3 Things You Should Know about Habakkuk
हबक्कूकविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
06/01/2026
3 Things You Should Know about Jonah
योनाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
13/01/2026
3 Things You Should Know about Habakkuk
हबक्कूकविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
06/01/2026
3 Things You Should Know about Jonah
योनाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
13/01/2026

यहूदाच्या पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

3 Things You Should Know about Jude

आज अनेकांना असा मोह होतो की सार्वकालिक परमसत्यासाठीचा संघर्ष सोडून द्यावा, येशू हाच स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग आहे हा विश्वास सोडून द्यावा आणि जगभर आढळणाऱ्या विविध धर्मीयांच्या मतांना तारणाचे तितकेच समरूपी वैध मार्ग मान्य करावे. दुःखाची गोष्ट म्हणजे ही की, मंडळ्याही अशा सर्वव्यापी शिकवणीपासून अलिप्त राहिलेल्या नाहीत; उलट, काहींनी या दबावापुढे शरणागती पत्करून सत्याकडे पाठ फिरवली आहे आणि भ्रामक मतांचा स्वीकार केला आहे. यहूदाचे पत्र, ज्यात या प्रश्नांवर बरेच काही सांगितले आहे, त्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष केले जाते. कदाचित याचे कारण असे की हे पत्र लहान असले तरी ते गोंधळात टाकू शकणाऱ्या कठीण संदर्भांनी भरलेले आहे. तरी, जे “देवपित्याला प्रिय” आहेत व जे “ख्रिस्त येशूसाठी त्याने राखून ठेवले आहेत, अशा सर्व बोलावलेल्यांनी” (यहूदा 1) विश्वासाची वकिली करावी आणि त्या विश्वासात दृढ राहावे, याची आठवण करून देणारा यहूदाचा संदेश आज विशेषतः आवश्यक आहे. 

ज्याच्या नावावर हे पत्र आहे त्या यहूदाचा परिचय असा आहे की तो येशू आणि याकोब या दोघांचा धाकटा भाऊ होता; आणि याकोब हा सुरुवातीच्या मंडळीतील एक महत्त्वाचा पुढारी होता तसेच त्याच्या नावावर असलेल्या ह्या पत्राचा लेखकही होता (मार्क 6:1–6; प्रेषितांची कृत्ये 15:13–21; गलतीकरांस 2:9; याकोब 1:1). विशेष म्हणजे, येशूच्या पृथ्वीवरील जीवनकाळात आणि सेवाकाळात यहूदा त्याचा अनुयायी नव्हता (योहान 7:5); पण येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याला तारणदायी  विश्वास प्राप्त झाला (प्रेषितांची कृत्ये 1:12–14). आशयात असलेल्या साम्यामुळे, यहूदाचे हे पत्र बहुधा 2 पेत्राच्या पुस्तकाच्या जवळपास त्याच वेळी, म्हणजेच इसवी सन 60 च्या दशकाच्या मध्यकाळात, लिहिले गेले असावे.

यहूदाचे पत्र हे दाखवते की तो एका विशिष्ट मंडळीला, किंवा मंडळ्यांच्या एका संघाला लिहित होता, जिथे “कित्येक माणसे चोरून आत शिरली” होती, आणि जी “अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप” देत होती, “आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला” नाकारत होती. (यहूदा 4). जुन्या करारातील आणि यहुदी साहित्यातील अनेक दाखल्यांवरून यहूदाचे वाचक बहुधा यहुदी ख्रिस्ती असावेत, जरी काही विद्वानांचे मत असे आहे की हे उल्लेख त्याच्या वाचकांपेक्षा यहूदाच्या स्वतःच्या पार्श्वभूमीबद्दल अधिक बोलतात. 

महत्त्वाचे म्हणजे, यहूदा आपल्या कृतीच्या आवाहनाचा पाया देवाच्या करारबद्ध प्रीतीमध्ये रोवतो. तो प्रथम देव कोण आहे या प्रकाशात विश्वासणाऱ्यांना ते कोण आहेत हे सांगतो; आणि मग त्यांना विश्वासाकरिता झगडण्यास (वकिली करण्यास) व त्या विश्वासात टिकून राहण्यास बोलावतो. त्रैक्य देवाचा गौरव, ऐश्वर्य, प्रभुत्व आणि अधिकार यांवर तो आपल्या वाचकांचे विचार केंद्रित करतो, जेणेकरून ते विश्वासासाठी लढण्यास आणि त्यात स्थिर राहण्यास सक्षम होतील.

1. विश्वासणाऱ्यांना देवाने बोलावले आहे.

यहूदा आपल्या पत्राचा प्रारंभ “बोलावलेल्यांस” (यहूदा 1) असे संबोधून करतो. जेव्हा देव लोकांना स्वतःकडे बोलावतो, तेव्हा त्यांचे डोळे उघडले जातात “जेणेकरून त्यांनी अंधारातून प्रकाशाकडे व सैतानाच्या सत्तेतून देवाकडे वळावे” (प्रेषितांची कृत्ये 26:18). विश्वासाद्वारे ख्रिस्ताशी एकरूप झाल्यावर विश्वासणारे “देवपित्याला प्रिय असलेले” (यहूदा 1) आहेत. ख्रिस्तामध्ये “जगाच्या स्थापनेपूर्वी” (इफिसकरांस 1:4) निवडलेले असल्याने ते “ख्रिस्त येशूसाठी राखलेले” (यहूदा 1) आहेत. देव ज्यांना बोलावतो त्यांना तो नीतिमानही ठरवतो आणि त्यांचे गौरवही करतो (रोमकरांस 8:30). म्हणूनच देव एकटाच “तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास समर्थ आहे” (यहूदा 24). 

