
मूर्तिपूजा म्हणजे काय?
03/09/2026
नियमपंथी न बनता पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न कसा करावा
10/09/2026प्रार्थना सभांचे सामर्थ्य
2 करिंथ 1:11 मध्ये एक सुंदर संक्षिप्त वाक्यांश आहे: “तुम्हीही प्रार्थनेद्वारे आम्हाला साहाय्य करा.” एनआयव्ही भाषांतरात तो असा आहे: “तुम्ही तुमच्या प्रार्थनेद्वारे आम्हाला साहाय्य करता.”
2 करिंथ 1 मधील या वचनाचा संदर्भ ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य यांत येणाऱ्या दुःखाशी संबंधित आहे. पौल आपल्या इतर कोणत्याही पत्रापेक्षा या पत्रात वाचकांसमोर स्वतःला अधिक मोकळेपणाने उघड करतो. “करुणाकर पिता” आणि “सर्व सांत्वनदाता देव” याच्याकडून त्याला जे सांत्वन मिळाले, त्याविषयी तो बोलतो (2 करिंथकर 1:3).
आपल्या सहनशक्तीच्या अत्यंत पलीकडे जाणाऱ्या प्रचंड दडपणाच्या मध्यभागी असताना देवाने त्याला सामर्थ्य दिले होते. तो आपल्या जीवनाच्या अगदी शेवटच्या टोकाला पोहोचला होता; त्याच्या मर्यादा संपल्या होत्या. तो असेही सांगतो की त्याला जगण्याचीही आशा उरली नव्हती. ख्रिस्ती मनुष्याने अशा प्रकारे बोलणे अयोग्य आहे, असे काही लोकांना वाटू शकते; परंतु प्रेषित यापेक्षा कितीतरी अधिक वास्तववादी आहे.
प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनात अशी संकटे येतात जी आपल्याला असे म्हणण्यापर्यंत नेऊ शकतात: “मला काय करावे हे समजत नाही, आणि मी पुढे सहन करू शकेन की नाही, हेही मला ठाऊक नाही.” रक्तस्रावाने पीडित त्या स्त्रीचा विचार करा जी येशूला भेटली होती : तिने कित्येक वर्षे संघर्ष केला होता, डॉक्टरांवर खूप पैसा खर्च केला होता; पण त्यांनी तिची अवस्था अधिकच वाईट केली. तिनेही काही वेळा जगण्याची आशा सोडली नसेल का?
आपल्या ख्रिस्ती बांधवांना ज्या संघर्षांचा सामना करावा लागतो, त्यांचा विचार करा: जे प्रचंड दुःखाशी झुंज देत आहेत, ज्यांच्या लग्नाच्या आशा कधीही पूर्ण झाल्या नाहीत, ज्यांचे नातेवाईक आजारी आहेत आणि बरे होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, देवाने आपल्याला मुले द्यावीत म्हणून प्रार्थना करूनही निष्फळ राहिलेले. प्रेषित पौलानेही असा तीव्र क्लेश अनुभवला की आपल्या अंतःकरणात त्याला मृत्यूची शिक्षा ठरल्यासारखे वाटले.
जेव्हा तो आपल्या जीवनाचा आणि ज्या संकटांतून तो जात होता त्याचा विचार करतो, तेव्हा पौल म्हणतो की या गोष्टी देवाच्या सार्वभौम नियंत्रणाबाहेर नव्हत्या. त्या काही आंधळ्या योगायोगाने घडल्या नव्हत्या, तर या गोष्टी अशासाठी घडल्या होत्या जेणेकरून आम्ही स्वतःवर नव्हे, तर मेलेल्यांना उठवणाऱ्या देवावर विश्वास ठेवावा.
पौलाच्या बाबतीत ख्रिस्ती सेवाकार्यातील ताणतणाव आणि दडपणेच त्याला कड्याच्या टोकापर्यंत घेऊन गेली. आणि नेमक्या त्या टोकावर त्याला हे समजले की स्वतःच्या बळावर यातून पार पडण्यासाठी त्याच्याकडे काहीही साधनसामर्थ्य नाही. त्याऐवजी देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहूनच तो टिकू शकला.
आपण स्वतःवर अवलंबून राहण्याच्या सततच्या मोहाविषयी पूर्णपणे जागरूक आहोत का, याची मला खात्री नाही. अनेक प्रकारे, हा ख्रिस्ती जीवनातील मोठा लढा आहे. आपल्या संपूर्ण हृदयाने प्रभूवर विश्वास ठेवणे आणि आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून न राहणे, हे दिवसेंदिवस स्वतःला स्मरण करून देण्याचा हा अखंड संघर्ष आहे (नीतिसूत्रे 3:5). जर मी फक्त पुरेसा प्रयत्न केला, किंवा पुरेशी इच्छाशक्ती एकवटली, तर मी हे करू शकतो, या खोट्या समजुतीवर मी स्वतः विश्वास ठेवताना आढळतो.
