ख्रिस्ती जीवनासाठी ल्यूथर यांच्याकडून प्रबोधन
13/11/2025
नीतिमान ठरविले जाण्याचे साधनीभूत कारण
20/11/2025
ख्रिस्ती जीवनासाठी ल्यूथर यांच्याकडून प्रबोधन
13/11/2025
नीतिमान ठरविले जाण्याचे साधनीभूत कारण
20/11/2025

पालक म्हणून तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी

मी नुकताच पणजोबा झालो आहे, आमच्या कुटुंबात दोन पणनाती आणि एक पणनातू यांचे स्वागत झाले आहे. येथे लहान मुलांचे संगोपन करण्याविषयी काही बायबलसंबंधी विचार आहेत, जे मी माझ्या नातवंडांना आणि त्यांच्या वैवाहिक जोडीदारांना देत आहे. 

1. संगोपन हे देवाने तुम्हाला दिलेले एक महत्त्वाचे पाचारण  आहे.

या विषयावर मला स्तोत्रसंहिता 78 आठवते, 

‘त्याने याकोबासाठी निर्बंध स्थापले, 

त्याने इस्राएलासाठी नियमशास्त्र केले. 

त्याने आमच्या वडिलांना आज्ञा केली की,

 त्यांनी ते आपल्या वंशजांना शिकवावे, 

आणि पुढच्या पिढीने, 

म्हणजे पुढे जन्मास येणार्‍या संततीने ह्या गोष्टी जाणाव्या;

 त्या आपल्या मुलांना कथन करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावे. 

त्यांनी देवावर भाव ठेवावा, 

देवाची कृत्ये विसरू नयेत, 

तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात; ‘स्तोत्रसंहिता 78:5-7

देवाविषयीचे सत्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे काय असू शकते? पिढ्यान्‌पिढ्या देवावर आशा ठेऊन राहणे याहून मोठा वारसा कोणता? तुमच्या जीवनात अनेक आव्हानात्मक संधी येतील, पण मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्याइतका परिणामकारक अनुभव क्वचितच मिळेल (इफिसकरांस 6:4).

2. अधिकाराखाली जगण्यास शिकणे हा पाया आहे. 

इफिसकरांस 6:1–3 मध्ये देव मुलांना उद्देशून म्हणतो: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. ‘आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख,’ (ही पहिली आज्ञा आहे जिच्याशी पुढील अभिवचन जोडलेले आहे) ‘ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे.’ ” (इफिसकरांस 6:1–3)

देवाने एक वर्तुळ आखले आहे, ज्याच्या आत लेकरांनी जगायचे आहे. त्या वर्तुळाची सीमारेषा म्हणजे आईवडिलांचा मान राखणे आणि त्यांचे आज्ञापालन करणे. मूल या वर्तुळात जगते तेव्हा देव उत्तम आशीर्वादांचे अभिवचन देतो—त्यांचे कल्याण होईल आणि त्यांना दीर्घायुष्य लाभेल.

हे असे आशीर्वाद आहेत जे प्रत्येक मुलाला आणि पालकाला हवे असतात. “मान राखणे आणि आज्ञा पाळणे” म्हणजे केवळ सांगितले ते करणे इतकेच नाही; ते देवावर विश्वास ठेवून त्याची आज्ञा पाळण्याची विश्वासाची बांधिलकी  आहे. आपल्या मुलांना अधिकाराखाली राहायला शिकवून तुम्ही हे पायाभूत सत्य दाखवता की देवाच्या अधिकाराला शरण जाणे हाच आशीर्वादाचा एकमेव मार्ग आहे.

3. जीवनाचा झरा हा अंत:करणातून वाहतो.

‘सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. ‘नीतिसूत्रे 4:23

जीवन हे अंत:करणातून वाहते. आपली समस्या केवळ आपण ज्या प्रकारे पाप करतो त्यापुरती मर्यादित नसून त्या पापाच्या खाली दडून असलेला पापी स्वभाव यांत तिचे मूळ आहे : गर्व, सक्तीचे आत्मकेंद्रितपण, स्वार्थप्रेम, मत्सर आणि मनातील विविध पापी वृत्ती, ज्या बाह्य वर्तनाला जन्म देतात.. पालकांसाठी केवळ वर्तनावर लक्ष केंद्रित करणे आणि अंत:करणाकडे दुर्लक्ष करणे सोपे असते.

येशू आठवण करून देतो की लोभ, फसवणूक, मत्सर, निंदा, घमेंड आणि गर्व यांसारखी कृत्ये अंत:करणातून उद्भवतात (मार्क 7:2–23 पाहा). संगोपनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांना त्यांच्या पापी वर्तनांच्या मागे दडलेल्या ह्याच आंतरिक वृत्ती ओळखायला मदत करणे. आणि नक्कीच, आपल्या स्वतःच्या सतत त्रास देणाऱ्या पापांच्या मुळाशी कोणत्या आंतरिक वृत्ती आहेत, हे समजून घेतल्यास तुम्ही असे नेमके प्रश्न विचारू शकाल, ज्यामुळे मुलांना स्वतःच्या अंत:करणाचे स्वरूप समजून घेण्यास सहाय्य करतील. 

