Was Mary Born Without Sin?

मरिया निष्पाप जन्माला आली होती का?

06/10/2026
What Is the Christian’s Comfort in Death?

मृत्यूसमयी ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचे सांत्वन काय आहे?

13/10/2026
Was Mary Born Without Sin?

मरिया निष्पाप जन्माला आली होती का?

06/10/2026
What Is the Christian’s Comfort in Death?

मृत्यूसमयी ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचे सांत्वन काय आहे?

13/10/2026

मंडळीने आपल्या दिव्यांग सदस्यांची काळजी कशी घ्यावी?

How Can the Church Care for Its Disabled Members?

माझ्या सध्याच्या मंडळीत चिल्ड्रन्स मिनिस्ट्री डायरेक्टर (बाल सेवाकार्य संचालक) म्हणून पाचारण झाल्यानंतर काही आठवड्यांतच, मंडळीच्या एका एल्डर (वडील) आणि त्यांच्या पत्नीने एका बैठकीची विनंती केली. त्यांनी या महत्त्वपूर्ण प्रश्नाने सुरुवात केली: “तुम्ही येथे आमच्या चर्चमधील सर्व मुलांचे सेवाकार्य करण्यासाठी आला आहात, की केवळ बहुतांश मुलांचे?” योग्य उत्तर (अर्थातच, सर्व मुलांची!) दिल्यानंतर, त्यांनी मला विचारले की, आमच्या मंडळीचे सदस्य असलेल्या आणि दिव्यांगत्वाने बाधित असलेल्या पाच मुलांची आणि त्यांच्या कुटुंबांची काळजी घेण्याची माझी काय योजना आहे. या आव्हानात्मक प्रश्नांनी माझ्या अंतःकरणाला टोचणी लावली आणि माझ्या सेवाकार्याच्या जगाला हादरवून सोडले, आणि याच पार्श्वभूमीवर पुढे आमच्या मंडळीत एक समृद्ध दिव्यांग सेवाकार्य उभे राहिले. 

मंडळीत दिव्यांगत्वाने बाधित झालेल्या व्यक्तींची आणि कुटुंबांची काळजी कशी घ्यावी या प्रश्नाचे उत्तर सर्वप्रथम मंडळीच्या सर्व सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ओळखण्याद्वारे मिळते. दिव्यांग सेवाकार्य हे ऐच्छिक नाही, जरी तुमच्या मंडळीत दिव्यांगत्वाचे प्रमाण जास्त नसले तरीही. हे असे सेवाकार्य नाही ज्याच्यावर आपण मुलांचे, तरुणांचे इत्यादी “अधिक महत्त्वाच्या” सेवाकार्यांनंतर लक्ष केंद्रित करतो. जवळजवळ प्रत्येक स्थानिक मंडळीत कोणी ना कोणी दिव्यांगत्वाने प्रभावित व्यक्ती असतेच, मग ते स्पष्टपणे दिसणारे असो किंवा नजरेआड राहणारे असो. आणि समाजातही असे आणखी बरेच लोक आहेत, ज्यांना मंडळीने आपल्याला कवटाळावे अशी तळमळ असते.

1 करिंथकरांस 12 मध्ये, प्रेषित पौल मंडळीचे वर्णन अनेक अवयवांनी बनलेल्या ख्रिस्ताच्या एका शरीराप्रमाणे करतो. सर्व अवयव भिन्न असूनही आवश्यक कसे आहेत, हे सांगितल्यानंतर तो लिहितो: “शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरूण घालून विशेष मान देतो, आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते; आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. जे उणे आहे त्यांना विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे; अशासाठी की, शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.” (1 करिंथ 12:22, 25). ही सत्ये दिव्यांग व्यक्तींना लागू करताना, आपल्याला केवळ त्यांची चांगली काळजी घेण्यासाठीच पाचारण करण्यात आलेले नाही; तर त्या ख्रिस्ताच्या शरीरासाठी अपरिहार्य आहेत, हे ओळखण्यासाठीही पाचारण करण्यात आले आहे.

पवित्र शास्त्रात मंडळीचे वर्णन केवळ ख्रिस्ताचे शरीर म्हणूनच नाही, तर देवाचे कुटुंब म्हणूनही केलेले आहे. म्हणून, शरीराचा एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींची काळजी घेण्यासाठी आपल्याला पाचारण झाले असले, तरी ती काळजी कौटुंबिक अंतःकरणातून घेतली पाहिजे. ख्रिस्तामधील भाऊ व बहिणी म्हणून आपण कौटुंबिक बंध आणि ख्रिस्तातील परस्पर प्रीती सामायिक करतो. मंडळीची ही दोन चित्रे मनात ठेवून, आपण दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींची आणि कुटुंबांची काळजी कशी घेतो याच्याशी संबंधित पाच व्यावहारिक लागूकरणे खालीलप्रमाणे आहेत:

समावेश 

मंडळीचे कुटुंब म्हणून, सर्वांचा समावेश व्हावा अशी आपली इच्छा असली पाहिजे. विविध प्रकारच्या दिव्यांगत्वांमुळे सहभागी होणे आणि शरीराचा कार्यरत अवयव बनणे कठीण ठरते. म्हणून उपासनेपासून शिष्यत्वापर्यंत, मिशनरी कार्यापासून इतर सर्व सेवाकार्यांपर्यंत, मंडळीच्या प्रत्येक सेवाक्षेत्राकडे पाहून आपण विचारले पाहिजे की आपल्या सर्व सदस्यांचा समावेश कसा निश्चित करता येईल. दिव्यांग व्यक्ती केवळ समाविष्ट होऊ नयेत, तर खऱ्या अर्थाने आपलेपणाने सामील व्हाव्यात, यासाठी आपण शक्य ते सर्व काही केले पाहिजे (इफिसकरांस 2:19).

