
ख्रिस्तामध्ये” असणे म्हणजे काय?
09/06/2026प्रीतीची प्रेरणा
सी. एस. लुईस यांच्या विसाव्या शतकातील अभिजात ग्रंथ द स्क्रूटेप लेटर्स मध्ये, स्क्रूटेप नावाचा पिशाच्च आपला पुतण्या वर्मवूड याला देव माणसांवर प्रीती का करतो, यामागचे रहस्य शोधण्याची गरज पटवून देत पत्र लिहितो आहे, अशी कल्पना त्यांनी केली आहे. तो लिहितो:
सत्य तर हे आहे की, केवळ गाफीलपणामुळे माझ्या तोंडून असे निघाले की शत्रू खरोखरच माणसांवर प्रीती करतो. अर्थात, ही गोष्ट अशक्य आहे. . . . प्रीतीबद्दलचे त्याचे सर्व बोलणे दुसऱ्या कशासाठी तरी केलेले सोंग असावे, त्यांना निर्माण करण्यामागे आणि त्यांच्यासाठी इतके कष्ट घेण्यामागे त्याचा नक्कीच काही खरा हेतू असावा. तो एखाद्या व्यक्तीवर खरोखरच ही अशक्य प्रीती करतो, असे आपल्याला वाटते या मागचे कारण म्हणजे त्या खऱ्या हेतूचा शोध घेण्यात आलेले आपले संपूर्ण अपयश. त्यांच्यापासून त्याला नेमके काय मिळणार आहे? हा न सुटणारा प्रश्न आहे. . . . आणि तिथेच मोठे कार्य आहे. आपल्याला ठाऊक आहे की तो खरोखर प्रेम करू शकत नाही; कोणीच करू शकत नाही; त्याला काही अर्थ नाही. तो नक्की काय करीत आहे, हे जर आपल्याला कळले असते तर!
या उत्तराचा शोध घेण्याच्या भुतांच्या या प्रयत्नांसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ. कारण आपण जे देवाचे लोक आहोत, त्या आपल्याला अशा शोधाची गरज नाही. देव आपल्यावर खरोखरच प्रीती करतो, यावर आपला विश्वास आहे. देव प्रीती आहे (1 योहान 4:16). म्हणून प्रीती करणे हा त्याचा स्वभावच आहे. आदामामध्ये झालेल्या पतनापूर्वीच्या आपल्या निर्दोष अवस्थेत त्याने आपल्यावर प्रीती केली, आणि आपल्या पतित अवस्थेतही तो आपल्यावर प्रीती करीतच आहे. म्हणूनच येशू म्हणू शकला, “तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा… अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे.” (मत्तय 5:44-45).
देवाची आपल्यावरील असलेल्या प्रीतीचे पर्यवसान वधस्तंभावरील त्याच्या मुक्तीच्या कार्यात स्पष्टपणे दिसून आले : “कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे” (योहान 3:16). ही अवर्णनीय प्रीती आहे, आणि ती आपल्याला पूर्णपणे थक्क करून सोडते. चार्ल्स वेस्ली यांनी म्हटल्याप्रमाणे:
माझ्यावर ही प्रीतीची उधळण कोठून? वरील माझ्या कैवाऱ्याला विचारा! येशूच्या मुखावर त्याचे कारण पहा, जो आता कृपेच्या सिंहासनासमोर आहे.
तेथे माझ्यासाठी तारणारा उभा आहे; आपल्या जखमा दाखवतो आणि आपले हात पसरतो, देवप्रीतीआहे; मला ठाऊक आहे, मला जाणवते; येशू जिवंत आहे आणि तो आजही मजवर प्रीती करतो.
