रिफॉर्मेशन डे म्हणजे काय?
11/11/2025
पालक म्हणून तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
18/11/2025
रिफॉर्मेशन डे म्हणजे काय?
11/11/2025
पालक म्हणून तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
18/11/2025

ख्रिस्ती जीवनासाठी ल्यूथर यांच्याकडून प्रबोधन

देवाचे सार्वभौमत्व, कृपेने मिळणारे तारण, विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जाणे आणि ख्रिस्ताशी झालेल्या ऐक्यामुळे निर्माण झालेले नवे जीवन — या सत्यांचा ख्रिस्ती जीवनाशी काय संबंध आहे? ल्यूथर यांच्या दृष्टिकोनातून या सत्यांचे चार मुख्य निहितार्थ (गर्भित अर्थ किंवा दडलेला अर्थ) दिसून येतात.

पहिला निहितार्थ हा की ख्रिस्ती विश्वासणारा सिमुल इयुस्टुस एत पेक्काटोर1 (simul iustus et peccator) म्हणजे एकाच वेळी नीतिमान ठरविलेला आणि तरीही पापी, असा असतो. (हे तत्त्व ल्यूथर यांना कदाचित योहान टाउलर यांच्या थिओलोजिया जर्मानिका मधून स्फूर्ती देत असेल.) हे तत्त्व खूपच स्थैर्य देणारे आहे : कारण जेव्हा मी स्वतःकडे पाहतो, तेव्हा मला फक्त एक पापी दिसतो; पण जेव्हा मी स्वतःला ख्रिस्तामध्ये पाहतो, तेव्हा मला असा मनुष्य दिसतो, ज्याला त्याच्या परिपूर्ण नीतिमत्त्वामुळे नीतिमान गणले  गेले आहे. असा मनुष्य देवापुढे येशू ख्रिस्ताइतकाच नीतिमान म्हणून उभा राहू शकतो, कारण तो नीतिमान आहे, ते केवळ ख्रिस्ताच्या नीतिमत्वात. येथे आपण सुरक्षितपणे उभे राहतो. 

दुसरा निहितार्थ म्हणजे हा शोध की देव ख्रिस्तामध्ये आपला पिता झाला आहे; त्याने आम्हाला स्वीकारले आहे. ल्यूथर यांच्या टेबल टॉक मधील एक सुंदर नोंद, जी कदाचित उल्लेखनीय आहे, पण काहीसे विषादमय स्वभावाचे, तरीही सर्वांच्या प्रेमास पात्र ठरलेले योहान श्लागिनहाउफेन यांनी नोंदवली आहे :

“माझ्या कॅटीपेक्षा देव माझ्यावर आणि माझ्या लहान मार्टिनवर अधिक दयाळू आणि अधिक ममतेने वागणारा असला पाहिजे. कॅटी किंवा मी मुद्दामहून आमच्या लेकराचा डोळा उपटणार नाही, त्याचे डोके फोडणार नाही, आणि देवही तसे काही करणार नाही. देवाला आमच्याबाबतीत संयम राखावा लागत असेल; आणि त्याने त्याचा पुरावा दिला आहे. म्हणूनच त्याने आपल्या पुत्राला  आपल्यासारख्या मानवी देहात पाठवले, जेणेकरून आपण सर्वोत्तम गोष्टींसाठी त्याच्याकडे पाहू शकू.”2

