Was Jesus Perfect?

येशू परिपूर्ण होता का?

24/09/2026
Is Marriage Eternal?

विवाह सार्वकालिक आहे का?

01/10/2026
Was Jesus Perfect?

येशू परिपूर्ण होता का?

24/09/2026
Is Marriage Eternal?

विवाह सार्वकालिक आहे का?

01/10/2026

मी ज्ञानात कसा वाढू शकतो?

How Can I Grow in Wisdom?

पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की आपण अशा जगात राहतो, जिथे काही गोष्टी परस्परविरोधी आहेत, आणि त्यांपैकीच ज्ञान व मूर्खता या दोन गोष्टी आहेत. हे दोन परस्परविरोधी मार्ग आहेत, जे व्यक्तींच्या जीवनाला आकार देतात. ज्ञान हे जीवनाच्या मार्गाशी जोडलेले आहे, तर मूर्खता मरणाच्या मार्गाशी जोडलेली आहे.

ज्ञानाची व्याख्या सहसा व्यावहारिक जाण किंवा ज्ञानाचा कुशल उपयोग अशी केली जाते. परंतु ख्रिस्ती लोक म्हणून आपण यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन शलमोनाचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत: “परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा आरंभ आहे” (नीतिसूत्रे 1:7). पवित्र शास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर ज्ञान म्हणजे देवाविषयीचे ज्ञान जीवनात उतरवणे; किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ज्ञान म्हणजे सुभक्तीचे जीवन जगण्याचे कौशल्य होय.

या कौशल्याची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात गरज आहे. आपले शब्द, नातेसंबंध, घर, व्यवसाय, भावना, लैंगिकता, नेतृत्व, नागरिकत्व, योजना, तसेच साधनसंपत्तीचे व्यवस्थापन व उपयोग, या सर्व क्षेत्रांत आपल्याकडे ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात अशी एकही गोष्ट नाही जिला ज्ञानाची गरज पडत नाही; कारण देवाच्या सन्मानासाठी आणि गौरवासाठी सर्व बाबतींत कुशलतेने जगणे, हेच आपले ध्येय आहे.

पण आपण ज्ञानात कसे वाढू शकतो? कोणत्याही कौशल्यात आपण कसे वाढतो, याचा विचार करणे येथे उपयुक्त ठरेल. एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे कशी करावी हे जर आपल्याला शिकायचे असेल, तर त्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न, शिक्षण आणि अंमलबजावणी यांची गरज असते. ज्ञानाच्या कौशल्यात वाढ होणेही यापेक्षा वेगळे नाही.  

हेतुपुरस्सर प्रयत्न

ज्ञानाचे कौशल्य ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी आपण प्रार्थना करतो आणि शोधही घेतो. शेवटी, ज्ञान हा येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला दिलेला लाभ आहे. प्रेषित पौल म्हणतो की येशू “ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी” आहेत (कलस्सैकरांस 2:3). आपल्या प्रभूकडे हे ज्ञान त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी आहे, कारण पौल इतर ठिकाणी म्हणतो त्याप्रमाणे, तो “आपल्यासाठी देवापासून आलेले ज्ञान झाला” (1 करिंथकर 1:30). देवाच्या कुटुंबात दत्तक घेतलेली त्याची मुले म्हणून, ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला शहाणपणाचे अभिवचन देण्यात आले आहे. त्यामुळे आपण विश्वासाने देवाकडे मागू शकतो आणि आपला उदार देव ते नक्कीच देईल, याची खात्री बाळगू शकतो (याकोब 1:5). परंतु देव जे ज्ञान किंवा शहाणपण देतो, याचा अर्थ असा होत नाही की तो नेमून दिलेल्या साधनांचा उपयोग न करता ते देतो. 