पवित्र शास्त्रात प्रगट झालेली देवाची आपल्यावरील प्रीतीच आपल्यात त्याच्याविषयीची प्रीती प्रज्वलित करते. कारण अशा विस्मित करणाऱ्या सत्यांच्या प्रकाशात आपण त्याच्यावर प्रत्युत्तरादाखल प्रीती का करू नये? वधस्तंभावर देवाच्या स्वतःच्या पुत्राचे बलिदान ही ती शेकोटी आहे, जिथे देवाप्रती थंड झालेली आपली अंतःकरणे उब घेतात. आणि आपल्यापैकी जे उपदेशक आहेत, त्यांच्यासाठी देवाने आपल्याकरता केलेल्या बलिदानाच्या प्रकाशात, सेवाकार्यात कोणतेही बलिदान फार मोठे ठरत नाही. पवित्र आत्मा या सत्याचा उपयोग आपल्या आत्म्याच्या ज्वलन-कक्षांना धगधगते ठेवण्यासाठी करतो. मग आपला आवेश विझवता न येणारा बनतो. आयझॅक वॉट्स चे प्रसिद्ध भजन शेवटच्या कडव्यात हे सत्य फारच सुंदर रीतीने मांडते:
निसर्गाचे संपूर्ण साम्राज्य जरी माझे असते,
तरी ते अर्पण फारच लहान ठरले असते;
इतकी आश्चर्यकारक, इतकी दैवी प्रीती,
माझा आत्मा, माझे जीवन, माझे सर्वस्व मागते.
तरीही, आपण केवळ देवावर मात्र प्रत्युत्तरादाखल प्रीती करीत नाही, तर देवाने ज्यांच्यावर प्रीती केली आहे आणि ज्यांच्यावर तो प्रीती करीतच आहे, त्यांच्याकडेही आपण ओढले जातो. देवाचे प्रेम ज्यांच्यापर्यंत पोहचावे असा त्याचा हेतू आहे, त्या लोकांपर्यंत ते प्रेम पोहचविण्याची साधने आपण व्हावे, अशी आपली इच्छा असते. आपण देशोदेशी आणि समुद्रपार जाऊ, ते केवळ हरवलेल्या आत्म्यांना देवाच्या क्रोधाविषयी इशारा देण्यासाठीच नव्हे, तर ख्रिस्त येशूमध्ये देवाने त्यांच्यावर दाखविलेल्या प्रीतीला प्रतिसाद द्यावा, अशी त्यांची कळकळीने विनवणी करण्यासाठीही. खरेच, आपल्याला हे प्रेम ठाऊक असेल, तर आपण तसे केलेच पाहिजे.
पौलाने जेव्हा खालील शब्द लिहिले, तेव्हा त्याचा हाच अर्थ होता:
कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले;…म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. (2 करिंथकरांस 5:14, 20)
ही प्रीती जर तुम्हाला सुवार्ता-प्रचाराच्या परिश्रमासाठी प्रवृत्त करत नसेल, तर तुम्ही बहुधा तुमच्या पूर्ण क्षमतेच्या कितीतरी खाली स्तरावर कार्य करीत आहात.
देवाने आपल्यावर दाखविलेल्या प्रीतीच्या प्रकाशात जेव्हा आपण देवावर प्रीती करतो, तेव्हा आपण त्याच्या वधूवर, म्हणजे मंडळीवर, प्रीती करीत आहोत, हे आपल्याला दिसून येते. देवाचे लोक, जे त्याने स्वतःच्या रक्ताने विकत घेतले आहेत, ते आपल्यासाठी फारच मौल्यवान ठरतात. पौलाबरोबर आपण त्यांना असे म्हणतो:
ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी; ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून, तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती, हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे; असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. (इफिसकरांस 3:17-19).
या हेतूने, देव आपल्याला देतो त्या सर्व सामर्थ्याने आणि शक्तीने आपण कष्ट करतो आणि झटतो.
लुईसचे नरकातील भुते देवाने तो आपल्यावर प्रीती करतो, असा जो दावा केला आहे, त्यामागचा “खरा हेतू” शोधण्यात व्यस्त असताना, ह्याच प्रीतीने आपल्याला केवळ देवावर प्रीती करण्यासच नव्हे, तर त्याने निर्माण केलेल्या आणि तारलेल्या लोकांवर प्रीती करण्यासही प्रवृत्त केलेले आपण पाहतो. जॉन केंटच्या शब्दांत सांगायचे, तर आपण स्वतःला असे म्हणतो:
अशा प्रीतीवर, माझ्या आत्म्या, अजूनही विचार कर, इतकी महान, समृद्ध आणि विनामूल्य प्रीती; पवित्र आश्चर्यात हरवलेले असताना म्हण, हे प्रभू, माझ्यावर अशी प्रीती का? हालेलुया! कृपा सर्वकाळ राज्य करेल.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