 तिसरा  निहितार्थ म्हणजे, ल्यूथर यांचा असा ठाम आग्रह की ख्रिस्तामधील जीवन म्हणजे अपरिहार्यपणे क्रूसाखालील जीवन.3 आपले जर ख्रिस्ताबरोबर ऐक्य झाले आहे, तर मग आपले जीवन हे देखील त्याच्या धर्तीवरच घडेल. खऱ्या मंडळीचा आणि खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचा मार्ग हा अभिमानाचे ईश्वरशास्त्र (थिओलोजिया ग्लोरिये) नव्हे, तर क्रूसाचे ईश्वरशास्त्र (थिओलोजिया क्रूसिस) हाच असतो. याचा परिणाम अंतःकरणी असा होतो की आपण स्वतःसाठी मरतो, आणि बाह्यरीत्या असा की आपण मंडळीच्या दु:खांत सहभागी होतो. मध्ययुगीन “अभिमानाचे ईश्वरशास्त्र” हे “क्रूसाच्या ईश्वरशास्त्राच्या” अधीन झाले पाहिजे. पवित्र विधींच्या स्वरूपाकडे पाहण्याच्या दृष्टीने ल्यूथर आणि कॅल्विन यांच्यात मतभेद असले, तरी या तत्त्वावर ते दोघेही एकमत होते : आपण ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान यांद्वारे त्याच्याशी एकरूप झालो आहोत, आणि बाप्तिस्म्याद्वारे तशी छाप आपल्यावर कोरली गेली असेल (रोमकरांस 6:1–14), तर संपूर्ण ख्रिस्ती जीवन क्रूस वाहणारेच असेल. 

“ख्रिस्ताचा क्रूस म्हणजे ती लाकडाची वस्तू नाही जी ख्रिस्ताने आपल्या खांद्यावर वाहिली आणि जिच्यावर त्याला नंतर खिळले गेले, तर सर्वसाधारणपणे याचा अर्थ विश्वासणाऱ्यांचे सर्व दुःख आहे, ज्यांचे दुःख ख्रिस्ताचे दुःख आहे, 2 करिंथकरांस  1:5: ‘कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दु:खे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते.’ आणि तसेच : ‘तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यांमध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे;’ (कलस्सै 1:24). अशाप्रकारे ख्रिस्ताचा क्रूस, सर्वसाधारण अर्थाने, मंडळीवर ख्रिस्तामुळे येणारे सर्व क्लेश आणि दु:ख यांना सूचित करतो.”4

ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान यांद्वारे विश्वासणाऱ्याचे त्याच्याबरोबरचे झालेले ऐक्य आणि ते रोजच्या जीवनात कसे प्रकट होते, हे लुथरच्या मते, असे भिंग बनले ज्यातून ख्रिस्ती व्यक्ती जीवनातील प्रत्येक अनुभवाकडे पाहणे शिकते. हेच क्रूसाचे ईश्वरशास्त्र (थिओलोजिया क्रूसिस) आहे जे सर्वकाही अधिक स्पष्टपणे पाहण्यास मदत करते आणि ख्रिस्ती जीवनातील चढ-उतारांचा अर्थ लावण्यास समर्थ बनवते.

या गोष्टींचे ज्ञान आपल्याला लाभदायक आहे, जेणेकरून जेव्हा आपले शत्रू आपल्यावर निर्दयपणे अत्याचार करतात, आपल्याला बहिष्कृत करतात, किबहूंना जिवेही मारतात, तेव्हा आपण दु:खाच्या लाटांमध्ये गिळंकृत होणार नाही किंवा निराशेच्या गर्तेत कोसळणार नाही. पौलाच्या आदर्शानुसार आपण असे म्हणूया की, आपल्या पापांसाठी नव्हे, तर ख्रिस्ताच्या नावासाठी जो क्रूस आपण वाहतो, त्यातच आपण अभिमान बाळगला पाहिजे. जर आपण या दुःखांचा विचार फक्त स्वतःपुरता केला, तर ती असह्य ठरतात; परंतु जेव्हा आपण म्हणू शकतो — “हे ख्रिस्ता, तुझी दु:खे आमच्यात विपुल झाली आहेत,” किंवा जसे स्तोत्रसंहिता 44 मध्ये लिहिले आहे, “तुझ्यामुळे आम्ही दिवसभर मारले जातो,” तेव्हा ही दुःखे जड राहत नाहीत, तर मधुर वाटतात, अगदी या वचनाप्रमाणे: ‘’कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय 11:30)5

