3 Things about 1 Peter
पेत्राचे पहिले पत्र याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
20/01/2026
3 Things You Should Know about Haggai
हाग्गय या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
27/01/2026
3 Things about 1 Peter
पेत्राचे पहिले पत्र याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
20/01/2026
3 Things You Should Know about Haggai
हाग्गय या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
27/01/2026

मलाखी या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

3 Things You Should Know About Malachi

परमेश्वर मलाखी या संदेष्ट्याद्वारे बंदिवासातून आलेल्या आपल्या लोकांना अनेक आव्हानात्मक गोष्टी सांगतो. मलाखी हे पुस्तक सात संदेष्टात्मक वादसंवादांच्या मालिका स्वरूपात रचलेले आहे; प्रत्येक वादसंवाद लोकांच्या एका कटू विधानाने सुरू होतो आणि त्यास परमेश्वर प्रत्युत्तर देतो. यातील बहुतेक संदेश मलाखीच्या काळातील लोकांची मनोवृत्ती आणि कृती यांचे परीक्षण करणारी, सत्य उघडे पाडणारी आणि कडक शब्दात फटकार लावणारी वचने आहेत. तरीदेखील, परमेश्वर लोकांना फटकारण्यापूर्वी, तो सर्वप्रथम त्यांच्या विषयी असलेल्या त्या प्रीतीची पुष्टी करतो जिच्याद्वारे त्याने त्यांना निवडले होते; आणि ह्याच कारणामुळे बंदिवासाच्या न्यायानंतरही त्यांचे अस्तित्व कायम आहे. “तुमच्याविरुद्ध माझ्याकडे हा आरोप आहे” असे म्हणण्यापूर्वी परमेश्वर असे जाहीर करतो, “मी तुमच्यावर प्रीती केली” (मलाखी 1:2).  

1. आपले लोक म्हणून निवड करणारी देवाची प्रीती हीच नेहमी प्रारंभबिंदू असते, हे मलाखी प्रकट करतो. 

दरम्यान, लोक एका नकारार्थी प्रत्युत्तराने विचारणा करतात, “तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केलीस?” (मलाखी 1:2). हा असा प्रश्न आहे, ज्याला परमेश्वर एक आश्चर्यकारक उत्तर देतो. आपण अशी अपेक्षा केली असती की परमेश्वर मिसरदेशातून झालेल्या निर्गमनाकडे आणि कनान देशाच्या विजयाकडे त्यांचे लक्ष वेधेल, जिथे त्याने आपल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना त्यांचा वारसा देण्यासाठी महान चमत्कार केले होते. परंतु त्या ऐवजी परमेश्वर इस्राएलाचे लक्ष आणखी मागे घेऊन जातो, म्हणजे त्याने त्यांचा पूर्वज याकोब ह्याची केलेली निवड आणि त्याच्या भाऊ एसाव ह्याचा त्याने केलेला द्वेष (मलाखी 1:3). बाबेलने केलेला यरुशलेमचा विनाश आणि त्यानंतरचा बंदिवास यानंतरही  जर इस्राएल अजूनही अस्तित्वात आहे तर त्यामागचे एकमेव कारण केवळ ही प्रीतीच आहे जी त्यांची लायकी नसतांना देखील त्यांच्यावर केली गेली. इस्राएलाने आपल्या पापांमुळे नक्कीच दुःख भोगले; तरीसुद्धा परमेश्वराच्या महान प्रीतीमुळे तिचे पुनर्स्थापन झाले. पण एसावाचे वंशज असलेले अदोमचे लोक, बाबेलला मदत केल्यामुळे, बाबेलच्या काळात तुलनेने फारशी हानी न होता बचावले. (ओबद्या 1:10–14 पहा). परंतु अदोमची सध्याची सुरक्षित आणि निवांत स्थिती लवकरच उध्वस्त होईल, आणि तिचे पतन संपूर्ण व अंतिम असेल (मलाखी 1:4–5). देवाने निवडलेले लोक आपल्या पापांमुळे धडपडू शकतात, पण ते अंतिमरीत्या पडणार नाहीत, कारण परमेश्वर प्रेमापोटी त्यांना धरून उभे ठेवतो (स्तोत्रसंहिता 37:23–24 पहा). 

2. जीवन कठीण असते, तेव्हा लोक संशयी वृत्तींकडे ओढले जातात, हे मलाखी दाखवतो.

मलाखीच्या पुस्तकात लोकांचा परमेश्वराविषयीचा प्रतिसाद सुरुवातीपासून शेवटपर्यंत खोलवर संशयाने ग्रस्त आहे. सुरुवातीला ते त्यांच्याविषयी असलेल्या परमेश्वराच्या प्रीतीच्या घोषणेला सरसकट नाकारतात (मलाखी 1:2). शेवटी ते असे म्हणतात की परमेश्वराचे आज्ञापालन करणे व्यर्थ आहे, कारण गर्विष्ठ सुखी होतात आणि दुराचारी संपन्न होतात (मलाखी 3:15). मग देवाचा कथित न्याय नेमका कुठे आहे? (मलाखी 2:17). परमेश्वरविषयीची ही संशयी वृत्ती लोकांच्या मन नसलेल्या उपासनेत (मलाखी 1:12–13), त्यांनी घेतलेल्या इस्राएली पत्नींबद्दलच्या विश्वासघातात (मलाखी 2:14–16), आणि देणगीत प्रकट होणाऱ्या त्यांच्या कंजुषपणात (मलाखी 3:8–9) ठळकपणे दिसून येते. या वृत्तीचा प्रभाव याजकांवरही पडला आहे (मलाखी 2:1–9); ते लोकांकडून दोषपूर्ण अर्पणे स्वीकृत करतात आणि लाच घेऊन पक्षपाती न्यायनिवाडा देतात (मलाखी 2:9). कठीण काळ तेव्हा आणि आताही देवाविषयी थंड, कठोर अंतःकरणे निर्माण करतात. 

