
जेव्हा मला कुठेतरी अडकून पडल्यासारखे वाटते
28/07/2026असामान्य सामान्यपणा
‘द हंगर फॉर सिग्निफिकन्स’ या माझ्या पुस्तकात मी आपल्या सर्वांमध्ये सामान्यतः आढळणाऱ्या त्या इच्छेचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न होता, जी आपल्या मानवी जीवनात प्रतिष्ठा, मोल आणि मूल्य यांसाठी काही आधार शोधू पाहते. त्या वेळी मी असे लिहिले होते: “आधुनिक मनुष्याच्या अंतःकरणात त्याला अस्वस्थ करणारी एक वेदनादायी पोकळी आहे. आपल्याला जाणवणारी ही रिकामी पोकळी नवीन कार, चांगली नोकरी किंवा मोठ्या घरामुळे भरून निघू शकत नाही. प्रत्येक मानवी जीवन अर्थपूर्ण आहे हे समजून घेतल्यानेच ती भरली जाऊ शकते. आपल्या जीवनाचा अर्थ नाकारून त्याला शून्य ठरवता येत नाही.”
महत्व आणि मानवी प्रतिष्ठेचा आधुनिक शोध हा अनेकदा आपल्या सभोवतालच्या सांस्कृतिक जागतिक दृष्टिकोनात पसरलेल्या निराशेच्या प्रचंड छायेने प्रेरित झालेला असतो. आपल्याला वारंवार हेच सांगितले जाते की, आपण वैश्विक अपघाताचा परिणाम आहोत जे चिखलातून योगायोगाने बाहेर पडलो आहोत. आपली उत्पत्ती अर्थहीन आहे आणि आपले अंतिम गंतव्य विनाश आहे. तरीही निराशेच्या या दोन टोकांच्या दरम्यान, महत्त्व आणि प्रतिष्ठा यांचा शोध अनेकदा एका तीव्र निकडीच्या भावनेने व्यापलेला असतो.
‘टेबलटॉक’च्या या अंकात, आपण उत्कृष्टतेच्या शोधाचा वेध घेत आहोत, जो अनेक प्रकरणांमध्ये महत्व मिळवण्याच्या आपल्या मूलभूत आकांक्षेशी अविभाज्यपणे संबंधित आहे. उत्कृष्टतेच्या शोधामागे वेगवेगळे आणि कधीकधी परस्परविरोधी हेतू असू शकतात. तो शोध आपण ज्या कामात गुंतलो आहोत त्यामध्ये केवळ उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या इच्छेवर आधारित असू शकतो. एकीकडे, या प्रकारच्या उत्कृष्टतेचा हेतू स्पर्धात्मक वर्चस्व गाजवण्याचा असू शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या, आपण आपल्या मानवतेची परिभाषा ‘होमो सेपियन्स’ या संज्ञेच्या उपयोगाने केली आहे. एकोणिसाव्या शतकातील निहिलवादी तत्त्वज्ञ फ्रेडरिक नीत्शे यांनी असा युक्तिवाद केला की, मानवी अस्तित्वाची मूलभूत परिभाषा ही आपल्या शहाणपणाद्वारे (sapiens) केली जात नाही, तर सत्तेसाठी असलेली भूक आणि जिंकून वर्चस्व प्रस्थापित करण्याची प्रबळ इच्छा याद्वारे ती केली जाते. सत्ता मिळवण्याची भूक जी जुलमी सत्ताधीशांना आणि हुकूमशहांना चालना देते, ती आपण वैशिष्ट्यपूर्णपणे वाईट मानतो, परंतु नीत्शेने तिला सद्गुण मानले. त्याच्यामते, ‘सुपर-मॅन’ तो आहे जो सर्वांहून श्रेष्ठ असा विजेता आहे. तो असा मनुष्य असतो, जो आपल्या अंगभूत सत्तेच्या इच्छेला केवळ अनिर्बंध राहू देत नाही, तर उपलब्ध असलेल्या प्रत्येक मार्गाने तिला वासनेने खतपाणी घालतो. आपण ज्या जगात राहतो, तिथे सत्तेची इच्छा ही अनेकदा कॉर्पोरेट शिडी चढण्याची, अधिकार आणि सत्तेच्या शिखरावर पोहोचण्याची इच्छा म्हणून पाहिली जाते, जेणेकरून आपण इतर लोकांवर वर्चस्व गाजवू शकू. या संदर्भात, वर्चस्वाची स्पर्धात्मक इच्छा ज्याद्वारे आपण कमकुवत लोकांवर सार्वभौमत्व गाजवू शकतो, हे अंगभूत मानवतेचे नव्हे, तर अंगभूत मानवी पतनाचे प्रकटीकरण आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात दबा धरून बसलेल्या भ्रष्टतेच्या खोलीचे हे एक बाह्य प्रकटीकरण आहे.
