3 Things You Should Know about Zechariah
जखर्‍याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
17/02/2026
3 Things You Should Know about Revelation
प्रकटीकरणाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
24/02/2026
3 Things You Should Know about Zechariah
जखर्‍याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
17/02/2026
3 Things You Should Know about Revelation
प्रकटीकरणाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
24/02/2026

मीखा संदेष्ट्याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3  गोष्टी

3 Things You Should Know about Micah

मीखा संदेष्ट्याचे पुस्तक हे बारा ‘लघुग्रंथी संदेष्ट्यांच्या’  पुस्तकांमध्ये सहावे पुस्तक आहे. त्याचे तीन मुख्य संदेश (मीखा 1:2–2:13; 3:1–5:15; 6:1–7:20) इस्राएलच्या बंडखोर उत्तर राज्यावर परमेश्वराच्या न्यायाची भविष्यघोषणा करतात, यहूदाच्या समृद्ध दक्षिण राज्यातील प्रचलित अन्यायाचा जाहीर निषेध करतात, आणि ज्याच्याविषयी अभिवचन देण्यात आले होते त्या येणाऱ्या मशीहाच्या आशेची घोषणा करतात.

1. मीखा हा यशया आणि होशेय यांचा समकालीन होता आणि इस्राएलाला पश्चात्ताप करण्यासाठी पाचारण करण्याच्या त्यांच्या संदेशात तो सहभागी होता.

मीखाने ख्रिस्तपूर्व आठव्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे आमोस आणि योना या संदेष्ट्यांनंतर एका पिढीने, योथाम, आहाज, आणि हिज्कीया यांच्या कारकिर्दीत सेवा केली. ते दिवस अत्यंत अशांततेचे होते. अश्शूरी राजा शल्मनेसेरने शोमरोन लुटले होते, इस्राएलवर विजय मिळवला होता आणि यहूदाला धमकावले होते. श्रीमंत लोक गरिबांवर अत्याचार करत होते. राजकीय भ्रष्टाचार, सांस्कृतिक ऱ्हास आणि आध्यात्मिक अधोगती सर्वत्र पसरली. इतर सर्व संदेष्ट्यांप्रमाणेच, मीखा, यशया, आणि होशेय यांचा संदेश एकच होता : देवाच्या निवडलेल्या लोकांना पश्चात्तापासाठी पाचारण करणे. जखऱ्याप्रमाणे, परमेश्वराचे शब्द, विधी, आणि आज्ञा घोषित करणे हा त्या संदेशाचा हेतू होता, जेणेकरून त्याद्वारे लोकांची अंत:करणे वितळवून त्यांनी पश्चात्ताप करावा (जखऱ्या 1:6). योएलच्या संदेशाप्रमाणे, या संदेशाचा विषय त्यांनी गोणपाट नेसून विलाप करावा, हाच होता (योएल 1:13). यहेज्केलच्या संदेशाप्रमाणे, या संदेशाचा विषय त्यांनी पश्चात्ताप करून आपल्या सर्व अपराधांपासून फिरावे, नाहीतर अधर्म हा त्यांचा अडखळण्याचा दगड ठरेल, हाच होता (यहेज्केल 18:30). संदेष्ट्यांच्या संदेशात सतत ऐकू येणारा आशेचा सूर म्हणजे हाच की: 

“सीयोनेचा न्यायाकडून उद्धार होईल व तिच्यातील पापनिवृत्त जन नीतीने उद्धरले जातील” (यशया 1:27).

अर्थातच, मीखाचा पश्चात्तापाचा संदेश, जरी त्यात आशेचा सूर होता, लोकांनी अमान्य केला. संदेष्ट्यांच्या दिवसांतही हा संदेश नाकारला गेला, आणि आजही तो मान्य नाही.

2. पश्चात्तापाच्या संदेशाला असलेल्या या स्वाभाविक विरोधामुळे, संदेष्टे अनेकदा देवाचे “फिर्यादी” म्हणून भूमिका बजावत असत.

काहीवेळा, संदेष्ट्यांची ही फिर्यादी भूमिका अगदी ठळकपणे दिसते, जसे की मीखाच्या भविष्यवाणीत (मीखा 6:1–8). येथे एका नाट्यमय न्यायालयीन दृश्याचे सर्व घटक दिसतात: परमेश्वर आपल्या निवडलेल्या लोकांविरुद्ध आरोप मांडतो. हा खटला स्वर्गातील राजसिंहासनाच्या सभेतूनच पुकारला जातो (मीखा 6:1). डोंगर-टेकड्यांपासून ते पृथ्वीच्या पायापर्यंत, संपूर्ण सृष्टीलाच पुरावे ऐकण्यासाठी आणि या कार्यवाहीचे साक्षीदार होण्यासाठी पाचारण केले जाते (मीखा 6:2). मग फिर्यादी आपले पुरावे मांडतो (मीखा 6:3–5), आणि आरोपी तडजोड करण्याची शक्यता पडताळून पाहतो (मीखा 6:6–7). लोक परमेश्वराला “कंटाळले” होते (मीखा 6:3). म्हणूनच त्यांच्यावर लावलेला आरोप अत्यंत गंभीर होता: करारभंगाच्या वृत्तीतून जन्मास आलेला विश्वासघात. हा दोषारोप लोकांच्या उद्धाराच्या इतिहासातील चार घटनांवर आधारलेला होता. पहिली घटना म्हणजे मिसर देशातील गुलामगिरीतून झालेली त्यांची नाट्यमय सुटका (मीखा 6:4). दुसरी घटना म्हणजे रानातील भटकंतीच्या काळात मोशे, अहरोन, आणि मिर्याम असे भक्तिमान नेतृत्व उभे राहणे (मीखा 6:4). तिसरी घटना म्हणजे दूध व मध वाहणाऱ्या वचनदत्त देशात जाण्याच्या उंबरठ्यावर असताना बलामाचे शाप उलटे पडणे (मीखा 6:5). आणि चौथी घटना म्हणजे दीर्घकाळ अपेक्षित असलेले यार्देन नदी ओलांडणे— शिट्टीम हा पूर्व किनाऱ्यावरील शेवटचा तळ होता, तर गिलगाल हा पश्चिम किनाऱ्यावरील पहिला तळ होता (मीखा 6:5).  