पवित्र शास्त्र हेही शिकवते की ज्ञानात वाढत जाणे, हे हेतुपुरस्सर प्रयत्नातून होते. ज्ञान हा काही जन्मजात गुण नाही; आणि ते वयानुसार आपोआपही येत नाही. परत लक्ष द्या, तो ज्ञानी राजा आपल्याला सांगतो की आपण त्याचा शोध केला पाहिजे:

जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करशील, व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढशील,

तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. (नीतिसूत्रे 2:4–5)

आपण ज्ञानात वाढतो ते मागितल्याने आणि त्याचा शोध घेतल्याने: “मागा, म्हणजे तुम्हाला दिले जाईल; शोधा, म्हणजे तुम्हाला सापडेल” (मत्तय 7:7).

देवाकडून मिळणारे शिक्षण

एखाद्या कौशल्यात वाढ होण्यासाठी शिक्षणाचीही गरज असते, आणि ज्ञानाच्या बाबतीतही हेच खरे आहे. आपण देवाच्या वचनातून आणि त्याच्या जगातून ज्ञानाविषयी शिकतो. पवित्र शास्त्र सांगते,

कारण ज्ञान परमेश्वर देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. (नीतिसूत्रे 2:6)

पवित्र शास्त्रातून मिळणारे शिक्षण अनेक मार्गांनी आपल्यापर्यंत येते; परंतु पवित्र शास्त्र सातत्याने या गोष्टीवर भर देते की पालकांनी आपल्या मुलांना ज्ञानाचे शिक्षण देणे अत्यंत मौल्यवान आहे. शलमोनाने हे स्पष्टपणे दाखवून दिले आहे, कारण नीतिसूत्रे पुस्तकाचा पहिला भाग एका पित्याने आपल्या पुत्राला दिलेल्या शिक्षणाच्या स्वरूपात आहे. तो म्हणतो:

मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका, व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.कारण मी तुम्हांला उत्तम शिकवण देतो; माझे नीतिशिक्षण सोडू नका. कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो.
ती मला शिकवी व म्हणे, “माझी वचने तुझ्या चित्ती राहोत; तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो;” (नीतिसूत्रे 4:1–4).

तीमथ्याच्या उदाहरणातूनही आपल्याला प्रोत्साहन मिळते. बालपणापासूनच त्याला पवित्र शास्त्र माहीत होते, आणि ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाद्वारे त्याला तारणासाठी ज्ञानी करण्यास समर्थ होते (2 तीमथ्य 3:15). त्याच्या आईने आणि आजीने त्याला हे ज्ञान शिकविले, तेव्हा त्याने त्यांच्या शिक्षणाकडे लक्षपूर्वक कान दिला होता, असे मानण्यास भक्कम कारण आहे (पाहा 2 तीमथ्य 1:5).

सृष्टी सुद्धा असे एक पुस्तक आहे, जे आपल्याला देवाच्या ज्ञानाविषयी शिकवू शकते. कारण सृष्टीच्या कार्यात ज्ञानाचा सहभाग होता; म्हणून ज्ञानाचा ठसा सर्वत्र दिसतो (नीतिसूत्रे 8:22–31). उल्लेखनीय म्हणजे, नीतिसूत्रे पुस्तकाच्या शेवटी आगूरचे शब्द म्हणतात,

पृथ्वीवर चार प्राणी लहान आहेत, तरी ते अत्यंत शहाणे आहेत. (नीतिसूत्रे 30:24–28)

तो पुढे मुंगी, ससे, टोळ आणि पाल यांच्या ज्ञानाचा उल्लेख करतो. सृष्टीतील लहान व नगण्य वाटणारे भाग सुद्धा आपल्याला कुशल आणि सुभक्तीच्या जीवनाच्या तत्त्वांचे शिक्षण देतात. 

ज्ञानाची अंमलबजावणी

जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करण्यास कटिबद्ध होत नाही, तोपर्यंत कोणतेही कौशल्य प्राप्त होत नाही किंवा दृढही होत नाही. 

