
मीखा संदेष्ट्याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
19/02/2026
एस्तेरच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
26/02/2026प्रकटीकरणाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
गोंधळात टाकणारे. वादग्रस्त. त्रासदायक. भयानक. जर प्रकटीकरणाचे पुस्तक तुमच्या मनात अशीच काही छाप टाकणारी वर्णने उभी करीत असेल, तर तुम्ही एकटेच नाहीत. तरीही प्रकटीकरणाच्या पुस्तकामागील देवाचा हेतू प्रकट करणे हा आहे, लपवणे नाही; प्रोत्साहन देणे हा आहे, क्लेश देणे हा नाही. प्रकटीकरण “जो कोणी या भविष्यकथनाचे मोठ्याने वाचन करतो, जे लोक ते ऐकतात आणि यात लिहिल्याप्रमाणे पालन करतात” त्यांना आशीर्वादाचे अभिवचन देते (प्रकटीकरण 1:3). पहिल्या शतकातील मंडळ्यांमधील त्या दृश्याची कल्पना करा जिथे प्रकटीकरण प्रथम पाठवण्यात आले होते: एक पुढारी ती गुंडाळी उघडून मोठ्याने वाचण्यासाठी उभा राहतो, आणि इतर सर्वजण एकाग्रतेने ते ऐकतात. ते प्रकटीकरणाचा संदेश समजू शकतात; आणि केवळ ते मोठ्याने वाचलेले ऐकून, व त्यातील सत्ये अंतःकरणात धारण करून, त्याद्वारे अभिवचन दिलेला आशीर्वाद प्राप्त करू शकतात. आपणही तसेच करू शकतो. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, पवित्र शास्त्राच्या या कळसाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला तीन गोष्टी माहीत असाव्यात.
1. प्रकटीकरण हे विस्कटलेल्या जगात कोकऱ्याच्या विजयाचे अनावरण करते.
प्रकटीकरणाचे पहिले वचनच या पुस्तकाचे शीर्षक आहे: “येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण” (प्रकटीकरण 1:1). “प्रकटीकरण” असे ज्याचे भाषांतर केले गेले आहे, त्या ग्रीक शब्दाचा (apocalypsis) संकेत हा आहे की, आपले अनुभव आणि जगाचा इतिहास यांच्या दृश्यांच्या पलीकडे पाहण्यासाठी, आणि त्यांच्या मागे असलेल्या मूळ सत्याचा आणि त्यांच्या स्त्रोताचा शोध घेण्यासाठी एक “अनावरण” आवश्यक आहे. आपण जर केवळ वरवरची लक्षणेच पाहिली, म्हणजे युद्धातील अत्याचार, पर्यावरणातील विपत्ती, बाजाराचे कोसळणे, दुष्काळ व उपासमार, रोगराई व मृत्यू, तर आपले जग इतके का विस्कटले आहे, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कधीच कळणार नाही. केवळ पडद्यामागील त्या आध्यात्मिक क्षेत्राची झलक, जिथे सर्व गोष्टींवर सार्वभौम असलेला देव “तो मोठा अजगर… जो जुना साप, ज्याला दियाबल व सैतान म्हणतात” (प्रकटीकरण 12:9; 20:2) त्याच्याशी झुंज देतो, तीच आपल्या सभोवतालच्या दुःखांचा आणि रहस्यांचा अर्थ उलगडून दाखवते.
हे पुस्तक दोन अर्थांनी “येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण” आहे. येशू हा अनावरण करणारा कर्ता देखील आहे, आणि ज्याचे अनावरण केले जात आहे तो विषयही आहे. प्रथम, देवाने येशू ख्रिस्ताला हे प्रकटीकरण दिले, की “ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या’ आपल्या दासांना प्रकट करव्या” (प्रकटीकरण 1:1). पित्याकडून देहधारी पुत्राकडे झालेले हे हस्तांतरण प्रकटीकरणाच्या चौथ्या आणि पाचव्या अध्यायांमध्ये नाट्यमय रीतीने दाखविले आहे: कोकरा सिंहासनावर बसलेल्या सार्वभौम देवाकडून एक गुंडाळी स्वीकारतो आणि मग इतिहासात उलगडणाऱ्या घटनांना सुरू करण्यासाठी व त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिची शिक्के एक-एक करून फोडतो. देवाच्या उद्देशाला उघड करण्यास आणि तो अमलात आणण्यास केवळ कोकराच योग्य आहे, कारण कोकऱ्याने “प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्र यांतून देवासाठी लोक” खंडणी देऊन विकत घेण्यासाठी हिंसक मरण सोसून विजय मिळवला आहे (प्रकटीकरण 5:5–10).
