
प्रकटीकरणाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
24/02/2026
सफन्याच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
03/03/2026एस्तेरच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
एस्तेरच्या पुस्तकात देवाच्या नावाचा प्रत्यक्ष उल्लेख आढळत नाही. किंबहुना, हा वृत्तांत धर्म आणि भक्तीपासून पूर्णपणे अलिप्त असल्यासारखा वाटतो. यातील मुख्य पात्रे देवाचा करार पाळण्याविषयी अतिशय काळजी घेणारी, अत्यंत श्रद्धावान व विश्वासू यहुदी असल्याचेही स्पष्टपणे दिसून येत नाही. अशा पुस्तकातून आपण देव आणि त्याच्या मार्गांविषयी काय शिकू शकतो?
एस्तेर आणि तिच्या वृत्तांताविषयी माझ्या मनात प्रेम आहे, हे मी नाकारू शकत नाही (माझ्या मुलींपैकी एकीचे नाव “हदस्सा” आहे, जे एस्तेरचे यहूदी नाव आहे). तरीही, या कथानकात काही ठिकाणी असे क्षण येतात की मला कबूल करावे लागते: एस्तेर आणि मर्दखय यांची खरी आशा नेमकी कुठे आहे, असा प्रश्न मनात उभा राहतो; आणि त्यांच्या कृती इब्री लोकांस लिहिलेल्या पत्राच्या 11 व्या अध्यायात वर्णन केलेल्या विश्वासाचे खरे प्रतिबिंब दाखवतात का, हाही विचार अस्वस्थ करतो. परंतु या सुरुवातीच्या ठशांपलीकडे जाऊन अधिक बारकाईने पाहिल्यास, एस्तेर आपल्याला सखोल ईश्वरशास्त्रीय सत्ये शिकवते, जी ख्रिस्ती जीवनाला नवचैतन्य देऊ शकतात. एस्तेरच्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासारख्या तीन गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत.
1. देवाची करारविषयक विश्वासपात्रता: एस्तेरचे पुस्तक हे देवाच्या कराराच्या अभिवचनांचे जवळजवळ झालेल्या विनाशाचे एक उत्कंठावर्धक वर्णन आहे.
एस्तेरमधील घटना वचनदत्त देशापासून खूप दूर घडतात. ख्रिस्तपूर्व 539 मध्ये कोरेशाच्या फर्मानानंतर काही इस्राएली लोक बंदिवासातून यरुशलेमला परतले होते (एज्रा 1:1–4 पहा). तथापि, काहींनी पारसामध्येच राहण्याचा निर्णय घेतला. पारसात राहिलेल्या अशाच यहुद्यांपैकी एका यहुदी स्त्रीची ओळख वाचकाला लगेचच होते. पारसी राजाला त्याच्या पूर्वीच्या राणीच्या उद्धटपणामुळे अपमान सहन करावा लागल्यानंतर, ही स्त्री झपाट्याने पारसी उच्चभ्रू जीवनात ओढली जाते आणि पुढे राणी बनते.
उत्कंठा, विडंबन आणि व्यंग यांची कुशल गुंफण असलेल्या प्रभावी निवेदनातून लेखक सांगतो की एका क्षुल्लक, मूक संकेतामुळे दोन पुरुष, अमालेकी हामान आणि यहुदी मर्दखय, यांच्यामध्ये वैयक्तिक वाद पेटून कसा विकोपाला जातो. हा वाद पुढे सरकार-मान्य नरसंहाराद्वारे देवाच्या करारातील लोकांचा (आणि म्हणूनच, त्याच्या अभिवचनांचा) जवळजवळ नायनाट घडवून आणतो. परंतु एका मूर्ख राजाची अनपेक्षित निद्रानाशाची वेळ आणि नैतिकदृष्ट्या तडजोड केलेल्या राणीची क्षणिक चातुर्यबुद्धी—यांमुळे अखेरच्या क्षणी परिस्थिती पूर्णतः उलटते. नरसंहाराचा सूत्रधार हामान, ज्याने आपला शत्रू मर्दखयसाठी फास उभारला होता, अखेरीस त्याच फासावर चढतो; आणि यहुद्यांचा संहार टळतो.
