When Did Jesus Die?

येशूचा मृत्यू कधी झाला होता?

11/08/2026
Why Do We Sing at Christmas?

आपण ख्रिसमसला गीते का गातो?

14/08/2026
When Did Jesus Die?

येशूचा मृत्यू कधी झाला होता?

11/08/2026
Why Do We Sing at Christmas?

आपण ख्रिसमसला गीते का गातो?

14/08/2026

ख्रिस्ती लोक देवाच्या प्रकटीकरणाविषयी काय विश्वास ठेवतात?

What Do Christians Believe About Divine Revelation?

देव मानवजातीला स्वतःची व आपल्या इच्छेची ओळख केवळ स्वतःच्या प्रकटीकरणाद्वारेच करून देतो. मनुष्य हा सृष्ट प्राणी असल्यामुळे त्याला देवाचे ज्ञान होण्यासाठी हे आवश्यक आहे; कारण निर्माणकर्ता म्हणून देव आपल्या सृष्टीहून श्रेष्ठ आणि तिच्यापासून भिन्न आहे. जोपर्यंत देव स्वतःला प्रकट करण्याचे निवडत नाही तोपर्यंत मानव देवाला ओळखू शकत नाही. देवाच्या स्व-प्रकटीकरणावाचून मनुष्याला स्वतःच्या बुद्धीने, अनुभवाने किंवा प्रयत्नांनी त्याचे ज्ञान प्राप्त करता येत नाही. म्हणून देव आपल्या कृपेने मनुष्याच्या सृष्टीजन्य मर्यादित क्षमतेशी सुसंगत अशा रीतीने स्वतःला प्रकट करतो, म्हणजे तो त्याच्या पातळीवर उतरून स्वतःची ओळख करून देतो. अशा प्रकारे देवाविषयी आणि सृष्टीसाठी त्याच्या उद्देशांविषयी मनुष्याला मिळणारे सर्व ज्ञान, निर्माणकर्ता म्हणून देवाला स्वतःविषयी आणि आपल्या सृष्टीविषयी असलेल्या ज्ञानाचे सृष्टीस अनुरूप प्रतिबिंब आहे.

देव मानवजातीला आपण कोण आहे आणि त्याची इच्छा काय आहे, हे तो मानवांना ज्या दोन मार्गांनी प्रकट करतो, त्यांत आपण भेद करू शकतो. हे दोन्ही मार्ग एकमेकांना पूरक असून ते एकत्रितपणे कार्य करतात. पहिल्या मार्गाला सर्वसामान्य प्रकटीकरण (general revelation) असे म्हटले जाते. त्यात देव आपल्या सृष्टीच्या कार्यांद्वारे, ईश्वरनियोजनाद्वारे आणि मनुष्याच्या सद्सद्विवेकबुद्धीद्वारे सर्व लोकांसमोर सार्वत्रिक रीतीने स्वतःला प्रकट करतो. निसर्गाची व्यवस्था आणि विश्व देवाचे सामर्थ्य, बुद्धी आणि दैवी स्वरूप प्रकट करतात (रोमकरांस 1:19–20). इतिहासाचे आणि मानवी व्यवहारांचे त्याचे संचालन त्याचा न्यायीपणा व चांगुलपणा यांचे प्रतिबिंब पाडतात (मत्तय 5:45; प्रेषितांची कृत्ये 14:17). मनुष्याच्या सामान्य वर्तनात देवाने अंतःकरणात रोविलेली बरे आणि वाईट यांविषयीची वस्तुनिष्ठ नैतिकतेची जाणीव दिसून येते; ती देवाच्या नैतिक नियमाचे प्रतिबिंब आहे (रोमकरांस 2:14–15). या सर्व गोष्टी निरंतर, स्पष्टपणे, सत्यतेने आणि अधिकाराने मनुष्याला दाखवितात की त्याचा निर्माणकर्ता म्हणून देव कोण आहे, आणि त्याच्या प्रतिरूपात निर्माण झालेला प्राणी म्हणून देवाप्रती त्याची कर्तव्ये कोणती आहेत. ही साक्ष सतत व अखंड चालू असते, त्यामुळे मनुष्य प्रत्येक वेळी देवापुढे जबाबदार ठरतो.

जरी निसर्गाचा प्रकाश आणि सृष्टीची व ईश्वरनियोजनाची कार्ये देवाचा चांगुलपणा, शहाणपण आणि सामर्थ्य इतक्या प्रमाणात प्रकट करतात की मनुष्याला कोणतीही सबब उरत नाही; तरीही ते देवाचे आणि त्याच्या इच्छेचे ते ज्ञान देण्यासाठी पुरेसे नाहीत, जे तारणासाठी आवश्यक आहे. 