चौथा निहितार्थ असा की, ख्रिस्ती जीवन हे खातरी आणि आनंद यांनी ओळखले जाते.  हा विषय म्हणजे म्हणजे धर्मसुधारणेचे एक ठळक वैशिष्ट्य, आणि ते सहज उलगडणारे आहे. धर्मसुधारणेने नीतिमान ठरविले जाण्याविषयीच्या (justification) सिद्धांताचा पुनर्शोध लावला, म्हणजे ख्रिस्ती जीवन हे त्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठीच्या प्रयत्नांनी नव्हे, तर आधीच नीतिमान ठरल्याने सुरू होते. या सत्याने विलक्षण मुक्ती प्रदान केली, ज्यामुळे मन, इच्छाशक्ती आणि भावना आनंदाने परिपूर्ण झाल्या. याचा अर्थ असा होता की आता मनुष्य गौरवाच्या स्थिर भविष्याच्या प्रकाशात जगण्यास प्रारंभ करू शकतो. आणि त्या प्रकाशाचे प्रतिबिंब वर्तमान जीवनावरही पडले, ज्यातून खूप मोठी शांती आणि अंतःकरणात स्वातंत्र्याची अनुभूती प्राप्त झाली.

आनंदाने डोक्यावर उभे राहणे

ल्यूथर यांच्या दृष्टीने, ख्रिस्ती जीवन हे सुवार्तेवर आधारित, सुवार्तेने बांधलेले आणि सुवार्तेचा गौरव करणारे असे जीवन आहे. हे जीवन देवाच्या मुक्त आणि सार्वभौम कृपेचे दर्शन घडवते आणि ज्या तारणकर्त्याने आपल्यासाठी प्राणार्पण केले त्याच्याप्रती आभारप्रदर्शन म्हणून  जगले जाते. हे जीवन मरणाने विजयात गिळले जाईपर्यंत आणि विश्वास हा प्रत्यक्ष दर्शनात परिवर्तित होईपर्यंत ख्रिस्ताशी जखडून क्रूस वाहत जगले जाते.

कदाचित इ.स. 1522 मध्ये, बोर्ना येथील मंडळीमध्ये एका रविवारी ल्यूथर यांचे प्रवचन ऐकत असताना, त्यांच्या मंडळीतील काही लोकांच्या मनात प्रश्न उद्भवला असेल : ज्या सुवार्तेने बंधू मार्टिन इतके प्रभावित झाले, किंबहुना त्यांचे जीवनच बदलून टाकले त्या सुवार्तेचा मूळ गाभा आहे तरी काय? ती सुवार्ता केवळ त्यांच्यासाठीही असू शकते का? ल्यूथर यांनी त्यांच्या मनातील विचार ओळखले होते. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ते चांगले तयार होऊन व्यासपीठावर उभे राहिले आणि म्हणाले:

“पण सुवार्ता म्हणजे काय? ती ही की, देवाने पाप्यांचे तारण करण्यासाठी (योहान 3:16); आणि नरकाला चिरडण्यासाठी, मरणावर विजय मिळवण्यासाठी, पाप काढून टाकण्यासाठी आणि नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आपल्या पुत्राला जगात पाठविले. मग तुम्ही काय करावे? काहीच नाही—फक्त हे स्वीकारा, तुमच्या तारणकर्त्याकडे पाहा आणि ठामपणे विश्वास ठेवा की त्याने हे सर्व तुमच्या कल्याणासाठी केले आहे आणि तुम्हाला विनामूल्य दिले आहे. त्यामुळे, मरण, पाप आणि नरकाच्या भयात तुम्ही निर्धास्तपणे म्हणू शकता आणि ठामपणे यावर विसंबू शकता: जरी मी नियमशास्त्र पूर्ण करत नसलो, जरी पाप अद्याप माझ्यात राहत असले आणि मला मृत्यू व नरकाची भीती वाटत असली, तरी सुवार्तेद्वारे मला हे माहीत आहे की ख्रिस्ताने आपली सर्व कार्ये माझ्यासाठी केली आहेत. मला खातरी आहे की तो खोटे बोलणार नाही, आणि हे की तो आपले वचन नक्कीच पूर्ण करेल. आणि याचे चिन्ह म्हणून मी बाप्तिस्मा घेतला आहे. यावरच मी माझा विश्वास दृढ ठेवतो. कारण मला ठाऊक आहे की माझ्या प्रभु ख्रिस्ताने माझ्या चांगल्यासाठी मृत्यू, पाप, नरक आणि सैतान यांवर विजय मिळविला आहे. कारण तो निर्दोष होता, जसे पेत्र म्हणतो: ‘ज्याने पाप केले नाही, त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही’ (1 पेत्र 2:22). म्हणून पाप आणि मृत्यू त्याला मारू शकले नाहीत; नरक त्याला कैद करून ठेऊ शकला नाही; आणि तो त्यांचा अधिपती झाला, व हे सर्व त्याने त्या सर्वांना दिले आहे जे या गोष्टींना स्वीकारतात आणि विश्वास ठेवतात. हे सर्व माझ्या कर्मांमुळे किंवा पुण्याईने होत नाही; तर केवळ देवाची  शुद्ध कृपा, चांगुलपण आणि दयेमुळे होते.”6

