
येशू हा नवा दावीद आहे
22/09/2026येशू परिपूर्ण होता का?
“कोणीच परिपूर्ण नाही.” हे आजच्या काळातील एक सुप्रसिद्ध ब्रीदवाक्य आहे, आणि ते खरेही वाटते. आपल्याला आपल्या चुका आणि मर्यादा माहीत असतात; आणि स्वतःच्या बचावासाठी हे ब्रीदवाक्य पुढे करण्यास आपण तत्पर असतो.
तरीही पवित्र शास्त्र या नियमाला एक अपवाद दाखवते. कधी कधी तर आपण असेही ऐकतो: “परिपूर्ण असा केवळ एकच मनुष्य होऊन गेला आहे.” तो मनुष्य म्हणजे येशू ख्रिस्त.
येशू हा आजवर ह्या जगात होऊन गेलेला एकमेव परिपूर्ण मनुष्य आहे, हे निश्चितच खरे आहे. पण पवित्र शास्त्र हे नेमके कुठे आणि कशा प्रकारे शिकवते? विशेष म्हणजे काही वचने असेही सांगतात की येशू परिपूर्ण झाला. चला तर, येशूच्या परिपूर्णतेवर बायबलनिष्ठ असे एक संक्षिप्त चिंतन करूया.
देवाचा दैवी पुत्र
येशूच्या परिपूर्ण मानवी जीवनाविषयी विशेष शब्दांत बोलण्यापूर्वी, आपल्याला हे ओळखणे आवश्यक आहे की तो एक सनातन, दैवी व्यक्ती आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तो देवाचा सनातन पुत्र आहे (योहान 1:1). देवाचा स्वभाव आणि त्याची गुणवैशिष्ट्ये यांचे जे पूर्णत्व आहे, त्या सर्व पूर्णत्वात तो अनादिकालापासून अस्तित्वात आहे. तो आपल्या “अस्तित्वात, ज्ञानात, सामर्थ्यात, पवित्रतेत, न्यायात, चांगुलपणात आणि सत्यात असीम, सार्वकालिक आणि अपरिवर्तनीय” आहे (वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझम 4).
म्हणजेच, येशू आपल्या दैवी पुत्रत्वाच्या तत्त्वामुळे परिपूर्ण आहे. तो पापापासून पूर्णपणे मुक्त आहे.
येशूचे परिपूर्ण मनुष्यत्व
त्याच्या दैवी पुत्रत्वापासून वेगळ्या दृष्टीने पाहिले, तर येशूच्या परिपूर्ण जीवनाविषयी बोलताना आपण त्याच्या देहधारणेतील मनुष्यत्वाच्या दृष्टीने बोलत असतो, म्हणजेच त्याच्या मानवी स्वभावाच्या परिपूर्णतेविषयी बोलत असतो याकडे विविध दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते.
सर्वप्रथम हे की, आदाम पापात पडला तेव्हा त्याच्या पापात येशूचा समावेश नव्हता. रोमकरांस 5:12–21 सारख्या शास्त्रभागाचा हाच अर्थ निघतो. आदामामध्ये “सर्वांनी पाप केले” (रोमकरांस 5:12), परंतु येशू आदामाच्या विरुद्ध उभा राहणारा प्रतिनिधी आहे. एकाच अपराधामुळे आदामामध्ये असलेल्या सर्व माणसांना दंडाज्ञा झाली, तर नीतिमत्वाच्या एका कृत्यामुळे ख्रिस्तामध्ये असलेल्या सर्व माणसांना जीवनदायी असे नीतिमत्त्व प्राप्त होते (रोमकरांस 5:18–19).
जर आदामाद्वारे सर्व लोकांनी पाप केले, आणि तरीही ख्रिस्त नीतिमत्त्व व जीवन देतो, तर येशू आदामामध्ये पाप करणाऱ्या त्या “सर्वांमध्ये” नव्हता. तो जे नीतिमत्त्व देतो, ते कराराचा प्रमुख आणि पूर्णपणे नीतिमान प्रतिनिधी म्हणून त्याच्या अद्वितीय स्थानातून येते. देवदूत गॅब्रिएलने मरियेला दिलेल्या संदेशाशी हे सुसंगत आहे: तिच्या पोटी ज्या मुलाचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील. (लूक 1:35).
या सर्वांचा अर्थ असा आहे की येशूला पतित स्वभाव नव्हता जो पापाकडे प्रवृत्त होतो. येशूचा स्वभाव पापविरहित, निष्पाप मानवी स्वभाव आहे. तो परिपूर्ण नीतिमान आहे.
दुसरे म्हणजे, येशू एक परिपूर्ण आज्ञाधारक मानवी जीवन जगला. हे देखील पुन्हा आदामाशी जोडले पाहिजे. आदामाच्या आज्ञाभंगामुळे दंडाज्ञा आली; परंतु नवा करार येशूला दुसरा आणि शेवटचा आदाम म्हणून सादर करतो, एक असा प्रतिनिधी ज्याच्या आज्ञाधारकतेने पहिल्या आदामाच्या आज्ञाभंगाचा परिणाम उलटवून टाकला.