4. संगोपन हे सुवार्ताकेंद्रित असावे.

आपल्या विश्वासाचे मर्म हा “सार्वकालिक जीवन हक्काने मिळविण्याइतपत पात्र ठरण्याइतका नैतिक दर्जा कसा साधावा” हा प्रश्न नाही; आपल्या विश्वासाचे मर्म म्हणजे जो खरोखरच पर्याप्तरीत्या सद्गुणी होता तो एकच : म्हणजे येशू. आपला तारणकर्ता होण्यासाठी तो देहधारी झाला. आपण जे जीवन जगू शकलो नाही ते जीवन तो जगला : पापविरहित, जेणेकरून आपल्याला नीतिमत्व लाभावे. आपण जे मरण मरू शकलो नाही  ते मरण तो मेला : आपल्या पापांचा दोष आणि शिक्षा यांपासून आपली मुक्ती करण्यासाठी त्याने क्रूसावर आपला जीव अर्पिला. आपल्यासाठी नीतिमान ठरविले जाणे यासाठी तो मरणातून उठला. आणि आताही तो पित्याच्या उजवीकडे आपल्यासाठी विनवणी करत आहे.

कृपा , क्षमा , तारण आणि सामर्थ्य यांची ही आशा असलेले सत्य आपल्या मुलांना (आणि आपल्यालाही) सतत आवश्यक आहे. शिस्त लावताना आणि शिष्यत्वात घडविताना, मुलांसमोर नेहमी सुवार्तेची आशा ठेवा. आपण मुलांना “तुमच्या स्वतःच्या बळावर तुम्ही चांगले बनू शकता” असे सांगतो, तेव्हा आपण सुवार्तेलाच नाकारतो. इब्री लोकांस 2:17–18 चे उत्तेजन असे की, येशू, ज्याने मनुष्य म्हणून परीक्षेमध्ये दुःख सोसले,तो आपल्या परीक्षांमध्ये आपल्याला साह्य  करतो. 

5. तुम्ही जो आदर्श ठेवता, तो सामर्थ्यशाली असतो.

अनुवाद  6:5 हे सत्य स्पष्ट करते: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.” देवाबद्दलचे तुमचे प्रेम, त्याच्याठायी असलेला तुमचा आनंद आणि ख्रिस्तामध्ये देव तुमच्यासाठी जे काही आहे त्याबद्दलची तुमची कृतज्ञता व समाधान—ही सत्ये तुमच्या मुलांसाठी तुम्ही आदर्श म्हणून मांडणे महत्त्वाचे आहे. पुढील वचने हा आदर्श किती निकडीचा आहे हे दर्शवतात: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा.” (अनुवाद 6:6–7). 

प्रत्येक दिवशी, तुम्ही तुमच्या मुलांसोबत जसे जगता, तसे तुम्ही त्यांच्यासमोर वास्तविकतेचे एक दृश्य सादर करत असता. देव चांगला आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे, यावर तुमचा विश्वास आहे हे तुम्ही त्यांना दाखवत असता. देव व इतरांवर प्रीती करून, तुम्ही त्यांना हा आदर्श देता की देवाचे नियमशास्त्र चांगले आहे. तुम्ही उपासनेला प्राधान्य देता, तेव्हा तुम्ही त्यांना सांगता की जीवन देवामध्येच सापडते. जे लोक दयाळू नसतात, त्यांच्याशी तुम्ही दयाळूपणाने वागता, तेव्हा तुम्ही त्यांना देवाचा परोपकारीपणा आणि दयाळूपणा दाखवता. तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या मुलांसाठी सत्याची एक कथा सांगते.

सर्व गोष्टींत देवाला तुमचे शरण जाणे, तुमचे मन कसे सहजपणे विचलित होण्यास प्रवृत्त होते, हे प्रामाणिकपणे मान्य करण्याची तुमची तयारी, आणि सुवार्तेत असलेल्या कृपेवर तुमची आशा—या सर्व गोष्टी तुमच्या मुलांसमोर एक जिवंत कथा उभी करतात. देवासाठी मुलांचे संगोपन करणे, हे तुम्ही तुमच्या जीवनात कराल त्या सर्व कार्यांपैकी एक महान कार्य आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

टेड ट्रिप
टेड ट्रिप
डॉ. टेड ट्रिप हे हॅझलटन, पेनसिल्वेनिया येथील ग्रेस फेलोशिप चर्चचे पास्टर एमेरिटस आणि शेफर्डिंग द हार्ट मिनिस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. ते शेफर्डिंग अ चाइल्ड्स हार्ट या पुस्तकाचे लेखक आहेत.