ख्रिस्ती जीवनातील मोठा घातक शत्रू शंका नाही. काही वेळा शंका आरोग्यकारकही ठरू शकते. जर आपण शंकांचे योग्य प्रकारे निराकरण केले, तर त्या आपला विश्वास अधिक दृढ करतील. परंतु आत्म-निर्भरता ही अशी गोष्ट आहे जी आपल्या विश्वासाचा नाश करेल.
परीक्षा, मोह आणि संघर्ष यांचा एक उद्देश हा आहे की आपण स्वतःवर अवलंबून राहू नये, याची आपल्याला आठवण व्हावी. असा एक देव आहे जो सामर्थ्यवान आहे, ज्याचे सर्वशक्तिमान सामर्थ्य कबरेपर्यंत पोहोचून मेलेल्यांना उठवू शकते. परीक्षा आपल्या जीवनात येतात आणि आपल्या आत्मनिर्भरतेचा फुगा फोडतात. आपल्या ख्रिस्ती जीवनात वारंवार आपल्याला पुन्हा देवाकडे जाण्यास भाग पाडले जाते, जेणेकरून केवळ प्रभूच हे करू शकतो, हे आपल्याला कळावे.
2 करिंथकर 1 मध्ये पौल आपल्या पत्रातील मोठा विषय आधीच सूचित करतो, म्हणजे देवाचे सामर्थ्य अशक्तपणात प्रकट होते; आणि याच संदर्भात तो सांगतो की या मंडळीच्या प्रार्थनांनी त्याला साहाय्य केले आहे. देवाच्या सार्वभौमत्वात, देवाच्या लोकांच्या प्रार्थनांनी त्याला टिकून राहण्यास प्रवृत्त केले आहे.
जेव्हा प्रार्थनेचा विचार येतो तेव्हा आपण अनेकदा वैयक्तिक स्तरावर विचार करतो, परंतु येथे पौल म्हणत आहे की देवाच्या लोकांच्या सामूहिक प्रार्थनांनी त्याला साहाय्य केले आहे. करिंथ येथील मंडळीने एकत्र प्रार्थना केली तेव्हा, (मूळ भाषा दर्शवते की हे अनेकवचनी आहे, एकवचनी नाही), त्यांच्या प्रार्थनांनी त्याला आशीर्वाद दिला; आणि त्याचा परिणाम असा की अनेक जण पौलासाठी व सेवाकार्यातील त्याच्या सहकाऱ्यांसाठी उपकारस्तुती करतील.
मंडळी म्हणून प्रार्थना करणे हे एक उल्लेखनीय प्रोत्साहन आहे. जेव्हा मला परिस्थितीबद्दल असहायतेची भावना येते, तेव्हा “मी फक्त प्रार्थना करू शकतो,” असे विचार करणे ही माझ्या महान अपयशांपैकी एक आहे, जणू काही ते दुसऱ्या क्रमांकाचे काम आहे. आपण अनेकदा मदत करू इच्छितो, आणि अशा अनेक वेळा येतील जेव्हा आपण मदत करू शकू. परंतु अनेकदा मी स्वतःला विचार करताना पाहतो, “मी फक्त प्रार्थना करू शकतो.” आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की आपल्या प्रार्थना खरोखर मदत करतात. आपल्या प्रार्थनांमुळे आपले भाऊ आणि बहिणी देवाच्या सार्वभौमत्वात पुढे जात राहतात.
जर आपण मंडळी म्हणून आपल्या प्रार्थनांचे सामर्थ्य पाहू शकलो—की आपल्या प्रार्थना एकमेकांना आधार देतात, एकमेकांना मदत करतात आणि एकमेकांना टिकवून ठेवतात—तर संघर्ष करीत असलेल्या ख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना करण्यास आपल्याला प्रोत्साहन मिळेल. सेवक आणि लेखक जेफ्री विल्सन या वचनाविषयी असे म्हणतात, “आपण अशा नाटकाचे निष्क्रिय प्रेक्षक नाही ज्यामध्ये आपल्याला कोणतीही भूमिका बजावायची नाही.”
जेव्हा आपण आपल्या प्रार्थना सभेत एकत्र येतो, तेव्हा आपण देवाच्या उद्देशांमध्ये सहभागी होत असतो. येथे एक सखोल रहस्य आहे, परंतु आपल्या प्रार्थना ख्रिस्तातील आपल्या भाऊ आणि बहिणींना मदत करतात आणि देवाचे सनातन उद्देश पूर्ण करण्यासाठी वापरल्या जातात.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