सुलभ प्रवेश

आपण दिव्यांग व्यक्तींची काळजी घेतो याचा एक अधिक स्पष्ट मार्ग म्हणजे आपल्या इमारती सुलभ करणे होय. जर आपण एकत्र येऊच शकत नसू, तर सर्व लोक एकत्र उपासना कशी करू शकतील आणि एकत्र शिष्यत्वात कसे वाढू शकतील? आपल्या सर्व सुविधा सुलभ करणे ही नेहमीच प्राथमिकता असली पाहिजे. पण त्याबरोबरच आपल्या सर्व सेवाकार्यांचे कार्यक्रमही प्रत्येकासाठी सुलभ करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. श्रवणदोष आणि दृष्टिदोष असलेले, शांत जागेची गरज असलेले, तसेच बौद्धिक अडचणी असलेले लोक, यांची आपण काळजी कशी घेतो? रविवारची शाळा (संडे स्कूल), पवित्र शास्त्र अभ्यास आणि इतर सेवाकार्यांच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी काही व्यक्तींना सोबत्याची गरज आहे का? मंडळीचे कुटुंब म्हणून, सर्व सदस्यांना कौटुंबिक जीवनात पूर्ण प्रवेश मिळावा, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.

कृपादानांचे आदानप्रदान 

देवाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सामूहिक हितासाठी आत्मिक कृपादाने देण्यात आली आहेत (1 करिंथ 12:7). यात दिव्यांग असलेल्या सर्व ख्रिस्ती लोकांचाही समावेश होतो. म्हणून, आपण दिव्यांग व्यक्तींची सेवा आणि काळजी करावयाचीच आहे; पण त्याचबरोबर देवाचे गौरव करण्यासाठी आणि इतरांची सेवा करण्यासाठी त्यांनी आपली कृपादाने वापरावीत म्हणून त्यांना शिष्यत्वात वाढवले आणि सज्ज केले पाहिजे. दिव्यांग व्यक्तींकडे देण्यासाठी असलेल्या कृपादानांशिवाय मंडळीचे कुटुंब अपूर्ण आहे.

खरे नातेसंबंध

हे जग दिव्यांग व्यक्तींचे मानवी मूल्य कमी करून पाहते. कधी कधी ख्रिस्ती लोकांनाही त्या व्यक्तीऐवजी केवळ तिचे दिव्यांगत्वच दिसते. आपण एकमेकांना कुटुंब म्हणून स्वीकारतो, तेव्हा खऱ्या व्यक्तींशी खरे नातेसंबंध जपण्याचा आपण प्रयत्न करतो. दिव्यांग व्यक्तींची केवळ “देखभाल” करण्यापलीकडे जाऊन आपण त्यांच्या विषयी मनापासून जिव्हाळा बाळगला पाहिजे. त्यांचा वृत्तांत जाणून घ्या. त्यांना ओळखा. त्यांच्यावर प्रीती करा. 

काळजीवाहूंना विश्रांती 

मंडळी दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींची काळजी घेऊ शकते असा अंतिम मार्ग म्हणजे त्यांच्या काळजीवाहूंची काळजी घेणे. पालकांना एक रात्र बाहेर जाण्याची संधी देणे किंवा अखंड चालणाऱ्या काळजीच्या जबाबदारीतून काही तासांची विश्रांती देणे, हे दीर्घकालीन काळजी घेण्यासाठी आवश्यक आहे. बहुतेक लोकांसाठी या जगाच्या चिंतांमधून स्वतःसाठी विश्रांती शोधणे हे सहसा एक सोपे काम असते. पण दिव्यांगत्वाने बाधित कुटुंबांना शरीर आणि आत्मा यांना विश्रांती व नवचैतन्य मिळण्यासाठी त्यांच्या मंडळी- कुटुंबाकडून मदतीची आवश्यकता असते.

निष्कर्ष

अलिप्तता, फूट आणि संघर्ष यांनी अनेकदा ओळखल्या जाणाऱ्या या जगात, ख्रिस्ती लोकसुद्धा सहजपणे एकमेकांपासून विलग होऊ शकतात. परंतु मंडळी म्हणून आपल्याला आपले दुहेरी वास्तव प्रत्यक्ष जगायचे आहे: आपण एकमेकांशी जोडलेले असे ख्रिस्ताचे शरीर आहोत, आणि आपण एकमेकांवर प्रीती करण्यासाठी व एकमेकांची काळजी घेण्यासाठी पाचारण पावलेले देवाचे कुटुंब आहोत. दिव्यांग सेवाकार्याचे पाचारण म्हणजे देवाच्या सर्व लोकांची काळजी घेण्याचेच पाचारण आहे. 


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

जॉन सी. क्वासनी

जॉन सी. क्वासनी

डॉ. जॉन सी. क्वासनी हे रिजलँड, मिसिसिपी येथील पिअर ऑर्चर्ड प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये एक्झिक्युटिव्ह मिनिस्ट्री डायरेक्टर आहेत, वन स्टोरी मिनिस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत, आणि जॅक्सन, मिसिसिपी येथील रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीमध्ये पास्टोरल काउन्सिलिंगचे व्हिजिटिंग लेक्चरर आहेत. ते ‘सफरिंग इन 3-डी: कनेक्टिंग द चर्च टू डिसीज, डिसेबिलिटी, अँड डिसऑर्डर’ या पुस्तकासह अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.