
मी ज्ञान व शहाणपणाने कसे बोलावे?
22/10/2026
ख्रिस्ती परिपक्वता म्हणजे काय?
29/10/2026कृपेने मातृत्वाच्या आव्हानांतून मार्ग काढणे
या वसंत ऋतूमध्ये माझ्या मातृत्वाच्या प्रवासात एक मोठा बदल घडत आहे: माझा धाकटा मुलगा हायस्कूलमधून पदवीधर होणार आहे. ही अशी एक अंतिम रेषा आहे, जी पालकत्वाच्या या टप्प्याचा शेवट दर्शवते. मी हे काही काळापासून येताना पाहत आहे, आणि मी अनेक भावनांनी भरून गेले आहे. माझा मुलगा आयुष्याच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असल्यामुळे त्याच्याबद्दलचा आनंद; आणि मी त्याला दररोज घरी पाहू शकणार नाही या विचाराने होणारे दुःख. आपण सर्वजण ज्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करतो, तेथे मी पोहोचले आहे; तरीही त्या टप्प्याच्या पलीकडे काय आहे, याबद्दल मी अनिश्चिततेने भरलेली आहे.
जेव्हा मी पहिल्यांदा या प्रवासाला सुरुवात केली, तेव्हा मला जे काही माहीत नव्हते त्या सर्वांमुळे मी अस्वस्थ झाले होते. खूप नवीन आणि अनोळखी गोष्टींसमोर मला स्वतःमध्ये अपुरेपणा जाणवत होता. पालकत्वाच्या आव्हानात्मक निर्णयांसाठी माझ्याकडे ज्ञान नव्हते आणि ते निर्णय योग्य ठरतील की नाही, याची मला भीती वाटत होती. तेव्हापासून, मी माझ्या मातृत्वात अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला आहे आणि पुढेही अशा आणखी परिस्थिती येतील, याची मला जाणीव आहे. तरीही, मागे वळून पाहताना मला देवाची कृपा कार्यरत असल्याचे आणि माझ्या प्रत्येक संकटात मला भेटण्यात त्याचे विश्वासूपण स्पष्टपणे दिसते.
आपल्या मातृत्वाच्या प्रवासात आपण कुठेही असाल, मग तो सुरुवातीचा, मधला किंवा मुले घर सोडून गेल्यानंतरचा काळ असो, देव आपण जिथे आहात तिथे आपल्याला भेटतो. तो आपली कृपा पुरवतो. आपण हे पवित्र शास्त्रातील तीन मातांच्या जीवनातून पाहतो. त्यांच्या प्रत्येक परिस्थितीत, देवाने त्यांना आवश्यक असणारी गोष्ट पुरवली आणि त्यांना आपली कृपा दिली.
देव पाहतो आणि जाणतो
हागारच्या वृत्तांतात, आपण एका भावी आईला पाहतो, जिला देवाने तिच्या संघर्षात पाहिले. सारायची दासी म्हणून, ती देवाची अभिवचने पूर्णत्वास नेण्याच्या सारायच्या योजनेचा भाग बनली (उत्पत्ती 16). जेव्हा ती सारायच्या रागापासून पळून रानात गेली, तेव्हा देव तिला भेटला आणि त्याने तिला आपली कृपा दाखवली. तेथे तिने देवाला एल रोई असे नाव दिले; “तिच्याशी बोलणार्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता-एल-रोई (तू पाहणारा देव) असे ठेवले; ती म्हणाली, “मला पाहणार्याला मी ह्याही ठिकाणी मागून पाहिले काय?” (उत्पत्ती 16:13). जेव्हा ती नंतर पुन्हा एकदा रानात आढळली आणि तिला वाटले की ती आणि तिचा मुलगा मरतील, तेव्हा देवाने तिला पाहिले. त्याने तिची रडण्याची हाक ऐकली. त्याने आपल्या कृपेने तिच्या गरजा पुन्हा एकदा पूर्ण केल्या: “भिऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे.” (उत्पत्ती 21:17).
जेव्हा आपण माता म्हणून संघर्ष करतो, तेव्हा देव त्याच्या विपुल कृपेने आपण जिथे आहोत तिथे आपल्याला भेटतो. तो एल रोई आहे, तो पाहणारा देव आहे. तो आपल्या भीती, दुःख आणि अनिश्चितता पाहतो. त्याला आपल्या मुलांबद्दलची आपली काळजी माहीत आहे. तो मदतीसाठी आपली हाक ऐकतो आणि आपली सुटका करतो. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे वधस्तंभावर आपल्या पापांपासून देवाने केलेली आपली सुटका, जिथे त्याने आपल्याला योग्य असलेली शिक्षा भरण्यासाठी स्वतःच्या पुत्राला दिले. आपल्यासाठी ख्रिस्ताने केलेल्या कार्यावरील विश्वासाद्वारे, आपली पापापासून सुटका झाली आहे आणि आता आपण देवाचे आहोत: “तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही?” (रोमकरांस 8:31-32).
