
देवाने जगावर अशी प्रीती केली
04/08/2026
येशूचा मृत्यू कधी झाला होता?
11/08/2026प्रीतीचे गुणविशेष
सतराव्या शतकाच्या सुरुवातीला आयर्लंडचे आर्चबिशप अशर यांना एका प्रेस्बिटेरियन पाळकाच्या घरी जाऊन, त्या मनुष्याच्या वैयक्तिक ईशभक्तीविषयी त्यांनी ऐकले होते ते खरे आहे की नाही, हे पाहण्याची इच्छा झाली. अशर एका गरीब भिकाऱ्याचा वेष धारण करून त्या पाळकाच्या घरी आले. त्यांचे घरात स्वागत करण्यात आले. तेथे पाळकांची पत्नी घरातील सर्वांना प्रश्नोत्तरांच्या पद्धतीने, म्हणजे कॅटेकिझममधून ख्रिस्ती शिक्षण देत होती. तिने त्या अनपेक्षित पाहुण्याला विचारले की आज्ञा किती आहेत. त्याने, “अकरा,” असे उत्तर दिल्यावर तिला तो अतिशय अज्ञानी मनुष्य वाटला. म्हणून तिने त्याला पुढे काहीही विचारले नाही, परंतु त्याला भोजन दिले आणि झोप घेण्यास पाठविले.
त्या रात्री उशिरा पाळकांना अशर यांचा हा वेषांतराचा हेतू समजला आणि त्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवचन करण्याची विनंती केली. तेव्हा अशर आंघोळ करून, पाळकांच्या पत्नीला ओळखू येणार नाही अशा पोशाखात, व्यासपीठावर गेले. त्यांनी ज्याला “अकरावी आज्ञा” म्हणता येईल अशा विषयावर, म्हणजे योहान 13:34 वर प्रवचन दिले: “मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.” तो भिकारी चक्क उपदेशक आहे, आणि आपण त्याच्याविषयी किती चुकीचा निर्णय केला व त्याच्याप्रती अधिक प्रीती दाखविली नाही, याचे पाळकांच्या पत्नीला फार आश्चर्य वाटले.
प्रीती म्हणजे काय? आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींवर प्रीती करण्याची ख्रिस्ताची आज्ञा आपण पाळत आहोत, हे कसे ओळखावे? प्रीती करणारा मनुष्य इतरांशी कसा वागतो? लोकप्रिय माध्यमे प्रीतीला अनेकदा आकर्षण आणि आनंदाची भावना म्हणून रंग देतात, परंतु अशा भावना तापमापकातील पाऱ्यासारख्या वरखाली होत राहतात. आपल्याला तापमापकासारख्या प्रीतीची नव्हे, तर आपल्या प्रतिक्रियांच्या अधीन न राहता त्यांना नियंत्रित करणाऱ्या थर्मोस्टॅटसारख्या प्रीतीची गरज आहे.
इतर काही जण प्रीतीचे वर्णन दोष न काढणारा, कोणतीही अट न घालता केलेला स्वीकार असे करतात. ही कल्पना मानसशास्त्रातील कोणतीही अट न घालता केलेल्या सकारात्मक स्वीकाराच्या संकल्पनेतून आली आहे. परंतु हा अतिशय सोपा दृष्टिकोन गोंधळ निर्माण करतो आणि दुष्ट हेतू व दुष्टता यांसमोर आपल्याला असहाय करतो. एखाद्या दहशतवाद्याचा किंवा साखळी-खुन्याचा अटविरहित व दोष न काढता केलेला स्वीकार आपण कसा करू शकतो?
आज अनेक ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की, नवीन करारातील प्रीतीसाठीचे प्रमुख ग्रीक शब्द, अगापे (agapē) आणि त्याच्याशी संबंधित अगापाओ (agapaō), हे भावना नव्हे, तर स्वतःचा त्याग करून इतरांचे भले करण्यासाठी इच्छेने केलेली कृती दर्शवितात. परंतु ही कल्पना ग्रीक भाषेतील प्रीतीच्या निरनिराळ्या शब्दांवर आधारलेली असू शकत नाही, कारण अगापे या शब्दसमूहाचे अर्थ संदर्भानुसार अनेक प्रकारचे होतात. शिवाय, प्रीतीची भावनारहित संकल्पना आपल्या भावनांचे काय करावे याविषयी आपल्याला संशयास्पद ठेवते. तसेच ती आपल्या निर्णयांना चालना देणाऱ्या खोलवरच्या व अनेकदा गुप्त असलेल्या प्रेरणांशी सामना करण्यात अपयशी ठरते.