दुसरीकडे, उत्कृष्ट ठरण्याची प्रबळ इच्छा ही यशाची ध्येये गाठण्याच्या प्रयत्नातूनही प्रेरित झालेली असू शकते. प्रत्येक मानवामध्ये असलेली महत्व मिळवण्याची महत्वाकांक्षा ही स्वतःमध्ये पापपूर्ण भूक नाही. महत्व मिळवण्याची महत्वाकांक्षा आपल्याला आपल्या निर्माणकर्त्याद्वारे देण्यात आली आहे, असा माझा विश्वास आहे. त्याचे लोक म्हणून, त्याच्या प्रतिरुपात बनवलेले असल्यामुळे, आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे असलेली प्रतिष्ठा ही नैसर्गिकरित्या आपल्या आतून आलेली नसून बाहेरून बहाल केलेली आहे. म्हणजेच, ती देवाने आपल्याला दिलेली प्रतिष्ठा आहे. आपल्याला मूल्य आणि मोल आहे कारण देव आपल्याला मौल्यवान घोषित करतो. देवच आपल्याला आपल्या क्षमतेनुसार उत्कृष्टतेच्या आणि यशाच्या उच्च पातळींवर कष्ट करण्याचे आवाहन करतो. या जगात उपयोग करावीत अशी दाने आपण त्याच्याच हातून प्राप्त करतो. त्या दानांचा विश्वासूपणे उपयोग करणे, हाच उत्कृष्ट ठरण्याच्या आपल्या इच्छेला चालना देणारा हेतू असला पाहिजे. सार्थकता मिळवण्याची अभिलाषा ही स्वतःमध्ये वाईट गोष्ट नाही, परंतु मानवी हृदयात धडधडणाऱ्या अशा उदात्त इच्छा खरोखरच भरकटू शकतात. महत्व मिळवण्याची ही महत्वाकांक्षा, जर देवाने ठरविलेल्या नैतिकतेद्वारे नियंत्रित केली गेली नाही, तर ती सहजपणे नीत्शेवादी प्रभुत्वाच्या वासनेचे रूप धारण करू शकते.
उत्कृष्टतेमागील योग्य हेतू म्हणजे देवाचे गौरव व्हावे, या अंतिम उद्देशाने यश मिळवण्याचा प्रयत्न करणे. ज्या मुख्य हेतूसाठी आपली निर्मिती झाली आहे तो म्हणजे त्याच्या गौरवाचा साक्षीदार होणे. एक गोष्ट जी देवाच्या गौरवाची साक्ष देत नाही ती म्हणजे सामान्यपणाचे मानवी व्यसन, यथास्थितीबद्दलचे आत्मसंतुष्ट समाधान. याउलट, पवित्र शास्त्र आपल्याला उच्च पाचारण शोधण्यासाठी सांगते — जे उच्च पाचारण ख्रिस्त येशूमध्ये आपले आहे. जेव्हा आपण आळसात लोळतो तेव्हा असे उच्च पाचारण साध्य होऊ शकत नाही. सुस्ती आणि आळस हे दोन दुर्गुण आहेत ज्यांचा पवित्र शास्त्राने स्पष्टपणे आणि कठोरपणे निषेध केला आहे. आपण उत्कृष्टता प्राप्त करण्यात अपयशी ठरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे उत्कृष्टता साध्य होईल इतक्या प्रमाणात परिश्रम करण्याची आपली तयारी नसते. कष्टाळू आणि शिस्तबद्ध परिश्रमाशिवाय कोणीही कोणत्याही उदात्त उद्योगात उत्कृष्टता मिळवू शकत नाही. या अर्थाने यशाचा शत्रू आळस आहे. दुसरीकडे, अत्यंत पवित्र मानवी हृदयाने देखील, उत्कृष्टतेचा शोध हा नेहमीच गर्वाच्या भ्रष्ट भावनेने कलंकित राहतो. जर आपण या जगात शक्य असलेली सर्वोच्च ध्येये गाठली, मानवी यशाची शिखरे अभूतपूर्व पद्धतीने सर केली, तरीही आपण जास्तीत जास्त ‘निरुपयोगी दास’ असू ज्यांना देवाच्या गौरवाशिवाय आणि ख्रिस्त येशूमध्ये आपल्या असलेल्या मौल्यवान तारणाशिवाय कशाचाही अभिमान बाळगण्याचा अधिकार नाही.
म्हणून आपण उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करूया, आपण जे काही करतो त्यामध्ये उत्कृष्टतेची सर्वोच्च शक्य पातळी गाठण्यासाठी सहनशक्तीच्या सर्वोच्च मर्यादेपर्यंत स्वतःला झोकून देऊया आणि त्याच वेळी आपल्या कष्टाच्या कोणत्याही मूल्याला भ्रष्ट करून टाकणाऱ्या गर्वाच्या दुष्ट आवेगाबद्दल नेहमीच सतर्क राहूया. आपण कठोर परिश्रम करूया, देवाच्या गौरवासाठी आपण उत्कृष्ट होऊया.
सोली डेओ ग्लोरिया!
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


