
यहूदाच्या पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
08/01/2026
एज्राच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
15/01/2026योनाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
योनाची साहसी कथा पवित्र शास्त्रातील सर्वात परिचित कथांपैकी एक आहे. मंडळीमधील कोणत्याही मुलाला तुम्ही ही गोष्ट कशाविषयी आहे असे विचारल्यास तुम्हाला ठोस उत्तर मिळेल; हबक्कूकसारख्या इतर कोणत्याही लहान संदेष्ट्याविषयी विचारल्यास मात्र अशी शक्यता फारच कमी आहे. पण हे पुस्तक जरी लक्षात राहण्यासारखे असले, तरी ते खरोखर समजले गेले आहेच असे आवश्यक नाही. एक हट्टी संदेष्टा आणि मोठा मासा हे या पुस्तकाचे मुख्य केंद्रबिंदू नाहीत. उलट, प्रश्नचिन्हावर समाप्त होणारे हे पुस्तक देवाचे गौरव व कृपेच्या प्रकाशात आपल्या जीवनाचा अर्थ नेमका काय आहे, यावर तर्कशुद्ध आणि मनपूर्वक विचार करण्यास प्रवृत्त करते.
1. योनाचे पुस्तक आज्ञाधारकपणे देवाचे अनुसरण कसे करावे याविषयी आपल्याला साहाय्य परवू शकते.
योना त्या देवाला—ज्याचे आज्ञापालन मनुष्याला अनिवार्यच आहे—कसा प्रतिसाद देऊ नये हे जणू प्रत्यक्ष कार्यशाळेसारखे समजावून सांगतो. हे पुस्तक परमेश्वराला सर्वस्वी सार्वभौम म्हणून आपल्या समोर उभे करते. तो सूचना देत नाही; तो आज्ञा करतो. अगदी परधर्मीय खलाशी सुद्धा म्हणतात, “हे परमेश्वरा, तुला इष्ट ते तू करतोस” (योना 1:14), आणि अशा रीतीने ते परमेश्वर सर्वशक्तिमान आहे, हे मान्य करतात. देव निर्णायकरीत्या हस्तक्षेप करतो. त्याने “समुद्रात प्रचंड वायू सोडला” (योना 1:4). त्यानेच “एक प्रचंड मासा सिद्ध केला होता” (योना 1:17). संपूर्ण घटना घट्टपणे देवाच्या हातात, व त्याच्या नियंत्रणाखाली आहे.
देवाच्या आज्ञा अगदी स्पष्ट आहेत. त्याच्या सरळ आज्ञा जणू एखाद्या बालकाला संबोधल्यासारख्या ऐकू येतात: “उठ,” “जा,” आणि “मोठ्याने सांग.” योनाने अवज्ञा केली, कारण त्याला माहिती नव्हती म्हणून, किंवा त्याला घाई झाली होती म्हणून, किंवा बाह्य दबावामुळे तो प्रभावित झाला म्हणून नव्हे; त्याला फक्त आज्ञा पाळायची नव्हती. आणि त्याच्या या अवज्ञेमुळे संकट ओढवले. आपल्या बंडखोरीमुळे आपणही जाणीवपूर्वक देवाचा आशीर्वाद नाकारतो आणि त्याला कठोर वागण्यास आमंत्रित करतो.
परंतु आज्ञाधारकपणा हा खऱ्या धर्माचा एक पुरावा असला, तरी खरे आत्मसमर्पण हे देवावर प्रेम करणाऱ्या अंतःकरणातून प्रवाहित होते. योनाने आपल्या धार्मिक पात्रतेविषयी बढाई मारली आणि सुबोध ईश्वरशास्त्रीय तत्त्वे उच्चारली, परंतु आपण देवाचे भय बाळगतो याविषयी तो प्रत्यक्षात केवळ बढाई मारत होता (योना 1:9). प्रत्यक्षात, अंतःकरणाने आणि आचरणाने तो “परमेश्वरासमोरून पळून चालला” होता (योना 1:3, 10). योना आत्मिकदृष्ट्या अस्वस्थ होता. मोठ्या माशाच्या पोटातून त्याने केलेली बाहेरून भक्तिपूर्ण भासणारी पण आत्म-अभिनंदनाने भरलेली प्रार्थना, आणि पुस्तकाच्या शेवटी दिसणारा त्याचा संतापयुक्त बालिश हट्ट—या सर्वांमध्ये योनालाही निनवेच्या जागृतीची खूण ठरलेल्या त्याच प्रकारच्या हृदयपरिवर्तनाची आवश्यकता होती, हे उघड होते.
वारा, लाटा, वनस्पती, प्राणी आणि अगदी परराष्ट्रीय (अन्यधर्मीय) लोक यांचा आज्ञाधारकपणा या आत्मतुष्ट संदेष्ट्याच्या हट्टी स्वेच्छाचाराच्या तीव्र विरुद्ध उभा राहतो. तो आपल्यासाठी सतत सावध करणारा धडा ठरू द्या.
2. योनाचे पुस्तक सुवार्ता-सेवेचे मार्गदर्शक आहे.
