
कृपेने मातृत्वाच्या आव्हानांतून मार्ग काढणे
27/10/2026
दैनंदिन जीवनात देवाच्या पवित्रतेची रूपांतर घडविणारी शक्ती
03/11/2026ख्रिस्ती परिपक्वता म्हणजे काय?
आमच्या बागेत सफरचंदाचे एक लहान झाड आहे. दरवर्षी ते थोडे मोठे होते, आणि त्याला येणारी फळे अधिक मुबलक होत जातात. वर्षांनुवर्षे त्यात परिपक्वता आली आहे, आणि त्या परिपक्वतेच्या फळाचा लाभ घेणे हा एक आशीर्वाद ठरला आहे.
अनेक बाबतींत, हे ख्रिस्ती जीवन आपल्याला ज्या गोष्टीसाठी पाचारण करते त्याचेच एक चित्र आहे, अधिकाधिक फलदायी होत जाणारी वाढ. म्हणून, आपण वाचतो, “सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू या…” (इब्री 6:1).
परिपक्वतेचे उदाहरण
ख्रिस्ती परिपक्वतेचे चित्र प्रभू येशूमध्ये आपल्यासमोर मांडले आहे. त्याच्या स्वरूपाशी समरूप केले जाण्याद्वारेच आपण परिपक्व आणि फलदायी होतो.
प्रभू येशूच्या मानवी जीवनाचे वास्तव कमी लेखण्याची प्रवृत्ती दिसून येते. परंतु ख्रिस्ताच्या जीवनात परिपक्वतेची खरी वाढ झाली होती. तो एक परिपूर्ण बाळ, मूल आणि प्रौढ होता. या प्रत्येक टप्प्यातून तो पापरहित रीतीने झाला.
लूक 2:40 मध्ये आपल्याला हे सांगितले आहे: “तो बालक वाढत वाढत आत्म्यात बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला; आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.” कॅल्व्हिन नोंदवतात त्याप्रमाणे, “ख्रिस्त खरा मनुष्य झाला… त्याने स्वेच्छेने मानवी स्वभावाशी अविभाज्यपणे जोडलेल्या सर्व गोष्टी स्वतःवर घेतल्या.” यामध्ये परिपक्वतेत वाढ होणेही समाविष्ट आहे.
जसजसे त्याच्या पित्याने त्याला वचनाचे शिक्षण दिले, तसतसा ख्रिस्त परिपक्व झाला:
तो रोज रोज सकाळी मला जागे करतो;
शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. (यशया 50:4)
पतित जगातील जीवनातील परीक्षा आणि संकटांद्वारेही तो परिपक्व झाला. इब्री लोकांस पत्राचा लेखक म्हणतो, “तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला;” (इब्री 5:8). प्रत्येक टप्प्यावर येशूचे आज्ञापालन परिपूर्ण होते, परंतु त्याच्या दुःखांनी त्याला अधिकाधिक मोठ्या आज्ञापालनाकडे आणि परिपक्वतेकडे नेले.
परिपक्वतेचे साधन
ख्रिस्त हा केवळ परिपक्वतेचा नमुना नाही; तर तो ख्रिस्ती परिपक्वतेचे साधन आहे. फळ फक्त तेव्हाच वाढू शकते, जेव्हा ते झाडाशी जोडलेले असते. वॅम्फ्रेचे जॉन ब्राऊन म्हणतात,
आपण ख्रिस्ताशी जोडले जात नाही आणि विश्वासाने त्याच्याशी एक होत नाही, तोपर्यंत भ्रष्ट वासनांना मारण्यासाठी आणि नव्या मनुष्याची वाढ सुरू करण्यासाठी प्रभू येशूकडून येणाऱ्या कृपाप्रभावाचा कोणताही भाग आपल्याला मिळत नाही.
परिपक्वता “त्याच्यामध्ये” विकसित होते.
