्ठावान अशा लेखकांचा होता; तरी मंडळीच्या शासनरचनेच्या (polity) बाबतीत आणि शिशूबाप्तिस्म्याच्या (paedobaptism) नकाराच्या बाबतीत ते प्रेस्बिटेरियन, अँग्लिकन आणि डच कॅल्विनवादींपेक्षा वेगळे होते. इंग्लंडमध्ये उगम पावलेल्या बॅप्टिस्टांच्या पिढीजात प्रवाहाचा हा परमोच्च बिंदू ठरला आणि पुढील अनेक शतकांसाठी धर्मसुधारित बॅप्टिस्ट विचारांना त्याने स्वरूप दिले.
वेस्टमिन्स्टर धर्मशिक्षण प्रणाली
विश्वास-अंगीकारांच्या इतिहासातील सर्वोच्च शिखर म्हणजे वेस्टमिन्स्टर मानके—यात वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार, विस्तृत धर्मशिक्षा प्रश्नोत्तरी आणि लघु धर्मशिक्षा प्रश्नोत्तरी धर्मशिक्षणग्रंथ, सार्वजनिक उपासनेची निर्देशिका, आणि मंडळी-प्रशासनाची पद्धत यांचा समावेश होतो. विश्वास-अंगीकाराने धर्मसुधारित (Reformed) शुद्धमताला नवी अभिव्यक्ती दिली; तर दोन्ही प्रश्नोत्तरी धर्मशिक्षणग्रंथांनी लूथर यांनी जसे धर्मगुरू किंवा प्रौढ (विस्तृत प्रश्नोत्तरी) आणि बालक/नवविश्वासी (लघु प्रश्नोत्तरी) यांच्यासाठी मार्गदर्शक तयार केले, त्याचीच प्रतिबद्धता प्रकट केली. लांबी व खोली या दोन्ही बाबतीत, वेस्टमिन्स्टर सभेने मान्य केलेल्या या मानकांशी स्पर्धा करील असे ना धर्मसुधारणाकाळातील, ना धर्मसुधारणोत्तर काळातील कोणतेही विश्वास-अंगीकार बरोबरी करणारे असे मानक आढळते. मात्र या मानकांचा इतिहास इंग्लिश मंडळीमधील प्युरिटनवादाभोवतीच्या संघर्षातूनच आकारास आला.
हेन्री आठवा (राज्यकाल 1509–47) याच्या काळापासून इंग्लिश मंडळीने फक्त एक आवश्यक विश्वास-अंगीकार स्वीकारला होता— सुरुवातीला बेचाळीस लेख (1552), नंतर त्यांचे रूपांतर एकोणचाळीस लेखांमध्ये झाले (1563). हे लेख ईश्वरशास्त्रतः पूर्णपणे प्रोटेस्टंट असले तरी, उपासनेच्या तत्त्वांवरील मंडळीची बांधिलकी त्यांनी स्पष्ट केली नाही, तसेच मंडळीच्या नेतृत्वरचनेबाबत किंवा प्रभू भोजनामध्ये तत्वांत ख्रिस्ताची उपस्थिती यांबाबतच्या वादग्रस्त शिकवणींवर कोणतीही निश्चित भूमिका मांडली नाही. सोळाव्या शतकातील बव्हंश काळात अधिक सर्वसमावेशक विश्वास-अंगीकार लिहिण्यात इंग्लिश मंडळी अपयशी ठरल्याचे कारण संकोच नव्हे, तर हेन्रीच्या अपत्यांपैकी एडवर्ड सहावा व मेरी पहिली यांच्या कारकिर्दीत प्रोटेस्टंट व कॅथलिक निष्ठांमधील प्रचंड हेलकावे यांमुळे उद्भवलेली अक्षमता हेच मुख्य होते. त्या काळी अँग्लिकन मंडळीकडे दीर्घ, एकसंघ विश्वास-अंगीकार रचण्याची मोकळीक नव्हती.
एलिझाबेथ प्रथम यांचा काळ येईपर्यंत, इंग्लंडमध्ये बऱ्याच जणांना मर्यादित (short) विश्वास-अंगीकाराची पूर्वीची गरज हीच एक सद्गुण आहे असे वाटू लागले. उदाहरणार्थ, लघु अंगीकारांमुळे युरोपातील धर्मसुधारित व लूथरन नेत्यांमध्ये उफाळणाऱ्या तात्त्विक वादांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा होती. मॅथ्यू पार्कर यांसारख्या बिशपांनी—धर्मसुधारित विश्वासाशी निष्ठा राखूनही—इंग्लिश मंडळीने उपासना, वस्त्रे, शिकवण आणि इतर धार्मिक प्रथा यांवरील आपली भूमिका बदलावी, अशी वाढती मागणी पाहून चिंता व्यक्त करू लागली होती.