दुसरे म्हणजे, प्रकटीकरणाचे पुस्तक येशू ख्रिस्तालाही प्रकट करते. तो केवळ मुक्तीदायक असे दुःख सहन करून विजय मिळवणारा कोकराच नाही, तर तो “मनुष्याच्या पुत्रासारखा” देखील आहे, जो पृथ्वीवरील आपल्या मंडळ्यांमध्ये चालतो (प्रकटीकरण 1:10–20), जो त्यांच्या आध्यात्मिक आरोग्याचे परीक्षण करतो, आणि जे स्थिर राहतात त्यांना आशीर्वाद देतो (अध्याय 2–3). येशू हा त्या स्त्रीची संतती आहे जिचे अभिवचन देवाने इतिहासाच्या प्रारंभीच दिले होते (उत्पत्ति 3:15), ज्याच्या जन्माच्या वेळी त्या जुनाट सापाने त्याच्यासाठी धोका निर्माण केला होता, पण देवाने त्याला आपल्या सिंहासनावर उंच केले (प्रकटीकरण 12:1–6). त्याच्या रक्ताने आपल्यावर दोष लावणाऱ्याला स्वर्गातून खाली पाडले आणि आपल्याविरुद्ध असलेल्या सर्व आरोपांचे उच्छाटन केले (प्रकटीकरण 12:7–17). येशू हा स्वर्गीय सैन्याचा सेनापती आहे, जो अजगर, त्याचे अक्राळविक्राळ हस्तक, आणि त्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा नाश करण्यासाठी परत येईल (प्रकटीकरण 19:15–21). येशू, पित्यासह आणि आत्म्यासह, देवाचे स्वर्गीय सेवक, त्याचे देवदूत-दूत, आणि सर्वत्र असणारे सर्व प्राणी यांच्याकडून होणाऱ्या उपासनेचा केंद्रबिंदू आहे (प्रकटीकरण 5:9–14; 11:15–18; 14:2–5; 15:3–4; 19:1–8; 21:2–4, 22–24; 22:3–5).
प्रकटीकरणाचे दृष्टांत या विस्कटलेल्या जगात पापाच्या विषाक्त उपउत्पादनांची भयानक वास्तविकता रेखाटतात; म्हणून ती हिंसक धुमश्चक्रीची दृश्ये महामार्गावरील अपघातांसारखी आपले लक्ष खेचून घेतात. पण आपण जर केवळ “झाडांवर”, (म्हणजे मानवी दुष्टतेच्या दृश्यांवर आणि त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या दैवी क्रोध, यांवर) खिळून राहिलो, तर प्रकटीकरणाचे “अरण्य” म्हणजे येशू ख्रिस्ताचे गौरव आणि त्याची दया, पाहण्यापासून वंचित राहू.
2. प्रकटीकरण एका चित्रमय “शब्दसंग्रहासह” बोलते, ज्याची मुळे जुन्या करारात रुजलेली आहेत.
प्रकटीकरण आपला संदेश अशा भाषावैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने देत आहे की तो मोठ्याने वाचला जावा आणि ऐकला जावा, म्हणजेच आपल्या कल्पनाशक्तीवर अमिटपणे कोरली जाणारी जिवंत, स्पष्ट चित्रे. पवित्र शास्त्रभर देव, जो खरा व परिपूर्ण संवादक आहे, अशाच प्रकारे चित्रे रेखाटतो: मेंढपाळ, खडक, गड, अग्नी, पती, आणि बरेच काही. प्रतिमांनी भरलेल्या स्वप्नांद्वारे प्रभू आपले बेत योसेफ आणि दानीएल यांना, आणि त्यांच्याद्वारे प्रकट करतो (उत्पत्ति 37, 41; दानीएल 2, 7). यशया, यहेज्केल, आणि जखऱ्या यांसारख्या संदेष्ट्यांना प्रभू पडद्यामागची, त्याच्या स्वर्गीय न्यायालयाची, झलक देतो; आणि त्यामुळे त्यांना त्याच्या लोकांसाठी असलेला त्याचा संदेश शब्दस्वरूपांत ऐकण्याबरोबरच, स्पष्ट चिन्हांच्या रूपाने सुद्धा पाहण्यास मिळतो. प्रकटीकरणातील प्रतीकात्मकतेत देव तेच करीत आहे, जे तो नेहमी करीत आला आहे.