शलमोनाने म्हटले,

माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत; (नीतिसूत्रे 3:1)

याच कारणामुळे ज्ञान आणि मूर्खता यांची तुलना मार्गाशी केली जाते. मार्गाचा हेतूच असा असतो की त्यावर पाऊल ठेवावे आणि चालत राहावे. जर आपल्याला ज्ञानात वाढायचे असेल, तर आपण ज्ञानाचा सराव केला पाहिजे, केवळ ऐकणारे नव्हे तर ते पाळणारे झाले पाहिजे. आपण असे करत गेलो, तर कदाचित आपली वाटचाल संथ असेल; तरी आपण वाढत जाऊ असे अभिवचन आपल्याला दिलेले आहे:

परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणार्‍या उदयप्रकाशासारखा आहे. दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे; त्यांना कशाची ठेच लागते हे त्यांना कळत नाही. (नीतिसूत्रे 4:18–19)

ज्ञानात वाढणे हे कोणतेही कौशल्य शिकण्यापेक्षा आणि त्यात वाढण्यापेक्षा फारसे वेगळे नाही. अगदी साध्या रीतीने आपण हेतुपुरस्सर प्रयत्नांनी त्याचा पाठपुरावा करतो, वचन आणि सृष्टी यांच्याकडून सतत शिक्षण घेतो, आणि त्याची तत्त्वे आचरणात उतरवतो, अशा प्रकारे जोपर्यंत येशूच्या कृपेने आगामी जगात आपल्याला परिपूर्ण केले जात नाही, तोपर्यंत आपण कुशल सुभक्तीचे जीवन जगत उन्नती करतो.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

काईल बोर्ग

काईल बोर्ग

रेव्हरंड काईल बोर्ग हे विंचेस्टर, कॅन्सस येथील विंचेस्टर रिफॉर्म्ड प्रेस्बिटेरियन चर्चचे वरिष्ठ पाळक आहेत. ते व्हॉट इज लव्ह? या पुस्तकाचे लेखक आहेत.
How to Pursue Holiness Without Becoming Legalistic

नियमपंथी न बनता पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न कसा करावा

10/09/2026
What Is Monotheism?

एकेश्वरवाद म्हणजे काय?

15/09/2026

मंडळीने आपल्या दिव्यांग सदस्यांची काळजी कशी घ्यावी?

माझ्या सध्याच्या मंडळीत चिल्ड्रन्स मिनिस्ट्री डायरेक्टर (बाल सेवाकार्य संचालक) म्हणून पाचारण झाल्यानंतर काही आठवड्यांतच, मंडळीच्या एका एल्डर (वडील) आणि त्यांच्या पत्नीने एका बैठकीची विनंती केली. त्यांनी या महत्त्वपूर्ण प्रश्नाने सुरुवात केली: “तुम्ही येथे आमच्या चर्चमधील सर्व मुलांचे सेवाकार्य करण्यासाठी आला आहात, की केवळ बहुतांश मुलांचे?” योग्य उत्तर (अर्थातच, सर्व मुलांची!) दिल्यानंतर, त्यांनी मला विचारले की, आमच्या मंडळीचे सदस्य असलेल्या आणि दिव्यांगत्वाने बाधित असलेल्या पाच मुलांची आणि त्यांच्या कुटुंबांची काळजी घेण्याची माझी काय योजना आहे. या आव्हानात्मक प्रश्नांनी माझ्या अंतःकरणाला टोचणी लावली आणि माझ्या सेवाकार्याच्या जगाला हादरवून सोडले, आणि याच पार्श्वभूमीवर पुढे आमच्या मंडळीत एक समृद्ध दिव्यांग सेवाकार्य उभे राहिले. 