रोमकरांस 5:12–21 व्यतिरिक्त, मार्कने दिलेले परीक्षेचे वर्णन येशूला नवा आदाम म्हणून चित्रित करते, असा प्रतिनिधी जो परीक्षेला सामोरे जाताना आज्ञाधारक राहतो. त्यामुळेच कदाचित तेथे रानटी पशूंचा उल्लेख आहे, जो एदेन बागेची आठवण करून देतो (मार्क 1:12–13).
त्याचप्रमाणे, लूक 3:21–22 मध्ये येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लूकाच्या शुभवर्तमानात येशूची वंशावळ दिलेली आहे, जी थेट आदामापर्यंत मागे जाते (लूक 3:23–38). त्यानंतर येशू अरण्यात आज्ञाधारक राहतो (लूक 4:1–13). यामुळे पुन्हा येशूची आज्ञाधारकता ही नवा आदाम म्हणून त्याच्या ओळखीशी साम्य स्थापित करते.
पौल 1 करिंथ 15 मध्येही याच विषयाला हात घालतो. येशू हा शेवटचा आदाम आहे, ज्याच्याद्वारे मृतांचे पुनरुत्थान होते (1 करिंथकर 15:21–22, 45). येशूचे पुनरुत्थान हे त्याच्यावरील अन्यायकारक मरणाचे निर्दोषत्व सिद्ध करणारे तत्त्व होते. तो निष्पाप असल्यामुळे, येशूला अपराध्याप्रमाणे मरणदंड देणे हा अन्याय होता; आणि त्याचे नव्या जीवनासाठी उठणे त्याच्या परिपूर्ण आज्ञाधारकतेचे दर्शन घडवते (पाहा 1 तीमथ्य 3:16). येशूचे पुनरुत्थान त्याच्या संपूर्ण जीवनातील आज्ञाधारकतेकडे निर्देश करते (पाहा इब्रीकरांस 2:14–18).
तिसरे म्हणजे, इब्रीकरांस पत्र जेव्हा येशूला परिपूर्ण करण्यात आले असे बोलते (इब्रीकरांस 2:10; 5:9; 7:28), तेव्हा आपण हे मुक्तीच्या इतिहासाच्या संदर्भात समजले पाहिजे, त्याच्या मूलभूत स्वभावाच्या संदर्भात नव्हे. देवाचा सनातन पुत्र म्हणून येशूमध्ये कोणतेही पाप नाही. शिवाय, पृथ्वीवरील जीवनात येशूने कधीही पाप केले नाही. म्हणून, “त्याला परिपूर्ण करण्यात आले”, याचा अर्थ असा आहे की तो अंतिम आणि परिपूर्ण प्रमुख याजक म्हणून आपली भूमिका पार पाडण्यात यशस्वी ठरला, जो पूर्वीच्या याजकांपेक्षा आपल्याला देवाजवळ अधिक उत्तम प्रवेश देतो (पाहा इब्रीकरांस 5:7–10; 6:19–20; 9:11–14; 10:5–14).
येशू अंतिम अर्पण सादर करू शकला, कारण तो देवाचा सार्वकालिक पुत्र आहे, जो अविनाशी जीवनाच्या सामर्थ्यानुसार सदासर्वकाळ जिवंत आहे (इब्रीकरांस 7:15–28). येशूचे पुनरुत्थान आणि त्याने आपल्याला देवाजवळ उपलब्ध करून दिलेला प्रवेश, हे त्याने स्वतःला अर्पण केले त्या अर्पणाच्या परिपूर्णतेवर, आणि म्हणूनच त्याच्या पृथ्वीवरील जीवनाच्या परिपूर्णतेवर आधारलेले आहेत.
निष्कर्ष
आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नसल्यामुळे, येशू परिपूर्ण आहे, ही खरोखरच आनंदाची बातमी आहे. येशू हा दुसरा आणि शेवटचा आदाम आहे; त्याचे परिपूर्ण आज्ञापालन आपल्याला नीतिमान ठरविले जाण्याचा आधार पुरवते, आणि त्याचा लाभ आपण विश्वासाने घेतो. सार्वकालिक जीवन त्याच्यामध्ये सापडते (योहान 1:4; 20:31). तो केवळ मनुष्य नाही; तो देवाचा सार्वकालिक पुत्र आहे. तरीही तो खरा मनुष्य आहे, देव-मनुष्य, ज्याने आपल्यासाठी ते केले जे आपण स्वतःसाठी करू शकत नाही.
परिपूर्ण याजक म्हणून येशू हा एकमेव मध्यस्थ आहे, जो आपल्याला देवाच्या उपस्थितीत परिपूर्ण प्रवेश देतो (इब्रीकरांस 10:14). म्हणून आपण दयेचा लाभ घ्यावा व आपल्याला ऐन वेळी साहाय्य मिळावे म्हणून कृपेच्या राजासनाजवळ धैर्याने जाऊ या (इब्रीकरांस 4:14–16).
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