या तणावामुळे, प्रथम एलिझाबेथ आणि नंतर जेम्स पहिला यांच्या राजवटीत प्युरिटनवादाचा उदय झाला. हे नाव एखाद्या स्पष्टपणे आखीव-रेखीव चळवळीला नव्हे, तर अधिक सुधारणा साधण्याच्या प्रेरणेला लागू होते. तरीही बिशप आणि राजकीय नेते इंग्लिश मंडळीमध्ये पुढील सुधारणा करण्यास कचरत आहेत, या वस्तुस्थितीमुळे सर्व प्युरिटन निराश झाले होते.
चार्ल्स प्रथम यांच्या काळापर्यंत परिस्थिती बरीच गंभीर झाली. एलिझाबेथ आणि जेम्स यांच्या राजवटीत प्युरिटन लोकांकडे सहसा केवळ दुर्लक्ष केले गेले, जरी त्यांना फारसा छळ सहन करावा लागला नव्हता. परंतु चार्ल्सने प्युरिटन लोकांविरुद्ध अधिक आक्रमक भूमिका घेतली. अखेरीस पार्लमेंट आणि राजा यांच्यातील संघर्षाचा परिणाम म्हणून इंग्लिश गृहयुद्ध (1642–51) भडकले.
ऑलिव्हर क्रॉमवेल यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे प्युरिटन लोकांनी हा संघर्ष जिंकला—आणि त्यांचा पुतळा आजही पार्लमेंटच्या समोर ठामपणे उभा आहे. युद्धकाळात पार्लमेंटने प्युरिटन नेत्यांना (आणि काही स्कॉटिश सल्लागारांना) अशी सभा बोलावण्याचा आदेश दिला, की ज्या द्वारे एकोणचाळीस लेखांचा विस्तार करून युरोपातील इतर विश्वास-अंगीकारांशी तुल्य असा पूर्ण विश्वास-अंगीकार तयार करता येईल. वेस्टमिन्स्टर सभेने आपले कार्य एकोणचाळीस लेखांवर आधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला; परंतु लवकरच ते प्रारूप अत्यंत मर्यादित वाटल्याने त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली.
चार्ल्सविरुद्धचा संघर्ष आणि पुढील सुधारणेची गरज—या पार्श्वभूमीवर वेस्टमिन्स्टर मानकांची लांबी व खोली स्पष्ट होते. सर्व ईश्वरशास्त्रीय तत्त्वांचा सरळसा सारांश देण्याचा हा प्रयत्न नसून, इंग्लिश प्रोटेस्टंट सुधारित ईश्वरशास्त्र व आचरण यांना स्पष्टपणे परिभाषित करण्यासाठी प्युरिटनवादात दडलेल्या ऊर्जेचा हा स्फोट म्हणून ही मानके पाहिली पाहिजेत. रक्त सांडले गेले होते, अनेक आवाज दाबले गेले होते; आणि जेव्हा ते आवाज त्यांच्या बंधनांतून मुक्त झाले, तेव्हा केवळ त्यांच्या शास्त्रीय भूमिकेचे नव्हे, तर उपासना, शिष्यत्व, आणि मंडळीच्या जीवनातील इतर अनेक प्रश्नांचेही सविस्तर स्पष्टीकरण देणे हीच आपली जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना झाली.
आजच्या काळात या विश्वास-अंगीकारांचे महत्व
आज प्रोटेस्टंट मंडळीच्या जीवनात विश्वास-अंगीकार विविध प्रकारे वापरले जातात. इव्हँजेलिकल मंडळीमधील सर्व प्रवृत्ती विश्वास-अंगीकारांसाठी अनुकूल नाहीत. पायटिझमचा उदय आणि ‘दुसरी महान जागृती’ यांसारख्या चळवळींमुळे—सामूहिक तसेच वैयक्तिक पातळीवर—विश्वास-अंगीकारांची भूमिका क्षीण झाली आहे, कारण विश्वासाच्या अधिक तात्काळ अभिव्यक्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. काही वेळा, खऱ्या विश्वासासाठी विश्वास-अंगीकार जणू अडथळा आहेत अशा वृत्तीने त्यांकडे पहिले जाते.
या प्रवृत्ती चिंताजनक असल्या तरी सोळाव्या व सतराव्या शतकातील विश्वास-अंगीकार लुप्त झालेले नाहीत. अनेक मंडळ्यामध्ये उपासनेच्या संदर्भात तसेच नवीन विश्वासणाऱ्यांना आणि मुलांना धर्मशिक्षण देण्यासाठी त्यांचा आठवड्याप्रती वापर होतो. विविध पंथांमध्ये पास्टर आणि वडीलधारी यांची विश्वासनिष्ठा तपासण्यासाठीही ते उपयुक्त ठरतात. या अर्थाने, विश्वास-अंगीकार केवळ शुद्धमताची सीमारेषा ठरविणारे नव्हेत, तर ख्रिस्ती शिष्यांच्या दैनंदिन चालण्यात मार्गरेषा रेखाटणारे, जिवंत दस्तऐवज म्हणूनही कार्य करतात.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


