Is the Church Full of Hypocrites

मंडळी ढोंगी लोकांनी भरलेली आहे का?

04/06/2026
The Motivation for Love

प्रीतीची प्रेरणा

11/06/2026
Is the Church Full of Hypocrites

मंडळी ढोंगी लोकांनी भरलेली आहे का?

04/06/2026
The Motivation for Love

प्रीतीची प्रेरणा

11/06/2026

ख्रिस्तामध्ये” असणे म्हणजे काय?

What Does It Mean to Be In Christ

‘आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे; त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान व बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले; ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत; ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या, खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. (इफिसकरांस पत्र 1:3-14)

जेव्हा लोक तुम्हांला तुमच्या विश्वासाबद्दल विचारतात, तेव्हा तुम्ही स्वतःचे वर्णन कसे करता? तुम्ही बहुधा असे म्हणत असाल, “मी प्रेस्बिटेरियन आहे” किंवा “मी बॅप्टिस्ट आहे”? किंवा कदाचित, “मी एपिस्कोपलियन आहे”? किंवा तुम्ही इतकेच म्हणत असाल, “मी ख्रिस्ती आहे”?

आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात असा विचार बहुधा कधीच येत नाही की, जर आपण नव्या कराराच्या काळातील विश्वासणाऱ्यांना स्वतःचे वर्णन करायला सांगितले असते, तर त्यांनी कदाचित कधीच “आम्ही ख्रिस्ती आहोत” असे उत्तर दिले नसते. खरं तर, “ख्रिस्ती” हा शब्द नव्या करारात फक्त तीनदा येतो. अंत्युखिया येथे शिष्यांना प्रथम “ख्रिस्ती” हे नाव देण्यात आले (प्रेषितांची कृत्ये 11:26). पुढे, राजा अग्रिप्पा प्रेषित पौलाला विचारतो, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवतोस!” आणि तो जवळजवळ तुच्छतेने हा शब्द उच्चारतो, असेच वाटते (प्रेषितांची कृत्ये 26:28). आणि नंतर, आपल्या पहिल्या पत्रात, शिमोन पेत्र कोणी तरी “ख्रिस्ती” म्हणून जर दुःख सोसतो” याविषयी बोलतो (1 पेत्र 4:16). 

या तिन्ही संदर्भांत “ख्रिस्ती” हा शब्द बहुधा तुच्छतादर्शकच आहे, अगदी शुभवर्तमानाच्या विरोधकांनीच घडवलेली “द्वेषपूर्ण भाषा” आहे, जसा सतराव्या शतकात “प्युरिटन” हा शब्द होता. आज “फंडामेंटलिस्ट” हा शब्द जसा उपहासाने उच्चारला जातो, तसाच हा शब्दही जवळजवळ तुच्छतेनेच उच्चारला जात असावा. हे “द्वेषपूर्ण शब्द”च आहेत. “ख्रिस्ती” हा शब्द जर सुरुवातीला अशा रीतीनेच प्रचलित झाला असेल, तर प्रेषितांच्या कृत्यांमध्ये लूक “शिष्य” हा शब्द वापरतो (उदा. प्रेषितांची कृत्ये 6:1; अशी दोन डझनांहून अधिक उदाहरणे आहेत), किंवा कधी कधी विश्वास ठेवणाऱ्यांचे वर्णन “त्या मार्गाचे” अनुयायी असे करतो (प्रेषितांची कृत्ये 9:2; 22:4; 24:14), हे आश्चर्यकारक नाही. कारण त्यांनी त्याचे अनुसरण केले ज्याने म्हटले होते, “मी मार्ग आहे” (योहान 14:6).

पण जर तुम्ही पौलाला विचारले असते, “तू कोण आहेस असे तुला वाटते?” तर त्याचे उत्तर बहुधा वरीलपैकी कोणतेही नसते; तर ते असे असते, “मी ख्रिस्तामध्ये असलेला एक मनुष्य आहे.”

मला आठवते, किशोरवयात असताना मी 2 करिंथकरांस 12:1-10 वाचत होतो, हा तो शास्त्रभाग आहे ज्यामध्ये पौल त्याला मिळालेल्या विलक्षण प्रकटीकरणांबद्दल, आणि त्याला गर्वापासून दूर ठेवणाऱ्या देहातील काट्याबद्दल बोलतो. या शास्त्रभागाची प्रस्तावना करताना तो सांगतो की तो एकदा “ख्रिस्तामध्ये असलेल्या एका मनुष्याला” ओळखत होता, ज्याला देवाच्या आश्चर्याची आणि कृपेची अशी असाधारण प्रकटीकरणे मिळाली होती की त्यांचे वर्णन इतरांसमोर करणे त्याला अयोग्य वाटले. मला आठवते, मी मनातल्या मनात विचार करीत असे, “पौल ज्याच्याबद्दल बोलतो तो हा निनावी ‘ख्रिस्तामध्ये असलेला मनुष्य’ कोण?” कदाचित त्या वेळी माझी बुद्धी इतकी तीक्ष्ण नव्हती, पण तरी उत्तर हळूहळू माझ्या लक्षात आले: पौल स्वतःबद्दलच बोलत आहे! तो स्वतःचे वर्णन याच मूलभूत पद्धतीने करतो, कारण तो स्वतःबद्दल विचार करतो, तीच ही पायाभूत चौकट आहे. तो “ख्रिस्तामध्ये असलेला मनुष्य” आहे. 

