Finding Hope Amid Severe Illness

गंभीर आजारपणात आशा शोधणे

21/04/2026
What Is a Confession of Sin?

पापाची कबुली म्हणजे काय?

28/04/2026
Finding Hope Amid Severe Illness

गंभीर आजारपणात आशा शोधणे

21/04/2026
What Is a Confession of Sin?

पापाची कबुली म्हणजे काय?

28/04/2026

मी निराशेचा सामना कसा करावा?

How Can I Deal with Despair?

आशा जर जीवनाची ओढ असेल, तर निराशा म्हणजे अंताची ओढ. झाडाखाली बसलेल्या एलीयाप्रमाणे (1 राजे 19:1-10), आपल्या जन्मावर शोक व्यक्त करणाऱ्या ईयोबाप्रमाणे (ईयोब 3), किंवा संकटाने इतका भारावून गेलेल्या पौलाप्रमाणे की ज्याने आपल्या जीवनाची जणू आशाच सोडून दिली होती (2 करिंथ 1:8), विश्वासणारे देखील, जे जिवंत आशा प्राप्त व्हावी म्हणून नवा जन्म पावलेले आहेत, वेदनांच्या काळात जणू काही कोंडीत अडकल्यासारखे अनुभवू शकतात. 

स्तोत्रकर्त्याने टाहो फोडला,

तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत. (स्तोत्रसंहिता 42:7)

ईयोबाने विलाप केला, “माझा आत्मा भग्न झाला आहे; माझे दिवस संपले आहेत” (ईयोब 17:1). या केवळ काव्यात्मक भावना नाहीत, तर त्या अशा वास्तवाचे प्रतिबिंब आहेत जिथे दुःख कधी कधी आपण ज्या मर्यादेपर्यंत सहन करायला घडवलेलो आहोत, त्या आपल्या नैसर्गिक मर्यादेपलीकडे जाऊ शकते. 

निराशा केवळ ‘ज्यांच्यावर ती अपेक्षित असते’ अशांनाच येते, असे नाही: म्हणजे जे नेहमी उदास राहणारे, कायम असंतोषात जगणारे, किंवा समज कमी असलेले लोक. नाही. चार्ल्स स्पर्जन, मार्टिन लॉयड-जोन्स, आणि जॉन बन्यन यांसारख्या चैतन्यशील संतांनीही खोल वेदना आणि तीव्र यातनांचे काळ अनुभवले. दु:खे व क्लेश ही व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याची आध्यात्मिक परिपक्वता यांवर आधारित भेदभाव करत नाहीत.

निराशेच्या गर्तेत असलेल्या व्यक्तीला एकच गोष्ट हवी असते: त्यातून सुटका. या संघर्षाचे स्वरूपच असे आहे की, तो पराभव आणि अर्थहीनतेचा एक शक्तिशाली आभास निर्माण करतो, आणि त्यातून कोणताही उपाय, कोणतीही वाट, किंवा कोणतीही सुटका दिसत नाही. स्तोत्रकर्त्याने ते असे मांडले आहे:    

‘मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, आणि लोंढा माझ्यावरून जात आहे. (स्तोत्रसंहिता 69:2)

खवळलेल्या समुद्रात हातपाय मारत पाण्यावर टिकून राहण्यासाठीच्या संघर्षासारखे, हे असे भासू शकते की आपण सर्वांच्या डोळ्यांदेखत बुडत आहोत, परंतु मदतीचा हात मात्र सुटकेच्या आवाक्याबाहेरच आहे.

मग ती हळूहळू येणारी घसरण असो, किंवा मन व आत्म्याला एकाएकी कडेलोटाच्या टोकापर्यंत ढकलणारा झटका असो, निराशा विश्वासू व्यक्तीच्या आशेचे वास्तव वाकडे-तिकडे करून टाकते आणि शरीर, मन, आत्मा यांची सहनशक्ती कुंठित करते. म्हणून पुन्हा सावरण्यासाठी आपली दृष्टी आणि सहनशक्ती ही नव्याने उभारणे आवश्यक असते, कारण आपण आपल्या अशक्तपणात ख्रिस्तावर विसंबून राहतो आणि आज्ञापालन, धीर, व आशा यांची  हळूहळू वेगावणारी “बालकपावले” टाकत विश्वासाचा सराव करतो, अशी पावले जी निराशेचा वेग तोडून टाकतात. 