ज्या देवाने रानात हागारला पाहिले, तोच देव आपल्याला पाहतो आणि मदतीसाठी केलेली आपली ओरड ऐकतो.
देव आपल्या कराराच्या प्रीतीमुळे सुटका करतो
रूथच्या पुस्तकात आपण नामीला भेटतो, जिने मोआब देशात सर्व काही गमावले होते. तिचा पती मरण पावला, त्यानंतर तिचे दोन मुलेही मरण पावले. तिचे दुःख जड होते; आयुष्य पुन्हा कधी आनंद आणू शकेल, अशी ती कल्पनाही करू शकत नव्हती. देवाने तिची सून रूथ हिच्याद्वारे तिच्यासाठी तरतूद केली; रूथने नामीबरोबर तिच्या बेथलेहेमच्या घरी परत जाण्यासाठी स्वतःचे लोक सोडले. नंतर देवाने धान्याच्या शेतांत रूथसाठी प्रेम करणारा पती आणि नामीसाठी नातू पुरवला. त्यांच्या वृत्तांतात वारंवार दिसणारी संकल्पना म्हणजे देवाची ‘हेसेद’ प्रीती. अशी प्रीती केवळ दयाळूपणापेक्षा अधिक आहे; ती देवाची आपल्या लोकांशी असलेली करारबद्ध बांधिलकी आहे.
देव अत्यंत कठीण परिस्थितीत असलेल्या मातांना त्याच्या हेसेद प्रीतीने भेटतो. आव्हानात्मक परिस्थितीत असलेल्या मातांसाठी, पालकत्वाच्या कठीण काळातून जाणाऱ्या आपल्यासाठी, आपण देवाच्या आपल्यावरील अचल प्रेमावर विश्वास ठेवू शकतो. आश्वासने पाळणारे विश्वासू प्रेम. सुटका करणारे आणि पुरवठा करणारे प्रेम. आपली अभिवचने पाळणारे प्रेम. कधीही अपयशी न ठरणारे प्रेम.
ज्या देवाने नामीची तिच्या दुःखातून सुटका केली आणि तिला व रूथला हेसेद प्रीती दाखवली, तोच देव आपल्यावरील आपल्या प्रेमात विश्वासू आहे.
देव आपल्याला आपल्या पाचारणासाठी सज्ज करतो
किशोरवयीन तरुण मरियेला एका दिवशी गब्रीएल देवदूत भेटला; त्याने तिला सांगितले की ती जगाच्या तारणाऱ्याला जन्म देईल. नवीन आई म्हणून मला वाटणारा अपुरेपणा मला अजूनही चांगला आठवतो; मरियाला अशी बातमी ऐकून कसे वाटले असेल, याची मी कल्पनाही करू शकत नाही. तिचे गीत आपल्याला आठवण करून देते की देव त्याच्या कृपेने आपल्या जीवनात कसा कार्य करतो:
“कारण जो समर्थ आहे, त्याने
माझ्याकरता
महत्कृत्ये केली आहेत;
आणि ‘त्याचे नाव पवित्र आहे.’
आणि जे ‘त्याचे भय धरतात,
त्यांच्यावर
त्याची दया पिढ्यानपिढ्या
आहे.’”
(लूक 1:49-50).
देव आपल्याला माता म्हणून पाचारण करतो ते आपल्याला आपण काय करीत आहोत हे आधीपासूनच माहीत असते म्हणून नाही. त्याने आपल्या देखरेखीखाली सोपवलेली मुले वाढवण्यासाठी तो आपली निवड करतो ती आपण सक्षम किंवा ज्ञानी आहोत म्हणून नाही. उलट, तो त्याच्या विपुल कृपेने आपल्याला मातृत्वासाठी सज्ज करतो: “ज्याने तुम्हाआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्त्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत” (2 पेत्र 1:3). आपली मुले वाढवण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारे सर्व काही तो आपल्याला देतो. तो ज्ञान, सामर्थ्य आणि सहनशक्ती पुरवतो. मातांसाठी ही सुवार्ता आहे.
ज्या देवाने मरियावर आपल्या कृपेचा वर्षाव केला, तोच देव आपल्यावरही त्याच कृपेचा वर्षाव करतो.
पवित्र शास्त्रातील या प्रत्येक मातेने तिच्या जीवनात देवाच्या कृपेचा अनुभव घेतला, ज्यातून त्याचा विश्वासूपणा दिसून येतो. मातांनो, आज तुम्ही कुठेही असलात तरी, देव त्याच्या कृपेने तुम्हाला तिथे भेटेल असा विश्वास ठेवा.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


