
असामान्य सामान्यपणा
30/07/2026
प्रीतीचे गुणविशेष
06/08/2026देवाने जगावर अशी प्रीती केली
प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य मर्यादित प्रायश्चित्तावर विश्वास ठेवतो. हे कदाचित माझ्या आर्मिनियन मित्रांना हास्यास्पद वाटू शकते, कारण ट्युलिप (TULIP) मधील भयावह मानल्या गेलेल्या “L” चा स्वीकार केवळ कॅल्व्हिनवादीच करतात, असे फार काळ मानले गेले आहे. परंतु जर येशू ख्रिस्ताच्या मरणाकडे (केवळ एक संभाव्य नव्हे,) तर प्रत्यक्ष प्रायश्चित्त म्हणून पाहिले गेले, तर जोपर्यंत तुम्ही वैश्विकवादाच्या (universalism) असत्यावर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत मर्यादित प्रायश्चित्ताच्या प्रश्नापासून सुटका नाही.
ख्रिस्ताच्या मरणाने पापांचे प्रत्यक्ष प्रायश्चित्त केले, ही जाणीवच त्याच्या तारणदायी कार्याच्या महान व्यापकतेविषयी बोलणाऱ्या त्या अद्भुत शास्त्रभागांचा आपण कसा अर्थ लावतो, हे ठरविते. उदाहरणार्थ, योहान लिहितो की येशू “आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. ” (1 योहान 2:2). येथे निवड कॅल्व्हिनवाद आणि आर्मिनियनवाद यांपैकी एकाची नाही, तर कॅल्व्हिनवाद आणि वैश्विकवाद यांपैकी एकाची आहे. जर “जग” या शब्दाचा अर्थ “प्रत्येक व्यक्ती जी कधी जन्माला आली किंवा येईल” असा घेतला, तर प्रायश्चित्ताच्या वस्तुनिष्ठ स्वरूपामुळे प्रत्येक जण तारला जाईल. कोणतेही पाप न फेडलेले राहणार नाही—अगदी अविश्वासाचे पाप सुद्धा.
नरक आणि न्याय या विषयांवर पवित्र शास्त्राचे शिक्षण गांभीर्याने घेणारी कोणतीही व्यक्ती वैश्विकवादाचा स्वीकार करणार नाही. अर्थ असा होतो की योहान येथे “जग” हा शब्द प्रत्येक व्यक्ती या अर्थापेक्षा वेगळ्या अर्थाने वापरत आहे (जसा तो अनेकदा करतो; पहा योहान 14:19; 16:8; 18:20; 1 योहान 2:15.) योहानाचा मुख्य उद्देश हे ठामपणे सांगणे आहे की जगाला लाभलेला एकमेव तारणारा येशू हाच आहे. त्याचे मरण केवळ यहुदी किंवा अमेरिकन किंवा कोणत्याही एका लोक गटातील लोकांचीच मुक्तता करत नाही, तर संपूर्ण जगातील सर्वच जातीच्या आणि वंशाच्या लोकांची मुक्तता करते.
कॅल्व्हिनवाद एका बाजूने वैश्विकवादाच्या पाखंडापासून, तर दुसऱ्या बाजूने प्रायश्चित्ताच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाला कमी लेखण्याच्या खोट्या शिक्षणापासून संरक्षण करतो. कॅल्व्हिनवादी हे ओळखतो की येशूचे मरण त्या प्रत्येकाचा उद्धार करते ज्यांच्या तारणासाठी ते ठरविले गेले होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, प्रायश्चित्ताची व्याप्ती आणि उद्देश मर्यादित आहेत, असे मानले जाते. ख्रिस्त ज्यांच्यासाठी मेला, ते सर्व तारले जातील.
तथापि, आर्मिनियनवाद अशा चुकीच्या शिक्षणापासून विश्वासाचा बचाव यशस्वीपणे करू शकत नाही. आर्मिनियन असा दावा करतो की येशूचे मरण इतिहासातील प्रत्येक व्यक्तीच्या तारणासाठी योजिले गेले होते, तरी प्रत्यक्षात त्यांपैकी प्रत्येकाचे तारण त्याने साध्य केले नाही. परिणामी, प्रायश्चित्त ज्यांच्यासाठी अभिप्रेत होते, त्या सर्वांचा उद्धार त्याने केला नाही. दुसऱ्या शब्दांत, प्रायश्चित्ताची व्याप्ती अमर्यादित आहे, असा दावा करीत असतानाही आर्मिनियन दृष्टिकोनाला त्याचे फळ मर्यादित आहे, असा निष्कर्ष काढावाच लागतो. त्याचा सार्वत्रिक उद्देश साध्य करण्यात ते अपयशी ठरते.