2. विश्वासणाऱ्यांनी विश्वासाकरिता संघर्ष करावा (वकिली करावी).

यहूदाला ज्यांना तो लिहित होता त्या विश्वासणाऱ्यांना उद्देशून “लिहिणे आवश्यक वाटले,” आणि त्यांना “एकदाच पवित्र जनांच्या हवाली केलेल्या त्या विश्वासाकरिता तळमळीने संघर्ष करा” (यहूदा 3) असे आग्रहाने सुचवले. तो विश्वासणाऱ्यांना आठवण करून देतो की त्यांनी ज्या विश्वासाला इतके प्राणप्रिय मानले आहे, त्या विश्वासासाठी त्यांनी लढा दिला पाहिजे, विशेषतः त्यांच्या मंडळ्यांमध्ये चोरून शिरलेल्या आणि देवाच्या कृपेचे विकृतीकरण करणाऱ्या शिकवणुकींच्या पार्श्वभूमीवर. त्यांना विश्वासाकरिता झगडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, यहूदा दुष्टांवर असलेल्या देवाच्या न्यायाची आठवण करून देतो आणि भविष्यात दुष्टांच्या होणाऱ्या न्यायनिवाड्याविषयी चेतावणी देण्यासाठी भूतकाळातील उदाहरणांचा उपयोग करतो (यहूदा 5–16).

3. विश्वासणाऱ्यांनी विश्वासात टिकून राहावे.

विश्वासणारे सत्याबाबत उदासीन किंवा सुस्त होऊ शकतात, खोटे शिक्षण सहजपणे स्वीकारू शकतात, देवाच्या खऱ्या कृपेचे विकृतीकरण करू शकतात आणि ख्रिस्ताला धनी व प्रभू म्हणून नाकारू शकतात; म्हणून यहूदा या शब्दांत त्यांना आवाहन करतो की, “तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा, सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतीमध्ये राखा” (यहूदा 20–21). याशिवाय, बलवान विश्वासणाऱ्यांनी दुर्बळांवर दया करावी आणि त्यांना सत्याची आठवण करून देत खोट्या शिकवणीपासून पळ काढण्यास मदत करावी (यहूदा 22–23).

कदाचित तुम्ही आज विश्वासाकरिता चाललेली झुंज सोडून दिली असेल, अनेकमतवादाचा स्वीकार करण्याच्या आपल्या संस्कृतीच्या हाकेपुढे नकळत शरण पत्करली असेल. किंवा कदाचित तुम्ही विश्वासाच्या मध्यवर्ती तत्त्वांपासून पतन पावला असाल आणि त्यांच्या ऐवजी दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला असेल. कदाचित जीवनातील कठीण प्रसंगांमुळे तुम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास थांबवला असेल आणि आता शास्त्राचा चिकाटीने, स्थिर मनाने अभ्यास करण्याच्या आपल्या बांधिलकीचे पुन्हा नूतनीकरण करण्याची तुम्हांला गरज भासत असेल. किंवा कदाचित आजही खोट्या शिकवणुकी मंडळ्यांत चोरून शिरकाव करीत आहेत, याची ताजी आठवण करून देण्याची तुम्हाला गरज असेल. कदाचित अनेकमतवादी समाजाच्या मध्यभागी त्रैक्य देव किती महान आहे, हे पुन्हा मनावर दृढपणे बिम्बविण्याचीही गरज असेल. काहीही असो, यहूदाचा संदेश आपणा सर्वांसाठी योग्य वेळी आलेला आहे. तो आपल्याला विश्वासाकरिता झगडण्यास आणि विश्वासात टिकून राहण्यास बोलावतो, तसे करताना आपल्या तारणाच्या खातरीवर आणि देवाचे गौरव, ऐश्वर्य, प्रभुत्व व अधिकार यांच्या महान आणि सार्वकालिक वैभवावर आपल्याला स्थिर उभे करतो.

हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

सारा आयविल
सारा आयविल
सारा आयविल (टीएचएम, डॅलस थियोलॉजिकल सेमिनरी) या बायबल शिक्षिका आणि कॉन्फरन्स वक्त्या आहेत, ज्या त्यांच्या पती आणि चार मुलांसह मॅथ्यूज, नॉर्थ कॅरोलिना येथे राहतात आणि ख्राईस्ट कॉव्हनंट चर्च (पीसीए) च्या सदस्य आहेत. त्या “द गॉड हू हिअर्स” आणि लुक : “दॅट यु मे हॅव सर्टिनीटी कन्सर्निंग द फेथ” यासह अनेक पुस्तके आणि बायबल अभ्यासांच्या लेखिका आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया www.sarahivill.com या संकेतस्थळाला भेट द्या.