
प्रोटेस्टंट धर्मसुधारणा का आवश्यक होती?
30/10/2025
प्रोटेस्टंट धर्मसिद्धांत आणि विश्वासाचे कबूलनामे
06/11/2025धर्मसुधारणा आजही का महत्त्वाची आहे?
10/31/2016 रोजी पोप फ्रान्सिस यांनी जाहीर केले की पाचशे वर्षांनंतर प्रोटेस्टंट आणि कॅथलिक आता “आपल्या इतिहासातील एका निर्णायक क्षणाची दुरुस्ती करण्याची संधी” मिळाली आहे—ज्यायोगे “आपण अनेकदा एकमेकांना समजून घेण्यास आड येणारे वादविवाद आणि मतभेद” मागे टाकू शकतो. यावरून जणू धर्मसुधारणा ही क्षुल्लक बाबींवरील अनावश्यक कुरघोडी, मोठे झाल्यावर विसरून टाकावी असा एक बालिश उद्रेकच होता, असेच म्हणावे.
पण ते मार्टिन ल्यूथरला सांगून पाहा, केवळ विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जाणे या सत्याचा पुनर्शोध झाल्यावर ज्यांना अशी स्वातंत्र्याची व आनंदाची अनुभूती झाली की त्यांनी लिहिले, “मी जणू पूर्णपणे नव्याने जन्मलो आणि उघड्या दारातून थेट स्वर्गात प्रवेश केला.” ते विल्यम टिंडेलला सांगा—ज्यांना ही “आनंददायी, सुखद व हर्षभरित वार्ता” इतकी लाभली की त्यांनी “गायले, नाचले, आनंदाने उड्या मारल्या.” ते थॉमस बिल्नीला सांगा, ज्यांना ती वार्ता “अद्भुत दिलासा व शांतता” देऊन गेली, “इतकी की माझी ठेचलेली हाडेसुद्धा आनंदाने उड्या मारू लागली.” स्पष्टच आहे, आरंभीचे ते धर्म सुधारक बालिश भांडण छेडत आहेत, असे त्यांना वाटत नव्हते; त्यांच्या दृष्टीने त्यांनी ‘महान आनंदाची’ शुभवार्ता शोधून काढली होती.
1517 मधील शुभवर्तमान
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, युरोपमध्ये लोकांना वाचता येईल असे पवित्र शास्त्र जवळजवळ हजार वर्षे उपलब्ध नव्हते. त्यामुळे थॉमस बिल्नी यांनी “ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला” (1 तीमथ्य 1:15) ही वचने कधी ऐकलीच नव्हती. देवाच्या वचनाऐवजी लोकांच्या मनात अशी समज रूजवली गेली होती की देव असा आहे जो मनुष्याला स्वतःचे तारण कमावण्यास समर्थ बनवतो. त्या काळातील एका शिक्षकाची आवडती मांडणी अशी होती, “जो कोणी आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करतो, त्याला देव आपली कृपा नाकारणार नाही.” तरीही, हे उत्साहवर्धक शब्द ज्यांनी गांभीर्याने घेतले त्यांच्यासाठी ते अत्यंत कटू ठरले. खरेच आपण आपले ‘सर्वोत्तम प्रयत्न’ केले आहे, याची खातरी कशी करणार? आपण तारणास पात्र ठरवून देणारे नीतिमत्व साध्य केले आहे की नाही, हे ओळखायचे कसे?
मार्टिन ल्यूथरने निश्चितच प्रयत्न केला. त्यांनी लिहिले, “मी एक चांगला संन्यासी होतो, आणि माझ्या मठसंन्यासाच्या शिस्तीचे इतके काटेकोर पालन केले की, जर कधी एखादा संन्यासी शिस्तीद्वारे स्वर्गात पोहोचू शकत असेल, तर मी नक्कीच आत गेलेलो असतो.” याउलट, त्यांना असे आढळले:
“माझ्या सद्सद्विवेकबुद्धीने मला खातरी दिली नाही; उलट मला नेहमीच शंका वाटत असे आणि म्हणत असे, ‘तू ही गोष्ट योग्यप्रकारे करण्यांस चुकलास. तू पुरेसा पश्चात्तापी नव्हतास. तू आपल्या पापांगीकारात अमुक-अमुक पाप कबुल करण्यास विसरलास.’ मानवी परंपरांनी माझ्या अनिश्चित, दुर्बळ आणि व्याकुळ झालेल्या अंतःकरणावर उपाय करायचा मी जितका अधिक प्रयत्न केला, तितकेच ते रोज अधिक अनिश्चित, अधिक दुर्बळ आणि अधिक व्याकुळ होत गेले.”