ख्रिस्ताने नेमलेल्या साधनांचा उपयोग केल्याने ही परिपक्वता विकसित होते. इफिसकरांस 4 मध्ये पौल म्हणतो की येशूने मंडळीला “पाळक व शिक्षक” दान म्हणून दिले आहेत, आणि आपल्याला “प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहचू तोपर्यंत दिले;” म्हणूनच ते देण्यात आले आहेत (इफिसकरांस 4:11, 13). देवाने आपल्या मंडळीला दिलेल्या पाळकांचा लाभ घेतल्याने, आपण “ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.” (इफिसकरांस 4:14, 15). वचनाच्या शिक्षणाकडे लक्ष दिल्याने सिद्धांतविषयक स्थिरता येते आणि खोट्या शिक्षणामुळे मार्गभ्रष्ट होण्यापासून आपले रक्षण होते. हे आपल्याला आपले मस्तक असलेल्या ख्रिस्तासारखे बनवण्याकडे नेते. हीच परिपक्वता आहे. आपल्या ऐकणाऱ्यांमध्ये ही परिपक्वता पाहणे हेच उपदेशकांचे ध्येय असते: “आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो; अशासाठी की, प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे.” (कलस्सैकरांस 1:28).
ख्रिस्तासारखी परिपक्वता जगातील दुःखांचा अनुभव घेतल्यानेदेखील येते. रोमकरांस 5:3-4 म्हणते, “इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर,धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते;आणि ‘आशा लाजवत नाही;” पतित जगातील जीवनातील परीक्षा आणि संकटे आपला ख्रिस्तासारखा शीलस्वभाव विकसित करतात.
जसे वचनाच्या शिक्षणाने आपल्याला आशीर्वाद मिळतो, जसे जीवनातील परीक्षांद्वारे आपले पवित्रीकरण होते, तशी परिपक्वतेत वाढ होईल. नीतिसूत्रे आपल्याला सांगते, “ज्ञान्याला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल; नीतिमानाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल.” (नीतिसूत्रे 9:9). आपल्याला सांगितले आहे की, दुःखाने “कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.” (इब्रीकरांस 12:11).
अपरिपक्वतेची लक्षणे
परिपक्वता म्हणजे ख्रिस्तासारखे असणे. परंतु आपण त्याच्या उलट असलेल्या अपरिपक्वतेवरूनही परिपक्वता काय आहे ते पाहू शकतो. इब्रीकरांस 5:12-14 मध्ये अपरिपक्वतेचे विस्तृत वर्णन आपल्याला दिसून येते. आपल्याला सांगितले आहे की विश्वासणारे “देवाच्या वचनांची मुळाक्षरासंबंधी” अज्ञानी होते, त्यांना “जड अन्नाची नाही, तर निऱ्या दुधाचीच गरज होती,” आणि ते “बरे आणि वाईट यांतील भेद ओळखण्यास” असमर्थ होते. दूध आणि बाल्यावस्था यांची स्वतःची एक वेळ आणि जागा असते (1 पेत्र 2:2; 1 करिंथकरांस 13:11). परंतु ख्रिस्ती लोकांनी धर्म-सिद्धांताच्या बाबतीत अज्ञानी राहणे किंवा योग्य आणि अयोग्य याविषयी नैतिक निश्चिततेचा अभाव असणे अपेक्षित नाही. नाही, ख्रिस्ती परिपक्वता ही या गोष्टींच्या उलट आहे.
अपरिपक्वतेचे आणखी एक लक्षण 1 करिंथकरांस 3:1-3 मध्ये मांडले आहे. पौल करिंथकरांना “ख्रिस्तामधील बालके” म्हणून संबोधित करतो आणि म्हणतो, “तुमच्यामध्ये मत्सर आणि तंटा आहे.” व्यक्तींवरून मंडळीत पडणाऱ्या फुटी आध्यात्मिक अपरिपक्वता उघड करतात. याउलट, ख्रिस्ती परिपक्वता म्हणजे विश्वासणाऱ्यांमधील ऐक्याविषयीचे प्रेम होय.
निष्कर्ष
ख्रिस्ती या जीवनात कधीही परिपूर्ण परिपक्वता प्राप्त करणार नाहीत. वाढीची नेहमीच गरज असते. आपल्याला “प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा.” असे पाचारण केले आहे (2 पेत्र 3:18). आपली पूर्ण परिपक्वता स्वर्गात आपली वाट पाहत आहे. जेव्हा आपण त्याला पाहू, तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ (1 योहान 3:2). केवळ त्याच दिवशी परिपक्वतेचे पूर्ण गौरव आपले होईल. सध्या, आपण, “परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत; आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.” (2 करिंथकरांस 3:18).
आपल्या पूर्ण ख्रिस्तसदृश परिपक्वतेचा दिवस निश्चित आहे: “आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले” (रोमकरांस 8:29). आपण ख्रिस्तामध्ये परिपक्व असू. किती अद्भुत आशा!
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


