
योनाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
13/01/2026
पेत्राचे पहिले पत्र याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
20/01/2026एज्राच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
एज़्रा आणि नहेम्या ही दोन्ही पुस्तके मिळून इस्राएलाच्या इतिहासातील सुमारे 100 वर्षांचा काळ व्यापतात. हा काळ ख्रिस्तपूर्व 538 मध्ये कोरेश राजाने यहुदी लोकांना त्यांची वतनभूमी असलेले यरुशलेम आणि यहूदा येथे परत जाण्यासाठी काढलेल्या फर्मानापासून ते ख्रिस्तपूर्व 433–432 मध्ये नहेम्या यरुशलेममध्ये परत येईपर्यंतचा आहे. या 100 वर्षांच्या कालावधीत झालेल्या सर्व घटना प्रामुख्याने दोन कालखंडांभोवती केंद्रित आहेत —ख्रिस्तपूर्व 538–515 (एज्रा 1–6) आणि ख्रिस्तपूर्व 458–433 (एज्रा 7– नहेम्या 13). पहिला कालखंड मंदिराच्या पुनर्बांधणीवर केंद्रित आहे. दुसरा कालखंड एज्राच्या नेतृत्वाखाली नियमशास्त्राद्वारे लोकांचे पुनरुज्जीवन आणि नहेम्याच्या नेतृत्वाखाली तटाची पुनर्बांधणी याभोवती केंद्रित आहे. या काळांत कराराची कहाणी पुढे जात राहिली आणि ज्या तारणकर्त्याविषयी देवाने अभिवचन दिले होते त्याच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आगमनासाठी जगाला तयार करण्यात आले..
तुम्ही एज्रा या पुस्तकाचा विचार करताना, तुम्हाला खालील तीन गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
1. कोरेश राजापेक्षाही महान आणि अधिक दयाळू असा राजा आहे, ज्याने देवाच्या लोकांसाठी मुक्तीचे वर्ष जाहीर केले आहे.
एज्राच्या सुरुवातीच्या अध्यायांमध्ये आपण देवाच्या लोकांच्या जीवनातील त्या काळाशी परिचित होतो, जेव्हा त्यांच्या पापामुळे त्यांना त्यांच्या भूमीतून 70 वर्षांसाठी विस्थापित व्हावे लागले होते. परंतु देवाने एका पारशी राजाचे मन असे प्रवृत्त केले की, त्याने त्या लोकांना स्वातंत्र्य दिले आणि देवाने आपल्या लोकांची अंतःकरणेही अशी जागृत केली की, सत्तर वर्षांपूर्वी एका परधर्मी राजाने (नबुखद्नेस्सरने) नष्ट केलेले देवाचे मंदिर पुन्हा उभारण्यासाठी ते आपल्या मायदेशी परतले. ही एक आश्चर्यकारक कथा आहे, जी आपत्ती आणि कराराचे वचन; संकट आणि आनंद; भीती आणि विश्वास; कठीण परिस्थिती आणि आशा; अडथळे आणि मुक्ती; दुःख आणि तारण; कंप आणि भरवसा; चिंता आणि विस्मय यांनी परिपूर्ण आहे.
ज्या प्रभूने आपल्या योग्य वेळी कोरेश आणि परत येणाऱ्या लोकांना प्रेरित केले, त्याच प्रभूने आपल्या योग्य वेळी आपल्या पुत्राला पाठवले, यासाठी की त्याने “धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे; परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी” (लूक 4:18–19). आजही तो तुमच्या परिस्थितीवर सत्ता गाजवत आहे. त्याने तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी ठेवले आहे. तुम्ही भविष्याकडे आशेने पाहू शकता, कारण तुम्हाला माहीत आहे की आताही तो तुमच्या अडचणींचा उपयोग तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या महान नावाची महती प्रगट करण्यासाठी करीत आहे. ख्रिस्तामधील आपल्या स्वातंत्र्याला आपण स्वेच्छेने सेवा करण्याच्या आणि त्यागमय देणगी देण्याच्या अंतःकरणाने प्रतिसाद देऊ या. आपण त्याची उपासना करून आणि त्याच्या गौरवासाठी कार्य करून देवाविषयीचे आपले प्रेम प्रगट करू या.
2. पुनर्बांधणी केलेले मंदिर हे येणाऱ्या खऱ्या मंदिराची, म्हणजेच येशू ख्रिस्ताची, केवळ एक छाया होती; आणि देवाच्या लोकांना पुनर्बांधणी करताना ज्या विरोधाला सामोरे जावे लागले, त्याने ख्रिस्ताच्या जीवनात आणि सेवाकार्यात होणाऱ्या अधिक मोठ्या विरोधाचा जणू आगाऊ संकेत दिला.