मग प्रीतीचे खरे वर्णन कोठे सापडेल? प्रेषित पौलाने 1 करिंथकर 13:4–7 मध्ये तिचे अप्रतिम वर्णन दिले आहे. पौल प्रीतीची प्रशंसा “सर्वोत्तम मार्ग” अशी करतो. किंग जेम्स भाषांतरात तिच्यासाठी “चॅरिटी” हा शब्द असून तो लॅटिन कॅरिटास या शब्दापासून आला आहे. हा मार्ग आत्मिक दानांपेक्षा श्रेष्ठ आहे (अध्याय 12), आणि देवाच्या तराजूत मोजले असता कोणत्याही मौल्यवान जीवनासाठी ते पूर्णपणे आवश्यक आहे (1 करिंथकर 13:1–3). वचने 4–7 प्रीतीचे गुणविशेष आणि कृती यांचे सौंदर्य उलगडून दाखवितात. ती प्रीतीच्या मूलस्वरूपाची व्याख्या करण्यापेक्षा तिच्या फळांचे वर्णन अधिक करतात. प्रीती काही कृतींना व वर्तनांना कशी प्रवृत्त करते, आणि विपरीत वर्तनाला कशी विरोध करते, हे ती आपल्याला दाखवितात.
हे वर्णन सहनशीलतेने सुरू होते आणि टिकून राहण्याने संपते (वचने 4, 7). संकटे, दुःख आणि दुष्टता यांना प्रीती कसा प्रतिसाद देते, यात तिचे खरे स्वरूप प्रकट होते. प्रीतीचे सर्वोच्च प्रकटीकरण ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण होय. पौलाने रोमकरांस 5:8 मध्ये लिहिले आहे: “परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.” ज्या पौलाने म्हटले होते की त्याला “येशू ख्रिस्त व तो वधस्तंभावर खिळलेला, यावाचून” (1 करिंथकर 2:2) दुसरे काही ठाऊक नाही, त्याने नक्कीच ख्रिस्ताच्या प्रीतीचे अत्यंत गांभीर्याने चिंतन केले होते. योहानही ख्रिस्ताने आपल्यासाठी मरण पत्करण्याच्या इच्छेमागे असलेल्या प्रीतीवर प्रकाश टाकतो, जेव्हा तो म्हणतो, “आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.” (योहान 15:13).
प्रीती आपले श्रेष्ठत्व विविध मार्गांनी प्रकट करते. जोनाथन एडवर्ड्स यांनी लिहिले आहे, “प्रीती हे कार्यशील तत्त्व आहे” (लिखाण 8:301). सकारात्मक रीतीने पाहिले, तर प्रीती सहनशील असते आणि ममता दाखविते (1 करिंथकर 13:4). प्रीती निरंतर चांगलेच करीत राहते. इतरांच्या गरजा भागविण्यासाठी आणि देवाचे गौरव करण्यासाठी प्रीती करणारा मनुष्य अप्रिय प्रसंग किंवा अडचणी समोर आल्या तरी स्थिर राहतो. प्रीती दुःखाची परतफेड ममतेने करण्यास प्रवृत्त करते आणि दुष्टतेला भल्याने प्रत्युत्तर देते. ख्रिस्ती प्रीती त्या देवाच्या प्रतिरूपाचे प्रतिबिंब पाडते, जो “दयाळू व कृपाळू देव, क्रोध करण्यास मंद आणि दयेने व सत्याने भरपूर” (निर्गम 34:6) असा आहे.