प्रकटीकरणातील या प्रतीकांचा खरा अर्थ उलगडून पाहण्यासाठी आपल्याला एका “शब्दकोशाची” गरज आहे, जो आपल्याला या चित्रमय शब्दसंग्रहाची ओळख करून देईल. देवाने शतकानुशतके लिहिलेला तो शब्दकोश म्हणजे जुना करार. जुन्या कराराच्या इतिहासातील व्यक्ती आणि घटना (निर्मिती, सर्प, निर्गम, मोशे, एलीया इ.), तसेच इस्राएलच्या संदेष्ट्यांना दाखवण्यात आलेली दर्शने, ही प्रकटीकरणाची प्रतीकात्मकता उघडणारी किल्ली आहेत. ख्रिस्त जसा पहिल्या शतकातील मंडळ्यांशी बोलतो, तसाच तो एकविसाव्या शतकातील मंडळीशीही बोलतो, म्हणून तो सर्व पिढ्यांतील आपल्या लोकांना समजेल अशी चित्रात्मक भाषा वापरतो, जिचे आधार जुन्या करारातील तारणदायी घटना आणि भविष्यसूचक प्रतीकात्मकता आहेत.
3.ख्रिस्ताचा प्रकटीकरणाचा उद्देश अशा ख्रिस्ती लोकांना बळकट करणे हा आहे ज्यांचा विश्वास आणि विश्वासूपणा छळ, बहिष्कार, फसवणूक आणि आत्मसंतुष्ट सांसारिकतेद्वारे सैतानाच्या हल्ल्याखाली आहे.
प्रकटीकरण वाद पेटवते, अशी त्याची एक ख्यातीच झाली आहे. जरी येशूने काळ व वेळ ठरवण्याविरुद्ध चेतावणी दिली होती, जणू काही आपण आपल्या आवाक्याबाहेरील दैवी गुपिते उकलू शकतो (मार्क 13:32–35; प्रेषितांची कृत्ये 1:7), तरीही योहानाची दर्शने आपल्या काळातील घटनांशी कशी “जुळतात” याविषयी ख्रिस्ती गट आजही परस्परांशी संघर्ष करीत आहेत. परंतु येशूने प्रकटीकरण हे आपल्या अंतकाळविषयक चकमकींसाठी दारूगोळा पुरवावा म्हणून दिलेले नाही; त्याने ते एका अधिक तातडीच्या आणि अधिक व्यावहारिक हेतूसाठी दिले आहे: ख्रिस्त स्वतःच्या मंडळीला, जिच्यावर या युगाच्या दुष्ट शक्ती आक्रमण करीत आहेत, स्थिर राहण्यासाठी सज्ज, सशस्त्र आणि समर्थ करीत आहे.
प्रकटीकरण आपल्याला सैतानाच्या डावपेचांविषयी सावध करते, आणि शत्रूच्या आघातांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला बळकट करते. हिंसक छळ आणि समाजाकडून होणारा नकार देवाच्या लोकांना ख्रिस्ताप्रती असलेली आपली निष्ठा त्यागण्यास प्रवृत्त करतात. खोट्या शिक्षकांद्वारे मंडळीची फसवणूक होऊ शकते; आणि सांसारिक समृद्धीच्या मोहाने तिला आत्मसंतुष्टता व तडजोड यांकडे ओढले जाऊ शकते (प्रकटीकरण 2–3). योहानाची दर्शने या आक्रमणाच्या साधनांना श्वापद, खोटा संदेष्टा, आणि कलावंतीण यांच्या रूपाने जणू “देहधारी” स्वरूप देतात (प्रकटीकरण 13, 17).
आशियातील सात मंडळ्या या सर्व युगांतील मंडळीचे एक सूक्ष्म रूप होत्या. सैतानाच्या घातक शक्ती काळानुसार वेगवेगळे वेष परिधान करून आपले रूप बदलतात. त्याचे हल्ले कोणत्याही स्वरूपाचे असले, तरी सैतान आधीच पराभूत झाला आहे (प्रकटीकरण 12:7–13; 20:1–3). म्हणूनच, विजयी कोकऱ्याने आपल्याला प्रकटीकरणाचे पुस्तक दिले आहे, जेणेकरून नवे आकाश व नवी पृथ्वी यांमध्ये त्याच्या उपस्थितीच्या आशीर्वादाची आपण आतुरतेने वाट पाहत असताना, त्याच्या वचनाला घट्ट धरून ठेवण्यासाठी आपल्या ठायी विवेक, धैर्य आणि निष्ठा अधिकच दृढ व्हावी (प्रकटीकरण 1:3; 22:7, 14).
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ: याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