हे पुस्तक एखाद्या उत्कंठावर्धक कादंबरीसारखे वाचले जाते, आणि तुम्ही हा वृत्तांत एका बैठकीत वाचला नसेल, तर तसे करून पाहावे, असे मी सुचवीन. कथानकातील ही अनपेक्षित वळणे आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवतात: अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना दिलेल्या करारातील अभिवचनांचे पालन करण्यास देव कटिबद्ध आहे, आणि सैतानाचे कोणतेही बाहुले—फारो असो, अहाब असो, अबशालोम असो, नबुखदनेस्सर असो, किंवा हामान असो—स्वतःसाठी एक प्रजा टिकवून ठेवण्याच्या देवाच्या करारबद्ध निर्धाराला उधळून लावू शकत नाही.
2. देवाचे अदृश्य ईश्वरीनियोजन: एस्तेरचे पुस्तक देवाविषयी मौन राखून, देवाविषयीच आपल्याला आवर्जून काहीतरी शिकवते.
एस्तेरच्या पुस्तकातील व्यंग्यपूर्ण “जवळजवळ घडून गेलेल्या” घटना कथानकाच्या प्रवाहात देवाच्या ईश्वरीनियोजनाच्या कार्याचे वर्णन करतात, ज्याचे वर्णन हायडलबर्ग प्रश्नोत्तरी (कॅटेकिझम) पुढीलप्रमाणे करते :
ईश्वरीनियोजन म्हणजे देवाची सर्वसमर्थ आणि सर्वव्यापी अशी शक्ती, ज्याद्वारे देव, जणू आपल्या हाताने, आकाश व पृथ्वी आणि सर्व सृष्टीला उचलून धरतो, आणि त्यांचे असे शासन करतो की झाडाचे पान आणि गवताचे पाते, पाऊस आणि दुष्काळ, सुकाळ आणि टंचाईची वर्षे, अन्न आणि पेय, आरोग्य आणि आजारपण, समृद्धी आणि दारिद्र्य—खरे पाहता, सर्व गोष्टी, योगायोगाने नव्हे, तर त्याच्या पितृतुल्य हाताने आम्हांस प्राप्त होतात. (प्रश्न व उत्तर 27)
एस्तेरच्या पुस्तकात घडणाऱ्या सर्व घटना केवळ योगायोगाने घडत आहेत, असे प्रथमदर्शनी वाटू शकते; परंतु आध्यात्मिक दृष्टी (स्वर्गाभिमुख मनोवृत्ती) असलेला वाचक हे ओळखेल की एक अद्भुत नाटककार त्याच्या करारातील लोकांच्या हितासाठी म्हणजे त्यांच्यासाठी जे त्याच्यावर प्रीती करतात आणि त्याच्या संकल्पानुसार बोलावलेले आहेत, सर्व गोष्टींचे सूत्र हातात धरून आहे (रोमकरांस 8:28). देवाच्या ईश्वरीनियोजनाच्या निरीक्षणाखाली अपघात नावाची गोष्ट नाहीच. एस्तेरच्या पुस्तकातील प्रत्येक “योगायोग” देवाच्या शांत, अदृश्य ईश्वरीनियोजनाचीच घोषणा करीत आहे—जे त्याच्या सर्व सृष्टीवर आणि त्यांच्या सर्व कृतींवर शासन करते (वेस्टमिन्स्टर लघू प्रश्नोत्तरी 11). या पुस्तकातील देवाचे मौन आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा धडा शिकवते: देवाचे सर्वसमर्थ सुशासन आणि त्याच्या सर्व सृष्टीचे जतन इतके शांत, पण इतके निश्चित आहे की त्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे. जरी आपण त्या नाटककाराला त्याचे नाटक रंगमंचावर दिग्दर्शित करताना पाहू शकत नसलो, तरीही त्याच्या ईश्वरीनियोजनाच्या कक्षेबाहेर काहीही नाही.
3. देवाने उणीव असलेल्या लोकांची सातत्याने केलेली निवड: एस्तेरचे पुस्तक त्याच्या मुख्य पात्रांबद्दलच्या अनेक नैतिक प्रश्नांची उत्तरे देत नाही, जे देवाचे करारातील लोक आहेत.
इब्री वृत्तांतशैलीला अनुसरून, एस्तेरचा लेखक प्रत्येक कृतीचे स्वतंत्र मूल्यमापन न करता त्या कृतींचे वर्णन करतो. यामुळेच अनेकदा या पुस्तकातील दोन मुख्य पात्रे, एस्तेर आणि मर्दखय, यांना नैतिक आदर्श आणि विश्वासाचे नायक म्हणून गौरविले जाते. परंतु हा वृत्तांत भीती आणि विश्वास यांच्या गुंतागुंतीच्या मिश्रणाने भरलेला आहे, आणि वाचकाला नेहमीच हे ठरविता येत नाही की कोणत्या क्षणी कोणता घटक वरचढ आहे. एस्तेर व मर्दखय यांच्या चारित्र्याविषयी आणि कृतींविषयी अनेक प्रश्न वाचकाच्या मनात अनुत्तरितच राहतात. अशा काही अनिर्णीत संदिग्ध प्रश्नांमध्ये पुढील प्रश्नांचा समावेश होतो:
● मर्दखय आणि एस्तेर आपल्या मायदेशी का परतले नाहीत (एस्तेर 2:5)?