हे सामान्य प्रकटीकरण सर्व मनुष्यांना देवापुढे जबाबदार धरण्यास पुरेसे असले, तरी ते केवळ मूलभूत स्वरूपाचे आहे, आणि मनुष्याच्या तारणासाठी ते पुरेसे नाही. वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार (1.1) हे पुढीलप्रमाणे मांडतो:

असे यामुळे नाही की मनुष्य एक निर्मित प्राणी म्हणून मर्यादित आहे आणि त्यामुळे देवाच्या स्वतःच्या प्रकटीकरणाची पूर्णता त्याच्या ग्रहणशक्तीपलीकडे आहे. देव स्वतःचे प्रकटीकरण मनुष्याच्या मर्यादित ग्रहणक्षमतेनुसार करतो. उलट, हा अपुरेपणा पापाच्या वास्तवातून आणि मनुष्याच्या बुद्धीवर व इच्छाशक्तीवर होणाऱ्या त्याच्या परिणामांतून उद्भवतो. देवाच्या प्रतिरूपात निर्माण झालेल्या मनुष्याचा प्रत्येक पैलू देवाच्या दैवी अस्तित्वावर व स्वभावावर अवलंबून राहण्यासाठी आणि त्यांचे प्रतिबिंब दाखविण्यासाठी घडविला गेला होता. पापाने मनुष्याचे मन आणि हेतू भ्रष्ट केले आहेत; त्यामुळे सर्वसामान्य प्रकटीकरणाद्वारे प्राप्त झालेले देवाचे ज्ञान तो दडपून टाकतो आणि विकृत करतो. पवित्र आत्म्याच्या कार्यावाचून, जे स्पष्टपणे प्रकट केले आहे त्याचा चुकीचा अर्थ लावणे, त्याची विकृती करणे किंवा त्याचा अव्हेर करणे, यांस मनुष्य बांधील असतो. 

विशेष प्रकटीकरण (Special revelation) हा दुसरा मार्ग आहे ज्याद्वारे देव स्वतःला आणि आपली इच्छा मनुष्याला प्रकट करतो. सर्वसामान्य प्रकटीकरणात तो जे प्रकट करतो, त्याचा अर्थ विशेष प्रकटीकरण उलगडून सांगते आणि त्यात भर घालते. देव तारणारा म्हणून कोण आहे, इतिहासातील त्याच्या तारणकारी कृतींचे उद्देश काय आहेत, त्याच्या लोकांबरोबरचा त्याचा करारसंबंध कसा आहे, आणि येशू ख्रिस्ताद्वारे त्याची मुक्तीची अंतिम योजना कोणती आहे, हे त्यातून प्रकट होते. तारणाच्या इतिहासात हे विशेष प्रकटीकरण स्वप्ने, दृष्टान्त, देवदूतांचे दर्शन, ईश्वरी प्रकटीकरण, आणि संदेष्ट्यांची वचने अशा विविध माध्यमांनी देण्यात आले. तथापि, येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्त्वात देवाच्या प्रकटीकरणाने आपला कळस आणि पूर्णता गाठली. त्याच्याद्वारे देवाने निश्चितपणे संवाद साधला आहे (इब्रीकरांस 1:1–2), आणि तो पित्याचे परिपूर्ण प्रकटीकरण आहे (योहान 1:18; 14:9). या सर्व गोष्टींविषयी अधिकाराने आणि अचूक रीतीने साक्ष देणारे विशेष प्रकटीकरणाचे प्रमुख, अंतिम आणि पर्याप्त स्वरूप म्हणजे पवित्र शास्त्र होय. वेस्टमिन्स्टर विश्वास-अंगीकार (1.1) याविषयी असेही म्हणतो: 

प्रभूने निरनिराळ्या वेळी आणि विविध प्रकारांनी स्वतःला प्रकट करावे आणि आपली इच्छा आपल्या मंडळीला जाहीर करावी, असे त्याला बरे वाटले. त्यानंतर सत्याचे अधिक उत्तम जतन व प्रसार व्हावा, तसेच देहाच्या भ्रष्टतेपासून आणि सैतानाच्या व जगाच्या दुष्टतेपासून मंडळीची अधिक खात्रीशीर स्थापना व सांत्वन व्हावे, म्हणून त्याने ते संपूर्णपणे लिखित स्वरूपात सोपविले. यामुळे पवित्र शास्त्र अत्यंत आवश्यक ठरते.

हेच विशेष प्रकटीकरण पवित्र आत्मा प्रभावी करतो, जेणेकरून मनुष्याला तारणासाठी, विश्वासासाठी आणि सुभक्तीच्या जीवनासाठी आवश्यक असलेले देवाचे ज्ञान प्राप्त व्हावे, आणि मनुष्याला देवाचे स्वतःविषयीचे प्रकटीकरण प्राप्त व्हावे म्हणून ते सर्वसामान्य प्रकटीकरणाबरोबर एकात्मतेने कार्य करते.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

मॅथ्यू ए. डुड्रेक

मॅथ्यू ए. डुड्रेक

डॉ. मॅथ्यू ए. डुड्रेक हे सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथील रिफॉर्मेशन बायबल कॉलेजमध्ये नव्या कराराचे असोसिएट प्रोफेसर आहेत.