रोमन कॅथलिक मतानुसार, ल्यूथरला स्वर्गाबद्दल खातरी नसणे हे अगदी योग्यच होते. स्वर्गातील स्थानाबाबतची खातरी ही दुराग्रही उर्मट गृहितक समजली जात असे, आणि 1431 साली जोन ऑफ आर्कच्या खटल्यात करण्यात आलेल्या आरोपांपैकी ती एक होती. तेथे न्यायाधीशांनी अशी घोषणा केली :
“ही स्त्री पाप करते, कारण ती म्हणते की तिला सुखलोकात (म्हणजे स्वर्गात) स्वीकारले जाईल याची तितकीच खातरी आहे जणू ती आधीच … गौरवाची भागीदार आहे; कारण या पृथ्वीवरील यात्रेत कोणत्याही यात्रेकरूला हे ठाऊक नसते की तो गौरवासाठी योग्य आहे की शिक्षेस पात्र आहे, हे केवळ सर्वोच्च न्यायाधीशच सांगू शकतात.”
त्या धर्मव्यवस्थेच्या तर्कात तो न्यायनिर्णय पूर्णपणे बसतो: जर आपण (देवाच्या सहाय्यकारी कृपेने) वैयक्तिकरीत्या त्यास पात्र झालो आहोत म्हणूनच आपल्याला स्वर्गात प्रवेश मिळत असेल, तर अर्थातच कोणालाच खातरी असू शकत नाही. त्या युक्तिवादानुसार, माझ्या स्वतःच्या निष्पापत्वावर जितका मला विश्वास आहे, तितकाच मला स्वर्गाबद्दल आत्मविश्वास असू शकतो.
हाच तो नेमका कारणार्थ होता की तरुण मार्टिन ल्यूथर विद्यार्थी असताना मेघगर्जनेसह वीज कोसळताना मृत्यूच्या दाट छायेतून वाचल्यावर भयाने ओरडून उठले. ख्रिस्ताच्या पर्याप्त आणि कृपापूर्ण तारणाचे ज्ञान—केवळ विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जाण्याचे ज्ञान—नसल्यामुळेच त्यांना मृत्यूची भीती वाटत राहिली; त्यांना स्वर्गाची कोणतीही आशा नव्हती.
आणि याच कारणामुळे, केवळ विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जाण्याचा त्यांचा पवित्र शास्त्रामधील पुनर्शोध त्यांना उघड्या दारांतून स्वर्गात प्रवेश केल्यासारखा जाणवला. याचा अर्थ असा की आपल्या सर्व चिंतेऐवजी आणि भयाऐवजी ते आता असे लिहू शकले:
“जेव्हा सैतान आपली पापे आपल्यासमोर आक्रमकपणे टाकतो आणि आपण मृत्यू आणि नरक यांस पात्र आहोत असा जणू निवाडाच देतो, तेव्हा आपण असे बोलले पाहिजे: ‘मी मान्य करतो की मी मृत्यू आणि नरक यांस पात्र आहे. मग काय? याचा अर्थ मला दोषी ठरवून सार्वकालिक शिक्षा होईल का? कदापि नाही. कारण मी एका अशा मनुष्याला ओळखतो ज्याने माझ्या वतीने दु:ख भोगले आणि प्रायश्चित केले. त्याचे नाव येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र. तो जिथे आहे, तिथे मीही असेन.’”
आणि म्हणूनच धर्मसुधारणेमुळे लोकांत उपदेश ऐकण्याची आणि पवित्र शास्त्र वाचण्याची विलक्षण ओढ निर्माण झाली. कारण देवाचे वचन स्वतः वाचणे, आणि त्यात हे शुभवर्तमान पाहणे—की देव पाप्यांना वाचवतो, त्यांच्या पश्चात्तापाच्या परिपूर्णतेच्या आधारे नव्हे, तर पूर्णपणे आपल्या कृपेच्या आधारे —हे धार्मिक अपराधगंडाने धूसर झालेल्या जगात भूमध्य समुद्राच्या तेजस्वी सूर्यप्रकाशासारखे उजळणारे होते.