विचारचक्राला खंड घालणे

बन्यन यांच्या पिलग्रिम्स प्रोग्रेस या पुस्तकामध्ये, जेव्हा ‘ख्रिश्चन’ ‘जायंट डिस्पेअर’च्या किल्ल्यात खितपत पडला होता, तेव्हा तेथील अंधार केवळ आभास नव्हता; तो स्पर्शास येईल असा, गुदमरवून टाकणारे वास्तव होता. त्याचप्रमाणे, आपणही कधी कधी अतिशय काळोख्या परिस्थितीच्या मधोमध उभे असतो; परंतु निराशा त्या परिस्थितीभोवती आपले विचार अखंड फिरवीत ठेवते आणि ख्रिस्तामधील आपली आशा धूसर करते. ‘ख्रिश्चन’ची सुटका अंधार संपला म्हणून झाली नाही; तर त्याच्या खिशात असलेल्या अभिवचनाच्या किल्लीचा उपयोग करावा, हे त्याला पुन्हा आठवले म्हणून झाली. 

देवाच्या वचनाने आपल्या विचारांना नियमितपणे खंडित करणे आणि त्या विचारांना नव्याने आकार देणे आवश्यक असते. जेव्हा त्यागले जाण्याची भीती घोंगावते, तेव्हा तो तुम्हाला कधीही न सोडण्याचे, कधीही न टाकण्याचे अभिवचन देतो, हे स्मरा. जेव्हा वेदनांची खोली देवाच्या आवाक्याबाहेर वाटते, तेव्हा तो स्वतः अधोलोकापर्यंत उतरला, हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला काय प्रार्थना करावी हे सुचत नाही, तेव्हा जाणून घ्या की आत्मा तुमच्यासाठी अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो. 

शरीराची काळजी

जेव्हा एलीया पूर्णपणे हताश झाला, तेव्हा देवाने त्याला अन्न दिले, विसावा दिला, आणि स्वतःचे सान्निध्य दिले. आपली निर्मिती ही मूळतः मर्यादित शक्ती देऊन झाली होती; ती झिजली की तिचे पुनर्संचयन आवश्यक असते. नम्रतेसाठी दररोज व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, शरीराचे पोषण करणे, सूर्यप्रकाशात बसणे, वैद्यकीय उपचार घेणे आणि जबाबदाऱ्या रेटण्याऐवजी स्वतःला विश्रांती घेऊ देणे आवश्यक आहे. शरीराच्या गरजांकडे लक्ष देणे कधी क्षुल्लक, कधी व्यर्थ वाटू शकते, पण ते आपल्या प्राणीमात्रपणाच्या मर्यादा मान्य करून त्यांचा मान राखण्याचे, आणि देवाच्या पुरवठ्यावर विश्वास ठेवण्याचे, आज्ञापालनातील एक शक्तिशाली कृत्य आहे.

आतल्या कोंडीतून बाहेरच्या वास्तवाकडे वळणे

जगण्याच्या एखाद्या उपजत प्रवृत्तीप्रमाणे निराशा पीडित व्यक्तीच्या अख्ख्या अस्तित्वाचा ताबा घेते, आणि आत्म-केंद्रितता व एकाकीपणाची मागणी करते. पण विकृत अंतर्मुखतेचा हा घट्ट पीळ इतरांबरोबर वेळ, काळजी आणि उपस्थिती यांचे देवाणघेवाण केल्याने सैल पडू शकतो. इतरांना आपल्या जीवनात सामावून घेणे हितकारक असते, फक्त प्रेम स्वीकारण्यासाठीच नव्हे, तर आपल्या संवादातून आणि लक्ष देऊन ते देण्यासाठीही असते. काळजी घेण्याचे लहान लहान कृत्ये इतरांना प्राधान्य देतात आणि आत्म-केंद्रिततेकडे खेचणाऱ्या शक्तीच्या विरोधात एक मजबूत उपाय म्हणून कार्य करतात. तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी प्रार्थना करा, प्रोत्साहनाचा संदेश पाठवा, त्यांच्याशी संवाद साधा. हे सर्व देवाकडे आणि शेजाऱ्याकडे बाहेर वळून पाहण्याची वृत्ती पुन्हा जागवणारे, मनाला मोकळे करणारे मार्ग आहेत. 