हे विधान काहींना अगदी स्वाभाविक वाटेल, तर काहींना थोडे आश्चर्यकारक. परंतु स्पष्ट आहे की, योना हे देवाच्या मिशनविषयक कार्याचे पुस्तक आहे. हरवलेल्या लोकांविषयी असलेल्या त्याच्या करुणेमुळेच देवाने योनाला निनवेकरांना आपल्या येऊ घातलेल्या क्रोधाची चेतावणी देण्यासाठी पाठवले (योना 4:2, 11). पण देवाने जणू “चुकीचा” मिशनरीच निवडला आहे असे वाटते! या वृत्तांतात योनाबाबत आदर्श म्हणावे असे जवळजवळ काहीही दिसत नाही—आणि बहुधा मुद्दा हाच आहे. योनाच्या मिशनविषयक अनिच्छेने त्याचे पुस्तक वाचणाऱ्यांना लज्जित करणे अपेक्षित होते, जेणेकरून “राष्ट्रांसाठीचा प्रकाश” (यशया 49:6) किती क्षीण झाला आहे, याची त्यांना जाणीव होईल. आपल्यापैकी ज्यांना दया दाखवली गेली आहे त्या प्रत्येकाने, या दयाळू देवाचा संदेश जगासमोर मांडण्यास मनापासून आवेशी असले पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, योनाचे अपयश हे सिद्ध करते की खरा मिशनरी नायक योना नाही, तर देव स्वतः आहे. योनाच्या अनिच्छेने केलेल्या सेवेने इस्राएलाला त्या महान संदेष्ट्याची वाट पाहण्यास तयार केले, जो मनापासून हरवलेल्यांचा शोध घेऊन त्यांचे तारण करील (लूक 19:10). “पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील” देवाच्या या ध्यासपूर्ण प्रतिज्ञेची पूर्तता केवळ ख्रिस्तच करू शकतो (उत्पत्ति 12:3). निनवेतील जागृती पेंटेकॉस्टचे आणि राष्ट्रांवरील सैतानाची पकड शिथिल होण्याचे आगाऊ दर्शन घडवते. ख्रिस्त या देवदत्त, अवर्णनीय देणगीमुळे, एक दिवस “हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित” मुक्त झालेले लोक वधलेल्या कोकराच्या अद्वितीय योग्यतेचे स्तोत्र गातील (प्रकटीकरण 5:11–12). खरोखरच, “तारण परमेश्वराकडूनच आहे” (योना 2:9).
योना हरवलेल्या लोकांविषयी देवाचे प्रेमळ अंतःकरण प्रगट करतो. हे तो स्वतःच्या कोणत्याही श्रेष्ठ सद्गुणामुळे नव्हे, तर ख्रिस्ताच्या एक प्रतीकस्वरूप रूपात करतो. योनाकडे लक्ष देण्याचे कारण तो देवभक्तीचा आदर्श आहे हे नसून, त्याच्या माध्यमातून जो ख्रिस्त आपल्या पुढे चित्रित केला जातो, त्या ख्रिस्ताची, योनाप्रमाणेच, आपल्यालाही किती खोल गरज आहे हे समजते.
3. योनाचे पुस्तक येशूविषयी आहे.
जेव्हा येशूच्या विरोधकांनी त्याने दावा केलेल्या ओळखीची पुष्टी करणारे चिन्ह मागितले, तेव्हा त्याने आपल्या काळातील लोकांना योनाच्या कथेकडे पाहण्यास सांगितले (मत्तय 12:39). योनाच्या वृत्तांतातील निर्णायक टप्प्याचा उलगडा येशूने स्वतःचे मरण व पुनरुत्थानाची सावली, एक प्रतीकात्मक छाया, म्हणून केला. नाविकांनी त्याला समुद्रात फेकून दिले, तेव्हा ते त्याचा अंतच घडवत आहेत, अशीच त्यांची धारणा होती; म्हणून योना रुपकात्मक अर्थाने “मेला” होता (योना 1:14). जहाज मोडून टाकण्याची धमकी देणाऱ्या “मोठ्या वादळातून” सुटका आणि मास्याच्या पोटात तीन दिवसांचा त्याचा प्रवास, या दोन्ही गोष्टी त्याच्या जिवंत राहण्याच्या शक्यतेच्या विरुद्ध होत्या (योना 1:4). तो मासा म्हणजे योनाची जलसमाधीच ठरली; आणि समुद्रकिनारी त्याला ओकून टाकण्यात आले तो क्षण त्याच्या नव्या जीवनाचा उंबरठा ठरला. परकीयांचा द्वेष करणारा आणि स्वार्थी आरामाची ओढ जपणारा “जुना योना” हा “जुना मनुष्य” (इफिसकरांस 4:22) याचे प्रतीक आहे; तर नवीन योना—अजूनही फारसा घडून न आलेला, अधिक उग्र, कच्च्या स्वरूपात “नवीन मनुष्य” (इफिसकरांस 4:23–24) याचे प्रतीक आहे. येशूही मरण पावणार आणि मरणातून उठणार होता. त्या ख्रिस्ताशी असलेले आपले ऐक्यच आपल्याला नवी उत्पत्ती बनवण्याचा आणि देवाचे प्रतिफळ मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे (रोमकरांस 6:8).
योनाचा प्रतीकात्मक मृत्यू आणि पुनरुत्थान निनवेकरांना दिलेल्या त्याच्या पश्चात्तापाच्या संदेशाचीही पुष्टी करीत होते. आणि जर आपण येशूच्या सुवार्तेला प्रतिसाद देण्यात अपयशी ठरलो, तर आपल्या हातात कोणताही सबब उरत नाही. “निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.” (लूक 11:32).
योनाचे पुस्तक येशूविषयी आहे (लूक 24:44–47). केवळ ख्रिस्तामध्येच आपल्याला देवापुढे उभे राहण्यासाठी आवश्यक असलेला आज्ञाधारकपणा आणि आपल्या देवभक्तिपूर्ण जीवनप्रवासाची सुरुवात करण्यासाठी लागणारी मदत मिळते. त्याच्यामध्येच आपल्याला देवाची ती दया अनुभवता येते, जी फिरून आपल्यामध्ये इतरांवर दया करण्याची प्रेरणा निर्माण करते.
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


