
अब्राहाम कोण होता?
20/10/2026
कृपेने मातृत्वाच्या आव्हानांतून मार्ग काढणे
27/10/2026मी ज्ञान व शहाणपणाने कसे बोलावे?
जर तुम्ही ख्रिस्ती असाल, तर तुमची संवादसाधण्याची क्षमता अधिक चांगली असावी अशी तुमची इच्छा असली पाहिजे—लोकांना प्रभावित करण्यासाठी नव्हे, तर तुमचे शब्द हे येशूच्या दाखल्यातील रुपयासारखे आहेत म्हणून (मत्तय 25:14-40). देवाने तुम्हाला दिलेल्या वाणीचा उपयोग त्याच्यासाठी फळ उत्पन्न करण्यासाठी करा. तुमचे बोलणे हे निशाण्यावर लागणाऱ्या बाणांसारखे असावे, ते व्यर्थ जमिनीवर पडू नये (1 शमुवेल 3:19). नीतिसूत्रे 15:23 मधील “समयोचित बोल किती उत्तम!” या स्तुतीवचनातून आपल्याला साहाय्य मिळू शकते.
“विरोध करणार्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी” यावर नीतिसूत्रेचे पुस्तक विशेष भर देते (तीत 2:8 पाहा). नीतिसूत्रे पुस्तकात पवित्र शास्त्राच्या इतर पुस्तकांच्या तुलनेत भाषण, जीभ, तोंड आणि शब्द यांसारखे शब्द अधिक वेळा आले आहेत. नीतिसूत्रे 15 मध्ये लेखक कृपाळू, सुज्ञ, शिस्तबद्ध आणि ज्ञानयुक्त उत्तरांची प्रशंसा करतो. तो अशा व्यक्तीची प्रशंसा करतो, जो “विचार करून उत्तर देतो” (नीतिसूत्रे 15:28). “विचार करणे” म्हणजे ध्यान करणे, योजना आखणे आणि बेत रचणे (स्तोत्रसंहिता 1:2; 2:1; नीतिसूत्रे 24:2). विश्वासणाऱ्यांनी कधीही निष्काळजीपणे बोलू नये. तसे केल्यास, आपले हेतू उत्तम असले तरी आपले शब्द व्यर्थ परत येतील, याची जवळजवळ खात्रीच असते (यशया 55:11 पाहा). परंतु जेव्हा देवाने आपल्या शब्दांना जीवन देणारे सामर्थ्य दिले आहे, तेव्हा आपण आपले शब्द व्यर्थ का घालवावेत (नीतिसूत्रे 18:21)?
“समयोचित बोल” याचा अर्थ समजून घेण्यासाठी, हे जाणून घेणे उपयुक्त ठरेल की इब्री काव्य सामान्यतः समांतर वाक्यरचना एकावर एक रचून तयार केलेले असते. वचनाची पहिली ओळ बऱ्याचदा तिच्यानंतर येणाऱ्या ओळींना दिशा देते. नीतिसूत्रे 15:23 ची सुरुवात अशी होते: “मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो.” पवित्र शास्त्रात “उत्तर” हे केवळ एखाद्या प्रश्नाला दिलेल्या प्रतिसादापेक्षा बरेच काही असते. ते समर्पक उत्तर असते, अचूक उत्तर असते; जसे गणिताच्या कोड्याचे एकमेव योग्य उत्तर देणे. चुकीची उत्तरे निरुपयोगी असतात. याच कारणास्तव, अलीहू ईयोबाच्या मित्रांवर रागावला होता, कारण ते खूप बोलले असले तरी “त्यांना उत्तर सापडले नव्हते” (ईयोब 32:3). म्हणून “समयोचित बोल” हा कोड्याच्या एकमेव उत्तरासारखा आहे किंवा कुलूप उघडू शकणाऱ्या एकमेव किल्लीसारखा आहे. वचनाचा दुसरा भाग योग्य वेळेचा घटक जोडतो. शलमोनच्या वाक्यांशाचे अक्षरशः भाषांतर ““त्याच्या योग्य वेळी असा शब्द” असे होते. योग्य वेळी बोललेला शब्द म्हणजे योग्य क्षणी दिलेले विश्वासू उत्तर होय. अशा प्रकारे संवाद साधण्यासाठी आपण कमीत कमी तीन गोष्टी केल्या पाहिजेत.
1. जेव्हा आपण आणि आपला ऐकणारा दोघेही तयार असाल तेव्हाच बोला.
