प्रोटेस्टंट धर्मसिद्धांत आणि विश्वासाचे कबूलनामे
06/11/2025
ख्रिस्ती जीवनासाठी ल्यूथर यांच्याकडून प्रबोधन
13/11/2025
प्रोटेस्टंट धर्मसिद्धांत आणि विश्वासाचे कबूलनामे
06/11/2025
ख्रिस्ती जीवनासाठी ल्यूथर यांच्याकडून प्रबोधन
13/11/2025

रिफॉर्मेशन डे म्हणजे काय?

31 ऑक्टोबर, 1517 रोजी घडलेल्या एकाच घटनेने जगाला बदलून टाकले. ‘बंधू’ मार्टिन,  (मार्टिन ल्यूथर), जे एक संन्यासी आणि विद्वान होते, यांचा अनेक वर्षांपासून रोममधील त्यांच्या मंडळीसोबत संघर्ष चालत आलेला होता. अभूतपूर्व अशा पापक्षमापत्रांच्या विक्रीमुळे त्यांचे मन फारच अस्वस्थ झाले होते. ही कथा जणू एखाद्या हॉलीवूड चित्रपटासारखीच आहे; चला तर, आपण त्यातील पात्रांना भेटूया. 

सर्वप्रथम, तरुण बिशप अल्बर्ट ऑफ माइंझ आहे जो मंडळीच्या कायद्यानुसार बिशपपदासाठी वयोमर्यादेपेक्षा फारच कमी वयाचा होता. दोन बिशपपदे हातात असूनही त्यांची महत्त्वाकांक्षा आणखी एक पाऊल पुढे, म्हणजे माइंझचे आर्चबिशपपद हाती घेण्याची होती, आणि हे सुद्धा नियमबाह्य होते. म्हणूनच अल्बर्टने रोम येथील पोप लिओ दहावा यांच्याकडे धाव घेतली. डे मेडिसी घराण्यातील लिओ दहावा, याची हाव इतकी अधिक होती की त्याच्या आवडीनिवडी त्याच्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त होत्या. आणि याच ठिकाणी राफेल आणि मायकेल एंजेलोसारखे कलाकार आणि शिल्पकार कथानकात प्रवेश करतात. 

अल्बर्ट ऑफ माइंझने पोपच्या विशेष परवानगीसाठी विनंती केली तेव्हा लिओ दहावा व्यवहार करण्यास तयार होता. पोपाच्या मान्यतेने अल्बर्ट—भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातील पापांसाठी—पापक्षमापत्रे विकणार होता. हे सर्व पाहून संन्यासी मार्टिन ल्यूथर अतिशय व्यथित झाले. “आपण स्वर्गात जाण्याचा मार्ग विकत घेऊ शकतो का?”— या प्रश्नाने त्यांचे अंतःकरण संतप्त झाले, आणि मग ल्यूथरला याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक वाटले.

पण 31 ऑक्टोबरच का? कारण 1 नोव्हेंबर हा चर्चच्या दिनदर्शिकेत ‘ऑल सेंट्स’ डे’ हा एक विशेष दिवस होता. 1 नोव्हेंबर 1517 रोजी, ल्यूथर यांच्या विटेनबर्ग शहरात नव्याने संकलित पवित्र अवशेषांची भव्य प्रदर्शनी भरणार होती. देशभरातून यात्रेकरू येऊन आपल्या समजुतीप्रमाणे त्या अवशेषांसमोर वंदन करून आणि शुद्धीस्थानातील (purgatory) दंडकाळातून शेकडो, किबहूंना हजारो, वर्षे कमी करून घेणार होते. हे सर्व पाहून ल्यूथर यांचे अंतःकरण अधिकच व्याकूळ झाले. त्याला हे मुळीच योग्य वाटले नाही.