मंडळीत दिव्यांगत्वाने बाधित झालेल्या व्यक्तींची आणि कुटुंबांची काळजी कशी घ्यावी या प्रश्नाचे उत्तर सर्वप्रथम मंडळीच्या सर्व सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ओळखण्याद्वारे मिळते. दिव्यांग सेवाकार्य हे ऐच्छिक नाही, जरी तुमच्या मंडळीत दिव्यांगत्वाचे प्रमाण जास्त नसले तरीही. हे असे सेवाकार्य नाही ज्याच्यावर आपण मुलांचे, तरुणांचे इत्यादी “अधिक महत्त्वाच्या” सेवाकार्यांनंतर लक्ष केंद्रित करतो. जवळजवळ प्रत्येक स्थानिक मंडळीत कोणी ना कोणी दिव्यांगत्वाने प्रभावित व्यक्ती असतेच, मग ते स्पष्टपणे दिसणारे असो किंवा नजरेआड राहणारे असो. आणि समाजातही असे आणखी बरेच लोक आहेत, ज्यांना मंडळीने आपल्याला कवटाळावे अशी तळमळ असते.

1 करिंथकरांस 12 मध्ये, प्रेषित पौल मंडळीचे वर्णन अनेक अवयवांनी बनलेल्या ख्रिस्ताच्या एका शरीराप्रमाणे करतो. सर्व अवयव भिन्न असूनही आवश्यक कसे आहेत, हे सांगितल्यानंतर तो लिहितो: “शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरूण घालून विशेष मान देतो, आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते; आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. जे उणे आहे त्यांना विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे; अशासाठी की, शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.” (1 करिंथ 12:22, 25). ही सत्ये दिव्यांग व्यक्तींना लागू करताना, आपल्याला केवळ त्यांची चांगली काळजी घेण्यासाठीच पाचारण करण्यात आलेले नाही; तर त्या ख्रिस्ताच्या शरीरासाठी अपरिहार्य आहेत, हे ओळखण्यासाठीही पाचारण करण्यात आले आहे.

पवित्र शास्त्रात मंडळीचे वर्णन केवळ ख्रिस्ताचे शरीर म्हणूनच नाही, तर देवाचे कुटुंब म्हणूनही केलेले आहे. म्हणून, शरीराचा एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींची काळजी घेण्यासाठी आपल्याला पाचारण झाले असले, तरी ती काळजी कौटुंबिक अंतःकरणातून घेतली पाहिजे. ख्रिस्तामधील भाऊ व बहिणी म्हणून आपण कौटुंबिक बंध आणि ख्रिस्तातील परस्पर प्रीती सामायिक करतो. मंडळीची ही दोन चित्रे मनात ठेवून, आपण दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींची आणि कुटुंबांची काळजी कशी घेतो याच्याशी संबंधित पाच व्यावहारिक लागूकरणे खालीलप्रमाणे आहेत:

समावेश 

मंडळीचे कुटुंब म्हणून, सर्वांचा समावेश व्हावा अशी आपली इच्छा असली पाहिजे. विविध प्रकारच्या दिव्यांगत्वांमुळे सहभागी होणे आणि शरीराचा कार्यरत अवयव बनणे कठीण ठरते. म्हणून उपासनेपासून शिष्यत्वापर्यंत, मिशनरी कार्यापासून इतर सर्व सेवाकार्यांपर्यंत, मंडळीच्या प्रत्येक सेवाक्षेत्राकडे पाहून आपण विचारले पाहिजे की आपल्या सर्व सदस्यांचा समावेश कसा निश्चित करता येईल. दिव्यांग व्यक्ती केवळ समाविष्ट होऊ नयेत, तर खऱ्या अर्थाने आपलेपणाने सामील व्हाव्यात, यासाठी आपण शक्य ते सर्व काही केले पाहिजे (इफिसकरांस 2:19).

सुलभ प्रवेश

आपण दिव्यांग व्यक्तींची काळजी घेतो याचा एक अधिक स्पष्ट मार्ग म्हणजे आपल्या इमारती सुलभ करणे होय. जर आपण एकत्र येऊच शकत नसू, तर सर्व लोक एकत्र उपासना कशी करू शकतील आणि एकत्र शिष्यत्वात कसे वाढू शकतील? आपल्या सर्व सुविधा सुलभ करणे ही नेहमीच प्राथमिकता असली पाहिजे. पण त्याबरोबरच आपल्या सर्व सेवाकार्यांचे कार्यक्रमही प्रत्येकासाठी सुलभ करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. श्रवणदोष आणि दृष्टिदोष असलेले, शांत जागेची गरज असलेले, तसेच बौद्धिक अडचणी असलेले लोक, यांची आपण काळजी कशी घेतो? रविवारची शाळा (संडे स्कूल), पवित्र शास्त्र अभ्यास आणि इतर सेवाकार्यांच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी काही व्यक्तींना सोबत्याची गरज आहे का? मंडळीचे कुटुंब म्हणून, सर्व सदस्यांना कौटुंबिक जीवनात पूर्ण प्रवेश मिळावा, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.