सक्रिय दिनचर्येद्वारे सुटका

निराशा जेव्हा आपल्याला जीवनातील मूलभूत गोष्टींपर्यंत आणून सोडते, तेव्हा त्याच मूलभूत गोष्टींना आपल्या सुटकेचा भाग म्हणून स्वीकार करूया. लहानशी का असेना, दिनचर्या जीवनात सुव्यवस्थाक्रम आणते. रोज सकाळी उठणे, कपडे धुणे, अंगणातील गवत कापणे, यासारखी सोपी कामे सामान्यता आणि हेतूची जीवनरेखा ठरतात. हे प्रयत्न जरी यांत्रिक वाटले, तरी पुढची गोष्ट हाताशी घेणे हे स्वतःच आशेचे कृत्य आहे. लहान गोष्टींमध्ये विश्वासूपणा (लूक 16:10) आपली शक्ती पुन्हा उभी करतो, अर्थ व उद्देश यांची खातरी देतो, ज्यामुळे दैनंदिन कामे सुटकेच्या मार्गात रूपांतरित होतात.  

सृष्टीच्या अवलोकनात विसावा पावणे

भयाचे सावट जेव्हा मोठे जाणवू लागतात, तेव्हा देवाचे वैभव आणि सार्वभौमत्व यांच्या प्रकाशात आपले लहानपण लक्षात ठेवल्याने मोठा दिलासा मिळतो. तो सर्व सृष्टीला, आणि आपल्यालाही, एकत्र धरून ठेवतो. देवाने आकाशातील नक्षत्रांच्या पट्ट्यापासून ते समुद्राच्या वेशीपर्यंत सर्व काही आपल्या सामर्थ्याने टिकवून ठेवत असल्याचे आपले चारित्र्य आणि सार्वभौमत्व प्रकट केले, तेव्हा ईयोबाची निराशा उपासनेत बदलली. निसर्गात फेरफटका मारणे, ताऱ्यांच्या छायेखाली आडवे पडणे, फुलझाडे लावणे, प्राण्यांची काळजी घेणे, असे हे सृष्टीचे सौंदर्य आपल्याला सांत्वन देते आणि दृष्टी पुन्हा स्थिर करते, कारण तो नैसर्गिक जगाच्या माध्यमातूनही आपली सेवा करतो. 

सहनशीलतेने टिकून राहा 

अंधार जर दूर होत नसेल आणि दिलासा मिळत नसेल, तर लक्षात ठेवा, दुःखाकडून आशेकडे जाणारा प्रवास सहनशीलतेशिवाय होऊ शकत नाही. यात वेळ आणि विश्वास दोन्ही अपेक्षित आहेत. तणावाच्या अशा अवस्थेत जगणे सोपे नाही; परंतु ख्रिस्तावर सर्वस्वी अवलंबून राहणे शिकण्यासाठी अशक्तपणा आणि गरज हीच पूर्वअट आहे. त्याने आपल्याला केवळ त्याच्या विजयात आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्यात सहभागी होण्यासाठीच नव्हे, तर त्याच्या दुःखांच्या सहभागातही बोलावले आहे (फिलिप्पै 3:10). विश्वासाची ती पावले डळमळत पडत असली, तरी त्यांत टिकून राहा; या काळात तुमच्यासाठी त्याने तयार केलेले हेच उत्तम कार्य आहे.सावल्यांना भिऊ नका. त्या कधीही न संपणाऱ्या वाटत असल्या, तरी वास्तव असे आहे की त्या केवळ “थोडा वेळ” आहेत, आणि मग “आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.” (1 पेत्र 5:10). सावल्या कदाचित आणखी गडद होतील, तरी ज्यांची सुटका अंधाराच्या सत्तेतून झाली आहे आणि ज्यांना पुत्राच्या राज्यात आणले गेले आहे, त्यांच्यावर त्या कधीही हक्क गाजवू शकत नाहीत (कलस्सै 1:13).

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

कारा डेडर्ट

कारा डेडर्ट

कारा डेडर्ट या एका खाजगी फॅमिली फाउंडेशनमध्ये कार्यरत आहेत आणि ग्रँड रॅपिड्स, मिशिगन येथे त्यांचे पती डॅरिल आणि त्यांच्या पाच मुलांसह राहतात. त्या ''थिंक ट्वाइस: एव्हरीडे लाइफ विथ गॉस्पेल पर्स्पेक्टिव” या संकेतस्थळावर नियमितपणे लेखन करतात.