2017 मधील चांगली बातमी
गेल्या पाचशे वर्षांत धर्मसुधारणेच्या अंतर्दृष्टींचे तेज वा त्यांच्या सत्याशी असलेला प्रासंगिकपणा कणभरही मंदावलेला नाही. त्याच मूलभूत प्रश्नांची उत्तरे आजही मानवी निराशा आणि आनंद यांच्यात निर्णायक फरक निर्माण करतात. माझ्या मृत्यूनंतर माझे काय होईल? मी ते कसे जाणून घेऊ? धर्म सुधारकांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे, नीतिमान ठरविले जाणे हे नीतिमत्वाच्या स्थितीचे देणगीरूप वरदान आहे का, की ते रोमच्या विधानाप्रमाणे अधिकाधिक पवित्र होत जाण्याची प्रक्रिया? माझ्या तारणासाठी मी केवळ ख्रिस्तावर दृढपणे अवलंबून राहू शकतो का, की माझे तारण माझ्या स्वतःच्या प्रयत्नांवर आणि पवित्रता साध्य करण्यातील यशावर देखील अवलंबून आहे?
बहुधा लोकांना धर्मसुधारणा म्हणजे आपण सहज मागे टाकू शकू असा केवळ ऐतिहासिक प्रसंग वाटण्याचे कारण हेच—की ती त्या काळातील काही समस्यांवर केलेली एक क्षणिक प्रतिक्रिया होती. . परंतु, तुम्ही जितके जवळून पहाल, तितके हे अधिक स्पष्ट दिसून येईल: धर्मसुधारणा प्रामुख्याने रोम आणि तिच्या धर्म-भ्रष्टतेपासून दूर जाण्याविषयीची नकारात्मक चळवळ नव्हती; ती शुभवर्तमानाकडे अधिक जवळ जाऊन उभे राहण्याविषयीची सकारात्मक चळवळ होती. आणि नेमके हेच आजच्या काळातही धर्मसुधारणेची वैधता आणि तिची प्रासंगिकता टिकवून ठेवते. जर धर्मसुधारणा पाचशे वर्षांपूर्वीच्या केवळ ऐतिहासिक परिस्थितीला दिलेले उत्तर असते, तर ती केव्हाच संपली असती. परंतु जर ती शुभवर्तमानाकडे सतत अधिक निकट जाण्याचा प्रवास होती, तर ती संपण्याचा प्रश्नच नाही.
दुसरा आक्षेप असा मांडला जातो की आजच्या सकारात्मक विचारसरणी व आत्मसन्मानाच्या संस्कृतीने पापी माणसाला नीतिमान ठरविले जाण्याची गरजच आहे हे सत्यच पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज देवाची कृपा मिळवण्यासाठी कोणी केसरी कपडे घालून गोठवून टाकणाऱ्या थंडीत रात्रभर प्रार्थना-जागरणे करत बसत नाही. त्यामुळे ईश्वरी न्यायाधीशासमोर दोषबुद्धीने छळल्या जाण्याची ल्यूथरची समस्या ही केवळ सोळाव्या शतकातील होती, असे म्हणून ती उडवून लावली जाते; आणि त्यावरचा त्यांचा उपाय—म्हणजे केवळ विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जाणे—आज आपल्यासाठी अनावश्यक मानला जातो.
परंतु नेमक्या ह्याच संदर्भात ल्यूथरचा उपाय अत्यंत आनंददायी व सुसंगत अशी बातमी ठरतो. कारण आपण देवासमोर दोषी ठरू शकतो व म्हणून त्याच्याकडून नीतिमान ठरविले जाण्याची आपल्याला गरज आहे ही विचारच बाजूला सारल्यानंतर, आपल्या संस्कृतीने जुन्याच दोषबुद्धीपुढे अधिक सूक्ष्म रीतीने—आणि उत्तर देण्याची कोणतीही साधने नसताना—शरणागती पत्करली आहे. आज आपण स्वतःला जितके अधिक आकर्षक बनवू, तितके अधिक प्रेम मिळेल, असा संदेश सतत आपल्यावर कोसळत असतो. देवाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी हा कर्मधर्मच—आणि तो खोलवर रुजलेला आहे. यासाठी धर्मसुधारणेकडे अत्यंत तेजस्वी शुभवर्तमान आहे. ल्यूथर यांचे पुढील शब्द दुःखाच्या दाट अंध:काराला चिरून जाणाऱ्या त्या तेजस्वी आणि पूर्णतः अनपेक्षित सूर्यकिरणासारखे आरपार छेदतात:
“देवाचे प्रेम जे त्याला आवडते ते शोधून काढत नाही, तर तेच निर्मिती करून दाखवते. स्वतःचे हित शोधण्याऐवजी देवाचे प्रेम बाहेर प्रवाहित होते आणि चांगुलपण देते. म्हणूनच पापी लोक आकर्षक असतात, ते यामुळे कारण की त्यांच्यावर प्रेम केले जाते; ते आकर्षक आहेत म्हणून त्यांच्यावर प्रेम केले जाते असे नाही.”
