
एज्राच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
15/01/2026
मलाखी या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
22/01/2026पेत्राचे पहिले पत्र याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
पेत्राचे पहिले पत्र हे ख्रिस्ती लोकांच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे पत्र आहे. पेत्राचे पहिले पत्र याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी येथे दिल्या आहेत:
1. या पत्राचा लेखक पेत्र, ज्याला येशूने विशेषपणे निवडून ‘खडक’ असे नाव दिले (मत्तय 16:18), तो या पत्रातही त्याच प्रकारच्या प्रतिमांचा उपयोग करतो.
नक्कीच, या वचनाविषयी आणि येशूच्या या म्हणण्याचा नेमका अर्थ काय होता याविषयी बरीच चर्चा झालेली आहे; परंतु असे स्पष्ट दिसते की येशू पेत्रालाच संबोधित करीत आहे, ज्याने अगदी थोड्या वेळापूर्वीच येशूविषयी ही कबुली दिली होती की तो “ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र” आहे (मत्तय 16:16). त्या घटनेनंतर पेत्राला खडक आणि दगडांविषयी एक वेगळे आकर्षण निर्माण झाले असेल, असे आपण गृहीत धरू शकतो. त्यामुळेच कदाचित, आपल्या पहिल्या पत्रात, म्हणजे 1 पेत्र 2:4–8 मध्ये खडक किंवा दगडांचा उल्लेख करून पेत्राने या प्रतिमेला विशेष महत्त्व दिले आहे, हे पाहणे लक्षणीय आहे. तो यशया आणि अंतिम हलेल (स्तवन) स्तोत्रांमधील (स्तोत्रसंहिता 113–118, जे वल्हांडणावेळी वाचले जात असत) तीन वचने उद्धृत करतो, ज्यांत आपण विशेषतः दगड किंवा खडकांचा उल्लेख पाहू शकतो.
एका उद्धरणात ‘मुख्य कोनशिला’ असा उल्लेख आहे, जी देव ‘सियोनमध्ये घालेल’—हा येशूचा संदर्भ आहे, तो दगड ज्याला बांधकाम करणारे नाकारतील (यशया 28:16; स्तोत्रसंहिता 118:22). येशूच्या काळात यहुद्यांनी त्याला कशा प्रकारे नाकारले, याचा विचार करा. शेवटचा संदर्भ अशा एका दगडाविषयी, किंवा खडकाविषयी आहे, ज्यावर मनुष्य अडखळतील (यशया 8:14–15). ‘मनुष्यांनी नाकारलेला, पण देवाने निवडलेला आणि त्याला बहुमोल असलेला’ हा खडक म्हणजे, अर्थातच, येशू (1 पेत्र 2:4).
ख्रिस्ती लोक हे ‘जिवंत धोंडे’ आहेत, जे येशू सध्या बांधत असलेल्या मंडळीमध्ये काळजीपूर्वक आणि सुरक्षितपणे बसविले गेले आहेत, आणि ज्यात ख्रिस्त हा मुख्य कोनशिला आहे, हे पेत्राला त्याच्या वाचकांना समजावून सांगायचे आहे. हे बांधकाम (मंडळी) या एका वचनावर उभे आहे: “तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही” (मत्तय 16:18).
2. पेत्राचे पहिले पत्र हे प्रामुख्याने ख्रिस्ती जीवनाच्या स्वरूपाविषयी आहे.
पेत्र या पत्राची सुरुवात करताना असे म्हणतो की ख्रिस्ती लोक “देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून : तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळोत.” (1 पेत्र 1:2). या पत्रातला अर्ध्याहून अधिक भाग पवित्रीकरण नेमके कसे दिसते, याविषयी आहे; पहिल्या अध्यायात तो लेवीय पुस्तकातील ‘पवित्रतेचे नियम’ म्हणून ओळखले जाणारे वचन उद्धृत करतो: “तुम्ही पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे” (1 पेत्र 1:16; लेवीय 11:44, 45; 19:2; 20:7). त्यानंतर, पत्राच्या उर्वरित भागात, दैनंदिन जीवनातील संघर्षांमध्ये पवित्रता कशी प्रकट होते याविषयी तो व्यावहारिक भाष्य करतो: कामाच्या ठिकाणी आणि समाजात, वैवाहिक जीवनात आणि मंडळीतील जीवनात अधिकार्यांच्या अधीन राहणे (1 पेत्र 2:13–25; 3:1–7; 5:1–11).
