
ख्रिस्ती जीवनासाठी एक संकल्प
02/06/2026
मंडळी ढोंगी लोकांनी भरलेली आहे का?
04/06/2026येशूने आपल्या स्वर्गारोहणापूर्वी कोणते अभिवचन दिले?
येशू स्वर्गात चढून वर गेला त्यापूर्वी त्यानेआपल्या प्रेषितांना दिलेले शेवटचे अभिवचन म्हणजे हे, की पवित्र आत्मा त्यांच्यावर येईल, आणि त्यांना सामर्थ्य देईल, यासाठी की त्यांनी पृथ्वीच्या टोकापर्यंत शुभवर्तमान घेऊन जावे (प्रेषितांची कृत्ये 1:8). लूक या अभिवचनाच्या पूर्ततेची नोंद प्रेषितांची कृत्ये 2 पासून करतो, आणि पेन्टेकॉस्टच्या दिवशी आत्मा मंडळीवर कसा उतरला, हे आपल्याला सांगतो.
जुन्या कराराच्या अंतर्गत, पेन्टेकॉस्ट हा तीन मुख्य यात्रोत्सवांपैकी एक होता, ज्यासाठी इस्राएल लोकांना यरुशलेमेला वर जाणे आवश्यक असायचे (अनुवाद 16). याला “सप्ताहाचा सण” असेही म्हटले जात असे, कारण तो प्रथमफळांच्या सणानंतर पन्नास दिवसांनी, म्हणजे सात आठवड्यांनी, येत असे; आणि हा प्रथमफळांचा सण वल्हांडण सणाच्या आठवड्यातील पहिल्या शब्बाथानंतरच्या पहिल्या दिवशी पाळला जात असे. पेन्टेकॉस्ट, जुन्या कराराच्या अंतर्गत, वसंत ऋतूतील धान्य कापणीची समाप्ती दर्शवीत असे (लेवीय 23:4–22). कालांतराने, यहूदी लोक पेन्टेकॉस्टचा संबंध सीनाय पर्वतावर नियमशास्त्र देण्याशी जोडू लागले, बहुधा याचे कारण असे की मिसरमधून निर्गमन झाल्यानंतर नियमशास्त्र मिळेपर्यंत सुमारे पन्नास दिवस उलटून गेले होते (निर्गम 19:1).
नव्या कराराचे आगमन झाले त्यावेळी, येशूचे मरण आणि पुनरुत्थानानंतर तात्काळ आलेल्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी देवाच्या लोकांवर पवित्र आत्मा उतरला. आत्मा “मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा” आवाज करून आला. ग्रीक आणि इब्री, या दोन्ही भाषांत “आत्मा” यासाठी प्रयुक्त झालेला शब्द तोच आहे, ज्याचे भाषांतर “वारा” असेही केले जाते; आणि पवित्र शास्त्र पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यवान कार्याबद्दल सामर्थ्यवान वारा किंवा श्वास, अशा भाषेत बोलते (यहेज्केल 37:1–14; योहान 3:8). वाऱ्याच्या आवाजासोबतच, अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या, व त्या प्रत्येकावर स्थिरावल्या (प्रेषितांची कृत्ये 2:3). अग्नी हा दैवी उपस्थितीचा संकेत, आणि त्याचबरोबर मशीहाने अभिवचन दिलेल्या पवित्र करणाऱ्या बाप्तिस्म्याचे प्रतीकही होता (निर्गम 3:1–6; लूक 3:15–17).
अर्थातच, नव्या करारातील पेन्टेकॉस्टच्या दिवसापूर्वीही पवित्र आत्मा करारबद्ध समुदायासोबत होता, कारण तो जुन्या करारातील सदस्यांना नवा जन्म देत असे आणि त्यांना विश्वासाची देणगी देत असे. त्याला तसे करावे लागले, कारण कोणत्याही कराराच्या अंतर्गत एकाच खऱ्या देवावर विश्वास ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्म्याद्वारे नवा जन्म मिळणे, हाच आहे (पहा योहान 3:3). तरीही, आत्म्याचा नव्या करारातील अनुभव अधिक व्यापक आहे, कारण आता सर्व ख्रिस्ती लोकांकडे सेवाकार्यासाठी आत्म्याच्या देणग्या आहेत.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


