
आपण काम का करतो?
21/10/2025
प्रोटेस्टंट धर्मसुधारणा का आवश्यक होती?
30/10/2025प्रोटेस्टंट विश्वासात प्रचलित सर्वात खोटा सिद्धांत कोणता आहे?
चला, आपण मंडळी इतिहासाच्या एका परीक्षेच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कार्डिनल रॉबर्ट बेलारमिन (1542–1621) ही हलक्यात घेण्यासारखी व्यक्ती नव्हती. ते पोप क्लेमेंट 8 यांचे वैयक्तिक ईश्वरशास्त्रज्ञ होते आणि सोळाव्या शतकातील रोमन कॅथलिक धर्मातील प्रोटेस्टंट धर्मसुधारणे (खरे पाहता, प्रतिक्रियांत्मक धर्मसुधारणे) विरुद्ध उठलेल्या चळवळीतील सर्वात समर्थ नेत्यांपैकी एक होते. संधीच्या एका प्रसंगी त्यांनी लिहिले: “प्रोटेस्टंट विश्वासात प्रचलित असा सर्वात खोटा सिद्धांत _______ आहे.” बेलारमिन यांचे हे विधान पूर्ण करा, स्पष्टीकरण द्या आणि चर्चा करा.
तुम्ही याचे काय उत्तर द्याल? सर्व प्रोटेस्टंट खोट्या मतांपैकी सर्वात मोठे खोटे मत कोणते? कदाचित “केवळ विश्वासाने नीतिमान ठरविले जाणे”? कदाचित “केवळ पवित्र शास्त्र”, किंवा धर्मसुधारणेच्या इतर घोषवाक्यांपैकी एखादे?
ही उत्तरे तर्कसंगत वाटतात; तरीही त्यापैकी एकही बेलारमाइनचे वाक्य पूर्ण करत नाही. त्यांनी असे लिहिले होते: “प्रोटेस्टंट विश्वासात प्रचलित असा सर्वात खोटा सिद्धांत म्हणजे ‘तारणाची खात्री.’”
क्षणभर विचार केला तर कारण उलगडते. जर नीतिमान ठरविले जाणे हे केवळ विश्वासाने, केवळ ख्रिस्तामध्ये, केवळ कृपेने होत नसेल, म्हणजे जर विश्वासाला कर्मांनी पूर्णत्व द्यावे लागत असेल; जर ख्रिस्ताचे कार्य काही ना काही रीतीने पुन्हा-पुन्हा घडत असेल; जर कृपा स्वैर आणि सार्वभौम नसेल, तर शेवटला न्याय होईल तेव्हा आम्हाला अंतिमरित्या नीतिमान ठरविले जाण्यासाठी काहीतरी सतत करणे किंवा त्यात “जोडणे” आवश्यक राहते. हीच तर खरी समस्या आहे : जर अंतिमरित्या नीतिमान ठरविले जाणे आपण पूर्ण करावयाच्या एखाद्या घटकावर अवलंबून असेल, तर तारणाची खात्री उपभोगणे अशक्य ठरते. कारण मग, ईश्वरशास्त्रीयदृष्ट्या, अंतिमरित्या नीतिमान ठरविले जाणे हे शर्तीवर अवलंबून व अनिश्चित राहते, आणि (रोमने मान्य केल्याप्रमाणे विशेष प्रकटीकरण वगळता) कोणालाही तारणाची खात्री असू शकत नाही. पण जर ख्रिस्ताने सर्व काही पूर्ण केले असेल, जर नीतिमान ठरविले जाणे कृपेने आहे—कर्मांच्या कोणत्याही योगदानाविना—आणि ते विश्वासाच्या रिकाम्या हातांनी ग्रहण केले जाते, तर मग तारणाची खात्री—अगदी “पूर्ण खात्री” देखील—प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी शक्य होते.
बेलारमिन यांना पूर्ण, विनामूल्य व बंधनमुक्त-कृपा धोकादायक का वाटली, यात काहीच आश्चर्य नाही! आणि धर्मसुधारकांना इब्री लोकांस पत्र विशेष प्रिय वाटले, यातही नाही!
म्हणूनच इब्री लोकांस पत्राचा लेखक ख्रिस्ताच्या कार्याच्या वर्णनाच्या शिखरावर (इब्री 10:18) क्षणभर थांबून पौलाप्रमाणे “म्हणून” असा निष्कर्ष काढतो (इब्री 10:19) आणि पुढे “आपण….विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ” (इब्री 10:22) असा आग्रह करतो. त्याच्या “म्हणून” ची तार्किक शक्ती पाहण्यासाठी आपल्याला संपूर्ण पत्र पुन्हा वाचण्याची गरज नाही. ख्रिस्त आपला महायाजक आहे; जसे आपली शरीरे निर्मळ पाण्याने धुतली गेली, तसेच आपली अंतःकरणे दुष्ट भावनेपासून शुद्ध झाली आहेत (वचन 22).