नकारात्मक रीतीने पाहिले, तर प्रीती हेवा करीत नाही (1 करिंथकर 13:4). प्रीती स्वार्थी हेवा रोखून धरते, कारण तिने स्वतःला नकार देण्यास शिकलेले असते आणि इतरांची भरभराट पाहण्यात तिला आनंद होतो. ती बढाई मारत नाही आणि फुगत नाही (वचन 4). या गुणांवरून प्रीती हा नम्र सद्गुण आहे, हे दिसते. प्रीती देवाविषयी आणि इतरांविषयी मनाची तळमळ निर्माण करते, आणि स्वतःभोवतीच फिरत राहण्याच्या वृत्तीला छेद देते. जोनाथन एडवर्ड्स यांनी लिहिले की, “जो कोणी देवावर प्रीती करतो, तो त्याच्यावर देव म्हणून प्रीती करतो. . . . जर आपण देवावर आपल्यापेक्षा अनंत श्रेष्ठ म्हणून प्रीती करीत असू, तर आपल्यामध्ये ती प्रीती अनंत कनिष्ठ म्हणून कार्य करीत असते; आणि म्हणून ती नम्र प्रीती असते” (लिखाण 8:245).
प्रीती गैरशिस्त वागत नाही, (1 करिंथकर 13:5). “गैरशिस्त वागणे,” असे भाषांतर केलेल्या ग्रीक क्रियापदाचा अर्थ मान्य निकषांना धुडकावून लावून वागणे, ज्यामुळे अपकीर्ती येते. प्रीती मनुष्याला देवाच्या आणि माणसांच्या दृष्टीने जे आदरणीय आहे, ते करण्यास प्रवृत्त करते (रोमकरांस 12:17b; 2 करिंथकर 8:21). हे विधान प्रीतीच्या कोणत्याही नियमविरोधी दृष्टिकोनाला अमान्य ठरविते. प्रीती देवाच्या नियमशास्त्रालाही धरून राहते (स्तोत्रसंहिता 119:97) आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते (रोमकरांस 13:8–10).
प्रीती स्वार्थ पाहत नाही (1 करिंथकर 13:5), तर ती आपल्याला देवाचे गौरव आणि आपल्या शेजाऱ्याचे हित साधण्यास प्रवृत्त करते. प्रीती आपल्याला सेवक बनविते (फिलिप्पैकरांस 2). ती सहज चिडत नाही आणि अन्यायाचा हिशोब ठेवत नाही (वचन 5). सहज चिडणे म्हणजे लवकर रागावणे होय (प्रेषितांची कृत्ये 17:16), परंतु प्रीती रागाला आवर घालते. क्षमा करणे म्हणजे अन्यायांची नोंद ठेवत न बसणे. प्रीती लोकांची पापे त्यांच्याविरुद्ध मोजण्यात आनंद मानत नाही (रोमकरांस 4; 2 करिंथकर 5:19).
प्रीती अनीतीमध्ये आनंद मानत नाही, तर सत्यात आनंद मानते (1 करिंथकर 13:6). जेव्हा जेव्हा प्रीतीला नीतिमत्व आणि विश्वासूपणा दिसतो, तेव्हा ती उल्हसित होते. परंतु एखादा मनुष्य पापात पडल्याची आणि त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागल्याची वार्ता ऐकून प्रीती दुःखी होते. म्हणून अशी वार्ता तिला गप्पांसाठीचा चविष्ट विषय वाटत नाही. अशी प्रीती शत्रूंचेही भले करते.
वचन 6 आपल्या संस्कृतीत प्रीतीच्या नावाखाली वावरणाऱ्या सापेक्षतावादी सहिष्णुतेच्या मूर्तीचा निषेध करते. निष्कपट प्रीतीमध्ये दुष्टतेचा द्वेषही समाविष्ट असतो (रोमकरांस 12:9). देवाच्या प्रीतीचे सर्वोच्च प्रकटीकरण हे त्याच्या नीतिमत्वाचेही सर्वोच्च प्रदर्शन होते, कारण त्याच्या पुत्राने आपल्या पापांची शिक्षा भोगून देवाच्या न्यायाचे समाधान केले (रोमकरांस 3:25–26). अशा प्रकारे 1 करिंथकर 13:6 प्रीतीचा भावनांशी काहीही संबंध नाही, या लोकप्रिय ख्रिस्ती कल्पनेचे निराकरण करते. प्रीतीला पापाविषयी तीव्र तिरस्कार आणि नीतिमत्वाविषयी उत्कट ओढ असते.