या प्रत्येक घटनेत देवाने आपल्या कराराची विश्वासार्हता सिद्ध केली होती. आपल्या सत्संकल्पानुसार त्याने लोकांना प्रत्येक संकटातून पार नेले होते आणि त्यांची प्रत्येक गरज पुरवली होती. परंतु लोकांनी तसा प्रतिसाद दिला नाही. त्यांचे प्रेम थंड पडले होते.

लक्षात घ्या की आरोपी आपला गुन्हा सहज मान्य करतात; पण मग त्याची भरपाई कशी करावी, हा प्रश्न त्यांना पडतो. कदाचित होमार्पणे? कदाचित एका वर्षाची वासरे? की हजारो एडके? की दशसहस्र नद्या? किबहूंना अगदी आपल्या पोटचे प्रथम फळ, म्हणजे जेष्ठ संतान (मीखा 6:6–7)? पण नाही; राजा, न्यायाधीश आणि नियमशास्त्र देणारा उत्तर देतो की या सर्वांपेक्षा कितीतरी महान आणि कितीतरी अधिक मौल्यवान अशीच एक गोष्ट त्याला हवी आहे. त्याला भेटवस्तू नको आहे; उलट, देणारा स्वतः त्याला हवा आहे: 

“हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?” (मीखा 6:8)

येथे पश्चात्तापाचे पाचारण टाळता न येईल इतके स्पष्ट आहे. म्हणूनच नंतर येशूने संदेष्ट्याच्या या तीन सात्त्विकतांची पुनरावृत्ती करून “नियमशास्त्रातील अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा” सारांश दिला: न्याय, दया आणि नम्रता (मत्तय 23:23), आणि शास्त्री व परुशी यांना पश्चात्तापासाठी पाचारण केले, हे आश्चर्यकारक नाही. पण दुर्दैवाने, त्यांच्या पूर्वजांप्रमाणेच त्यांनीही ते स्वीकारले नाही. अशा प्रकारे, “तो स्वकीयांकडे आला, तरी स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही” (योहान 1:11). परंतु नम्र अंत:करणाने केलेल्या पश्चात्तापाद्वारेच आपल्याला उपचार आणि आशेचा मार्ग सापडतो. आणि पश्चात्तापाद्वारेच आपण कृपेचा संदेश ऐकण्यास समर्थ होतो.  

3. कृपेचा संदेश न्यायाच्या इशाऱ्याइतकाच आणि पश्चात्तापाच्या हाकेइतकाच स्पष्टपणे घोषित केला आहे.

मीखाची भविष्यवाणी मुक्ती आणि पुनर्स्थापनेच्या आशेने दुमदुमते. यशया आणि यिर्मया दोघेही मीखाचे उदाहरण देऊन त्याच्या भविष्यसूचक वचनाचा पुनरुच्चार करतात की, जरी “सीयोन शेताप्रमाणे नांगरतील” आणि “यरुशलेम ढिगार होईल,” तरीही “शेवटल्या दिवसांत” “परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील” (यशया 2:2–4; यिर्मया 26:17–19; मीखा 3:12–4:3). बेथलेहेममधून मशीहा येणार आहे, “परमेश्वर ह्याच्या नामाचा प्रताप” प्रकट होणार आहे, आणि तो “कळप चारील,” हे घोषित करताना मत्तय मीखाचे उदाहरण देतो: “तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील;” (मत्तय 2:6; मीखा 5:2–4). लूक देखील मीखाचे उदाहरण देतो (लूक 12:53; मीखा 7:6 आणि लूक 11:42–43; मीखा 6:8); आणि अशा रीतीने तो सुवार्तेची घोषणा संदेष्ट्याच्या भाषेत मांडतो.

एकूणच पाहता, मीखाचा संदेश देवाच्या सार्वभौमत्वाचे वैभव, देवाच्या कराराचे अटळ चारित्र्य, देवाच्या न्यायाची निश्चितता, आणि देवाच्या विपुल कृपेचे आश्चर्य—यांची संक्षिप्त पण सामर्थ्यशाली घोषणा ठरतो.

हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ :याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

जॉर्ज ग्रँट
जॉर्ज ग्रँट
डॉ. जॉर्ज ग्रँट हे पॅरिश प्रेस्बिटेरियन चर्चचे 'पास्टर एमेरिटस' (सन्माननीय निवृत्त पाळक) आहेत. ते 'न्यू कॉलेज फ्रँकलिन'चे संस्थापक, 'किंग्ज मेडो स्टडी सेंटर'चे संचालक, आणि फ्रँकलिन, टेनेसी येथील 'फ्रँकलिन क्लासिकल स्कूल'चे संस्थापक आणि कुलपती आहेत. तसेच, ते 'वर्ड प्ले' आणि 'रेझिस्टन्स अँड रिफॉर्मेशन' या दोन्ही पॉडकास्टचे सूत्रसंचालक आहेत. 'द मीखा मँडेट: बॅलन्सिंग द ख्रिश्चन लाइफ' या पुस्तकासह त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.