आज पुन्हा एकदा, वेळ योग्य आहे
पाचशे वर्षांनंतरही रोमन कॅथलिक चर्चमध्ये अजून धर्मसुधारणा झालेली नाही. अनेक प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक ज्या उबदार ऐक्य-भाषेचा वापर करतात, त्या असूनही रोम आजही केवळ विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जाणे हा सिद्धांत फेटाळतो. यामागे कारण असे की पवित्र शास्त्राला—ज्याच्या मानकांशी पोप, धर्मसभा आणि शिकवण सुसंगत असली पाहिजे—सर्वोच्चधिकार मानले जात नाही. परिणामी, पवित्र शास्त्रवाचनाची आणि समजुतीची जोपासना होत नाही; आणि त्यामुळेच लाखो गरिब रोमन कॅथलिक आजही देवाच्या वचनाच्या प्रकाशापासून दूर ठेवले जातात.
रोमन कॅथलिक धर्माबाहेरही, केवळ विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जाणे ही शिकवण वारंवार क्षुल्लक, दिशाभूल करणारी किंवा गोंधळात टाकणारी म्हणून टाळली जाते. प्रेषित पौलाने नीतिमान ठरविले जाण्याबद्दल काय अभिप्रेत केले, याविषयीचे काही “नवे दृष्टिकोण”, विशेषतः जे वैयक्तिक परिवर्तनाची गरज दुय्यम ठरवतात, त्यांनी लोकांना अधिकच भ्रमात टाकले आहे. परिणामी, ल्यूथरने ज्या मुद्द्याला “कधीही सोडता किंवा तडजोड करता येत नाही” असे ठामपणे घोषित केले होते, तोच मुद्दा आज सोडला जातो किंवा ऐरणीवर ठेवला जातो.
नीतिमान ठरविले जाणे—आणि ते जाहीर करणाऱ्या पवित्र शास्त्राच्या सर्वोच्चधिकाराबद्दल—लाज बाळगण्याची ही वेळ नाही. केवळ विश्वासाणे नीतिमान ठरविले जाण्याची शिकवण ही इतिहासपुस्तकातील केवळ अवशेष नव्हे; ती आजही अंतिम मुक्तीचा अद्वितीय संदेश आहे—असा संदेश ज्यात मनुष्याला खऱ्या अर्थाने पंख उघडून भरारी मारण्यास सक्षम बनविण्याचे आणि फुलविण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे. हा संदेश आम्हाला आमच्या पवित्र देवापुढे तारणाची खातरी देतो, आणि देवाची कृपा “विकत” घेऊ पाहणाऱ्या पाप्यांना देवावर प्रेम करणारे व त्याचे भय बाळगणारे असे पवित्रजन घडवतो.
आणि ही चांगली वार्ता व्यापकपणे पसरवण्यासाठी आज आपल्याकडे किती बहुविध संधी आहेत! पाचशे वर्षांपूर्वी गुटेनबर्गच्या मुद्रणयंत्रामुळे शुभवर्तमानाचा प्रकाश अभूतपूर्व वेगाने पसरू शकला, टिंडेलच्या पवित्र शास्त्राच्या प्रती आणि ल्यूथरची पत्रिका हजारोंनी बाहेर पडली. आज डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्याला आणखी एक “गुटेनबर्ग क्षण” दिला आहे; तोच संदेश आता ल्यूथरच्या कल्पनेपलीकडील वेगाने पोहोचवता येतो.
म्हणून गरजा आणि संधी या आजही तेव्हढ्याच, किबहूंना अधिकच, मोठ्या आहेत. सुधारणाकारांच्या निष्ठेतून प्रेरणा घेऊया आणि त्याच अद्भुत शुभवर्तमानाला उंच धरूया; कारण त्याच्या तेजात किंवा आपल्या अंध:काराचा नाश करण्याच्या त्याच्या सामर्थ्यात आजही किंचितही घट झालेली नाही; ते आजही कायम आहे.
हा लेख मुळात टेबलटॉक या मासिकात प्रकाशित झाला होता.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