एक विद्वान म्हणून, मार्टिन ल्यूथरने लेखणी हातात घेतली, ती शाईत बुडवली आणि ऑक्टोबर 31, 1517 रोजी आपली 95 विधाने लिहिली. उद्देश होता वादविवाद चेतवणे, मंडळीमधील आपल्या बांधवांमध्ये आत्म-परीक्षणाची भावना जागृत करणे. पण या 95 विधानांनी केवळ वादविवाद उभा केला नाही; या विधानांनी हे देखील उघड केले की मंडळीची अवस्था पुनर्स्थापना अशक्य अशा टप्प्यावर पोहचली होती. मंडळीला केवळ पुनर्वसन नव्हे, तर धर्मसुधारणेची गरज  होती. आणि त्यानंतर मंडळी  आणि जग यापुढे पूर्वीसारखे राहिले नाही. 

ल्यूथरच्या 95 विधानांपैकी एक अगदी सरळ शब्दात घोषणा करते : “मंडळीचा खरा खजिना येशू ख्रिस्ताची सुवार्ता आहे.” हाच रिफॉर्मेशन डेचा सारगर्भित अर्थ. परंपरेचे थरावर थर चढवत गेल्याने पवित्र शास्त्राच्या पानांवर जणू आवरणे चढली होती, आणि सुवार्तेचे दर्शनच धूसर झाले. केवळ परंपरांमुळे अनेकदा कर्मकांडांची व्यवस्था निर्माण होते, जिथे तुम्हाला देवाकडे परत जाण्याचा मार्ग कमवावा लागतो. हे जितके परूशी लोकांच्या बाबतीत खरे होते तितकेच हे मध्ययुगीन रोमन कॅथलिक धर्माच्या बाबतीतही खरे होते.. ख्रिस्ताने स्वतः म्हटले नाही का, “माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”? रिफॉर्मेशन डे हा कर्मकांडातून बंधमुक्त करणाऱ्या ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या आनंददायी सौंदर्याचा उत्सव आहे. 

रिफॉर्मेशन डे म्हणजे काय? तो दिवस, ज्या दिवशी सुवार्तेचा प्रकाश अंधार फोडून बाहेर आला. हाच तो दिवस होता, ज्या दिवशी प्रोटेस्टंट सुधारणेला सुरुवात झाली.  त्या दिवसाने मार्टिन ल्यूथर, जॉन कॅल्विन, जॉन नॉक्स आणि इतर अनेक धर्मसुधारक यांच्या सेवेद्वारे मंडळीला पुन्हा पवित्र शास्त्राकडे—जे विश्वास आणि जीवनासाठी एकमेव सर्वोच्च अधिकार आहे—परत आणले; आणि केवळ कृपेने, केवळ विश्वासाद्वारे, केवळ ख्रिस्तामध्ये मिळणाऱ्या तारणाच्या महान शिकवणीच्या पायावर पुन्हा उभे केले. हा दिवस मिशनरी अभियानांना प्रेरणा देण्यासाठी कारणीभूत ठरला, स्तोत्रे लिहिण्यास तसेच मंडळीत येऊन एकत्र गीते गाण्यास चालना मिळाली, आणि देवाच्या लोकांसाठी उपदेश व प्रवचन पुन्हा केंद्रस्थानी आले. हा दिवस ईश्वरशास्त्रीय, मंडळीसंस्थात्मक, आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा उत्सव आहे. 

म्हणूनच आपण रिफॉर्मेशन डे साजरा करतो. हा दिवस आपल्या भूतकाळाविषयी, आणि संन्यासीवरून सुधारक बनलेल्या त्या बंधूबद्दल कृतज्ञ राहण्याची आपल्याला आठवण करून देतो. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, आपण जे काही करतो त्याच्या केंद्रस्थानी सुवार्तेचा प्रकाश न विझू देता प्रकाशित ठेवणे, ही आपली जबाबदारी आहे याची हा दिवस आपल्याला आठवण करून देतो.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

स्टीफन निकोल्स
स्टीफन निकोल्स
डॉ. स्टीफन जे. निकोल्स हे रिफॉर्मेशन बायबल कॉलेजचे अध्यक्ष आणि लिगोनियर मिनिस्ट्रिजचे मुख्य शैक्षणिक अधिकारी आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात बियाँड द 95 थीसेस, अ टाइम फॉर कॉन्फिडन्स, आणि आर. सी. स्प्रौल : अ लाइफ यांचा समावेश आहे.