“ख्रिस्तामध्ये” हे दोन शब्द, आणि त्यांचे समानार्थी शब्दप्रयोग (उदा. “त्याच्यामध्ये”), मनात घट्ट पकडून ठेवा. मग तुमच्या बायबलमधील, पौलाची तेरा पत्रे असलेल्या, साठच्या आसपास पानांवरून झटकन नजर फिरवा. तुम्हाला “ख्रिस्तामध्ये” ही अभिव्यक्ती, किंवा तिचा एखादा समतुल्य प्रकार, ऐंशीहून अधिक वेळा आढळेल. आणि “प्रभूमध्ये” (किंवा कधी कधी “प्रभू येशूमध्ये”) अशा समतुल्य अभिव्यक्तींची संख्या तर जवळजवळ त्याहून दुप्पटच आहे. 

जर तुम्ही याकडे यापूर्वी कधी लक्ष दिले नसेल, तर पौल या अभिव्यक्तींचा कशाप्रकारे वारंवार उपयोग करतो, हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, आणि आपण त्यांच्याकडे कधीच विशेष लक्ष कसे दिले नाही, असे तुम्हाला वाटू लागेल. आणि तरीही, वर्षानुवर्षे, अगदी दशकानुदशके, पौलाची पत्रे वाचूनही, या छोट्याशा शब्दयोगी अव्ययाचे महत्त्व लक्षात न येणे शक्य आहे, कारण ख्रिस्ती असण्याचा अर्थ काय, हे सांगण्याची पौलाची हीच मूलभूत पद्धत आहे. 

हे दोन शब्द, म्हणजे “मध्ये” हे शब्दयोगी अव्यय आणि त्यानंतर येणारी “ख्रिस्त” ही पदवी, या लेखाचा मध्यवर्ती विषय आहे. या  लेखाच्या शेवटी तुम्हाला असे वाटले, तर त्यात नवल नाही, की तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या दोन शब्दांच्या स्पष्टीकरणांपैकी हे सर्वात लांब स्पष्टीकरण आहे. आणि तरीही, हा लेख या समृद्ध आणि अद्भुत सिद्धांताच्या केवळ पृष्ठभागालाच स्पर्श करणार आहे. परंतु मला आशा आहे की, हा लेख तुम्हाला पवित्र शास्त्रासंबंधित निरनिराळ्या दृष्टीकोनांतून “ख्रिस्तामध्ये” असणे म्हणजे काय, हे पाहण्यास प्रोत्साहित करेल. तुम्ही जर त्याचे असाल, तर तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवशी तुम्ही खरेच आणि प्रत्यक्षात हेच आहात, म्हणजे “ख्रिस्तामध्ये” असलेला मनुष्य किंवा “ख्रिस्तामध्ये” असलेली स्त्री. 

नव्या कराराच्या एका विद्वानाने असे निदर्शनास आणून दिले आहे की ‘द गॉडफादर’ या चित्रपटात ‘माफिया’ हा शब्द कधीच वापरला जात नाही, तरी तो संपूर्ण चित्रपटाचा अंतर्निहित गृहीतक असतो.1 त्याच प्रकारे, ज्या ठिकाणी “ख्रिस्तामध्ये” ही विशिष्ट शब्दरचना वापरलेली नसते, तिथेही तिच्याद्वारे जे अभिप्रेत आहे, ते प्रेषित पौल ख्रिस्ती जीवन कसे जगावे याविषयी जे काही सांगतो, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मूलभूत आहे. आणि इतकेच नाही, तर वैयक्तिक विश्वासणाऱ्याला किंवा अख्ख्या मंडळीला अस्वस्थ करणाऱ्या अनेक प्रश्नांचे निराकरण देखील त्यात आहे.

नवा करार “ख्रिस्तामध्ये” याचा अर्थ काय, याची कधीही थेट व्याख्या करीत नाही. त्याचे महत्त्व समजून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यात काय अंतर्भूत आहे, याचे वर्णन करणाऱ्या निरनिराळ्या शास्त्रभागांवर मनन करणे. येथे, आपले प्राथमिक कार्य स्वतःला “ख्रिस्तामध्ये” असण्याच्या महत्त्वाशी परिचित करून देणे हे आहे. आणि हे करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्राच्या पहिल्या अध्यायात त्या अभिव्यक्तीची उपस्थिती पाहून मनन करणे.

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

सिंक्लेअर बी. फर्ग्युसन

सिंक्लेअर बी. फर्ग्युसन

डॉ. सिंक्लेअर बी. फर्ग्युसन हे लिगोनिअर मिनिस्ट्रीजचे अध्यापन सहकारी, लिगोनिअर मिनिस्ट्रीजचे उपाध्यक्ष, आणि रिफॉर्मड थिओलॉजिकल सेमिनरी येथे सिस्टेमॅटिक थिओलॉजीचे चान्सलर प्रोफेसर आहेत. सोजर्नर्स अँड एक्झाइल्स यांसह लिगोनिअरच्या अनेक अध्यापन-मालिकांमध्ये ते प्रमुख शिक्षक म्हणून सहभागी आहेत. द होल क्राईस्ट, मॅच्युरिटी, आणि डिव्होटेड टू गॉड्स चर्च यांसह अनेक पुस्तकांचे ते लेखक आहेत. डॉ. फर्ग्युसन हे थिंग्स अनसीन या पॉडकास्टचे यजमान आहेत.