ख्रिस्त एकदाच सर्वकाळाकरिता आमच्या पापांसाठी अर्पण झाला आहे; “अविनाशी जीवनाच्या सामर्थ्याने आमचा प्रतिनिधी याजक म्हणून तो उठविला गेला व निर्दोष ठरविला गेला. त्याच्यावर विश्वास ठेवून आपण देवाच्या सिंहासनासमोर त्याच्या नीतिमत्वामुळे नीतिमान समजले जातो. कारण आपण त्याच्या नीतिमत्वामध्येच नीतिमान ठरविले गेलो आहोत, त्याचेच नीतिमान ठरविले जाणे आपल्या खात्यावर मोजले गेले आहे! आणि जसा तो स्वर्गातून पडू शकत नाही, तशीच ही नीतिमान ठरविले जाण्याची स्थिती आपण गमावू शकत नाही. म्हणूनच आमच्या नीतिमान ठरविले जाण्याला आणखी “पूर्ण” करण्याची गरज नाही, जशी ख्रिस्ताच्या कार्याला नाही!
हेच लक्षात घेऊन, लेखक म्हणतो,, “कारण पवित्र होणार्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केले आहे.” (इब्री 10:14). आपण देवापुढे पूर्ण खात्रीने उभे राहू शकतो, याचे कारण म्हणजे हे की आता आपण “आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ” येतो (इब्री 10:22).
कार्डिनल बेलारमिनच्या रोमने प्रतिवाद केला, “”अरेरे, हे शिकवा, म्हणजे जे यावर विश्वास ठेवतील ते स्वैराचार आणि नियमशास्त्रविरहित (antinomianism) असे जीवन जगतील.” पण त्याऐवजी इब्री लोकांस पत्राचा तर्क ऐका. या खात्रीचा आनंद चार गोष्टींकडे नेतो: पहिले, ख्रिस्त येशूवरच आशा ठेवून केलेल्या आपल्या विश्वासकबुलीबद्दल अढळ निष्ठा (वचन 23); दुसरे, आपण एकमेकांना “प्रीती आणि सत्कर्मांसाठी” कसे प्रवृत्त करू शकतो याचा जाणीवपूर्वक विचार करणे (वचन 24); तिसरे, उपासना आणि आमच्या सहभागाच्या प्रत्येक पैलूंमध्ये इतर ख्रिस्ती लोकांबरोबर सातत्याने सहभागिता ठेवणे (वचन 25a); चौथे, त्याच्या परत येण्याची वेळ अधिकाधिक जवळ येत आहे हे लक्षात ठेऊन आपण एकमेकांना ख्रिस्ताकडे पाहत राहण्यासाठी आणि त्याच्याबरोबर विश्वासू राहण्यासाठी उत्तेजन देतो (वचन 25b).
चांगले फळ चांगल्या झाडालाच लागते; या उलट नसते. आपण कर्मांमुळे तारण पावत नाही; तर आपण सत्कर्मे करण्यासाठी तारलेले आहोत. खरंतर, आपण देवाची हस्तकृती आहोत (इफिसकरांस 2:9–10). म्हणून येशू ख्रिस्ताचे एकदाच झालेले कार्य व त्यातून उत्पन्न होणारी ही पूर्ण खात्री, आपल्याला नैतिक किंवा आध्यात्मिक उदासीनतेकडे नेण्याऐवजी, देवाच्या गौरवासाठी व त्याच्या प्रसन्नतेसाठी जगण्यास सर्वांत सामर्थ्यशाली प्रेरणा देते. शिवाय, तारणाची ही पूर्ण खात्री या वस्तुस्थितीमध्ये रोवलेली आहे की स्वतः देवाने हे सर्व आमच्यासाठी केले आहे. त्याने ख्रिस्तामध्ये आपले हृदय आम्हावर प्रकट केले आहे. पित्याने आपल्यावर प्रेम करावे म्हणून ख्रिस्ताचा मृत्यू आवश्यक नव्हता; पित्याने आपल्यावर प्रेम केले म्हणूनच ख्रिस्त मरण पावला (योहान 3:16). तो आपल्या पुत्रामागे दुष्ट अभिप्राय घेऊन लपलेला नाही—जणू पुत्राने बलिदान दिले नसते तर तो आपल्यावर अनिष्ट करणार होता! नाही, हजार वेळा नाही!—पिता स्वतः पुत्राच्या प्रेमात व आत्म्याच्या प्रेमात आपल्यावर प्रेम करतो.
ज्यांना तारणाची अशी खात्री आहे ते संतांकडे किंवा मरीयेकडे धाव घेत नाहीत. जे फक्त येशूकडे पाहतात, त्यांना दुसरीकडे पाहण्याची गरजच उरत नाही. त्याच्यामध्ये आपण तारणाची पूर्ण खात्री उपभोगतो. “सर्वात खोटा सिद्धांत” म्हणे? जर ते पाखंडी मत असेल, तर या सर्वांत धन्य “खोट्या मताचा” आनंद मला घेऊ द्या! कारण हे प्रत्यक्षांत देवाचेच सत्य आणि कृपा आहे!
हा लेख मुळात टेबलटॉक या मासिकात प्रकाशित झाला होता.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