एज्राचे पुस्तक देवाच्या लोकांना त्याच्या अभिवचनांविषयी तो विश्वासू आहे, याची आठवण करून देऊन त्यांना सांत्वन देते. तसेच, कठीण काळात देवाच्या लोकांनी देवाप्रती विश्वासू राहावे, असे त्यांना आव्हान देते. अश्रू आणि निराशेमधून आपण आपल्या तारणाऱ्याकडे पाहतो, ज्याने आपल्यासाठी दुःख सहन केले; त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो आणि तो गौरवाने परत येण्याची वाट पाहतो. एक असा दिवस येईल जेव्हा निराशेचे खोरे आनंदाच्या शाश्वत पर्वतात रूपांतरित होईल, जिथे आपण येणाऱ्या नगरात आपल्या प्रभूची आणि तारणाऱ्याची उपासना युगानुयुगे करत राहू. विश्वासणाऱ्यांनी देवाच्या गौरवासाठी काम करत असताना दुःखाची अपेक्षा ठेवली पाहिजे आणि निराशाजनक काळात त्याच्यावर अवलंबून राहिले पाहिजे. आपण प्रभूचे कार्य करणाऱ्यांना आनंदाने आपली संसाधने दिली पाहिजेत, ख्रिस्ताच्या नावाने सेवा करण्यासाठी देवाच्या लोकांसोबत एकत्र झाले पाहिजे, ज्यांना छळवणूकीमुळे राज्याचे कार्य थांबवण्यास भाग पाडले गेले आहे अशा विश्वासणाऱ्यांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे आणि सुवार्तेच्या कार्यात गुंतलेल्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
3. देव आपल्या गौरवासाठी आणि मुक्तीच्या हेतूंकरिता सर्व गोष्टींचा घटनाक्रम दैवी रीतीने जुळवून आणतो.
परत आलेल्या विस्थापित लोकांनी निराशाजनक परिस्थितीमुळे मंदिराचे काम थांबवले होते. परंतु देवाच्या संदेष्ट्यांनी त्यांना देवाच्या वचनाची आठवण करून दिली. 4 वर्षांच्या आत देवाने आपल्या दैवी कारभाराने असे घडवून आणले की त्याचे मंदिर पूर्ण झाले आणि उपासना पुन्हा सुरू झाली. ही आश्चर्यकारक कृपेची, दैवी कारभाराची आणि आनंदाची कथा आहे. म्हणूनच, जेव्हा आपण निराश होतो आणि देवाने आपल्याला जे काम करण्यासाठी बोलावले आहे ते थांबवण्याचा मोह आपल्याला होतो, तेव्हा आपण सत्यासाठी देवाच्या वचनाकडे वळले पाहिजे, ख्रिस्तामध्ये विश्रांती घेतली पाहिजे आणि त्याच्या मार्गांवर चालले पाहिजे, जेणेकरून पूर्ण आनंदाचा अनुभव घेता येईल; तसेच आपल्या चांगल्यासाठी आणि त्याच्या गौरवासाठी तो सर्व गोष्टी एकत्र आणील, या देवाच्या दैवी हेतूंवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपला पूर्ण आनंद हा ख्रिस्ताशी असलेल्या आपल्या ऐक्यातून आणि त्याच्या वचनाचे पालन करण्यातून येतो. या प्रकाशात, आपण इतरांना राज्याच्या कार्यात पवित्र शास्त्रातील शब्द आणि प्रार्थना यांद्वारे मदत करावी, देवाने आपल्याला जिथे बोलावले आहे त्या ठिकाणी परिश्रमपूर्वक काम करावे, ख्रिस्तामध्ये राहिल्याने आनंद मिळतो हे इतरांना शिकवावे आणि नियमितपणे सामूहिक उपासनेत भाग घ्यावा.
एज्रा याजकाने यरुशलेमकडे परतीचा प्रवास केल्यावर शेकडो वर्षांनी दुसरा एक याजक यरुशलेमेत आला. परंतु हा याजक स्वर्गातून पृथ्वीवर आला, जेणेकरून त्याने स्वतःचे बलिदान देऊन देवाच्या लोकांची मुक्ती निश्चित केली. कारण त्याचे बलिदान वधस्तंभावर परिपूर्ण आणि अंतिम होते, त्यामुळे आपण दृढ विश्वासाने कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ शकतो आणि आपल्या देवाला आपले संरक्षण करण्यासाठी, आपल्या गरजा भागवण्यासाठी आणि आपल्यासाठी त्याचे हेतू पूर्ण करण्यासाठी धैर्याने विनंती करू शकतो. एज्राचे पुस्तक आपल्याला प्रोत्साहित करते की, आपला याजक व राजा ह्याने आपल्याला ज्यासाठी बोलावले आहे ती सत्कृत्ये आपण विश्वासाने करीत राहावे आणि त्याचे ईश्वरीय पूर्वनियोजन, संरक्षण आणि पुरवठा यांवर भरोसा ठेवावा.
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