पवित्रता जीवनाच्या सर्व भागांमध्ये अतिशय व्यावहारिक मार्गांनी स्वतःचे दर्शन घडवते. पेत्राने जे काही सांगितले आहे, त्यापैकी काही गोष्टींचा व्यवहारात उपयोग करणे खूप कठीण वाटते, पण तो आपल्या वाचकांना आठवण करून देतो, “कारण ह्याचकरता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे.” (1 पेत्र 2:21). येशूने आपल्या रक्ताद्वारे आपली मुक्तता केली आहे, हे समजल्यावर, त्याच्यासाठी आपण ज्या अत्यंत कठीण परिस्थितींना सामोरे जाण्यास बोलावले जाऊ, त्या परिस्थितींमध्येही आपला क्रूस मोठ्या धैर्याने वाहण्यास आपल्याला बळ मिळते.
3. पहिले पेत्र हे पत्र प्रामाणिक आहे.
पेत्र आपल्या संदेशावर भावनिक गोडवे चढवत नाही, तर आपल्या सहविश्वासणाऱ्यांना आठवण करून देतो की ख्रिस्ती जीवन हे एक “युद्ध” आहे, ज्यात ख्रिस्ती लोक “प्रवासी व परदेशवासी” आहेत (1 पेत्र 2:11). ख्रिस्ती लोक चुकीच्या वागणुकीमुळे दुःख सोसू शकतात, पण काही वेळा ते “नीतिमत्वासाठी” दुःख सोसतील (1 पेत्र 3:13–14, 17). ‘चांगले’ काम करणे हे काही वेळा, येशूला तारणारा आणि प्रभू म्हणून न ओळखणाऱ्यांच्या दृष्टीने अपमानास्पद मानले जाईल. अशा परिस्थितीत आपण “तर ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र’ मानावे; आणि आमच्या “ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणार्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध” असावे(1 पेत्र 3:15). आपण ख्रिस्ताची, जो आपला स्वामी आहे, सेवा करतो हे लक्षात ठेवल्यास, जेव्हा आपण या युद्धक्षेत्रात असतो, तेव्हा योग्य निवड करण्यास आणि योग्य शब्द निवडण्यास आपल्याला मदत होईल. 1 पेत्र 4:12–19 मध्ये, पेत्र ख्रिस्ती लोकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करतो, आपल्या वाचकांना कळकळीने सांगतो की, “तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका.” (1 पेत्र 4:12).
रोमकरांस पत्राच्या 5व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या भागातले पौलाचे स्वर थोडेसे जाणवावेत अशा रीतीने बोलताना, पेत्र ख्रिस्ती लोकांनी क्लेशांमध्ये “आनंदित” व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो (1 पेत्र 4:13; रोमकरांस 5:3). पेत्राच्या मनात अशी दुःखे आहेत, जी आपल्याला निरर्थक वाटतात. आपण घेतलेल्या फारच वाईट निर्णयांमुळे आपल्याला दुःख सहन करावे लागू शकते, पण पेत्र अशा दुःखाविषयी विचार करत आहे, जी ख्रिस्ती लोकांना पवित्र जीवन जगताना आणि आदराने व भीतीने येशूविषयी बोलताना भोगावी लागतात: “ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दु:ख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचा गौरव करावा.” (1 पेत्र 4:16). पेत्र पुढील प्रोत्साहन देतो: “ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दु:ख भोगणार्यांनी सत्कृत्ये करत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावेत.” (1 पेत्र 4:19). ख्रिस्ती लोकांना सुखसोयींच्या निवांत जीवनासाठी बोलावले गेलेले नाही, तर “आज्ञाधारकतेच्या” (1 पेत्र 1:2) जीवनासाठी बोलावले आहे. आणि आज्ञाधारक असणे अनेकदा वेदनादायक आणि खर्चीक असू शकते. या परीक्षा आहेत, “’ ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी.” (1 पेत्र 1:7).
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