3. जे त्याचा आदर करतात, त्यांचा परमेश्वर सन्मान करतो, हे मलाखी दाखवतो.

मलाखीच्या काळात परमेश्वरविषयीची ही संशयी वृत्ती सर्वांमध्ये नव्हती. काहीजण अजूनही परमेश्वराला भिऊन वागत होते, आणि परमेश्वराने त्यांची ती वृत्ती पाहून त्यांना आपला खास निधी (सेगुल्ला [segullah] मलाखी 3:17) म्हणून राखून ठेवले; हाच शब्द निर्गम 19:6 मध्ये इस्राएलाचे वर्णन करण्यासाठी वापरला आहे. परमेश्वर लवकरच आपल्या मंदिरात प्रकट होईल आणि ज्या न्यायाची लोक कथितपणे आतुरतेने वाट पाहत होते, तो न्याय आणेल (मलाखी 3:1–2). तो नीतिमान आणि दुराचारी यांना कायमचे वेगळे करील; जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचे तो आपले खरे लोक म्हणून न्यायत्व सिद्ध करील, तर दुष्टांवर न्याय घडवून त्यांचा नाश केला जाईल (मलाखी 4:1–3). दरम्यान, जे विश्वासू शिल्लक राहतील त्यांना मोशेचे  नियमशास्त्र, जे पवित्र जीवनासाठी देवाचे मानक आहे, स्मरण ठेवले पाहिजे आणि एका नवीन एलीयाच्या आगमनाची वाट पाहिली पाहिजे,जो आद्य-संदेष्टा आहे, जो देवाच्या लोकांना पश्चात्तापासाठी हाक मारील (मलाखी 4:4–6). जे त्याचा संदेश ऐकून पाठमोरा होतील, त्यांना तो न्यायाच्या शापाने ताडन करील (मलाखी 4:6). 

पण, पौल रोमकरांस पत्र 3 मध्ये दाखवतो त्याप्रमाणे, जर आपण सर्व पापी आहोत आणि मोशेचे नियमशास्त्र पाळण्यात उणे पडतो, तर देव अंतिम न्यायाच्या वेळी आपल्या सर्वांना दोषी न ठरवता नीतिमान आणि अनीतिमान यांच्यात फरक कसा करू शकतो? ज्यावर तो प्रीती करतो आणि ज्याला त्याने निवडले आहे, त्या अनीतिमान याकोबाचे तो तारण कसे करू शकतो? या प्रश्नाचे उत्तर नवा करार येईपर्यंत अनुत्तरीत आहे; आणि मलाखीची भविष्यवाणी आपल्याला त्या उत्तरासाठीच परिपूर्णपणे तयार करते. 

लूक 1:17 मध्ये, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला त्याच्या जन्मापूर्वीच एलीया म्हणून ओळखले जाते, जो येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनापूर्वी येईल. महत्त्वाचे म्हणजे, देवदूताचा संदेश केवळ मलाखीच्या भविष्यवाणीच्या सकारात्मक बाजूवर लक्ष केंद्रित करतो, आणि असे घोषित करतो की “बापाची अंतःकरणे मुलांकडे’, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.” शापाच्या ताडनाची शक्यता नमूद केलेली नाही, कारण त्याच्या पहिल्या आगमनात येशू हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि तारण्यासाठी आला होता (मत्तय 1:21).रूपांतराच्या पर्वतावर, येशू मोशे आणि एलीयाला भेटला आणि त्याने यरुशलेममधून आपल्या निर्गमनाविषयी भाष्य केले ज्याद्वारे तो आपल्या लोकांसाठी मुक्ती घेऊन येणार होता (लूक 9:31). जे आता ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास नकार देतात, त्यांच्यासाठी दुसरे आगमन बाकी आहे: जेव्हा ख्रिस्त श्वेत घोड्यावर स्वार होऊन पश्चात्ताप न करणाऱ्यांवर विनाश आणण्यासाठी परत येईल (प्रकटीकरण 19:11–21). पण जे परमेश्वराचे भय धरून ख्रिस्तावरील आपला विश्वास प्रकट करतात, त्यांच्यासाठी तो दिवस वसंत ऋतूतील उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणांसारखा असेल, जो प्रत्येक गोष्टीचा नाश करणारी अग्निभट्टी नसून, त्वचेला आनंददायी उब देणारा न्याय्यत्वाचा सूर्य असेल (मलाखी 4:1–2).

हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

इयान डुगिड
इयान डुगिड
डॉ. इयान डुगिड हे फिलाडेल्फिया येथील वेस्टमिन्स्टर थियोलॉजिकल सेमिनरीमध्ये जुन्या कराराचे प्राध्यापक आहेत. ते द होल आर्मर ऑफ गॉड यांसारख्या पुस्तकांचे आणि याशिवाय सफन्या, हाग्गय आणि मलाखीवर भाष्य करणाऱ्या अनेक पुस्तकांचे लेखक आहेत.