● एस्तेरला परमेश्वराने ठरवून दिलेल्या आहारविषयक नियमांची पर्वा नव्हती, की ती केवळ आपल्या परिस्थितीची निर्दोष बळी होती (एस्तेर 2:9)?
● मर्दखयने एस्तेरला तिचा धार्मिक वारसा उघड न करण्याचा सल्ला का दिला (एस्तेर 2:10, 20)?
● मर्दखयने विरोध करण्याऐवजी आपल्या पुतणीला राजाच्या राजवाड्यात नेले जाण्यास (एस्तेर 2:8) आणि नुकत्याच घटस्फोट घेतलेल्या परधर्मी राजाच्या शयनगृहात नेले जाण्यास का अनुमती दिली (एस्तेर 2:15–18)?
● मर्दखयने हामानला नमन करण्यास नकार दिला, आणि त्यातून भयंकर परिणाम उद्भवले, तो नकार क्षुल्लक अहंकारातून होता, की विश्वासातील ठाम भूमिका होती (एस्तेर 3:2)?
● एस्तेरने प्रारंभी आपल्या लोकांच्या वतीने राजाकडे विनंती करण्यास नकार दिला, तो स्वार्थापोटी होता, की शहाणपणातून (एस्तेर 4:10–11)?
● एस्तेरने प्रथम मर्दखयच्या विनंतीला नकार दिल्यानंतर, मर्दखयने तिला उघड करण्याची धमकी दिली होती, की तो कृपापूर्ण इशारा देत होता (एस्तेर 4:12–14)?
● राजा व हामान यांच्यासाठी भोजन-निमंत्रणांची मागणी करताना, एस्तेर कपटाने वागत होती, की नीतिमत्वाने चतुराई दाखवीत होती (एस्तेर 5:4–8)?
● यहुद्यांना आणखी तीनशे पुरुष मारण्याची परवानगी द्यावी, आणि हामानच्या 10 पुत्रांना सुळावर लटकवावे—अशी तिची विनंती क्रूर सूडभावनेतून होती, की न्याय्य रीतीने मिळालेल्या संधीचा उपयोग होता (एस्तेर 9:13–15)?
जरी हे प्रश्न न सुटणाऱ्या समस्यांसारखे वाटू शकतात—कारण मुक्तीच्या इतिहासातील महत्त्वाचे घटक असलेले देवाचे लोक अशी चिंताजनक नैतिक संदिग्धता कशी काय प्रदर्शित करू शकतात?—तरीही, ते एका स्वागतार्ह सुवार्तेवरच प्रकाशझोत टाकतात: देवाकडून मिळणारे तारण शेवटी त्याच्या लोकांच्या विश्वासूपणावर, किंवा त्यांच्या विश्वासूपणाच्या अभावावर, अवलंबून नसते. तो आपल्या नावासाठीच आपल्या करारातील अभिवचनांशी विश्वासू आहे (पाहा यशया 48:9–11; यहेज्केल 20:44). एस्तेर आणि मर्दखय—त्यांच्या पापी, भितीदायक कृतींद्वारेही, आणि त्यांच्या नीतिमान, विश्वासू कृतींद्वारेही—“सियोनचे कल्याण” करण्याचा (स्तोत्रसंहिता 51:18) देवाचा अडथळा न येणारा व दृढ संकल्पित आराखडा पूर्णत्वास नेतात. हदस्साच्या सुंदर वृत्तांताचा हाच खरा अर्थ आहे. “हदस्सा” (हिब्रू भाषेत “मेंदीचे झाड”) ही जरी एक साधी व्यक्ती असली—जिच्याकडून सर्व काही नेहमीच योग्य घडत नाही—तरीही राणी एस्तेर ही प्रभूच्या करारातील आशीर्वादांचे जतन करण्यासाठी आणि त्याचे ईश्वरीनियोजनाचे उद्देश साध्य करण्यासाठी प्रभूचे साधन ठरते. एस्तेरच्या वृत्तांतात एवढी गोष्ट तरी अजिबात अस्पष्ट नाही.
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ :याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