या दोन दृष्टिकोनांतील फरक हा आहे, जसा एखाद्या दरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचणाऱ्या अरुंद पुलात आणि दरीच्या केवळ अर्ध्या अंतरापर्यंतच जाणाऱ्या रुंद पुलात असतो. तो तुम्हाला दुसऱ्या बाजूस पोहोचवू शकत नसेल, तर तो किती रुंद आहे याने काय फरक पडतो?
याच भेदामुळे चार्ल्स स्पर्जन यांनी असा युक्तिवाद केला की, कॅल्व्हिनवादापेक्षा आर्मिनियनवाद ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताला कितीतरी अधिक मर्यादित करतो. आर्मिनियन असे म्हणतो:
“ख्रिस्त मेला आहे, यासाठी की कोणत्याही मनुष्याचे तारण होऊ शकेल, जर…..” आणि मग त्यानंतर तारणाच्या काही अटी सांगितल्या जातात. आता ख्रिस्ताच्या मरणावर मर्यादा कोण घालतो? तुम्हीच. तुम्ही म्हणता की ख्रिस्त अशा प्रकारे मेला नाही की ज्यामुळे कोणाच्याही तारणाची खात्रीपूर्वक निश्चिती होईल. तुम्ही असे म्हणता की आम्ही ख्रिस्ताच्या मरणाला मर्यादित करतो, परंतु क्षमा असावी, आम्ही म्हणतो, “नाही महाराज, ते तुम्हीच करत आहात.” आम्ही म्हणतो की ख्रिस्त अशा प्रकारे मेला की त्याने मोजता येणार नाही अशा मोठ्या लोकसमुदायाचे तारण निश्चित केले, जे ख्रिस्ताच्या मरणाद्वारे केवळ तारले जाऊ शकतात असे नाही, तर ते तारलेले आहेत, तारलेच गेले पाहिजेत आणि तारणावाचून त्यांच्या बाबतीत इतर काहीही होण्याची शक्यता नाहीच. तुमचे प्रायश्चित्त तुम्ही खुशाल मान्य करा; तुम्ही ते स्वतःजवळ ठेवू शकता. त्यासाठी आम्ही आमच्या प्रायश्चित्ताचा कधीही त्याग करणार नाही. (स्पर्जन्स सर्मन्स, खंड 4, पृष्ठ 228)
मग स्पर्जन यांनी इतक्या आवेशाने ज्याचा बचाव केला, त्या प्रायश्चित्ताविषयी “आमचा” दृष्टिकोन काय आहे? विशेषतः, ही समज आहे की येशूने वधस्तंभावर आपले रक्त ओतले तेव्हा त्याने खरोखरच त्या प्रत्येकाची मुक्तता केली ज्यांची मुक्तता करण्याचा त्याचा उद्देश होता. ज्याप्रमाणे जुन्या करारातील महायाजक आपली यज्ञाची सेवा करताना आपल्या ऊरपटावर इस्राएलच्या बारा वंशांची नावे धारण करत असे, त्याचप्रमाणे नव्या करारातील आपल्या महान महायाजकाने स्वतःला त्यांच्या पापांसाठी अर्पण करताना आपल्या लोकांची नावे आपल्या हृदयावर कोरलेली होती.
योहान 10 मध्ये येशू आपल्या प्रायश्चित्तकारी मरणाचा विशिष्ट हेतू स्पष्टपणे जाहीर करतो. तो स्वतःला “उत्तम मेंढपाळ” म्हणतो, जो “मेंढरांसाठी आपला प्राण देतो” (योहान 10:11). यानंतर लगेचच, तो आपल्या मेंढरांचे वर्णन असे करतो की ज्यांना त्याच्या पित्याने त्याला दिले आहे. शिवाय, तो काही अविश्वासू इस्राएली लोकांना स्पष्टपणे सांगतो, “तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांतील नाही” (योहान 10:26-29).