ल्यूथर यांनी एकदा असे म्हटले, “जर मी असा विश्वास ठेवू शकलो असतो की देव माझ्यावर क्रोधाविष्ट नाही, तर मी आनंदाने डोक्यावर उभा राहिलो असतो.”7 कदाचित त्या दिवशी त्याचे प्रवचन ऐकणाऱ्यांपैकी काहींनी प्रतिसाद दिला असेल आणि त्याने सांगितलेल्या “खातरीचा ” अनुभव घेतला असेल. कोण जाणे, कदाचित काही तरुण श्रोत्यांनी नंतर आपल्या मित्रांना पत्र लिहून सांगितले असेल की ते घरी परतले आणि आनंदाने डोक्यावर उभे राहिले.

संपादकाची टीप: हा लेख ‘द लेगसी  ऑफ लुथर’ (The Legacy of Luther) या पुस्तकातून घेतलेला एक भाग असून, तो प्रथम 29 ऑक्टोबर 2018 रोजी प्रकाशित झाला होता.

  1. ल्यूथरमध्ये वारंवार उमटणारा एक विचार, उदा. ल्यूथर: लेक्चर्स ऑन रोमन्स (Luther: Lectures on Romans), 127, 208, 322.
  2. एल.डब्ल्यू. (LW), 54:127.
  3. ल्यूथरमधील या तत्त्वाच्या विपुल संदर्भांसाठी वॉल्थर वॉन लोवेनिच यांचे ल्यूथर्स थिओलॉजी ऑफ द क्रॉस (Luther’s Theology of the Cross) हे पुस्तक पहा, अनुवाद: हर्बर्ट जे. ए. बौमन (मिनियापोलिस: ऑग्सबर्ग, 1976), 112–43.
  4. ल्यूथर, कॉमेंटरी ऑन सेंट पॉल्स एपिस्टल टू द गॅलेशियन्स (Luther, Commentary on St Paul’s Epistle to the Galatians), 558.
  5. वरील संदर्भ, 559.
  6. कंप्लीट सर्मन्स ऑफ मार्टिन ल्यूथर (Complete Sermons of Martin Luther), 1.2, 373.
  7. डब्ल्यू.ए. (WA), 176.6f, ओबर्मन उद्धृत: ल्यूथर: मॅन बिटवीन गॉड अँड द डेविल (Luther: Man between God and the Devil), 315.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

सिंक्लेअर फर्ग्युसन
सिंक्लेअर फर्ग्युसन
डॉ. सिंक्लेअर बी. फर्ग्युसन हे रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरी येथे सुव्यवस्थित ईश्वरशास्त्राचे चान्सलर प्राध्यापक आहेत. यापूर्वी त्यांनी कोलंबिया, साऊथ कॅरोलिना येथील फर्स्ट प्रेस्बिटेरियन मंडळीमध्ये वरिष्ठ पाळक म्हणून सेवा केली आहे. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत; त्यांपैकी In the Year of Our Lord (इन द इयर ऑफ अवर लॉर्ड) हे एक.