कृपादानांचे आदानप्रदान 

देवाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सामूहिक हितासाठी आत्मिक कृपादाने देण्यात आली आहेत (1 करिंथ 12:7). यात दिव्यांग असलेल्या सर्व ख्रिस्ती लोकांचाही समावेश होतो. म्हणून, आपण दिव्यांग व्यक्तींची सेवा आणि काळजी करावयाचीच आहे; पण त्याचबरोबर देवाचे गौरव करण्यासाठी आणि इतरांची सेवा करण्यासाठी त्यांनी आपली कृपादाने वापरावीत म्हणून त्यांना शिष्यत्वात वाढवले आणि सज्ज केले पाहिजे. दिव्यांग व्यक्तींकडे देण्यासाठी असलेल्या कृपादानांशिवाय मंडळीचे कुटुंब अपूर्ण आहे.

खरे नातेसंबंध

हे जग दिव्यांग व्यक्तींचे मानवी मूल्य कमी करून पाहते. कधी कधी ख्रिस्ती लोकांनाही त्या व्यक्तीऐवजी केवळ तिचे दिव्यांगत्वच दिसते. आपण एकमेकांना कुटुंब म्हणून स्वीकारतो, तेव्हा खऱ्या व्यक्तींशी खरे नातेसंबंध जपण्याचा आपण प्रयत्न करतो. दिव्यांग व्यक्तींची केवळ “देखभाल” करण्यापलीकडे जाऊन आपण त्यांच्या विषयी मनापासून जिव्हाळा बाळगला पाहिजे. त्यांचा वृत्तांत जाणून घ्या. त्यांना ओळखा. त्यांच्यावर प्रीती करा. 

काळजीवाहूंना विश्रांती 

मंडळी दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींची काळजी घेऊ शकते असा अंतिम मार्ग म्हणजे त्यांच्या काळजीवाहूंची काळजी घेणे. पालकांना एक रात्र बाहेर जाण्याची संधी देणे किंवा अखंड चालणाऱ्या काळजीच्या जबाबदारीतून काही तासांची विश्रांती देणे, हे दीर्घकालीन काळजी घेण्यासाठी आवश्यक आहे. बहुतेक लोकांसाठी या जगाच्या चिंतांमधून स्वतःसाठी विश्रांती शोधणे हे सहसा एक सोपे काम असते. पण दिव्यांगत्वाने बाधित कुटुंबांना शरीर आणि आत्मा यांना विश्रांती व नवचैतन्य मिळण्यासाठी त्यांच्या मंडळी- कुटुंबाकडून मदतीची आवश्यकता असते.

निष्कर्ष

अलिप्तता, फूट आणि संघर्ष यांनी अनेकदा ओळखल्या जाणाऱ्या या जगात, ख्रिस्ती लोकसुद्धा सहजपणे एकमेकांपासून विलग होऊ शकतात. परंतु मंडळी म्हणून आपल्याला आपले दुहेरी वास्तव प्रत्यक्ष जगायचे आहे: आपण एकमेकांशी जोडलेले असे ख्रिस्ताचे शरीर आहोत, आणि आपण एकमेकांवर प्रीती करण्यासाठी व एकमेकांची काळजी घेण्यासाठी पाचारण पावलेले देवाचे कुटुंब आहोत. दिव्यांग सेवाकार्याचे पाचारण म्हणजे देवाच्या सर्व लोकांची काळजी घेण्याचेच पाचारण आहे.  

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.