योहान 17 मधील आपल्या प्रभूची महायाजकीय प्रार्थना देखील अशाच प्रकारची मर्यादित व्याप्ती दर्शवते. जेव्हा तो आपल्या लोकांसाठी आपल्या बलिदानी मरणाची तयारी करतो, तेव्हा तो विशेषतः —खरोखर केवळ— त्यांच्यासाठीच प्रार्थना करतो. ते असे आहेत ज्यांना पित्याने जगातून काढून त्याला दिले होते (योहान 17:6). परिणामी, त्याची याजकीय मध्यस्थी त्यांच्यापुरतीच मर्यादित होती: “मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो; मी जगासाठी प्रार्थना करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी करतो, कारण ते तुझे आहेत” (योहान 17:9). ज्यांच्यासाठी येशू पर्यायी बलिदान म्हणून मरणार होता, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात तो अपयशी ठरेल, ही गोष्ट अकल्पनीय आहे. ज्यांच्यासाठी त्याने प्रार्थना केली, त्यांच्यासाठीच तो मेला.
मर्यादित प्रायश्चित्त किंवा विशिष्ट मुक्तीचा सिद्धांत ख्रिस्ताच्या मरणात कोणत्याही प्रकारची उणीव सूचित करत नाही. ज्याने हे दुःख सोसले, त्याच्या महानतेमुळे येशूचे मरण अनंत मोलाचे आहे. कॅनन्स ऑफ डॉर्ट (Canons of Dort) हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी खूप प्रयत्न करतात आणि स्पष्टपणे घोषित करतात की “देवाच्या पुत्राचे मरण… अनंत मोलाचे आणि मूल्याचे आहे, जे सर्व जगाच्या पापांचे क्षालन करण्यास मुबलक प्रमाणात पुरेसे आहे” (2.3).
प्रायश्चितातील मर्यादा ही येशूला वधस्तंभावर पाठवण्यामागील देवाचा हेतू आणि उद्देश यातून येते. ख्रिस्ताचे मुक्तीचे कार्य त्याच्या स्वतःच्या लोकांसाठी—ज्यांना पित्याने त्याला दिले होते—एक विशिष्ट प्रायश्चित्त म्हणून योजले गेले होते. त्याच्या मरणाचा उद्देश निवडलेल्यांचे तारण करण्यासाठीच होता.
येशू शिकवतो की त्याचे संपूर्ण मुक्तीचे सेवाकार्य हे देवाच्या पूर्वनियोजित योजनेला सिद्धीस आणण्यासाठीच पार पाडले गेले. योहान 6:38-39 मध्ये त्याला हेच म्हणायचे आहे:
कारण मी स्वतःची इच्छा नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यांतील मी काहीही गमावू नये, तर शेवटल्या दिवशी ते पुन्हा उठवावे.
धर्मशास्त्रज्ञ या व्यवस्थेला मुक्तीचा करार म्हणतात, ज्यामध्ये इतिहास सुरू होण्यापूर्वीच, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी पतित लोकांचे तारण घडवून आणण्याची प्रतिज्ञा केली होती. केवळ दया आणि कृपेपोटी, पित्याने तारले जाण्यासाठी व्यक्तींची निवड केली (रोम. 9:11-13; इफिस. 1:4; 2 थेस्सलनी. 2:13). हे निवडलेले त्याने आपल्या पुत्राला दिले (योहान 6:37, 39; 17:6, 9, 24) ज्याने स्वतःच्या देहधारणेद्वारे त्यांचे तारण साध्य करण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केले (मार्क 10:45; योहान 10:11). या दैवी कार्यक्रमाला अनुसरून, पित्याद्वारे आणि पुत्राद्वारे पवित्र आत्म्याला जगात पाठवले जाते (योहान 15:26; 16:5-15) जेणेकरून ज्यांना पित्याने पुत्राला दिले आणि ज्यांच्यासाठी पुत्र मेला, त्यांना ख्रिस्ताच्या कार्याचा लाभ लागू व्हावा.
प्रायश्चित्ताविषयीचा हा दृष्टिकोन सुवार्ताप्रचाराचे यश निश्चित करतो. देवाचे असे लोक आहेत, की जे सुवार्तेच्या प्रचाराद्वारे अटळपणे तारले जातील. त्याने त्यांना निवडले आहे. ख्रिस्त त्यांच्यासाठी मेला आहे. आणि पवित्र आत्मा तारणाच्या संदेशाद्वारे त्यांना नवा जन्म देईल. या सत्याने करिंथ येथील निराशेच्या प्रसंगी पौलाला टिकवून ठेवले (प्रेषितांची कृत्ये 18:9-10), आणि हेच सत्य आपल्याला आज आपल्या सुवार्ता प्रसाराच्या प्रयत्नांमध्ये—केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर जागतिक स्तरावर—पुढे नेत राहील (प्रकटीकरण 5:9).
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