जेव्हा आपल्याला काय बोलावे हे माहीत नसते, तेव्हा चुकीचे शब्द बोलण्यापेक्षा कमी बोलणे किंवा मुळीच न बोलणे चांगले (नीतिसूत्रे 10:10). जेव्हा आपल्याला नेमके काय बोलायचे आहे हे माहीत असते, पण आपले हृदय योग्य स्थितीत नसते, तेव्हा सावध राहा. जेव्हा आपण रागाने मन मोकळे करता, तेव्हा आपले शब्द अग्निशामक नळीच्या जोरदार फवाऱ्यासारखे असतात, जीवन देणाऱ्या वसंतातील सौम्य सरींसारखे नसतात.
कधी कधी आपला ऐकणारा तयार नसेल. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, “मला अद्याप तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.” (योहान 16:12). नंतरच ते “सर्व सत्य” ऐकू शकले (योहान 16:13). आपल्याला कदाचित फार काळ थांबावे लागणार नाही, परंतु माती तयार नसेल तेव्हा बी पेरण्यात काही अर्थ नाही (1 शमुवेल 25:37 पाहा).
2. योग्य वेळी योग्य शब्द वापरा.
नाथानाने दाविदाला “तो मनुष्य तूच आहेस” असे म्हटले नसते, तर काय झाले असते, याची कल्पना करा (2 शमुवेल 12:7). नाथानाने दाविदाला अन्यायाचे अधार्मिक स्वरूप पाहण्यास मदत केली होती; त्याचा “क्रोध फार भडकला,” पण तो अजून स्वतःच्या पापाविरुद्ध भडकला नव्हता. देवाची कृपाच म्हणा की, नाथानाने कठीण सत्य योग्य वेळ आल्यावरच सांगितले (2 शमुवेल 12:1-15).
एखाद्या सेवकाने किंवा मित्राने कधी देवाची अशी वचने आपल्याशी बोलली आहेत का, ज्यांनी आपल्याला नेमकी जी गोष्ट आवश्यक होती तीच साध्य केली: अंतर्दृष्टी, प्रोत्साहन किंवा सुधारणा? आपण देव नाही. पण जेव्हा आपण प्रार्थनापूर्वक त्या क्षणासाठी योग्य शब्द निवडता, तेव्हा आपण त्याचे अनुकरण करता. शंका घेणाऱ्याशी आपण दयेचे शब्द बोलू शकता. नरकाकडे बेभान वेगाने जाणाऱ्या व्यक्तीशी आपले शब्द अधिक कठोर असतील (यहूदा 22-23). चांगला शब्दसंग्रह हा भरलेल्या साधनपेटीसारखा असतो; सर्वोत्तम परिणाम साध्य करण्याची अधिक शक्यता असलेले साधन वापरा आणि लोहाराप्रमाणे लोखंड गरम असतानाच घाव घाला.
3. आत्म्यावर विश्वास ठेवा आणि त्याचे शब्द वापरा.
आपल्या ऐकणाऱ्याचा विश्वास “तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा” याची काळजी घ्या (1 करिंथकरांस 2:4-5). मार्टिन ल्यूथरने लिहिले: “गरजेच्या वेळी पवित्र शास्त्रातून उच्चारलेला बंधूचा शब्द आपल्याबरोबर अकल्पनीय वजन घेऊन येतो. पवित्र आत्मा त्याच्यासोबत असतो, आणि त्याद्वारे लोकांच्या परिस्थितीनुसार त्यांच्या हृदयाला स्पर्श करतो आणि सजीव करतो.” जर पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आणि आपण देवाच्या वचनावर जगत आहात, तर आपण म्हणू शकता,
शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; (यशया 50:4)
मॅथ्यू हेन्री लिहितात की प्रभावी वाणी “योग्य वेळ आणि योग्य ठिकाण यांच्या दृष्टीने समर्पक परिस्थितीत असते,” आणि आपण “योग्य वेळी, योग्य अभिव्यक्तींमध्ये दिलेले शिक्षण, सल्ला किंवा सांत्वन” यासाठी प्रयत्न केला पाहिजे; ते ज्या व्यक्तीशी बोलले जाते तिच्या स्थितीला अनुरूप आणि बोलणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावाशी सुसंगत असले पाहिजे. ही पूर्ण करणे मोठीच जबाबदारी आहे! परंतु ज्या लोकांना काय बोलावे हे समजण्यासाठी संघर्ष करावा लागतो, देवाने त्यांना एक चांगली प्रार्थना दिली आहे:
हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत. (स्तोत्रसंहिता 19:14)
जेव्हा आपण मदतीसाठी देवाकडे पाहता, तेव्हा आपण म्हणू शकता,
ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. (नीतिसूत्रे 8:6)
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


