आमचा विश्वासांगीकार

लिगोनियर मिनिस्ट्रीज ही ख्रिस्ती  विश्वासाच्या प्राचीन मतांगीकाराचे पालन करते—प्रेषितांचा मतांगीकार, नायसिन मतांगीकार आणि चाल्सेडॉनचा मतांगीकार. हे  धर्मसुधारणेच्या पाच सोलांमध्ये व्यक्त झालेल्या ऐतिहासिक ख्रिस्ती  विश्वासाची पुष्टी करतात. तसेच वेस्टमिन्स्टर स्टॅण्डर्ड , थ्री फॉर्म्स ऑफ युनिटी, आणि 1689 लंडन बॅप्टिस्ट मतांगीकार या ऐतिहासिक धर्म-सुधारित कबुलीजबाबांचे एकमताने समर्थन करते.

बायबल

संपूर्ण पवित्र शास्त्र हे देवाचे अचूक, अचल आणि प्रेरित वचन आहे; ते दैवी प्रकटीकरण असून त्यामध्ये देवाच्या अधिकाराचे संपूर्ण प्रमाण आहे, आणि त्याच्या अधीन राहणे आपल्यासाठी बंधनकारक आहे.

त्रैक्य परमेश्वर

परमेश्वरामध्ये तीन स्वतंत्र, परंतु पूर्णपणे दैवी व्यक्तींचे ऐक्य आहे—पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. हे तिघेही एकच खरे व सार्वकालिक परमेश्वर आहेत, जे साररूपाने समान असून सामर्थ्य आणि गौरवातही समान आहेत.

देव

देव हा आत्मा आहे; आपल्या अस्तित्वात, ज्ञानात , सामर्थ्यात, पवित्रतेत, न्यायात, चांगुलपणात आणि सत्यात तो असीमित, सार्वकालिक  आणि अपरिवर्तनीय आहे. देव पूर्णतः सर्वज्ञ, सर्वसमर्थ  आणि सर्वव्यापी आहे; त्याला  शिकण्याची आवश्यकता नाही  आणि  “ओपन थिझम”सारख्या तत्वानुसार  बदलणाऱ्या विचारांना तो अधीन नाही.

येशू ख्रिस्त

येशू ख्रिस्त पूर्णपणे  देव आणि पूर्णपणे मनुष्य आहे; त्याच्यामध्ये दोन स्वभाव आहेत जे एकाच दैवी व्यक्तीमध्ये अविभाज्यपणे एकत्रित आहेत, आणि त्यात कोणताही गोंधळ, मिश्रण, पृथक्करण, किंवा विभाजन नाही. प्रत्येक स्वभाव स्वतःची वैशिष्ट्ये टिकवून ठेवतो. देहधारणेत, येशूचा जन्म कुमारी मरियमकडून झाला, त्याने आमच्यामध्ये परिपूर्ण जीवन जगले, क्रूसावर खिळला गेला, मरण पावला आणि गाडला गेला; तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला, स्वर्गात गेला आणि तो पुन्हा गौरवात  व न्यायासाठी येणार आहे. तो देव आणि मनुष्य यांच्यातील एकमेव मध्यस्थ आहे.

पवित्र आत्मा

पवित्र आत्मा पिता व पुत्राच्या एकाच तत्त्वाचाआहे. तो पित्यापासून व पुत्रापासून पाठविण्यात आला आहे आणि तो विश्वासणाऱ्यांच्या हृदयात वास करतो. तो त्यांच्या नवीन जन्माचे कार्य एकाधिकाराने करतो, आणि त्यांच्या पवित्रीकरणात सहकार्यासह कार्य करतो.

सृष्टी

देवाने पूर्वद्रव्याविना (एक्स निहिलो) केवळ आपल्या सामर्थ्याच्या वचनाने आकाश, पृथ्वी आणि त्यांतील सर्व वस्तू निर्माण केल्या. तो आपल्या अतिशय पवित्र, ज्ञानी आणि सामर्थ्यशाली ईश्वरी नियोजनानुसार सर्व सृष्टीचे आणि त्यांच्या सर्व कृतींचे पालनपोषण व प्रशासन करतो.

मनुष्यजात

 देवाने इतर सर्व गोष्टी निर्माण केल्यानंतर, त्याने मनुष्याला—पुरुष व स्त्री—आपल्या प्रतिमेत निर्माण केले. मात्र आदामच्या पापामुळे, तो आणि त्याचे वंशज नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आणि अशक्त झाले. त्यांनी आपल्या सृष्टीकर्त्याशी संबंध तोडला आणि पापाच्या शिक्षेस पात्र ठरले म्हणजेच मृत्यू.

पापक्षालन/प्रायश्चित्त

सर्वांनी पाप केले असल्यामुळे, मनुष्याचा देवाशी समेट व्हावा यासाठी पापाचे विमोचन (प्रायश्चित्त) आवश्यक आहे. येशू ख्रिस्ताने क्रूसावरील प्रतिस्थानी प्रायश्चित्तकारक मरणाद्वारे आपल्या लोकांसाठी परिपूर्ण प्रायश्चित्त केले. तो आपले नीतिमत्त्व सर्व विश्वासणाऱ्यांना प्रदान करतो, आणि जे आपले पाप मान्य करून तारणासाठी केवळ त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी तो संपूर्ण मुक्ती सुनिश्चित करतो.

नियमशास्त्र

नैतिक नियम हा देवाच्या अपरिवर्तनीय स्वभावाचे पूर्ण प्रतिबिंब आहे, आणि ते  विश्वासणारे तसेच अविश्वासणारे अशा सर्व लोकांवर कायमस्वरूपी बंधनकारक आहे.

मंडळी 

ख्रिस्ताने एक दृश्यमान मंडळी स्थापन केली आहे. तिला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र शास्त्राच्या अधिकाराखाली राहण्यास बोलावले गेले आहे — ख्रिस्ताची सुवार्ता प्रचार करण्यासाठी, विधींचे प्रशासन करण्यासाठी, आणि शिस्त (अनुशासन) अंमलात आणण्यासाठी.

ख्रिस्ती धर्म आणि संस्कृती

लिगोनियर अशा ख्रिस्ती संघटना व संस्थांना पाठिंबा देते ज्या पवित्र शास्त्राचा अंतिम अधिकार आणि येशू ख्रिस्ताचे प्रभुत्व कबूल करतात, आणि ज्या देवाच्या आज्ञांच्या सामाजिक व सांस्कृतिक परिणामांची अंमलबजावणी    मनुष्य आणि त्याच्या पर्यावरणाच्या कल्याणासाठी करण्यास कटिबद्ध आहेत. लिगोनियर विशेषतः अशा संघटनांना पाठिंबा देते ज्या विकासाच्या अगदी आरंभीच्या अवस्थेतील असहाय्य मानवी जीवांचा वध (गर्भपात) करण्याचा निषेध करतात, तसेच लिंग, लैंगिकता आणि विवाह याबाबतच्या सर्व अशास्त्रीय व्याख्या नाकारतात.

हेही पहा: ख्रिस्तसिद्धांतावरील  लीगोनियर विश्वासांगीकार