प्रीतीविषयी सांगितलेल्या शेवटच्या चार कृती किंवा सवयींमध्ये (वचन 7), वारंवार आलेला “सर्व” हा शब्द निरपेक्ष किंवा कोणत्याही अपवादावाचून असा घेऊ नये. ही वचने नवीन कराराच्या संदर्भात वाचली पाहिजेत. पौल “सर्व” हा शब्द वापरतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की प्रीती आपण वधस्तंभाप्रमाणे वाहिली पाहिजेत अशी सर्व ओझी सहन करते, ख्रिस्ती म्हणून ज्या सर्व गोष्टींवर आपण विश्वास ठेवला पाहिजे त्यांवर विश्वास ठेवते, देवाच्या अभिवचनाप्रमाणे ज्या सर्व गोष्टींची आपण अपेक्षा धरली पाहिजे त्या सर्वांची आशा धरते, आणि ख्रिस्तासाठी ज्या सर्व परीक्षा आपल्याला सोसाव्या लागतात त्या सहन करते. अशा रीतीने प्रीती या चार कृतींना सातत्याने प्रवृत्त करते.
अडचणींच्या काळात टिकून राहण्याचे सामर्थ्य प्रीतीमध्ये असते. प्रत्येक परिस्थितीत ती विश्वास ठेवत राहते आणि आशा धरून राहते. विश्वास, आशा आणि प्रीती हे त्रिकूट पवित्र शास्त्रात अनेकदा दिसते. ख्रिस्ती लोक देवावर प्रीती करतात तेव्हा, त्यांच्याविषयीच्या त्याच्या विश्वासू प्रीतीत त्यांची अंतःकरणे आनंदित होतात. त्यामुळे त्यांचा विश्वास दृढ होतो आणि त्यांची आशा जिवंत राहते. एडवर्ड्स यांनी म्हटले आहे की प्रीती हे “व्यावहारिक विश्वासाचे जीवन आणि आत्मा आहे,” जे विश्वासाला चैतन्य व फळद्रूपपणा देते (लिखाण 8:139, 330–31). प्रीती “विश्वास आणि आशेचा सर्वांत आवश्यक घटक आहे” (लिखाण 8:327).
येथे पापी आणि दुःखी जगामध्ये प्रीतीच्या अविरत कार्याचे पौलाने केलेले वर्णन आपल्याला दिसून येते. प्रीती हे क्रियापद आहे. तरीही प्रीती केवळ बाह्य कृतींपेक्षा अधिक असली पाहिजे, कारण तिचे मूळ हृदयाच्या प्रेरणेमध्ये वसलेले आहे. तिला चालना काय देते? ती स्वार्थी महत्त्वाकांक्षा असू शकत नाही, कारण प्रीती गर्विष्ठ नसते आणि स्वतःचे हित पाहत नाही. तसेच ज्याच्यावर प्रीती केली जाते त्याच्यापासून मिळणाऱ्या तात्कालिक आनंदानेही ती प्रेरित होत नाही. अन्यथा पतित लोकांशी ती सहनशील आणि ममताळू राहिली नसती.
मग कोणती गोष्ट प्रीतीला चालना देते? या शास्त्रभागात आपल्याला दोन सुगावे मिळतात. तिचा आनंद सत्यात आहे, म्हणजे देवाच्या नीतिमत्वात आणि विश्वासूपणात आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये प्रकट झालेल्या देवाच्या प्रीतीत प्रीती आनंद मानते. “आपण प्रीती करतो कारण त्याने प्रथम आपल्यावर प्रीती केली” (1 योहान 4:19). तिची चिकाटी विश्वास व आशेशी जोडलेली आहे, म्हणजे ख्रिस्ताकडे पाहण्यात आणि देवाच्या वचनावर भरवसा ठेवण्यात आहे. एडवर्ड्स यांनी म्हटले आहे की प्रीती “देवाच्या श्रेष्ठतेच्या दर्शनातून किंवा जाणिवेतून” उत्पन्न होते (लिखाण 8:333). म्हणून आपण असा निष्कर्ष काढतो की प्रीती देवापासून उत्पन्न झालेली, देवावर केंद्रित असलेली आणि देवाकडून प्रेरित होणारी आहे. “देव प्रीती आहे” (1 योहान 4:8b). जेव्हा आपण अस्सल प्रीतीत चालतो, तेव्हा देवाबरोबरच्या सहवासात आपण सर्वांत खोलवर असतो. मग प्रीतीचे गुणविशेष आणि कृती किती सुंदर आहेत.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


